आमच्या दुर्दवाला अंत नव्हता. बस कुठे चालली होती कळत नव्हतं. एका ठिकाणी एका बिल्डिंग समोर बस थांबली. तिथं फक्त एकच रूम होती.आईला तिथं उतरवलं गेलं. माझा तर धीरच सुटला. म्हणजे आता आई पण माझ्या जवळ नसणार होती. मी त्यांना खूप विनंती केली की मला आई सोबतच ठेवा. ते म्हणाले असं काही नसतं कारण बेडच नाहीये. तुला दुसरी कडे जावं लागेल. शेवटी माझी हरलेली, दुःखी आई तिथं उतरली. आता तिची आणि माझी चवदा दिवसांनी भेट होणार होती.
मला घेऊन बस पुढे निघाली. गावाच्या बाहेर एक पंचवीस तीस माळ्यांची बिल्डिंग होती. त्यात चवदाव्या मजल्यावर एक रूम रिकामी होती. ती मला दिली गेली.
आवश्यक पेपर वर्क पूर्ण केलं गेलं.माझ्या हातावर शिक्का उमटावंला गेला.सूचना दिल्या गेल्या.
हे बघ. रूमची सफाई तुलाच करायची आहे. तिथं झाडू, पाणी सगळं आहे. सकाळी आठ वाजता तुला चहा नाश्ता दिला जाईल. अकरा वाजता जेवण. संध्याकाळी पाच वाजता चहा बिस्कीट आणि आठ वाजता जेवण. हे सगळं रूमच्या बाहेर ठेवलं जाईल. चवदा दिवस रूमच्या बाहेर यायचं नाही. कोणाशी बोलायचं नाही. आणि दारावर तीन नंबर लिहिलेले आहेत. जर काही गरज लागली तरच त्या नंबर वर कॉल करायचा. कळलं ना. चल जा आता.
आणि मी माझ्या रूमवर आले. हॉस्टेल म्हणून बांधलेली ती बिल्डिंग पेशंट ठेवण्या साठी घेतली होती. आठ बाय दहा ची ती सिंगल रूम टॉयलेट बाथरूम अट्याच होती.
आत मध्ये प्रचंड घाण, कचराच कचरा होता. तो तिथं अगोदर राहून गेलेल्या पेशंटने केलेला होता. मी हातात ग्लोव्हज घालून तिथल्या झाडूने सगळी रूम धुऊन घेतली. गाडीवर चादर टाकली. तिथं लाईट पंखा होता. उशीवर डोकं ठेऊन पडले.
काही सुचत नव्हतं. कधी एकटी राहिलेलीच नव्हते. भीती वाटत होती.दिवस सुरु झाले. माझ्या मजल्यावर फक्त मीच एकटी. खिडकीतून फक्त खाडी दिसत असे. सकाळी सूर्य दिसायचा. बाकी काहीच हालचाल नाही. मी गाणं ऐकत बसायची. कधी देवाचा जप करत बसायची. रूम मधल्या रूम मध्ये फेऱ्या मारायची. कधी योगासन करायची.
हा, मी सोबत एक वही, पेन आणला होता. वेळ जाता जात नसे. मग मी माझ्या मनाने वेगवेगळ्या कल्पना करून चित्रं काढत बसे. तर कधी काही काही लिहीत बसे.
आम्हाला जेवण देणारे, जेवणाचं पाकीट दूरवर ठेऊन जात. माझ्याशी कोणी बोलतच नसे. सगळे घाबरूनच असतं.
न कळत कोरोना माझं रक्षणच करत होता म्हणा ना. नाहीतर एकट्या दुकट्या पंचवीस वर्षाच्या मुलीला असं चवदा दिवस एकटं राहणं शक्य तरी होतं का. तेही माणसांपासून . तसं या आजाराने मला काय नाही दिलं, आपलं कोण परकं कोण यांची ओळख करून दिली. ज्यांचा माझा काहीच संबंध नव्हता असे कितीतरी अनामिक लोक माझं जेवण, चहा, नाश्ता बनवत होते. माझ्या साठी झटत होते.
एकदा पोटात प्रचंड दुखायला लागलं. काय कराव सुचेना. आणि लक्षात आलं की अरे आपण दोन महत्वाच्या गोष्टी विसरलो. एक म्हणजे पोटदुखायच्या गोळया आणि दुसरं म्हणजे सॅनिटरी पॅड. मग त्या नंबर वर फोन करण्याचा प्रयत्न केला. बेल वाजायची पण कोणी उचलायचंच नाही. शेवट पर्यंत कोणी आलंच नाही. कसे बसे हातरुमाल वापरून मी दिवस घालवले. खूप तगमग व्हायची.आईची खूप आठवण झाली. पण पर्यायच नव्हता.
या काळात कोणी नाही पण माझ्या मोबाईलने मला धोका दिला.काय झालं कुणास ठाऊक. पूर्णपणे बंद पडला.क्षणभर काहीच सुचलं नाही. सगळ्या जगाशी संपर्क तुटल्या सारखं वाटलं. सगळ्या पृथ्वीवर मी एकटं असल्या सारख्या फिलिंग यायला लागल्या. काहीवेळाने मी अत्यंत स्थिर आणि शान्त झाले. वाटलं मोबाईल बंद पडला बरंच झालं. नाहीतरी मला किती दिवस झाले कोणाचाच फोन येत नव्हता. जगाच्या दृष्टीने आम्ही गुन्हेगार होतो. न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत होतो.
पण अजूनही वाटत फक्त एक जरी, कोणाचा तरी सहानभूतीचा फोन आला असताना तर हा वनवास कितीतरी सुसह्य झाला असता. पण तसं झालंच नाही. पण आता मीच समजूत करून घ्यायला लागली. अग, फोन खूप केले असतील पण वेडाबाई तुझा फोनच खराब नव्हता का.
मग मी अजूनच मुक्त झाले. कधी वाटायचं आपण सगळ्या कुटुंबा सोबत आहोत आणि मग त्या दिवसाचं जेवण खूप छान लागायचं. प्रचंड गरम व्हायचं तेंव्हा मी पोहोण्याची स्वप्नं पाहायची. आणि सकाळ संध्याकाळ खिडकीत उभं राहून पक्षासारखं सगळं आभाळ फिरून यायची.
हळू हळू दिवस संपायला लागले. नशीब मी आजारी पडले नव्हते. आई बाबांची काय परिस्थिती होती. माहित नव्हतं.
शेवटी जाण्याचा दिवस उजाडला. मला आदल्या दिवशीच सांगितलं होतं. की उद्या घरी जायचं आहे. तयारी करून ठेव. मग मी मुख्य म्हणजे रूम चांगली स्वच्छ करून ठेवली. या साठी की माझ्या सारखा त्रास कोणाला होऊ नये.
शेवटी संपलं एकदाच. बॅग घेऊन मी बस मध्ये बसले. रस्त्याने परत जातांना आईला घेतलं. मास्क लावलेली माझी प्रेमळ आई. थोडी खचली होती. थकली होती. पण अलगद हलकंसं हसली. असं वाटत होतं तिच्या एकदम कुशीत शिरावं. पण किती विचित्र अवस्था होती. तोंडाला मास्क बांधून आम्ही भेटत होतो.
बाबांची काही खबर?
तिने विचारलं.
माझा मोबाईल बंद आहे.
मी सांगितलं. आता फक्त त्यांचीच काळजी होती.कसे असतील ते कुठे असतील.
तिने विचारलं.
माझा मोबाईल बंद आहे.
मी सांगितलं. आता फक्त त्यांचीच काळजी होती.कसे असतील ते कुठे असतील.
गाडी बिल्डिंग जवळ आली. पून्हा खिडक्यांमधून माणसं डोकावली. आम्ही कोणाच कडे लक्ष न देता वर आलो.लॅच ने दरवाजा उघडला आणि आत येवून सोफ्यावर मटकन बसलो. डोळे मिटून शांतपणे बसून राहिलो. तेव्हढ्यात आवाज आला.
चहा घेणार.
आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना. चक्क माझे लाडके बाबा माझ्या समोर हातात चहाचा कप घेऊन हसत उभे होते. जणू म्हणत होते बघ मी आलोय परत.
आणि मी वेडी, कोरोनाचे सगळे नियम मोडून त्यांच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. आणि आश्चर्य म्हणजे माझे शूर बाबा पण रडत होते.
( समाप्त )
लेखक: दत्ता जोशी
लेखक: दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा