चवदावा मजला चवदा दिवस ( भाग दुसरा )

कोरोनाच्या काळातील एक जीवघेणा अनुभव


चवदावा मजला चवदा दिवस ( भाग दुसरा )


ऍम्ब्युलन्स गेल्यावर माझा धीर सुटला.मी आईच्या गळ्यात पडून मनसोक्त रडायला लागली. भरपूर रडून घेतलं. सुन्नपणे बसून राहिली.

थोड्यावेळाने फोन वाजला. त्या भयाण शांततेत तो आवाज एकदम कर्कश्य वाटला . मी एकदम दचकली. यांत्रिकपणे फोन उचलला. सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन होता.

" काय ग, तूझ्या बाबांना बरं नव्हतं. तुम्ही लोकांनी ही गोष्ट का लपवून ठेवली. तुम्हाला कळतंय का की तुम्ही किती लोकांचे जीव धोक्यात घातले आहेत ते. "

" पण काका, माझे बाबा कधीच बाहेर जात नव्हते, आणि त्यांना तशी लक्षण पण काहीच दिसत नव्हती. फक्त अधून मधून एक दोन तास ताप यायचा म्हणून कालच टेस्ट केली. "

" गप्प बस. जास्त बोलू नको. तुमच्या घरात तू जरा जास्तच हुशार आहेस. पण तुला माहित आहे का आता आपली बिल्डिंग सील केली जाईल.सगळ्या आरोग्य सेतू वर रेड सिग्नल येतोय. आपल्या बिल्डिंगच नाव खूप खराब झालंय.  हे सर्व तुमच्या मुळे झालंय. "

नंतर एक दोन फोन आले. पण त्यात एकच सल्ला असायचा की हा आजार आम्ही लपवायला नको होता. शेवटी शेवटी तर मी फोन घेणंच बंद करून टाकलं.

मला तर काहीच सुचत नव्हतं.मैत्रिणीला फोन केला. तो वाजत राहिला, पण कोणी उचलतच नव्हतं.

थोड्या वेळाने काही लोक ट्रक मधून बांबू घेऊन आले. बिल्डिंग मध्ये येण्याचे सगळे रस्ते त्यांनी बंद करून टाकले. आमच्या नावासकट माईक वरून अनाऊन्समेंट करत त्यांनी नागरिकांना बिल्डिंग सील केल्याच सांगून सूचनांच पालन करायला सांगितलं.

अजूनही काही लोक खिडकीत उभं राहून आमच्या घराकडे बघत होते. काहीतरी आपसात बोलत होते.

माझ्या डोळ्यासमोरून मात्र माझे बाबा हलतच नव्हते. कुठं नेलं असेल त्यांना. झाले असतील का ऍडमिट. त्यांची काळजी घेतली जाईल ना व्यवस्थित आणि मुख्य म्हणजे ते परत येतील ना. मी आणि आई, दोघीच घरात एकट्या. सुतक पडल्या सारख्या सुन्न झालो होतो. नुसत्याच बसून होतो. भांडी घासायची राहिली होती. तशीच पडली होती. काहीच करावंसं वाटत नव्हतं.

तेव्हढ्यात पुन्हा फोन वाजला.
अनोळखी नंबर.
" हॅलो, मी मुन्सिपल कोविड सेंटर मधून बोलतोय. तुम्हाला चवदा दिवसांसाठी विलगीकरण करण्यात येणार आहे. तुम्ही उद्या बॅगा भरून तयारी करून ठेवा. दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला न्यायला बस येईल. "

बापरे. हे काय नवीनच अजून. आमचा तर धीरच सुटला. पण परिस्थितीला सामोरं जाण भाग होतं. रडत रडत मी सामान गोळा करायला लागले. आठवून आठवून चवदा दिवसाचं आवश्यक सामान सोबत घ्यायच होतं. टूथपेस्ट, साबण, टूथ ब्रश, चादर, टॉवेल आणि अजून जे जे आठवेल ते ते मी भरत होती. झालं एकदाच. दुसऱ्या दिवशी दुपारी अँब्युलन्स आली. पुन्हा एकदा सगळ्या खिडक्यांमध्ये डोकावणारी डोकी दिसली. आमच्या बॅगा घेऊन आम्ही अँब्युलन्स मध्ये बसलो. आणि आमचा चवदा दिवसाच्या विलगीकरणाची सुरुवात झाली.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all