चौकट...

भावस्पर्शी कथा

"अवनी बाळा, तुला ही समाजाची चौकट भेदावीच लागेल?"

"पण आई, मला खूप भिती वाटतीये.."

"काळजी करू नकोस.. मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहिली.."

"आई, केवळ तुमचा आधार आहे म्हणून मी इथपर्यंत पोहचू शकले.. नाहीतर मला माहीत नाही आज मी कुठे असते??"

राधाबाईंनी सूनेचा हात हाती घेतला आणि त्या भूतकाळात गेल्या..

आपला एकुलता एक मुलगा आशिष आणि अवनीचा प्रेमविवाह.. राधाबाईंनी आशिषला पतीच्या निधनानंतर एकटीने तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले होते.. अवनी सुन म्हणून घरात आली आणि घराचे गोकुळ झाले.. कारण गोड नातू नील त्यांना वर्षाच्या आत हाती मिळाला होता..

एकेदिवशी ऑफिस वरून येताना काळाने घाला घातला आणि आशिष सगळ्यांना सोडून कायमचा निघून गेला..

अवनी तर सुन्न झाली होती.. तिला काहीच कळत नव्हते.. राधाबाई नीलकडे लक्ष देत होत्या.. त्यांना माहिती होते, आपण जर खचून गेलो तर नील आणि अवनी चे काही खरे नाही.. पतीच्या विरहाचे दु:ख आणि आता मुलाचे..!! परंतु पर्याय नव्हता..

थोड्या दिवसांनी अवनी नील मुळे, त्याच्या बालक्रिडांमुळे सावरू लागली...

अवनीचा मूड पाहून राधाबाई म्हणाल्या, 'किती दिवस अशी बसून राहणार?? या घराची चौकट तुला पार करावीच लागेल.. आपल्या लेकरासाठी.. नील साठी... आणि आशिषला देखील आवडत नसेल तू अशी भित्री, खचलेली अवनी...'

'पण आई..?'

पण बिन काही नाही.. शेजारच्या दादाने ज्या नोकरीच्या मुलाखती बद्दल सांगितले आहे, तिथे तू जाणार आहेस... राधाबाई म्हणाल्या..

'पण आई, मला काहीच आठवत नाही.. मी या मुलाखतीला कशी सामोरे जाऊ..'

"अजून एक आठवडा आहे.. तू तयारी कर.."

बघता बघता आज नोकरीला लागून अवनी ला एक वर्ष झाले होते.. नील देखील आता आजी बरोबर बोबड्या बोलांमध्ये 'शुभमं करोति..' शिकला होता...

या वर्षातच ऑफिस मधील अजितशी अवनीची ओळख झाली होती.. परंतु समाज, जातिव्यवस्था यामुळे अवनी आपल्या योग्य निर्णयापर्यंत पोहचू शकत नव्हती.. शिवाय राधाबाईंना एकटे सोडून दुसरा संसार सुरू करणे मनाला पटत नव्हते.. कारण अवनी वर त्यांचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता..

एकेदिवशी अजित अवनी घरी नसताना घरी आला आणि राधाबाईंना म्हणाला..

'मी तुम्हांला तुमची सुन साॅरी तुमच्या लेकीचा हात मागायला आलो आहे..'

राधाबाईंनी सगळी चौकशी केली आणि त्या आनंदाने तयार झाल्या..

अवनी ला लग्नासाठी तयार करायची जबाबदारी देखील घेतली..

ज्याची आज चर्चा सुरू होती आणि अवनी ला भिती वाटतं होती.. समाजाची.. समाजाने निर्माण केलेल्या चौकटीची.. अशी चौकट की जिच्या पुढे फक्त अंधार आहे..

राधाबाईंनी अवनी ला समजावले,

"सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नीलला वडीलांचे प्रेम मिळेल.. एकटीने त्याचा सांभाळ करणे अशक्य आहे.. मी अशी किती दिवस आहे.. आज आहे तर उद्या नाही.. आजूबाजूचे, शेजारी पाजारी, नातेवाईक काय म्हणतील? बोलतील थोडे दिवस आणि जातील विसरून.. प्रश्न तुझ्या संपूर्ण आयुष्याचा आहे.."

"तू योग्य निर्णय घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण कर.. जुनाट विचारांची जीर्ण झालेली चौकट कायमची दूर कर...

अवनी च्या चेहऱ्यावरील हास्यामध्येच तिचे उत्तर दडलेले






होते..

©® आरती संभाजी सावंत