चौकटीच्या बाहेर

एका मुलाच्या मनाची व्यथा
सुयशने स्वतःला खोलीत बंद करून घेतले आणि तो आरशासमोर जाऊन उभा राहिला. आरशात स्वतःला न्याहाळताना त्याने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला एकदा तेव्हा चेहर्‍यावर असलेली ती दाढी त्याला त्याच्या पुरूष असण्याची साक्ष देत त्याच्याकडे पाहून हसतं आहे असेच वाटले सुयशला.

     'बस्स! अजून किती दिवस हे असचं चालणार? हा चेहरा घेऊन फिरताना एक मुखवटा घेऊन फिरतोय असं वाटतंय मला. हे असं आतल्या आत घुसमटत राहून मी अजून नाही जगू शकणार. बाबांच्या
आनंदासाठी, त्यांच्या सो कॉल्ड सामाजिक प्रतिष्ठेसाठी मी इतक्या दिवसांपासून त्यांच्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला पण हे असं जगताना माझी खूप घुसमट होतेय. हे माझं माझ्या अस्तित्वाशी असलेलं द्वंद्व मला अजून नाही झेलता येणार. खरंच मी इतका वेगळा आहे का सगळ्यांपेक्षा? ', मनातल्या विचारांशीसंवाद साधतं सुयश पुन्हा एकदा आरशात पाहतो.

अगदी सगळ्या पुरूषांसारखाचं पुरूषी चेहरा. नुकतेच वीस वर्षे पूर्ण झाल्यावर आलेली ती मिशी, दाढी आणि पौरूषत्वाच प्रतीक असलेला पँटच्या आतमध्ये असलेला तो अवयव सगळं अगदी सारखं होतं त्याच्या बाबांसारखं पण मनाचं कायं? ते मन स्वतःला पुरूष म्हणून पहायला आणि स्वीकारायला तयार नव्हतं अजूनही. हो सुयश एक मुलगा होता, एक पुरुष पण वयात आल्यापासून त्याला त्याच्या देहाची आणि मनाची सांगड घालताना अवघड चाललं होतं. देहाने पुरूष पण सुयश मनाने एक स्त्री होता.  वयाच्या सोळाव्या - सतराव्या वर्षी इतर समवयस्क पोरांसारखं मिशीवर ताव देण्याच्या वयात सुयशला मात्र आईला आरशात शृंगार करताना पहायला आवडायचा. तो तासनतास आईला न्याहाळत रहायचा. आई कपडे घडी करताना तिच्या प्रत्येक साडीवरून हात फिरवायचा. आपण ही साडी नेसावी असं वाटायचं त्याला. एकदा आई आणि बाबा घरी नव्हते हेच निमित्त साधून सुयशने आईच्या कपाटातील एक त्याला आवडणारी साडी काढली आणि स्वतःच्या अंगावर अगदी जमेल तशी गुंडाळली तेव्हा त्या साडीत स्वतःला पाहून त्याला खूपच आनंद झाला. आई करायची तसा सगळा साज शृंगार त्याने करून पाहिला पण त्यावेळी आपण काय करतोय याची समज नव्हती म्हणूनचं साडी घेऊन गोल गिरकी मारताना आणि आरशात पाहून हसताना त्याला खूप आनंद वाटायला लागला होता पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. आई बाबा घरात आले आणि काही कळायच्या आत सुयशच्या बाबांनी त्याच्या अंगावरची साडी फेडून त्याच्या गालांवर चपराक दिली ठेवून. बिचारा सुयश त्याला काहीच कळत नव्हते.

"हे असे काही पुन्हा करायचे नाही लक्षात ठेवं. मला या घरात हे असले प्रकार चालणार नाहीत. निलिमा तुझ्या मुलाला नीट समजावून सांग तो पुरुष आहे बाई नाही म्हणून आणि समाजात त्याच्या वडिलांची एक प्रतिष्ठा आहे, याच्या या असल्या वागण्याने माझ्या प्रतिष्ठेला तडा गेलेला मला चालणार नाही. ", त्या दिवशी बाबा काय बोलले किंवा त्यानंतर आईने काय समजावले यापेक्षा साडी घालून त्याने नेमकी अशी कुठली चूक केली होती हे त्याला कळत नव्हते. एकीकडे वय वाढत चालत होते तसे मनांत उमलू पाहणाऱ्या त्या स्त्री सुलभ भावना ही रोज नव्याने बहरत चालल्या होत्या.

घरातील वडिलांचा धाक, आईचे वडिलांसमोर घाबरून असते त्यामुळे त्याला त्याच्या मनातील भावना व्यक्त करायला अवघड चालले होते पण वाढत्या वयाबरोबर एक गोष्ट त्याच्या लक्षात आलेली की, देह पुरूषी असला तरी मनाने आपण एक स्त्री आहोत म्हणून. असा पुरूषी देह घेऊन जगताना त्याला रोज घुसमट झाल्यासारखे वाटायला लागायचे अलिकडे. शर्ट पँटमध्ये श्वास गुदमरायला लागला होता सुयशचा. आज मात्र एका कार्यक्रमात गेल्यावर त्याच्या बोलण्यावरून कोणीतरी त्याची थट्टा केली तेव्हा घरी आल्यावर बाबांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. इतके दिवस वडिलांची मर्जी राखूनही आज वडिलांनी शरीरावर आणि सोबत मनांवर केलेला शब्दांचा वार सुयशच्या
चांगलाच जिव्हारी लागला होता. इतके दिवस डोळ्यात असणारी ती आसवं आता सुयशला शुष्क वाटायला लागली. सुयशने मनाशीचं एक निर्णय घेतला तेव्हा आरशात त्याने स्वतःला पाहिले. तो मुखवटा कुठेतरी गळून पडतोय असे जाणवले त्याला.

बाथरूममध्ये जाऊन सुयशने तोंडावर थंड पाण्याचे सपासप वार केले तेव्हा मनातील विचार ही अगदी शांत झाले. सुयशने बाहेर येऊन त्याची बॅग काढली. कपाटातून दोन कपडे, त्याच्या आईचा फोटो बॅगेत भरला.
फोटो काढताना त्याने आईच्या कपाटातून मागे चोरून स्वतः जवळ ठेवलेली ती साडी त्याच्या अचानक नजरेस पडली. सुयशने ती साडी कपाटातून बाहेर काढून त्याची घडी मोडली. आरशात जाऊन स्वतः च्या अंगावर त्या साडीचा पदर टाकताना एखाद्या नववधूने सुखाने मोहरावे तसाच सुयश त्या पदराला खांद्यावर घेऊन मिरवताना मोहरतं चालला होता क्षणोक्षणी.

सुयशने अलगदं साडीची घडी मोडली, आणि ती साडी स्वतःच्या शरीराभोवती गुंडाळली तेव्हा आज पहिल्यांदाच त्याला इतके वर्षानंतर मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटले. एकवार आरशात स्वतःवर नजर टाकली सुयशने तेव्हा आज त्याला त्याचे अस्तित्व अगदी स्पष्टपणे दिसले. बॅग हातात घेऊन सुयश बाहेर हॉलमध्ये आला तेव्हा त्याच्या वडिलांच्या हातातून टीव्हीचा रिमोट खाली पडला.

"निलिमा तुझ्या मुलाला सांगितले ते समजतं नाही वाटतं. याने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवायची ठरवलेले दिसतेय. याला आज मी जिवंत सोडतं नाही", असे म्हणून सुयशला आईला हाक देत त्याचे वडील धावून आले अंगावर तसा सुयशने त्यांचा हात पकडला इतक्यात त्याची आईही स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि सुयशकडे पाहू लागली.

" बाबा आता नाही. इतके दिवस मी तुम्हाला हवे तेच करत आलो आहे पण इथून पुढे मला हे असं दुहेरी जगता येणार नाही आणि म्हणूनचं मी आता मला हवं तसं जगायचं ठरवलं आहे. तुमच्या घरात मला असे जगता येणार नाही म्हणून मी हे घर सोडून चाललो आहे." , आयुष्यात पहिल्यांदाच सुयश बाबांशी एवढं बोलला होता धीराने.

"हो का? बाहेर जाऊन काय करणार आहेस? त्या लोकांसारखं टाळ्या वाजवणार आहेस का? अरे लोक तुला सुखासुखी जगू देणार नाहीत? इतकं सोप्प नाही, तु ज्या जगण्याचा विचार करतोय त्या लोकांना समाजात स्थान नाही. ", सुयशचे वडील तावातावाने बोलतं होते.

"बाबा मला मी कायं करणार आहे ते नाही माहित पण मला अजून आता या देहात अडकून राहता येणार नाही. माझं स्त्रीत्व मला खुणावतेय आणि या समाजात आम्हाला स्थान नसेल तर मी निर्माण करेन माहित आहे तेवढं सोप्प नाही ते पण आम्हाला ही त्या देवानेच जन्म दिला आहे. आमचा आकार त्यानेच घडवला आहे मगं हा फरक कशासाठी?

मला माहित आहे तुम्हाला आणि तुमच्या समाजाला हे माझे बोलणे कळणारं नाही पण माझा निर्णय झाला आहे आता, मी माघार घेणार नाही. माझं अस्तित्व घेऊन मला जगायचं आहे. येतो मी ", आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन सुयशने आज चौकटीच्या बाहेर पाऊल टाकले होते एका नव्या वाटेवर जाण्यासाठी.

इथून पुढे त्याचे आयुष्य कुठले वळण घेणार आहे हे त्यालाही माहित नाही परंतु आता त्याने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती.
त्याला मुखवट्याच्या मागे असलेला त्याचा चेहरा गवसला होता.

                    **समाप्त **