चौकटी बाहेरचं जग

सोबत आपल्या माणसांची

आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे.ती कशातच कमी नाही.मी असं मुळीच म्हणणार नाही की ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कारण मग आपण स्वतःच पुरुषाला जास्त महत्व  देण्यासारखं होईल, नाही का?

पण अजूनही काही ठिकाणी स्त्रियांसाठी काही नियम आहेत, काही बंधन आहेत.अशी एक चौकट आहे जिच्या बाहेर तिला पाऊल टाकता येत नाही. कधी कधी तिची ईच्छा असून सुद्धा तिला काही गोष्टी नाही करता येत आणि तिची स्वप्न तिला कुठेतरी गुडूप होतांना दिसतात,ती स्वप्न पूर्ण होण्याआधीच कुठेतरी हरवली जातात.

मग यात स्त्री कमी पडते का? तिचा आत्मविश्वास कमी पडतो का? तिला तिचे निर्णय घेता येत नाही का? ती घाबरते का? असे असंख्य प्रश्न उभे राहतात.

पण खरच जसं पुरुषांच्या यश मिळविण्याच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. तसाच पाठिंबा त्या स्त्रीला घरच्या लोकांचा,आपल्या माणसांचा म्हणजेच  आई-वडील, बहीण-भाऊ, सासू-सासरे, नवरा, मुलगा या सर्वांचा  मिळाला तर, किती बरे होईल नाही का?

स्त्री सगळं काही करू शकते, ती खंबीर आहे, तिच्यात सामर्थ्य आहे,ती स्वावलंबी आहे. पण जेव्हा आपली माणसं तिच्या मागे खंबीरपणे उभी असतात ना तेव्हा तिला त्या चौकटीच्या  बाहेरचं जग अधिक सुंदर दिसतं, किती तरी गोष्टी आहेत ज्या ती मग बिनधास्तपणे  करू शकते आणि तिच्या स्वप्नांना आकार देऊ शकते, तिच्या पंखांना बळ मिळालं की नक्कीच ती आकाशात ऊंच भरारी घेऊ शकते.

धन्यवाद! 

कल्पना सावळे