Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

"चौकट..अनोख्या नात्याची.."

Read Later

"समिधा अगं तुला राग नसेल येणार तर एक बोलू का?"


"बोला की, पण राग येणार नाही हे मी आधीच कसे सांगणार ना आई? आता तुम्ही काय बोलणार आहात हे आधीच थोडी माहिती आहे मला. पण बोला, मनात काही गोष्टी ठेवून गैरसमज वाढण्यापेक्षा बोलून टाका."


"तू सारखं सारखं काय ग विनयला काम सांगत असतेस.? तो बिचारा ऐकतो म्हणून आजकाल तुझे जास्तच वाढत चालले आहे. तो आमच्यासमोर जर ही सगळी कामे करतो तर आमच्या पाठीमागे काय काय करत असेल याचा अंदाजच बांधू शकत नाही आम्ही."


"आई प्लीज. उगीच माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ नका हो काढू.आणि वेगळं असं काय काम सांगितलं मी त्यांना? "

"माझे हात पीठाने भरले होते म्हणून पाण्याचा ग्लास भरून मागितला. काल थोडा उशीर झाला स्वयंपाकाला त्यात बाबांना वेळेत जेवायला लागतं म्हणून त्यांनी लसूण सोलायला मदत केली. त्यात बिघडलं कुठे पण?"

"धुणी, भांडी तर नाही ना करायला सांगितली तुमच्या लेकाला मी."


"तुम्ही आजकालच्या पोरी नवऱ्याला काय समजता काय माहिती? आमच्या काळात पुरुष लोकं किचनमध्ये फिरकायचे सुद्धा नाहीत. ही अशी कामं तर खूप दूर राहिली."


"अहो पण तुमच्या काळात हे असं नव्हतं. त्यात माझा काय दोष??"

"आणि बरं झालं आता तुम्हीच विषय काढलात. काहीही झालं, कसंही वागलं की लगेच तुमच्या काळाची उदाहरणं द्यायलाच हवीत का?? "

"सारखी तुलना. कंटाळा आला मला आता या सगळ्याचा. "


"तुम्ही आजकालच्या मुली काही ऐकून घेणार आहात का? माझंच मेलीचं चुकलं. मलाच अक्कल नाही. तुझ्याशी बोलायला आले. तरी तुला आधीच विचारलं होतं मी...राग येणार नसेल तर बोलते म्हणून. सासूबाई थोड्या चरफडतच बोलल्या."


"आणि मीही राग येणार नाही असं ठामपणे सांगितलं नव्हतं." समिधा म्हणाली."तसंही तू काय बोलून देणार आहेस का मला.? मीच जाते बाहेर. आता समजतंय लग्न झाल्यापासून विनय इतका कसा बदलला ते. तू त्याला बोलूच देत नसशील काही. आणि त्याला काही तुझ्याशी वाद घालताच येत नसेल. माझी शिकवणच नाही मुळी ती."

बडबडतच सासूबाई बाहेर जायला म्हणून उठल्या.


"थांबा आई." हातातील काम सोडून समिधाने सासूबाईंना थांबवले.

"आज न राहवून तुम्ही मला बोलायला भाग पाडलंच शेवटी."


"मला एक सांगा आई, निशा ताईंच्या नवऱ्याने त्यांना ही अशी मदत केली तर माझ्या जावयाचा माझ्या लेकीवर खूप जीव आहे. अगदी फुलासारखं जपतात तिला."

"का मग मुलाने सुनेला फुलासारखं जपलं, तिला स्वेच्छेने कामात मदत केली तर काही बिघडणार आहे का?"


"माझी लेक नोकरी करते, ती घरी यायच्या आत सासूचा स्वयंपाक तयार असतो. खूप समजून घेते सासू तिला. अगदी समजदार सासर मिळालंय माझ्या लेकीला. हो ना आई."

"मग ह्या बाबतीत आमच्या दोघींत का तुलना केली जात नाही.?? माझ्या लेकीला तिची सासू समजून घेते मग आपणही आपल्या सुनेला समजून घ्यावं. असं नाही का ओ मनात येत तुमच्या. ??"


"माझा स्वयम् लहान होता. त्यावेळी सुध्धा नाही आलात तुम्ही माझ्या मदतीला. आणि निशा ताईंच्या डिलिव्हरीसाठी पंधरा दिवस आधीच तिकडे जावून राहिलात. का आई असं? "

"दोन्ही मुलं तुमचीच ना.? मग लेकीकडे राहायला चालतं तुम्हाला पण लेकाच्या घरी का नाही आई? शहरी वातावरणात नाही करमत मला असं सांगून नेहमी टाळता इकडे यायला. आल्या तरी दोन दिवसाच्या वर थांबत नाहीत. मग निशा ताईंकडे कसं मॅनेज करता तुम्ही? "


"स्वयमला आजही मी पाळणाघरात ठेवून ऑफिसला जाते. तेव्हाही नोकरी करायची काय गरज आहे ? मुलाकडे लक्ष द्यावं. म्हणून मला दर वेळी ऐकवता तुम्ही."

"पण तू अजिबात नोकरी सोडू नको सासूला काम पाहून नसेल बाळाला सांभाळता येत तर मी सांभाळेल त्याला हे असं लेकीला सांगता तुम्ही. मग मी कोण आहे?? "


तुमच्या मर्जिनेच तुम्ही लग्न लावून दिलं ना विनयचे आणि माझे मग? तरीही का माझ्याविषयी इतका द्वेष आहे तुमच्या मनात? आणि नवऱ्याला नावाने हाक नाही मारायची. आमच्यावेळी हे असं नव्हतं. मग तुमच्या लेकीने तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारलेली चालते तुम्हाला??" 


" बरं नशीब तुमच्या लेकीएवढंच शिक्षण आहे माझं..मीही नोकरी करते म्हणून नाहीतर तिथेही मी कशी कमी शिकलेली आहे. मला काही कळतच नाही असं बोलून पुन्हा पुन्हा मला बोलायची, कमी लेखायची एकही संधी सोडली नसती तुम्ही.""काय आहे ना आई..समाजाची रीतच आहे ती. सून कशीही असू द्या पण ती लेक कधीच होवू शकत नाही. असेच वाटते ना तुम्हाला??" 

"पण, असं नाहीये आई..सासू जर सुनेची आई झाली सून घरात आल्यापासून तर सुनदेखील तिची लेक व्हायला मग वेळ लागणार नाही."


"पण असा विचार तेव्हाच केला जावू शकेल जेव्हा लेकीला आणि सुनेला एकाच पारड्यात तोलले जाईल. थोडासा बुरसटलेल्या विचारांच्या चौकटीबाहेर येवून विचार केला ना तर नक्कीच हे शक्य होईल." 

"पण त्यासाठी प्रत्येक सासूने आधुनिक विचारांच्या चौकटीत येवून आधी हा विचार करायला हवा. तेव्हाच सून आणि मुलगी ह्या दोघींना नजरेच्या एकाच दृष्टीकोनात सामावून घेतले जाईल. आणि सुनेच्या चुका मुलीलाही लागू होतील किंवा लेकीचे गुण सूनेतही दिसतील."


"माझा निशा ताईं सोबत काहीच वाद नाही. पण प्रत्येक वेळी तुमच्या ह्या अशा वैचारिक भेदभावामुळे माझं आणि त्यांचं ट्यूनिंग कधी जुळलच नाही. मी तर म्हणेन तुमच्यातील आणि माझ्यातील गैरसमजामुळे ते जुळूच शकले नाही."


बोलता बोलता समिधाच्या अश्रूंचा बांध तुटला. ती हमसून हमसून रडू लागली. 


आज मात्र सासूला पहिल्यांदा समिधाची बाजू पटली होती.

"खरंच आपण हिच्याकडे कधी मुलगी म्हणून पाहिलेच नाही. सुनेच्या भावना कधी समजून घेतल्याच नाहीत. जुन्या विचारांची चौकट तोडून बाहेर येण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. कारण एकच सुनेला जर तिच्या मर्जीप्रमाणे वागू दिले तर एक ना एक दिवस ती आपल्या डोक्यावर मिरे वाटेल. या इतर बायकांच्या अनुभवावरून मीही माझ्या सूनेकडे त्याच दृष्टीने पाहायला लागले. आणि म्हणूनच कदाचित मीही तिच्या दृष्टीकोनातून विचारच केला नाही कधी. "


"पण आज पटतंय मला समिधाचं म्हणणं. सगळ्याच सुना वाईटच असतात असं नाही. पण परंपरागत चालत आलेल्या समाजाच्या अनुभवावरून आपण आपला दृष्टीकोन तसा बनवून घेतो. आणि तिथूनच सुरु होते सासू सुनेच्या या नात्याची नकारात्मक सुरुवात. आणि हळूहळू वैचारिक मतभेद वाढत जावून नात्याची वेगळीच चौकट तयार होते. चौकटीच्या दोन्ही बाजूला ही दोन नाती. जरी घरात, एकाच छताखाली तरी दोन दिशेला दोघींची तोंडे. आणि आयुष्यरासाठी रंगते मग वादविवाद स्पर्धा जणू."


आज समिधाने प्रामाणिकपणे तिचे मत मांडले. मनातील सारे काही भावनेच्या भरात का होईना पण बोलून टाकले. पण एका दृष्टीने ते चांगलेच झाले. 


सासूला पहिल्यांदा समिधा जवळून समजली होती. आज पहिल्यांदा सासूने सुन म्हणून नाही तर मुलगी म्हणून तिला प्रेमाने जवळ घेतले. 


सासूच्या वागण्यातील हा अनपेक्षीत बदल समिधाला खूपच सुखावून गेला. त्यामुळे नात्याची ही चौकट अधिकच मजबूत व्हायला त्यामुळे मदतच होणार होती.

ह्यावेळी दोन दिवसाच्या बोलीने आलेली सासू पहिल्यांदा तब्बल पंधरा दिवस राहून मग गावी गेली. कारण पहिल्यांदा तिला लेकाच्या घरी परकेपणा जाणवला नाही. कारण काही चुकीच्या विचारांच्या चौकटीत अडकलेली समिधाची सासू त्या चौकटीच्या बाहेर येवून विचार करायला लागली होती. नि वेगळे असे काहीही न करता स्वतःच फक्त विचार आणि दृष्टीकोन बदलल्यामुळे अगदी सहजच शहरातील त्या वातावरणात दोनच दिवसांत रुळली. 


खरंच काही गोष्टी या आपल्या स्वतःच्या मानण्यावर असतात. सासू सून म्हणजे दोन ध्रुव. पण तरीही त्यांना एकाच छताखाली राहण्याचे हे अनोखे बंधन. मग अशावेळी ही दोन टोके एकत्र येणे शक्य जरी नसले तरी अशक्य देखील नाही. हे समिधा आणि तिच्या सासूने सिद्ध करुन दाखवले. आणि नात्याची ही चौकट अधिकच मजबूत झाली.


धन्यवाद...


कथा कशी वाटली ते अभिप्राय देवून नक्की सांगा.


©® कविता सुयोग वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//