चौकट...आयुष्याची (गोष्ट छोटी डोंगरा एवढी)

थोडंसं आयुष्याबद्दल


चौकट…आयुष्याची ( गोष्ट छोटी डोंगरा एवढी.)


सुनेत्रा निरांजनामध्ये नवीन फुलवात लावताना‌ आभाला म्हणाली.

"काय ग काय झालं आहे? दोन दिवसां पासून बघतेय माझी बबडी शांत आहे." सुनेत्राने विचारलं.

आभाचं लक्ष दुसरीकडेच होतं. सुनेत्राने पुन्हा विचारलं.

" आभा कसल्या विचारात आहेस?"सुनेत्रा

" आत्या तू म्हणतेस सांग पण…जाऊदे…" आभा

" काय जाऊ दे…?" सुनेत्राने विचारलं

" काही नाही." आभा गडबडीने बोलली.

" मग तू अशी अस्वस्थ का आहेस?"
सुनेत्राने पुन्हा विचारलं.

" मी…! नाही ग." आभाने सारवासारव केली.

" आभा तुला मी लहान असताना माझ्या अंगाखांद्यावर खेळवलय. तुझं जरा काही बिनसलं तर मला तुझ्या चेह-यावरुन कळतं. सांग मला नेमकं काय झालंय?"सुनेत्रा

सुनेत्राचं हे बोलणं ऐकून आभा तिच्या कुशीत धबधबा कोसळावा तशी कोसळली. हे असं घडणार असं मघाशीच सुनेत्राच्या लक्षात आलं होतं.

"आभा काय झालं?ऑफिसमध्ये काही झालं की शशांकशी भांडण झालं?" सुनेत्राने आभाच्या डोक्यावर थोपटत विचारलं.

" आत्या शशांकशी माझं पटेल असं वाटत नाही." आभा रडतच म्हणाली.

" का ग काय झालं? सांग मला." सुनेत्रा

" आत्या शशांक आता गुन्हेगारी जगताकडे वळला आहे." आभा

" काय सांगतेस? हे कसे कळले तुला?" सुनेत्रा

"काल त्यानी मेसेज करून मला सांगितलं." आभा

"मेसेज करून सांगितलं तुझ्याशी बोलला सुद्धा नाही? तुला भेटला सुद्धा नाही?" सुनेत्रा

" त्यांनी दुबईला जातानाच मला हा मेसेज केला." आभा

" या आधी तुला जराही संशय आला नाही? त्याच्या वागण्यातला बदल दिसला नाही?" सुनेत्राने आश्चर्याने आभाला विचारलं.

"नाहीनं. इतकी भोळसट कशी झाली मी मलाच कळत नाही. मी इतकी चौकसपणे सगळ्या गोष्टींकडे बघणारी मुलगी इतकी कशी त्याच्या जाळ्यात अडकले?." आभा म्हणाली.

" म्हणजे नेमकं काय झालं? सांग मला." सुनेत्रा

"आत्या मी त्याच्यात खूप गुंतले आहे. कशी विसरू त्याला कळत नाही. त्याचा मेसेज सारखा बघून माझ्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या." आभा

" हे बघ काळ हे खूप मोठं औषध आहे. सगळं काही विसरायला लावतो. आता तू त्याला विसरायला सुरुवात कर. तू गुन्हेगारी जगतात वावरणाऱ्या माणसाशी संसार करू शकणार आहेस का? आपण सामान्य माणसं आहोत बेटा. आपल्याला तर चो-या करणा-यांपासून सुद्धा लांब राहावं असं वाटतं. हा तर चक्क गॅंगमध्ये गेला आहे. " सुनेत्रा

"मला असं वाटतं की त्याने एकदा तरी माझ्याशी बोलायला हवं होतं. विचारायला हवं होतं. मी सांगितलं असतं." आभाला बोलताना हुंदके आवरत नव्हते.

" काय सांगितलं असतंस तू ?त्याच्याशी लग्न करून त्याच्याशी त्याही परीस्थितीत संसार करशील म्हणून. असं नसतं आभा एकदा गुन्हेगारीची चटक लागलेला माणूस पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकत नाही हे सत्य आहे. जर त्याला गुन्हेगारीची चटक नसती तर तुला असं मेसेज करून पळाला नसता. तुला भेटला असता. तुला सांगितलं असतं." सुनेत्रा

"आत्या पण आता मी खूप इन्व्हॉल झालेय शशांकमध्ये. त्याला मी कशी विसरू मला कळत नाही. माझं डोकं शशांमध्ये गुंतलेल असतं. ऑफीसमध्ये मी कुठलंच काम करू शकत नाही. ऑफिसमध्ये बसलेली असते पण ऑफिसमधले नसते." आभा तिची समस्या सांगते.


"हे बघ जे काही झालं ना ते विसरून जा." सुनेत्रा.

"विसरणं सोप आहे का ग आत्या? मी खूप अस्वस्थ असते आजकाल. परवा तर मी एका क्लाइंटला मेल केला त्याच्यात फक्त शशांक… शशांक… शशांकच लिहिलं. त्यांनी शेवटी साहेबांना फोन करून तुम्ही हा असा कसा मेल पाठवला? विचारलं. ही काय तुमच्या ऑफिसची कोड लँग्वेज आहे का? म्हणजे आम्हाला या भाषेला डी कोड करायला कोणीतरी ठेवायला हवा का? जेव्हा मला साहेबांनी सांगितलं तेव्हा कळलं. तेव्हा साहेब मला रागवले. काय झालं तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही सुट्टी घ्या पण इतक्या मोठ्या क्लाइंटला तुम्ही अशा पद्धतीने कसा काय मेल पाठवलाय ? कोण आहे शशांक?" आभा

" मग तू काय उत्तर दिलं ?" सुनेत्रा

"काय उत्तर देणार आहे काहीच बोलले नाही आणि निघून आले." आभा

"हे बघ आभा शशांक आता तुझा भूतकाळ झालाय. शशांक तुझ्यात एवढा गुंतला नसेलही. तुला काय माहिती त्याला कदाचित आधीपासूनच गुन्हेगारी जगताचा आकर्षण असेल. तुझ्याशी बोलत असेल पण आतून कुठेतरी त्याची धडपड चालूच असेल. तुला कळतंय का गुन्हेगारी जग हे जितकं वाईट आहे तेवढंच त्याला ग्लॅमरपण आहे." सुनेत्रा

"आत्या गुन्हेगारी जगाला ग्लॅमर कसं असेल?" आभा

"गुन्हेगारी जगतात मिळणारा पैसा आणि गुन्हेगारी जगातील दादागिरी. आपल्याला कोणीतरी घाबरतं याची एक नशा डोक्यात असते म्हणून गुन्हेगारी जगताकडे अशीच मुले वळतात ज्यांना याचं आकर्षण आहे." सुनेत्रा


" आत्या मी खूप गुंतले आहे शशांक मध्ये." आभा पुन्हा पुन्हा हेच वाक्य म्हणत होती.

"आपण सामान्य घरातील लोक आहोत. गुन्हेगारी जगाचं वलय असणारा जावई तुझ्या आईवडिलांना चालेल?" सुनेत्रा

" बहुदा नाही.पण मी त्यांना पटवीन." आभा

" कसं पटवणार आहेस. शशांक बरोबर तुझी होणारी वाताहत आईवडील म्हणून ते बघू शकतील? शशांकने निवडलेले जग मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याच्या चौकटी बाहेरचं जग आहे. तिथे आपण नाही स्वस्थ चित्ते जगू शकणार." सुनेत्रा


" मी इथेही जगू शकणार नाही. असू दे ते गुन्हेगारीचं जग मी शशांक बरोबर आनंदाने राहीन." आभा

" तू राहशील पण त्याने तुला विचारलं का माझ्या बरोबर येशील का म्हणून ?" सुनेत्रा

" नाही." आभा

" मग त्याचा का विचार करते आहेस? त्याला तुझ्यात अडकायचं नव्हतं म्हणून एक मेसेज करून सहजपणे तो तुझ्यापासून लांब गेला. कशाला रडतेस त्याच्यासाठी?" सुनेत्रा

आभा बराच वेळ काहीच बोलली नाही पण तिच्या हातांची अस्वस्थ हालचाल सुरू होती.

" आभा तू शशांकमध्ये फक्त मनाने गुंतली आहेस की शरीराने पण गुंतली आहेस?"

शेवटी सुनेत्रा ने तिच्या मनात असणारा प्रश्न आभाला विचारलाच.

"अं…!" आभा बावचळून एवढंच बोलली.

" माझा प्रश्न कळला आहे नं तुला?" सुनेत्रा

" हो…" आभा

" मग सांग अशी गप्प का?" सुनेत्रा

" आत्या तुला सांगायला अवघड वाटतंय पण मी शरीराने पण शशांक मध्ये गुंतले आहे." आभा

" मला सांगताना अवघड वाटतंय.असं गुंतून पडताना नाही अवघडलीस?"


" तुम्हा मुलींना शिस्त, संस्कार, नैतिकता यांची बंधन नको असतात. का…तर तुम्हाला स्वातंत्र्य हवं असतं. ज्या पद्धतीने तू शशांक मध्ये शारीरिक रित्या गुंतलीस त्याचा आनंद तुला मिळाला का? क्षणिक सुखासाठी तू मध्यमवर्गीय जीवनाची चौकट मोडलीस. पटतय?" सुनेत्रा ने विचारलं

" हो" आभाने खाली मान घालून उत्तर दिलं.

"माणसाच्या आयुष्याला नेहमीच एक चौकट असावी. चौकटीचे चार कोन हे आपल्या वर घातलेलं कुंपण नाही तर आयुष्य आखीव रेखीव व्हावं यासाठी केलेलं मोजमाप आहे.
हे मोजमाप माणसाच्या उत्तम स्वास्थ्या साठी, उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त असतं. पाश्चीमात्य संस्कृतीच्या आकर्षणा पोटी तुम्ही आपल्या समाजाने दिलेली चौकट झुगारून वागता आणि फसता." सुनेत्रा शांतपणे बोलत होती पण तिच्या चेहे-यावर राग होता.

"आत्या मी काय करू मला कळत नाही सांग नं?" आभा रडू लागली.आभा पार गोंधळली होती. तिला विश्वास होता की यातून बाहेर पडण्यासाठी सुनेत्राच मार्ग सुचवू शकते.

"शशांकला विसर. ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्या मध्येच राहील. पुन्हा आपल्या आयुष्याची चौकट मोडण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्या गोष्टीत मन रमेल ते काम कर. तुझं मन आनंदी राहिलं. तरच तू आयुष्यात शशांकला विसरून पुढे जाऊ शकतील."

देवाजवळ निरांजन पेटवून सुनेत्राने हात जोडून आभाला सगळ्यातून लवकर बाहेर पडू दे अशी देवाजवळ प्रार्थना केली.आभा आपलं रडणं न थांबवता सुनेत्राच्या मांडीवर डोकं ठेवलं. सुनेत्राने हळूवारपणे आभाच्या डोक्यावरून हात फिरवला.
__________________________
## लेखिका…मीनाक्षी वैद्य