चौकट...शिक्षणाची

Shikshanachi chaukat

चौकट... शिक्षणाची

राधिकाचं जेमतेम बारावी झालं आणि घरात लग्नाचा विचार सुरू झाला. तिला समोर शिकायचं होतं. काही का असो थोडं तरी स्वतःसाठी करता यायला हवं. वेळ पडली तर कुठेतरी नोकरी लागायला हवी. एवढीच तिची इच्छा होती. पण घरचे सांगून मोकळे झाले.

“तुला शिकावंस वाटतं ना, मग लग्न झाल्यावर काय करायचं ते कर. आता मात्र आम्हाला इथून मोकळं कर.” राधिकाचे बाबा शामराव तिला बोलून गेले.

राधिकाची इच्छा असूनदेखील ती काहीही बोलू शकली नाही.
राधिकासाठी स्थळ यायला लागली. काहींना ती पसंद पडायची पण त्यांना लग्न अगदीच थाटामाटात हवं होतं. काहींना हुंडा हवा होता.

एक स्थळ चालून आलं. मुलाला पंधरा हजाराची नोकरी होती. घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी होती.

राधिकाचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला. त्यांना मुलगी पसंत पडली आणि महिन्याभरात राधिकाचं सुशीलसोबत लग्न झालं.

नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले आणि राधिका घरकामाला लागली. घरी सासू सासरे, दोन दिर, एक नणंद आणि हे दोघे इतके लोक चार खोलीच्या घरात राहत होते.

नवीन नवीन होत तेव्हा राधिकाला काही वाटायचं नाही हळूहळू तिला गोष्टी खटकायला लागल्या.

आजूबाजूला शिकत असलेल्या मुलींकडे बघून राधिकाच्या मनात शिक्षणाची इच्छा प्रबळ होत होती.
ती एक दिवस सुशीलजवळ बोलली.


“अहो मी काय म्हणते, अस नुसतं दिवसभर घरी बसण्यापेक्षा मी काहीतरी शिकू का? म्हणजे एखादा व्यावसायिक शिक्षण वगैरे. मग माझाही थोडा हातभार लागेल ना आपल्या कुटुंबाला.”


“हे बघ मी जरी होकार दिला ना तरी घरचे परवानगी देणार नाहीत.”

सुशील कामाला गेला. संध्याकाळी आल्यावर राधिकाने पुन्हा विषय काढला. 


सुशील या विषयावर त्याच्या आई वडिलांशी बोलला.
त्यांनी नकार दिला.


“घरची सून अशी बाहेर शिकायला जात नाही, हे काही जमणार नाही. तिला सांग तस स्पष्ट. जेवढं शिकली तेवढंच खूप आहे. आपल्यात लग्न झाल्यानंतर अश्या सूना बाहेर पडत नाहीत.”


सासूने स्पष्ट नकार दिला.


दिवस सरत गेले, बघता बघता लग्नाला सहा महिने झाले.
राधिकाला दिवस गेले. सगळे आनंदात होते, घराला वंश मिळणार आता आपली पिढी समोर जाणार याच आनंदात सगळ्यांचे दिवस जात होते. वारस येणार या आनंदात तिची काळजी घेतली जायची. बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि राधिकाच्या घरात लक्ष्मी आली.


सासूने नातीचं तोंड देखील बघितलं नव्हतं. तिला माहेरीही जाऊ दिलं नव्हतं आणि इथेही कुणी तिची काळजी घेत नव्हतं.


पंधरा दिवसातच राधिका काम करायला लागली. बाळाचं, घरच दिवसभर काम करून ती थकून जायची.


सुशीलही लक्ष देत नव्हता, तो त्याच्याच कामात व्यस्त असायचा. घरी आला तरी त्याच लक्ष इतरत्र असायचं.

सर्व इतकं सुरू असताना एक दिवस अचानक सुशीलचा अक्सिडेंट झाला. तो दोन्ही पायांनी अपंग झाला होता. स्वतःच्या पायावर कधीच उभा होऊ शकणार नव्हता.

या सगळ्याचा राधिकाला खूप त्रास झाला. पदरात लहानसं मुलं आणि नवरा अपंग..

राधिकाला काळजी वाटायला लागली. 


‘हे असे घरात बसून राहणार तर मग घर कस चालणार. घरचे आपल्याला साथ देणार नाहीत. मलाच आता काहीतरी करायला हवं’ ती विचार करत होती.


तिने दुसऱ्या दिवशी थेट सुशीलचं ऑफिस गाठलं.
त्याची अशी अवस्था असताना त्याच्या जागेवर मला कामावर घ्यावे अशी तिने विनंती केली.


त्यांनी तस केलही असत पण राधिकाचं तेवढं शिक्षण नव्हतं. 

राधिकाने त्यांना विनंती केली की मी माझं शिक्षण पूर्ण करेल पण तुम्ही मला आधी नोकरीवर ठेवा.

ते तयार झाले. राधिका घरी येऊन सगळ्यांशी बोलली.

कुणीही तिच्या बाजूने उभं नव्हतं. तरीही राधिका हरली नाही. तिने तिचं शिक्षण सुरू केलं. सासू तिला खूप बोलायची. पण तिने तिकडे लक्ष न देता आपले शिक्षण आणि नोकरी सुरू ठेवली.

सासूने शिक्षणाला  विरोध केला तरी ती चौकट  तिने मोडली आणि ती चौकट मोडून तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नंतर तिने स्पर्धा परीक्षाची तयारी केली. त्यातही ती पास झाली आणि राधिकाला बँकेत नोकरी लागली.


तिने चौकट पार केली नसती तर आज स्वतःच्या पायावर उभी राहु शकली नसती.


समाप्त: