चौकट भेदून बघावं जगून ..

जगण्याच्या साचेबद्ध चौकटीबाहेरचे सकारात्मक विचार

आपण सगळेच आयुष्याची वाट चालत असतो पण प्रत्येकाच्या आयुष्याला वेगवेगळे पैलू कंगोरे ..

 काही माणसं ठराविक चौकटीत राहून पुढे चालत असतात तर काही चौकटीबाहेरचा विचार करतात तेव्हा कौतुक , आश्चर्य कधी चेष्टा अशा कितीतरी भावभावनांना सामोरं जावं लागतं .

 असाच चौकटीबाहेरचा विचार करणारे काही प्रसंग .....

दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवलेल्या आभानं कला शाखेत प्रवेश घ्यायचा ठरवलं . आई-बाबांचा तिला पूर्ण पाठिंबा पण अगदी मंदिरात पेढे ठेवायला गेली तेव्हा तिथल्या पुजारीकाकांनीसुध्दा विचारलं ,
"अभिनंदन , पण काय गं कलाशाखेत का एवढे गुण मिळवूनही ?"
तेव्हा त्यांच्या नजरेतलं आश्चर्य , शेजारी , नातेवाईक ,ओळखीचे  प्रत्येकाच्या अभिनंदनामागे दडलेलं कुतूहल , आश्चर्य तिला अस्वस्थ करून गेलं . त्यातून रोज वर्तमानपत्र देणारे काका आले . त्यांना पेढे दिले तेव्हा तर कळसच झाला .
"काय गं कशाला कला शाखा ? पुढे काही करिअर नाही त्यात त्यापेक्षा .."
त्यांचं बोलणं अर्धवट ऐकलेली आभा आत गेली .
"आई-बाबा मी चुकीचा निर्णय घेतलाय का ?"
तिनं विचारलंच रात्री .
"अजिबातच नाही बेटा . उलट आम्हांला खूप कौतुक आणि अभिमान आहे तुझा . तुझा निर्णय तू घेतलास आमच्यावर अवलंबून न राहता . असा चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी धाडस लागतं आणि तुझा निर्णय योग्य होता हे तू नक्कीच सिद्ध करशील..." 
  आणि आईबाबांचा विश्वास , पाठबळ मिळालेल्या अवनीनं तिचा निर्णय मनोमन पक्का केला ....

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

आश्रय वृद्धाश्रमात नव्यानेच दाखल झालेल्या शारदाआज्जींना आज रहावलंच नाही.त्यांनी विचारलंच प्रमिलाबाई आणि अनंतरावांना ,
"राग येणार नसेल तर एक विचारू का ?"
" विचारा की आणि खरं सांगायचं तर राग लोभाच्या पलिकडे गेलोय आता आम्ही . त्यामुळं अगदी बिनधास्त विचारा ."
"तुम्ही इथं वृद्धाश्रमात राहत नाही पण अगदी रोज येता , सगळ्यांना हवं नको बघता , सगळे आनंदात कसे राहतील याकडे लक्ष असतं तुमचं , तुमच्या घरी कोण कोण ..."

"कोणी नाही ,आम्ही दोघंच आहोत .एक मुलगा आहे पण त्यानं त्याचं बस्तान परदेशात बसवलं . तो खूप आनंदात आहे ,आम्हांलाही बोलावतो पण तिकडं राहण्याचा निर्णय त्याचा होता त्याला आम्ही संमती दिली हसतहसत ,पाखरांना पंख फुटले कि ती उडणारच . निसर्गनियम आहे तो .मग आम्हीही ठरवलं ,आता या वयात कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत , कशाचं बंधन नाही ,तब्येतीच्या फारशा तक्रारी नाहित मग आपण जर कोणासाठी आनंदाचं कारण होऊ शकलो तर काय हरकत आहे , नाही का ?"
असा चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या त्या दांपत्याला शारदाआज्जींनी नकळत नमस्कार केला ....

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * 

अनया आकाशचा आंतरजातीय प्रेम विवाह घरच्यांच्या संमतीने झालेला . उच्च शिक्षण , उच्च पदावर नोकरी , यामुळं दोघंही खूप आनंदात होते.
यश पैसा पद प्रतिष्ठा यांची चौकट तयार झाली अन प्रेम एका कोपऱ्यात जाऊन बसलं हळूहळू . एका निवांत क्षणी अनयाला याची झालेली जाणीव तिनं आकाशला बोलून दाखवली अन् दोघांनाही कळालं एकमेकांसाठीच प्रेम आणि एकमेकांसाठीचा वेळ अबाधित राहायला हवा .

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * 

दहा वर्षे बाळासाठी वाट पाहिल्यावर अमित आकांक्षानं मूल दत्तक घेण्याचा विचार केला .एका स्नेह्यांनी बरीच माहिती दिली ,
"या सगळ्या प्रक्रियेला भरपूर वेळ लागतो ,तुमची तयारी आहे ना ? "
या दोघांनी हसत होकार दिला ,
"एवढी वाट पाहिली ,अजून थोडी पाहू ."
पण आणखी एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अमितच्या आईनं सांगितलं ,
" मला नातच हवीय ,आज्जी आज्जी करत ,गोष्ट सांगण्यासाठी हट्ट करणारी , मला गोड पापी देणारी ."
असा चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या कुटुंबात येणारी लेक खरोखर भाग्यवान म्हणायची .

©® कांचन सातपुते हिरण्या