चौकट

Eka strichi preranadai gosht

ती आपलं भग्न होणारं आयुष्य सावरू पाहत होती. अचानक नवऱ्याने घटस्फोटाची मागणी केली तिच्याकडे. का? तर त्याला या एकसुरी आयुष्याचा उबग आला होता.
"मी कुठे कमी पडले" याचा विचार करत ती तासन् तास बसून असायची.
मनाशी म्हणायची, 'हर एक माणसाचं आयुष्य हे असंच असतं! त्याच -त्याच नियमात बांधलेलं.
माणसाला चौकटीत बंदिस्त राहून आयुष्य जगायची सवय झालेली असते. त्याच चौकटीला आपण 'सामाजिक नियमांचं' नाव देतो. त्या बाहेर आपलं पाऊल पडलं की, लोक कुजबुज सुरु करतात, नाव ठेवतात.'

पण आपल्या नवऱ्याच्या या विचित्र 'मागणीने' तिचं भावविश्व ढवळून निघालं होत. 'समजा आपण वेगळे झालोच तर पुढे काय?' हा प्रश्न सतत तिच्याभोवती गेले चार दिवस पिंगा घालत होता.

एरवी नवऱ्यापुढे बोलायची तिची हिम्मत नसायची. आज मात्र धीर एकवटून ती त्याच्या समोर उभी राहिली. "तुमचं काही बाहेर अफे..अफेअर?" तिच्या अशा अनपेक्षित प्रश्नांने तो गोंधळाला. तिच्या डोळ्यात डोळे रोखून म्हणाला.. "नाही."
हे ऐकून तिला थोड हायस वाटलं.
"मग ही घटस्फोटाची मागणी?" त्याच डोळ्यात रोखून पाहत आता तिने साडीचा पदर खोचला. तसा तो गांगरला. चाचरत म्हणाला, "अगं थोडं ऐकून घे माझं."
"काय?" तिचा चेहरा कसातरीच झाला. तसा तो झटकन उठला आणि तिच्या जवळ गेला. "अगं मला तुझ्यापासून घटस्फोट नको आहे, तर.."
"तर काय?" रागाने थरथरत ती त्याच्याकडे पाहू लागली.

"तू घराबाहेर पड, जगाचा अनुभव घे. काहीतरी वेगळ कर, शिक असं मला मनापासून वाटतं.
गेली दोन वर्षे तू घरचं सारं पाहतेस, माझी काळजी घेतेस. पण तुझं आयुष्य हे केवळ माझ्या किंवा आपल्या घरापुरतं मर्यादित असावं, अस मला अजिबात वाटत नाही. स्वतः साठी तू काहीतरी करावंस असं खरचं वाटत मला.

मला घटस्फोट हवा आहे तो या 'चौकटीपासून.' एका 'स्त्री' ची ओळख केवळ 'तिच्या घरापुरतीच' असते या विचारापासून, फक्त 'चूल आणि मूल'  या दोनच विचारात अडकलेल्या बुद्धीपासून.
स्त्री ची क्षमता अफाट असते. मनात आलं तर ती काहीही करू शकते. हो ना!"

आपल्या नवऱ्याच बोलणं ऐकून ती हळूहळू शांत होत होती, तिचा आत्मविश्वास थोडा दुणावला होता.

"ते ही खरचं, मी हा विचारच कधी केला नाही.  अनेक स्त्रिया केवळ घर, संसार आवडीने सांभाळतात, किंवा काहींवर घरच्यांची बंधन असतात.
आपल्या माणसांचा पाठिंबा असेल तर एक स्त्री उंच भरारी घेऊ शकते. आपल्या आखून घेतलेल्या चौकटीतून बाहेर पडू शकते." तिने अभिमानाने आपल्या नवऱ्याकडे पाहिले.
आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जिद्द होती,' काहीतरी नवीन करून दाखवण्याची.'