चटकदार चटण्या Recipe in Marathi

जेवणाची चव वाढवणाऱ्या चटकदार चटण्या

चटण्यांचे विविध प्रकार


जर समजा कधी कधी एखादी भाजी आपल्या नावडतीची असेल, तर जास्त विचार करू नका सरळ ह्या चटण्या सोबतीला घ्या मग बघा कसे जेवण जातेय.  एकापेक्षा एक मस्त तोंडाला चव येणाऱ्या चटण्या आहेत. जेवणाची चव वाढवणाऱ्या ह्या स्वादिष्ट चटकदार चटण्या नक्की आवडतील तुम्हांला.


शेंगदाण्याची चटणी

साहित्य : एक वाटी शेंगदाणे, तिखट लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, जीरे, लसूण दहा ते बार पाकळ्या.

कृती : शेंगदाणे तव्यावर खरपूस भाजून घेणे. नंतर त्याची साल काढून ते मिक्सरमध्ये घालणे त्यातच मीठ, लाल मिरची पावडर आणि लसून पाकळ्या घालून जाडसर दळून घेणे. जर घरात दगडी खलबत्ता असेल तर अगदी उत्तमच... कारण त्यात चव खुप छान लागते. कुटताना त्यात जीरे भाजून घातले तर अजूनच छान चव येते. जेवताना ही चटणी घेतली तर त्यात वरतून एक पळी शेंगदाणा तेल घालणे... खुप भारी लागते.
प्रवासात जाणार असाल तर ह्याच चटणीला फोडणी पण देता येते. तेलात जीरे मोहरी घालून एक कांदा बारीक चिरून परतवून घेणे आणि त्यात शेंगदाण्याची चटणी घालून मिक्स करून घेणे.


हिरवी मिरची आणि शेंगदाणा चटणी

साहित्य : एक वाटी शेंगदाणे, दहा बारा हिरव्या मिरच्या तिखट, मीठ चवीनुसार, लसून पाकळ्या सात ते आठ.

कृती : शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या खरपूस भाजून घेणे. आता मिक्सरमध्ये शेंगदाणे मिरच्या लसून मीठ सगळे घालून जाडसर वाटून घेणे. तयार चटणी एका वाटीत काढून घेणे. यावर एक वाटी कडकडीत तेल घालून एकत्र करणे किंवा मग कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करून त्यात ही चटणी अगदी थोडावेळ परतवून घेणे.


हिरवी चटणी

साहित्य : खारी बुंदी चार चमचे, डाळ्या दोन चमचे, लसून पाकळ्या दोन तीन, आल, हिरवी मिरची तीन चार, जीरे, एका लिंबाचा रस, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती : मिक्सरमध्ये सगळ्यात आधी बुंदी आणी डाळ्या बारीक करून घेणे, मग त्यात बाकिचे सर्व साहित्य घालून छान बारीक पेस्ट तयार करणे. पाहिजे तितके पाणी घालून पातळ करणे. हि चटणी ब्रेड सॅण्डविच बरोबर खुप छान लागते.


सुक्या खोबऱ्याची चटणी

साहित्य : सुक खोबरे एक वाटी, लसून पाकळ्या सहा सात, मीठ, लाल मिरची पावडर.

कृती : लसून पाकळ्या तेलात भाजून घेणे आणि त्यातच मग खोबऱ्याचा किस घालून ते पण थोडे भाजून घेणे. आता त्यात मीठ आणि लाल मिरची पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.


दही शेंगदाणा चटणी

साहित्य : एक वाटी शेंगदाणे, एक छोटी वाटी दही, साखर, मीठ, हिरवी मिरची दोन.

कृती : शेंगदाणे खरपुस भाजून घेणे. मिक्सरमध्ये शेंगदाणे मीठ साखर दही हिरवी मिरची आणि थोड पाणी घालून वाटून घेणे. हवे असल्यास पाणी घालून अजुन पातळ करु शकता. ही चटणी उपवासाला साबुदाण्याच्या वड्याबरोबर अप्रतिम लागते.


ओल्या खोबऱ्याची चटणी

साहित्य : ओल खोबरे दोन वाट्या, कढीपत्ता, डाळ्या दोन चमचे, हिरवी मिरची चार पाच, मीठ, भरपूर कोथिंबीर.

कृती : खोबऱ्याचा किस करणे किंवा बारीक चकत्या कापून घेणे. मिक्सरमध्ये खोबरे, मीठ, डाळ्या, हिरवी मिरची, कढिपत्ता आणि कोथंबीर घालून मस्त बारीक वाटून घेणे. हवे असल्यास याला वरतुन फोडणी देवू शकतात. तडका पॅनमधे तेलात जीरे मोहरी पांढरी उडदाची डाळ आणि कढीपत्ता बारीक चिरून घालणे ही फोडणी तयार चटणीवर ओतणे. हीचटणी आप्पे, इडली डोसा बरोबर खुप छान लागते.

पुदिना चटणी

साहित्य : पुदिना एक वाटी, कोथिंबीर एक वाटी, लिंबाचा रस, साखर, मीठ, सुक खोबर.

कृती : मिक्सरमध्ये सुक खोबर बारीक करून घेणे मग त्यात पुदिना कोथिंबीर मीठ साखर लिंबाचा रस घालून पुन्हा बारीक पेस्ट तयार करणे. ही चटणी अप्रतिम लागते तुम्ही जेवताना पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता.

तीळाची चटणी

साहित्य : तीळ एक वाटी, शेंगदाणे किंवा मग खोबरे वापरु शकता, लाल मिरची पावडर, मीठ, लसून पाकळ्या दहा ते बारा.

कृती : शेंगदाणे भाजून घेणे. तीळ पण जरा भाजून घेणे. आता मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य बारीक करून घेणे.

खुरसणीची, कारळ्याची चटणी

साहित्य : खुरसणी एक वाटी, शेंगदाणे अर्धी वाटी, लाल मिरची पावडर, मीठ, लसुन.

कृती : शेंगदाणे आणि खुरसणी दोन्ही वेगवेगळे भाजून घेणे. मिक्सरमध्ये सगळे पदार्थ एकत्र करून बारीक वाटून घेणे.

कोथिंबीर चटणी

साहित्य : एक वाटी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, चार टोमॅटो, हिरवी मिरची दोन तीन, काळ मीठ, साध मीठ, जीरे, हिंग.

कृती : मिक्सरमध्ये कोथिंबीर आणि वरील सर्व साहित्य घालून त्यात पाणी घालून वाटून घेणे.

हॉटेल सारखी कोथिंबीर चटणी

साहित्य : एक वाटी कोथिंबिर, लसूण दोन तीन पाकळ्या, हिरवी मिरची दोन तीन, अर्धा लिंबूचा रस, पुदिना पान अर्धी वाटी, जीरे, घट्ट दही दोन चमचे, चवीनुसार मीठ.

कृती : मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालून छान बारीक वाटून घेणे. पातळ हवे असल्यास पाणी घालणे.

टोमॅटोची चटणी

साहित्य : पाच सहा कच्चे टोमॅटो, लसून सात आठ पाकळ्या, मीठ, जीरे मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची चार ते पाच, शेंगदाण्याचा कुट चार चमचे.

कृती : टोमॅटोचे तुकडे करून ते पॅनमध्ये तेलात परतवून घेणे त्यातच हिरवी मिरची चिरून घालणे आणि लसूण ... हे सर्व भाजून घेणे. आता मिक्सरमध्ये हे मिश्रण घालून त्यात मीठ आणि दाण्याचा कुट घालून व्यवस्थित पेस्ट तयार करून घेणे. आता तडका पॅनमध्ये तेलात जीरे मोहरी काढिपत्ता घालून हि फोडणी चटणीवर घालणे.


तर कशा वाटल्या तुम्हांला चटण्या, मस्त चटकदार आणि तोंडाला चव देणाऱ्या अशा आहेत या चटण्या.

किचन तुमचे आणि रेसिपी माझी.

खात रहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा. आणि महत्वाचं म्हणजे मला लाईक कमेंट करायला अजिबात विसरु नका.


धन्यवाद



सौं तृप्ती कोष्टी


🎭 Series Post

View all