चारचौघी

Story of four friends, how their lives changes after marriage, now they decided to groom theirself.

 चारचौघी.(टीम: विंग्स ऑफ फायर)

आज स्वाती प्रचंड खुश होती. कामात लगबग दिसू लागली. नोकरांच्या मदतीने तिने पूर्ण बंगल्याची साफसफाई करून घेतली. प्रत्येक खोलीत नवीन पडदे चढले. दारावर तोरणं सजली. अंगणात नवीन फुलझाडं सजली. दारात रांगोळी रेखली. स्वयंपाक घरातून पंचपक्वांन्न बनवण्याची तयारी निनादू लागली. सुग्रास भोजनाचा दरवळ सर्वत्र पसरला. स्वातीच्या अंगात जणू नवचैतन्य संचारलं होतं. कारणही तसंच खास होतं म्हणा! आज इतक्या वर्षांनी तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणी भेटणार होत्या. तब्बल वीस वर्षांचा काळ लोटला होता. 

“किती भर्रकन निघून गेले न ते सोनेरी दिवस! बघता बघता वीस वर्षे लोटली”

स्वाती मनातल्या मनात पुटपुटली. आठवणींची जणू भरती आली. स्वयंपाक बनवता बनवता ती भूतकाळात गेली. जुन्या आठवणी मनात रेंगाळू लागल्या. रुपारेल कॉलेजचं प्रांगण, कॉलेजच्या पाखरांचा तो किलबिलाट, तो कॉलेजचा कट्टा, कॉलेज कॅन्टीन, मित्रमैत्रिणींचा मेळा, ती निर्व्याज मैत्री, कॉलेजमधली दंगामस्ती, कॉलेजमध्ये भरवलेलं रक्तदान शिबिर, नाटकाचे प्रयोग, एकांकिका नाटकाचे -मुव्ही, घरी न सांगता कॉलेजचं लेक्चर बंक करून लपूनछपून केलेली मौजमज्जा. आणि त्या चौघीजणी.. बिनधास्त.. बेधडक.. सारं कसं डोळ्यासमोर रुंजी घालू लागलं. 

तो साधारण १९९५ - १९९६ चा कालखंड. स्वाती, स्नेहल, प्रिया आणि कविता अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी. सदैव एकत्र. संपूर्ण कॉलेज विश्वात यांची मैत्री कोणीही हेवा करावा अशीच होती. त्या काळात ना मोबाईल होते ना सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह होता पण तरीही त्यांची मैत्री मात्र घट्ट होती. पुढे कॉलेज संपलं. सुरुवातीला दोनतीन वर्ष त्या एकमेकींच्या संपर्कात होत्या. पण नंतर पुढे त्यांची लग्न झाली आणि प्रत्येकीचं एक वेगळं विश्व तयार झालं. गाठीभेटी दुरापास्त झाल्या. एकमेकींच्या संपर्कात तरी कसे राहणार? कोण कुठे आहे काहीच ठाऊक नव्हतं. आणि मग ती निर्मळ मैत्री फक्त मनातच राहिली. कधी जुन्या आठवणी ताज्या व्हायच्या. भेटण्यासाठी जीव आतुर व्हायचा. पण काहीच मार्ग सापडत नव्हता. 

“यार.. कुठे आहात ग? खूप मिस करतेय तुम्हाला”

स्वाती आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी मनातल्या मनात ईश्वराकडे प्रार्थना करत होती. स्वाती मैत्रीणींच्या आठवणींनी व्याकुळ व्हायची. डोळे आपसूक भरून यायचे.

एक दिवस स्वातीची धाकटी मुलगी शर्वरी लॅपटॉपवर अभ्यास करत होती. कॉलेजमध्ये दिलेल्या प्रोजेक्टवर काम करत होती. ती स्वातीला म्हणाली,

“मम्मा, तुला सांगते आजकाल न प्रोजेक्ट बनवणं खूप सोप्पं झालंय. एका क्लीकवर सगळं सापडतं. सर्च केलं की हजारो पर्याय दिसतात”

“काहीही शोधलं तरी? शरू माझ्या मैत्रिणी सापडतील? ” 

स्वातीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. मनातल्या आशा पल्लवीत झाल्या. 

हो, का नाही! थाम्ब आपण त्यांना शोधून काढू. त्यासाठी सर्वात आधी तुझं फेसबुकवर अकाउंट बनवू आणि मग त्यांना शोधू. त्यांनी जर आपली माहेरची पहिलीच नावं ठेवली असतील तर लगेच सापडतील”

शर्वरीने तिला माहिती पुरवली. आणि तिने स्वातीला फेसबुकवर अकाउंट बनवून दिलं. आणि मग स्वातीने आपल्या मैत्रिणींना फेसबुकवर शोधलं. तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की पुन्हा एकदा अशी भेट होईल. आधी स्नेहल, प्रिया मग कविता असं करत चौघींची पुन्हा फेसबुकवर गाठ पडली. पुन्हा चौघी एकत्र आल्या. त्यांना अगदी आभाळ ठेंगणे झालं होतं. चौघींच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मग एकमेकींनी आपापले मोबाईल नंबर शेअर केले. व्हाट्सएपचा ग्रुप बनवला. आता रोज गप्पा रंगू लागल्या. पुन्हा एकदा जुन्या मैत्रीला नव्याने बहर येऊ लागला. पुन्हा एकदा ते कॉलेजचं आयुष्य परतून आल्याचा आनंद काही औरच होता. 

असंच एक दिवस चौघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. अधूनमधून असा एखादा कॉन्फरन्स कॉल व्हायचाच. बोलता बोलता स्नेहल म्हणाली,

“अरे यार, आता या फोनवरच्या गप्पा पुरे ना.. भेटू ना एकदा. कधी एकदा तुम्हाला भेटते. डोळे भरून पाहतेय. तुम्हा सर्वांना कडकडून मिठी मारतेय असं झालंय बघ.! ठरवूया ना..”

“हो ग, नक्की ठरवूया. कधी आणि कुठे भेटायचं बोला”

प्रियाने आतुरतेने म्हणाली. कवितानेही दुजोरा दिला. इतक्यात स्वाती म्हणाली,

“ए ऐका ना, माझ्याच घरी ठरवूया. येत्या रविवारी.. काय म्हणता? हे बघ.. माझा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला गेलाय. सासूबाई सुद्धा नंणदेकडे गेल्यात.मुलं आता मोठी झालेत. ती आपल्याच विश्वात असतात. ठरलं तर मग रविवारी माझ्या घरी भेटायचं.”

चौघींनाही स्वातीचं बोलणं पटलं. आणि मग रविवारी स्वातीच्या घरी भेटायचं ठरलं. इतक्या वर्षानी भेटणार होत्या. ओढ तर वाटणारच ना! 

कुकरची शिट्टी झाली तशी स्वाती आठवणीतून भानावर आली. आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणी येणार म्हटल्यावर स्वाती अतिशय आनंदात होती. तिने सगळी तयारी करून ठेवलेली होती. गप्पांच्या मध्ये उठून स्वयंपाकघरात जायला नको म्हणून स्वातीने सगळं उरकून ठेवलं होतं.

बरोबर अकराच्या ठोक्याला दोन चारचाकी गाड्या बंगल्यासमोर येऊन थांबल्या. आणि एका गाडीतून कविता स्नेहल तर दुसऱ्या गाडीतून प्रिया उतरली. स्वाती धावतच दारात आली. इतक्या वर्षानी त्या तिघींना समोर पाहून स्वातीचे डोळे भरून आले..दारातच चौघीनी एकमेकींना मिठी मारली. चौघींच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले होते. स्वाती सर्वाना घेऊन आत आली. 

सर्वजणी बाहेर हॉलमध्ये बसल्या. एकमेकींना न्याहाळत होत्या. वयोमानानुसार प्रत्येकीत थोडाफार बदल झाला होता. स्वाती कविता थोड्या स्थूल झाल्या होत्या. प्रियाचा चंचल स्वभाव शांत झाला होता. तापट स्नेहलही खूप समजूतदार झाली होती. तिच्या वागण्या बोलण्यात ते जाणवत होतं स्वातीने आल्या आल्या सर्वांसाठी चहा बनवून आणला. आणि मग गप्पांची मैफिल सजू लागली. एकमेकांची विचारपूस सुरू झाली. किती बदलल्या होत्या साऱ्याजणी. प्रत्येकीच्या आयुष्याचं चित्र त्यांनी कॉलेजमध्ये असताना जसं रेखाटलं होतं त्यापेक्षा खूपच वेगळं होतं. गप्पांच्या ओघात दुपार कधी झाली समजलंच नाही. स्वाती म्हणाली,

“चला ग मैत्रिणींनो, आधी जेवण करून घेऊ. मग पुन्हा गप्पा मारू. ” 

सर्वांनाच भूक लागली होती. स्वाती सर्वांना घेऊन डायनींग टेबलजवळ आली.सगळ्या जेवायला बसल्या. स्वातीने केलेली जेवणाची तयारी पाहून तिघीही अचंबित झाल्या. कविता आश्चर्याने म्हणाली,

“स्वाती, अगं कधीही स्वयंपाक घरात ढुंकूनही न बघणारी तू किती साग्रसंगीत केलंय सगळं! कसं जमवलंस सगळं? इतकं सगळं बनवायला कधी शिकलीस? ” 

तिच्या या वाक्याने चौघीही खळखळून हसल्या. जेवणाचा बेत खरंच खूप छान होता. जेवणावर यथेच्छ ताव मारून झाला. आणि पुन्हा गप्पा सुरू झाल्या. 

प्रिया म्हणाली,

“कॉलेजमध्ये असताना आपण किती वेगळ्या होतो. वेगळी स्वप्नं होती. पण आता वास्तवात मात्र किती वेगळे आहोत. हेच बघ न आपली स्नेहल..! कॉलेजची स्नेहल अतिशय डॅशिंग. स्वतःची कामं स्वतः करणारी अगदी गाडी बंद पडली तर ती सुद्धा स्वतःच दुरुस्त करून पुढे जाणारी. पण आता किती बदललीस तू! तुझ्यातली धडाडी अचानक कुठे आणि कशी लोप पावली.?

स्नेहललाही तिचा मुद्द्यांवर दुमत नव्हतं. स्नेहल एक गृहिणी होती. कायम गृहीत धरलेली. प्रत्येक कामासाठी घरच्यांवर अवलंबून होती.

पण स्नेहल सांगू लागली, 

“अगं, घरची परिस्थिती तशी यथातथाच होती तशात स्थळ सांगून आलं आणि तसं स्थळात दोष काढण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे आईबाबांची जबाबदारीही कमी होईल या विचाराने मी ही लग्नाला तयार झाले. सून, बायको या नवीन नात्यात मी खूप गुरफटून गेले. आणि पुढे नोकरी, करियर काही करायची इच्छा असुनही मला माझी सुरक्षित कक्षा सोडवत नव्हती. त्यातच आई होण्याची चाहूल लागली मग काय मी पूर्णपणे त्यातच गुरफटले. मी काय होते? माझ्या स्वतःकडून काय अपेक्षा होती? हेही मी पूर्णपणे विसरले. आता तर मला माझा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतोय. आता मी काही करू शकेन याची मलाच खात्री नाही. या माझ्या विश्वात, माझ्या संसारात मी आनंदी नाही असं नाही गं मुलींनो पण मी कुठेतरी जुन्या स्नेहलला मात्र मिस करते ग.” 

स्नेहलचं हे मनोगत ऐकून समाजकार्याला वाहून घेतलेली कविता बोलू लागली,

“अगं मी समाजकार्याला वाहून घेतले आहे. माझ्या या कार्यात तुझ्यासारख्या अनेक स्त्रियांशी माझा संबंध येतो, ज्या संसारात तर खूप रमल्या आहेत पण आता जीवनाच्या या टप्प्यावर स्वतःकडे त्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. त्यांना आम्ही योगा शिकवतो. स्वतःला कसं ग्रुम करायचं ते सांगतो. जीवनाच्या या वळणावर स्वतःचा छंद जोपासायला हवा आपण स्त्रियांनी."

कविताचे हे बोलणे ऐकून स्वाती, स्नेहल आणि प्रियाच्या विचारांना एक वेगळेच वळण मिळत होतं. तिघीनी आता या आपापल्या दिनचर्येत बदल करायचं असं ठरवलं. स्नेहल उत्साहाने म्हणाली,

“आता आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्या करूया. ”

प्रियाही व्यक्त होत होती, 

“मी नोकरी करते. एका मोठ्या हुद्यावर आहे पण मुलींनो, या नोकरीमुळे कुठेतरी मी माझ्या संसारातली काही सुखाच्या क्षणांना गमावले आहे. मुलांचं बालपण जगलेच नाही. त्यांना वाढवताना मला माझं आईपण भरभरून जगताच आलं नाही. मुलांचं संगोपन करताना मुलांची शाळा, पालकसभा, त्यांच्यासाठी खाऊचा डबा, बाहेर फिरायला घेऊन जाणं, त्यांच्यासोबत खेळणं, हे सारे सुखाचे क्षण गमावलेत ग. आता ते क्षण फिरून मागे तर येणार नाही ना.. खूप मिस करते मी सारं! आज पैसा येतो आहे माझ्या हातात, एक हुद्दाही मी कमावला आहे पण खूप गमावून.. जे फक्त मी जाणते.” 

प्रियाचे डोळे पाणावले. स्वातीने अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला.डोळ्यांच्या भाषेने शांत व्हायला सांगितलं. कविता स्वातीला म्हणाली,

“स्वाती, मी कॉलेजमध्ये असताना अगदीच लाजरी बुजरी. सर्वसाधारण.. जेमतेम मार्कांनी पास होणारी. कधी कोणासमोर तोंड वर करून न बोलणारी.. पण हळूहळू समज येत गेली. आयुष्यातल्या कटुगोड अनुभवांनी शिकत गेले. ज्या समाजात आपण राहतो त्याचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना प्रबळ झाली. आणि मग मी स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं. आमची संस्था समाजातील पीडित,दुःखी, शोषित स्त्रियांसाठी काम करते. त्यांना धीर देते. त्यांना छोटे छोटे उद्योग करण्याचं प्रोत्साहन देते. रोजगार मिळवून देते. पण स्वाती हे सारं करताना माझा संसार करायचा राहून गेला. एक गृहिणी म्हणून जगायचं राहून गेलं. स्वतःसाठी वेळ देताच आला नाही कधी. एकटं जगताना आता आपल्या माणसांची ओढ वाटू लागते ग.” 

स्वातीने कविताकडे पाहून दीर्घ श्वास घेत म्हणाली,

“अगदी खरंय तुमचं मैत्रिणींनो, मी आईकडे असताना कधी स्वयंपाक बनवला नव्हता. कधी आवडही नव्हती. पण लग्न झाल्यावर आपसूक जबाबदारी चालून आली. इथे आल्यावर आईने म्हणजेच आमच्या सासूबाईंनी मला संपूर्ण स्वयंपाक बनवायला शिकवलं. मी शिकले. सासू, नणंद नवरा मुलं यांना जसं हवं तसं वागत गेले. त्यांच्यासाठी सारं आवडीने करत गेले. पण हे सारं करत असतांना आर्थिकदृष्ट्या मला कायम माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहावं लागलं. स्वतःचं, माझं असं काही नाहीच ग. तुम्ही निदान स्वतःचे निर्णय स्वतः घेता. घराबाहेर पडता. सामाजिक भान ठेवून असता. पण माझं जग म्हणजे माझ्या घराच्या चार भिंती. मी माझ्या विश्वात सुखी नाही असं नाही ग पण स्वतःची एक ओळख असावी. माझं स्वतःच्या कष्टाची निदान दोन पैसे तरी कमाई असावी. माझं या माझ्या जगात एक अस्तित्त्व असावं. असं वाटतं ग.”

स्वाती खूप दिवसांनी भरभरून बोलत होती. खरंतर चौघीही व्यक्त होत होत्या. मनातल्या व्यथा, सल एकमेकींसोबत वाटून घेत होत्या. जे जगायचं राहून गेलं त्याबद्दल, आपल्या स्वप्नांबद्दल मनापासून सांगत होत्या.

बोलण्याच्या ओघात कधी संध्याकाळ झाली. कोणालाच समजलं नाही. चौघींचीही घरी जाण्याची वेळ आली. कोणाचाही घरातून पाय निघत नव्हता. बोलणं संपूच नये असं वाटत होतं. पण निरोप तर घ्यावा लागणारच होता. निरोपाची घटिका समीप आली. जाता जाता कविता सर्वांकडे पाहत म्हणाली.,

“मैत्रिणींनो, ‘दुरून डोंगर साजरे’ या उक्तीप्रमाणे नेहमी आपल्याला दुसऱ्याचं आयुष्य छान वाटतं. पण तसं नसतं ना.. देव सर्वाना सर्व देत नसतो ग. काहीतरी उणीव मागे ठेवतोच. आता या वयात उगाच जे मिळालं नाही, जे करू शकलो नाही याचं दुःख बाळगण्यापेक्षा येणारा प्रत्येक क्षण जगूया. स्वतःकडे लक्ष देऊ, स्वतःच्या स्वास्थाच्या बाबतीत जागरूक राहू आणि ज्या गोष्टीतून स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टीत मन रमवू. आणि यानंतरही जमेल तसं वेळ मिळेल तसं आता मनमोकळे करायला भेटत राहू!”

चौघींनीही होकारार्थी मान डोलावली. एकमेकींच्या हातावर हात ठेवून पुन्हा भेटण्याचं आश्वासन दिलं. एकमेकींना कडाडून मिठी मारली. आणि ’पुन्हा भेटू’ असं म्हणून एकमेकींना निरोप दिला. त्या चौघीच्या नजरेत आता जगण्याची नवी ऊर्मी दिसत होती. जणू काही आज नव्याने स्वतःची नवी ओळख होत होती. चौघींची एक नवीन इनिंग सुरू झाली होती.

पूर्णविराम

© तृप्ती लिखिते

(टीम: विंग्स ऑफ फायर