चारचौघी.. अंतिम भाग

कथा चार मैत्रिणींची
चारचौघी.. भाग ६


मागील भागात आपण पाहिले की या चौघी नवीन ठिकाणी रमल्या आहेत. बघू आता पुढे काय होते ते..


" बरं पोरींनो, रात्री काय खाणार? पटापट सांगा." गप्पा मारत बसलेल्या या चौघींना विचारायला मावशी आल्या.

"पिठलं भाकरी.." चौघीही एकदम बोलल्या आणि एकमेकींकडे बघून हसायला लागल्या.

" मला त्यासोबत गरम गरम भात आणि फोडणीचं वरण.."

" मला ठेचा.."

नेहमी इतरांना जे हवे आहे त्याची ऑर्डर दिल्यानंतर जे उरेल ते खाणार्‍या या चौघींना आपल्याला हव्या असलेल्या पदार्थाची ऑर्डर देतानाही मजा येत होती.


" बरं.. तुमच्या गप्पा टप्पा आटपल्या की सांगा. मी गरमागरम भाकर्‍या करायला घेते. " मावशी सांगून गेल्या.

" ए चला ना, आपण जाऊया तिथे. कधीतरी तव्यावरचे थेट पानात येईल."

चौघीही गरमागरम जेवून तृप्त झाल्या.

" मुलींनो , आम्ही बाजूच्या घरात आहोत. काही लागलं तर हाक मारा.. आम्ही आहोत." मावशी सांगून निघाल्या. त्या जाताच अवनी उठली.

" चला, पटापट कपडे बदला.. मी व्हिडिओ बनवते."

" अग पण.. आताच तर जेवलो. जरा वेळ बसू दे ना." नेहा कुरकुरली.

" ओ आजीबाई.. उठा.. घरी आराम करा. आता मजा करूया." सगळ्या उठल्या. आधी शॉर्टस घालून आल्या.

" अग हे किती लहान आहेत. यापेक्षा माझ्या मुलीच्या शॉर्टस मोठ्या आहेत." हाताने पाय झाकत नेहा म्हणाली. ती बोलत असतानाच चित्राने तिचे पटापट फोटो काढले.

" आता तू हे घाल किंवा काढ.. माझ्याकडे फोटो आले आहेत. पाठवते थांब तुझ्या नवर्‍याला.."

संहिताने गाणी लावली. चौघींनी मिळून त्यावर रील्स बनवले. रात्रभर चौघींची धमाल चालली होती. नवीन नवीन कपडे घालून फोटोसेशन करत होत्या. उगाचच हसत होत्या. शेवटी थकून अंथरूणावर पडल्या. शरीर थकलं असलं तरी मन ताजेतवाने होते. अंथरूणावर पडल्या पडल्या गप्पा सुरू झाल्या. कितीही ठरवलं तरी सुखाच्या गप्पा संपून मनातले सल बोलायला कधी सुरुवात झाली हे कोणालाच समजले नाही. ते सल बोलून झाल्यावर पहाटे पहाटे कधीतरी चौघींचा डोळा लागला. दुसर्‍या दिवशी ना शाळेची कटकट ना ऑफिसचे टेन्शन ना डब्याची चिंता. कितीतरी दिवसांनी सुखाची झोप मिळाली होती. उठल्यावर मावशींनी हवा तसा चहा नाश्ता दिल्यावर तर स्वर्गसुख म्हणजे अजून वेगळे काय असते, असेच वाटत होते. काही करायची इच्छा तर नव्हती. पण समोर दिसणारा स्विमिंग पूल खुणावत होता. तशाच त्या स्विमिंग पूल मध्ये शिरल्या. लहान मुलांच्या वरताण मजा करताना मनातली सगळी दुःख वाहून जात होती. मन नवीन आशेने भरून येत होते. हे करताना आता घरी जायची वेळ जवळ येत चालली आहे, याचीही जाणीव होत होती. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकीला घरचे वेध लागले होते. तसेही कालपासून प्रत्येकीच्या घरून फोन येत होतेच, काय चालले आहे? कधी परत येणार?

पाण्यात मनसोक्त खेळून झाले. झाडाफुलांसोबत, मैत्रिणींसोबत भरपूर फोटो काढून झाले. दुपारचे जेवून चौघी परत जायला निघाल्या. मावशींनी जाताना परत अलाबला घेतली.

" या ग परत.. अशीच मजा करायला."

" हो मावशी.. पुढच्या वेळेस येताना मुलाबाळांना घेऊन येऊ.." पोटभर आश्वासने देऊन झाली. चौघी परत घरी निघाल्या. पाय जड झाले होते. जाताना जी बडबड सुरू होती, ती आता कमी झाली होती. मन जरी हलके झाले होते तरी शरीर थकले होते. परतीचा प्रवास शांतीनेच झाला. सगळ्या घरी पोहोचल्या.

ग्रुपवर काढलेले फोटो शेअर करून झाले, स्टेटसवर फोटो ठेवले गेले. परत कधी जायचे याची चर्चा सुरू झाली. ती चालू असतानाच चित्राने ग्रुपचे नाव बदलून "हरवलेले माहेर" हे नाव ठेवले. ते ठेवताच प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी तरळले. ते न पुसताच प्रत्येकीने हार्टचे इमोजीज पाठवले..


हा प्रयत्न होता एकमेकींच्या भेटीसाठी आणि माहेरपणासाठी आसुसलेल्या मैत्रिणींची मनस्थिती मांडण्याचा. तो कसा वाटला ते नक्की सांगा. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all