चारचौघी.. भाग ५

कथा चार मैत्रिणींची


चारचौघी.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की कथेच्या चार नायिका शेवटी एकमेकींना भेटतात. आता बघू पुढे काय होते ते.


" अग थांबा, थांबा. घाई काय करताय? भाकरतुकडा ओवाळू दे.." तिकडच्या मावशी या चौघींना थांबवत म्हणाल्या.

" मावशी, भाकरतुकड्याने ओवाळायला आम्ही लहान आहोत का?" अवनी लटक्या रागाने बोलली खरी. पण तिचे डोळे पाणावले होते.

" हो.. माझ्यापेक्षा वयाने लहानच आहात. मावशी ठसक्यात बोलल्या. चौघींनीही मावशींचा तो आवाज ऐकून त्यांचे ऐकायचे ठरवले.
"आत या. बाथरूममध्ये गरम पाणी ठेवले आहे. आता सांगा , आधी तेल कोण लावून घेणार?" हे ऐकताच चौघींनी एकमेकींकडे टकामका बघायला सुरुवात केली.

" तेल? तेल कशाला?"

" डुक्कर घे उशाला.." हे ऐकून चौघी हसायला लागल्या.

" अग पोरींनो, आराम करायला आलात ना.. मग ऐका माझं.. मी मस्त तेल लावून देते. आत उटणं ठेवलं आहे. वाटल्यास केस, पाठ चोळून देते. मस्त आंघोळ करा. त्यानंतर जरा खा, प्या आणि गप्पा मारत बसा. फक्त जाताना रात्री काय हवं जेवायला ते सांगून जा." मावशी प्रेमाने बोलत होत्या.

" तुम्ही एकट्या करणार स्वयंपाक?" नेहाने विचारले.

" एकटी कशाला? माझा लेक आणि सून बघतील स्वयंपाकाचं. धनी तोपर्यंत तुमच्या खोल्या तयार करून ठेवतील."

" मावशी, आधी मी.." अवनी आढेवेढे न घेता म्हणाली.

" ए नाही ग.. मावशी आधी मी.." संहिता म्हणाली. "मला तर आठवतही नाही कोणी दिवाळीलाही अंगाला बोटभर तेल लावलेलं. स्वतःच स्वतःला लावून घ्यायचे."

" हो, आमच्या घरी तर जसं काही सासूबाई तयारच असतात तेलाची वाटी हातात घेऊन.." नेहा म्हणाली.

" सासूबाई असो वा आई.. एकदा लग्न झालं की विसरा सगळं. लग्नाच्या आधीचे हे चोचले. आता फक्त आपण दुसर्‍यांसाठी करा."

" मुलींनो, आता मी आहे ना.. चला पटापट आवरून घ्या." मावशींनी खरंच चौघींनाही चोळून मोळून अंघोळ घातली. अंघोळ करून ताज्या टवटवीत झालेल्या त्या चौघी बाहेर अंगणात येऊन बसल्या. सारवलेलं अंगण होतं. आजूबाजूला फुलझाडं लावली होती. एकीकडे झोपाळा होता. त्या झोपाळ्यावर बसण्याची प्रत्येकीची इच्छा होती पण दुसरीला बसू द्यावे म्हणून कोणीच त्यावर बसले नाही.


" नेहा, माझ्याकडून जिजूंना तू एक जादूची झप्पी दे.. " अवनी मांडी घालून बसत म्हणाली.

" कशासाठी?"

" एवढी छान जागा सुचवण्यासाठी.. बघ ना फक्त आपण चौघीच आहोत इथे. या मावशी पण किती छान काळजी घेत आहेत आपली. मस्त वाटतंय.."

" हो ना.. नवीन लग्न झाले होते तेव्हा आई असं करायची. अगदी तेच आठवलं बघ." चित्रा म्हणाली.

" माझ्याकडे तर आता फक्त आठवणीच राहिल्या आहेत.. ना आई ना बाबा.. हक्काने कोणाकडे जावं असं राहिलंच नाही बघ. भाऊबहिण आपापल्या संसारात बिझी. मनाला वाटलं म्हणून कोणाकडे जेवायला जाणंही अशक्य होऊन बसलंय बघ. मगाशी त्या मावशींनी भाकरतुकडा ओवाळला बघ.. माझी आई सुद्धा मी गेले की असेच करायची. पटकन आठवण आली ग तिची." अवनी व्याकुळ झाली होती. संहिताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अवनी रडायला लागली.
" खूप आठवण येते ग त्यांची. नेहमी जायला जमत नसलं तरी ते आहेत ही गोष्टच मनाला धीर द्यायची. ते नाहीत तर आता रडताही येत नाही. नवरा म्हणतो सतत काय रडायचे? त्याचे आईवडील आहेत म्हणून त्याला माझ्या भावनाच समजत नाही."

" तुझे आईबाबा नाहीत म्हणून तू रडतेस. माझी आई तर लेकीला पूर्णपणे विसरून गेली आहे." संहिताने बोलायला सुरुवात केली. " सून असावी ग जवळची. पण त्यासाठी लेकीला विसरावे? लागते ग मनाला." संहिताने डोळे पुसले. "तिथे गेले की फक्त तिने हे केले तिने ते केले.. पण कधी तुझं काय हे नाही विचारावंस वाटत."


" आमच्याकडे पण तीच गत. माहेरी जायचं म्हणजे फक्त यांचे मूड सांभाळा. तिथे गेले तरी यांचा हैदोस. माहेरपण उपभोगताच येत नाही.. सतत डोक्यावर टांगती तलवार. कोण कधी कसं वागेल? नको वाटतं एक दिवसही माहेरी जाणं या पाई.." चित्रा उसासा सोडत म्हणाली.

" माझं काय वेगळं? माहेर जवळच. गेलं तरी एका तासात सासरी परत. सासरी म्हणजे काय आनंदच.. येताजाता फक्त बोलणी ऐका. नको नको होतो जीव." नेहाने डोळ्यातले पाणी पुसले.

" मुलींनो.. रडके विषय बंद. आपण इथे मजा करायला आलो आहोत. जे काही रडायचे आहे ते रडून घ्या. पण त्यानंतर फक्त आणि फक्त हसा.." अवनीने अल्टीमेटम दिला.


कसा घालवतील आपला वेळ या चौघीजणी? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all