चारचौघी.. भाग ४

कथा चार मैत्रिणींची


चारचौघी.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की शेवटी चौघी मैत्रिणी शेवटी भेटायचे ठरवतात. बघू आता पुढे काय होते ते.


" आपण ना मस्त रील्स बनवूया.. येताना एक वनपीस, शॉर्टस, जीन्स घेऊन या.." अवनीने ग्रुपवर फर्मान सोडले.

"अग ए.. शॉर्टस काय? माझ्या घरी सासूबाई आहेत. तुला , या वयात माझा घटस्फोट बघायचा आहे की काय?" नेहाने मेसेज पाठवला.

" ए डफर.. घरून नाही घालून यायचा. घेऊन ये. रात्री बनवू मस्त रील्स."

" पण माझ्याकडे नाहीत हे असे कपडे. तुम्ही बनवा रील्स.. मी शूट करेन."

" म्हणून तुला तुझा नवरा कुठे घेऊन जात नाही. त्याने ढकलले आमच्यावर.. आम्ही झेलतो आहोत तुला." संहिता बोलली.

" हे असं बोललात तर मी येणारच नाही हां.." नेहाने चिडण्याचा इमोजी पाठवला.

" प्लिज असं नको करूस.. मी घेऊन येते तुझ्यासाठी कपडे. पण आता कोणी नाराज होऊ नका आणि येणार नाही असंही म्हणू नका." चित्राने हात जोडण्याचा इमोजी पाठवला.

" तथास्तु कन्ये.. "

" बरं आता जायचे कसे?"

" मी कार घेते.." अवनी म्हणाली

" तू चालवणार की ड्रायव्हर?" संहिताचा प्रश्न.

" मी.. आपल्या गप्पा इतर कोणाच्याही कानावर पडायला नको आहेत मला."

" मग तर अजिबात नको.. माझा इन्शुरन्सचा हप्ता भरायचा आहे.. क्लेम करायला प्रॉब्लेम होईल." गंभीरपणे संहिताने मेसेज पाठवला.

" माझ्या ड्रायव्हिंगचा आणि तुझ्या इन्शुरन्सचा काय संबंध??" मेसेज टाईप करता करता अवनीची ट्युब पेटली.
" मी चांगली गाडी चालवते.. भेट मला. दाखवतेच.."

" मला माहीत आहे तू गाडी चांगली चालवतेस ते पण एक दिवस बाहेर जाताना कशाला त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा ट्रेनने प्रवास करू. मी तर किती महिन्यात ट्रेनने गेलेच नाही. तेवढाच थ्रीलींग एक्स्पिरियन्स आपल्या आयुष्यात."

" चालेल.. मग शनिवारी लवकर निघू."

" लवकर कसं निघणार? शनिवारचा स्वयंपाक, संध्याकाळचा नाश्ता, रविवारची तयारी सगळं करून निघेपर्यंत दुपार तरी होईल." नेहाने थकल्याचा इमोजी टाकला.

" मी काय म्हणते, तू रविवारचा छान मेनू ठरव, तो कर आणि मगच ये." अवनीने टोमणा मारला. " एक दिवस बाहेर जायचे तर स्वयंपाकपाणी बघत बसलात.. तुमच्या घरातले जेव्हा बाहेर जातात तेव्हा बघतात का घरात? नाही ना.. मग बेसिक तयारी करा.. आणि निघा.." अवनीने हुकूम सोडला.

अनेक वर्षांनी ट्रेनचा वापर करत चौघी इष्टस्थळी पोहोचल्या.

" बापरे.. कसली ती गर्दी.. आणि काय त्या बायका.." संहिता कपडे झटकत बोलली. अवनी आणि चित्रा दोघीही हसायच्या थांबत नव्हत्या.

" तुम्हा दोघींना वेड लागलंय का? काय हसताय एवढ्या?" नेहाने विचारले.

" अग.. ती माझ्या शेजारी बसलेली बाई.." चित्राच्या डोळ्यातून हसून पाणी यायला लागले.

" काय झाले तिचे?"

" अग, ट्रेनमध्ये बसल्यापासून तुझा इथेच हात लागला, तू पायच मारलास. काही ना काही कारण काढून इतरांशी भांडत होती. या अवनीने निघताना तिच्या अंगावर पाल टाकली.." चित्रा परत हसायला लागली.

" ईईई.. पाल.." संहिता आणि नेहा जोरात ओरडल्या.

" अगदी अशीच ती उठली.." अवनी हसत बोलली.

" तू पण धन्यवाद आहेस.. पाली घेऊन फिरतेस का?" नेहाच्या चेहर्‍यावर विचित्र भाव होते.

" नेहा, तू शाळेत असताना जशी होतीस अगदी तशीच आहेस.. डफर... अग खरी पाल कशी असेल.. लेकाची खेळण्यातली आणली होती तुला घाबरवायला. पण आता तू त्या काकूंना थँक्स म्हण. त्यांनी पूर्ण प्रवासात मला पिडलं म्हणून त्यांच्या अंगावर टाकली. नाहीतर आज रात्री तुझी टर्न होती." अवनीच्या चेहर्‍यावर खोडकर हसू होते.

" तू ना जन्मात सुधारणार नाहीस. मला तर वाटते की तुझ्या नवर्‍याला समजत नसेल लहान कोण आहे, तू की मुले?" नेहाने परतफेड केली.

" आता तो विषय सोडू आणि जरा घसे ओले करू?" संहिता विषय बदलत बोलली.

" संहिता, तू पण?" चित्राने नाराज होत विचारले.

" काय?"

" तू दारू पितेस?"

" हे देवा.. या सगळ्या मूर्ख मुली माझ्याच मैत्रिणी म्हणून पाठवायच्या होत्या? एकही हुशार कोणी दिसली नाही का रे माझ्याशिवाय? घसे ओले करू म्हणजे समोर ते टी हाऊस आहे ना, तिथे जाऊन चहा कॉफी घेऊ, थंड पाणी पिऊ.. तू ना नवर्‍यासोबत राहून राहून पक्की झाली आहेस.." संहिता नाटकीपणे बोलली. तिचा आविर्भाव बघून बाकीच्या खिदळायला लागल्या. आपले वय, जबाबदारी, टेन्शन विसरून त्या शाळेतलं आयुष्य जगू लागल्या.

कशी जाईल त्या चौघींची रात्र.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all