चारचौघी.. भाग ३

कथा चार मैत्रिणींची


चारचौघी.. भाग ३


मागील भागात माहेरी जाण्याचे सुख न मिळणाऱ्या चार नायिका आपण बघितल्या. आता बघू काय होते पुढे.


" मुलींनो.. या विकेंडचा काय प्लॅन आहे?" नेहाने मुलींच्या ग्रुपवर विचारले.

" माझा नवरा आणि मुले चालले आहेत बाहेर.." चित्राने मेसेज केला.

" तू नाही जाणार?" संहिताने विचारले.

" नाही.."

" का ग?"

" नेहमीचे कारण.. हे सगळे रात्रभर जागून दारू पार्टी करणार. दुसर्‍या दिवशी उशीरा उठणार. मग माझी चिडचिड होणार. नकोच ते."

" अग मग तू पण कर ना दारू पार्टी. " अवनीने डोळा मारलेला इमोजी पाठवला.

" हो.. आता चाळिशीच्या उंबरठ्यावर तेच बाकी राहिले आहे."

" तू पण खरंच म्हातारी होत चालली आहेस. जा शिक थोडं आयुष्य एंजॉय करायला." अवनी उगाच पिना मारत होती.

" ए बाई, त्या ग्रुपवर टोमणे ऐकून कंटाळले म्हणून इथे आले.. आता तू ही सुरू नको करूस.." चित्राने वाकड्या तोंडाचा इमोजी पाठवला.

" तू पण ना चित्रा खरंच वैतागली आहेस. तिने केलेली मस्करी पण समजत नाही का? आणि यामध्ये मुख्य विषय बाजूला राहिला. आपण बाहेर जायचे का?"

" मी नाही.. या शनिवारी मी बॉसला मस्का मारून सुट्टी मिळवली आहे. आईला भेटून येईन म्हणते.." संहिता बोलली.

" आता?"

" तुम्ही तिघी जाऊन या.. मी नंतर कधीतरी येईन. आता आईला भेटायला गेले नाही ना तर आई मारेल आता."

" ओके.. तुम्ही दोघी घरी सांगा. आपण ठरवू शनिवार रविवारचे."

" मी येईन.. असेही माझ्या घरी कोणीच नाही." चित्राने अंगठ्याचा इमोजी पाठवला.

" मी एनी टाईम तयार.." अवनी म्हणाली.

" ठिक.. आपण तिघी तर जाऊ.. नंतर जेव्हा संहिताला जमेल तेव्हा परत जाऊ."

"डन.."

संहिताला खरेतर थोडे वाईट वाटत होते कारण या तिघी जमणार म्हणजे धमाल करणार.. आईला भेटून येणे पण गरजेचे होते. तिने आईला फोन केला.

" आई, या शनिवारी मी येते आहे ग तुला भेटायला."

" तुला हाच शनिवार मिळाला का?"

"म्हणजे?"

" अग नीताच्या माहेरचे सगळे चालले आहेत अष्टविनायक करायला. मी एकटीच कुठे घरी राहू? म्हणून मी पण जाणार होते त्यांच्यासोबत."

" तुझी तब्येत?" संहिताने आश्चर्याने विचारले.

"ती मागच्या महिन्यात बिघडली होती. मी तरी किती दिवस घरात कोंडून घेऊ स्वतःला? आता तू येणार असशील तर करते कॅन्सल.."

" नको.. माझ्यासाठी तू काही कॅन्सल करू नकोस. मी येईन नंतर परत." संहिताने फोन ठेवला. मिळालेली सुट्टी कॅन्सल करायची सुद्धा तिच्या जीवावर आली होती. जावे का या तिघींसोबत? इतकी वर्ष आपण बाहेर जायचं असं फक्त ठरवत होतो, आता या खरंच भेटणार आहेत मग जावे का? की तो एक दिवस मुलांच्या अभ्यासात घालवायचा? संहिताची द्विधा मनस्थिती झाली होती. एकीकडे नेहमीची कामे दुसरीकडे पहिल्यांदाच नाईट आऊटसाठी भेटत असलेल्या मैत्रिणी. शेवटी तिने मनाशी निर्णय घेतला.. नवर्‍याशी तिने फोनवर बोलून घेतले. लगेचच तिने ग्रुपवर मेसेज केला..

" मुलींनो.. मी पण शनिवारी येणार आहे." तो मेसेज वाचताच लगेचच तिघींचे यस्ससस असे मेसेजेस आले..

" आता लक्ष्य एकच.. शनिवारची धमाल."


होईल का यांची पिकनिक यशस्वी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all