चारचौघी.. भाग २

कथा चार मैत्रिणींची


चारचौघी.. भाग २


"चित्रा, या आठवड्यात मी एक छोटं गेटटुगेदर प्लॅन केले आहे.." अविनाशने फोन करून चित्राला सांगितले.

" अचानक?" चित्राने आश्चर्याने विचारले.

" हो.. तुमच्या बंधुराजांचा फोन आला होता. प्रमोशनची पार्टी मागत होते. मग म्हटलं सगळ्यांनाच बोलावूया. शनिवारी सकाळी निघू.. रविवारी परत."

" काही तयारी करायची आहे का?"

" नाही.. तिथे सगळी सोय आहे."

" सगळी?? म्हणजे तुमची ओली पार्टी आहे का?" चित्राने नाराज होत विचारले.

" हो.. एक दिवस भेटणार. मग दारू नको?"

" दारू असेल तर मी येणार नाही.." चित्राचा आवाज थरथरत होता.

" काय कटकट आहे? इतर बायका रडतात माहेरच्या लोकांसोबत वेळ घालवायला.. आणि मी इथे तुला नेतो आहे तर तुझी ही नाटके." अविनाश चिडला होता.

" माझ्या माहेरच्या लोकांना मलाही भेटायचे आहे.. पण ही दारू पार्टी मला नाही आवडत."

" काय अडचण आहे त्यात?"

" त्याचं काय होतं, जेव्हा तुमच्या या पार्ट्या सुरू होतात तेव्हा पिणारे आणि न पिणारे यांचे दोन गट पडतात. मग तिथे मुलांना पाठवायचे नाही. मुलांना सांभाळत बसायचे. ज्या गोष्टीसाठी एकमेकांना भेटतो ती गोष्टच करायची नाही.. ना कोणाशी बोलणे होते ना मन हलके होते. फक्त चेहरे दिसतात.. मग काय अर्थ आहे या सगळ्याचा?"

" तुला माहित आहे, हे असं बोलतेस ना म्हणून तुझी बहिणभावंड तुला फोन करत नाही.. जगाच्यापाठी आहेस नुसती. ना स्वतः मजा करणार ना इतरांना मजा करू देणार.." अविनाश तुच्छतेने बोलला.

" दारू पिऊन झिंगणं ही जर मजेची, पुढारलेपणाची व्याख्या असेल तर मग मी मागासलेलीच बरी. तुमची पार्टी तुम्हाला लखलाभ. तुला जायचे आहे, तू जा. मुलांना हवे असेल तर त्यांनाही घेऊन जा. मी येणार नाही." चित्रा ठामपणे बोलली.

" श्शी.. सगळा मूडच घालवलास.." चिडून अविनाशने फोन बंद केला. काहीच वेळात चित्राच्या मोबाईलवर तिच्या बहिण भावंडांचे मेसेजेस येऊ लागले.. ताई तू पण खरंच बोरिंग आहेस, का तू मूड ऑफ करते आहेस? चित्राने फोन बंद करून ठेवला आणि स्वतःच्या अश्रूंना मुक्तपणे वाहू दिले..


आता आपली शेवटची नायिका.. नेहा..


" नेहा.. फोडणी जळाली ग तुझी.. लक्ष कुठे असते? सतत मेला तो फोन हातात. मलाच मिळायची होती अशी सून?" सासूबाई नेहाच्या नावाने ओरडत होत्या.

" आई, इथेच आहे. गॅस अजून चालू करायचा आहे." थंडपणे नेहाने उत्तर दिले.

" गॅसही सुरू केला नाही अजून? मग स्वयंपाक कधी करणार? माझ्या लेकाला डब्बा कधी देणार? माझ्या तर पोटात भुकेने आग पडली आहे."

"आई, तुमच्यासाठी गोड शिरा केला आहे."

" सकाळी सकाळी कोण गोड खातं गं? तुला ना कधी काय करायचे ते ही समजत नाही. केलाच आहेस तर आण इथे. ढकलते पोटात कसातरी.." डिशभर शिरा सासूबाईंना देऊन मुलांना शाळेत पाठवून नेहा पाच मिनिटे बेडरूममध्ये जाऊन डोळे मिटून बसली.

" सॉरी.." सुजय तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला. त्यासरशी तिच्या डोळ्यातून दोन अश्रू बाहेर पडले.

" मी तरी काय करू? मला माहित आहे, आई खूपच जास्त चिडचिड करते आहे. वाटेल तसं बोलते आहे.. पण नाही ना काही करू शकत? ती पडल्यापासून जास्तच चिडचिडी झाली आहे.. आणि तिचा सगळा राग तुझ्यावर निघतो आहे." सुजय नेहाच्या डोक्यावरून हात फिरवत होता.

" मला दोन दिवस तरी या सगळ्यातून बाहेर जायचे आहे.." नेहा डोळे न उघडताच बोलली.

" तुला जेव्हा हवे तेव्हा जा. मी घेईन आई आणि मुलांची काळजी.. "

" खरं?" नेहा डोळे उघडत म्हणाली.

" अगदी खरं.. तू जा बाहेर. मला दिसते आहे घरचे, ऑफिसचे करून तू थकली आहेस. दोन दिवस छान फ्रेश होऊन ये." सुजय असं बोलताच न राहवून नेहाने त्याला मिठीच मारली.

" कुठे जाऊ पण? माहेरी जायचे तर दहा मिनिटांवर माहेर." नेहा विचारात पडली.

" एक सुचवतो, माझ्या मित्राच्या ओळखीचे एक निसर्गकेंद्र आहे.. जास्त लांबही नाही.. जवळही नाही. "

" तिथे एकटीने जाण्यात काय मजा? आपण सगळेच जाऊ.."

" सगळेच कसे जाणार? आईला तर उठताही येत नाही.. तुझ्या मैत्रिणींना विचार.. नाहीतरी सतत सुरू असतं ना तुझे, ती संहिता अशी, चित्रा तशी, अवनीचे काय भलतंच.. बोलून बघ, होत असेल तर मी बुकिंग करून देतो."

" थॅंक यू नवर्‍या.. मी आजच विचारते." नेहा मिठी घट्ट करत म्हणाली.

" मला समजले तुला आवडणारी गोष्ट केली की तुझे प्रेम उतू जाते ते. पण आता तू रंगात आली असलीस तरी तुला आणि मला ऑफिसला जायचे आहे. आता आईला बघणाऱ्या मावशीही येतील. त्या काय म्हणतील?" सुयश हसत म्हणाला.

" काहिही.." नेहा हसत दूर झाली. ही बाहेर जायची कल्पना मैत्रिणींना पटेल का? या विचारात गढून गेली.


जातील का या चार मैत्रिणी बाहेर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all