चारचौघी..

कथा चार मैत्रिणींची


चारचौघी..


"आई, कशी आहे तब्येत आता?" संहिताने रोजच्या प्रमाणे सकाळी आईला फोन करून विचारले.

" आता खूप बरी आहे. येतेस का ग भेटायला?" आईने विचारले.

"यावंसं खूप वाटतं ग.. पण हे ऑफिस, मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास. पूर्ण गुंतून गेले आहे. कधी आणि कशी सवड काढावी, तेच समजत नाही.." संहिता अपराधी स्वरात बोलली.

" हो.. अगदी जगाच्या दुसर्‍या टोकावर राहतेस ना? साधा पुणे मुंबई प्रवास पण तुला झेपू नये? इथे आई बसली आहे, डोळ्यात प्राण आणून लेकीची वाट बघत.. पण तिला काही आहे का? तुझं नाव जरी घेतलं की ऐकते सुनेचे टोमणे.. एवढं लेकीचं नाव घेताय, पण ती आहे तिथे मजेत म्हणून." आई आज रागावली होती.

" आई, तू ही असंच बोलशील का ग? तुला माहिती आहे, माझी प्रायव्हेट नोकरी आहे. त्यात या वेळेस सुट्ट्या मिळणे किती मुश्किल होते. मला रोज घरी जायला उशीर होतो. पुणे मुंबई प्रवास जरी म्हटलं तरी लेकाचे दहावीचे क्लास, लेकीचे कसले कसले प्रोजेक्ट रविवारी सुद्धा सुरू असतात. मग त्यांची सगळी तयारी करून निघायचे म्हटले तरी आठ तासांचा गाडीचा प्रवास फक्त दोन तासांच्या भेटीसाठी करायला खूप जीवावर येतं ग.. कारण दुसर्‍या दिवशी लगेच ऑफिस असतं. मला नाही का वाटत दोन दिवस माहेरी जाऊन छान आराम करावा, तुझ्या हातचं खावं.. पण छोट्या छोट्या गोष्टीही नाही नशिबात.." संहिता रडकुंडीला आली होती.

" जाऊ दे बाई.. तुला जमेल तेव्हा ये. मी आहेच.." आई फोन ठेवत बोलली. रडवेली होत संहिताने फोन ठेवला.


ही व्यथा होती संहिताची. आता भेटूया अवनीला..


" ऐक ना... आपण बाहेर जाऊ या का, या विकेंडला?" अवनीने राकेशला टाय बांधत विचारले. अवनीने हा प्रश्न विचारताच राकेशने खाली काहीतरी शोधायला सुरुवात केली.

" काय झाले? काही पडले का?" अवनीने आश्चर्याने विचारले.

" हो.. तुझा मेंदू कुठे पडला आहे का, बघतो आहे?" राकेश हसत बोलला.

" एवढा मेंदूवर संशय घेण्यासारखे मी काही बोलले का?" अवनी नाराज होत बोलली.

" मग काय? हे बघ तुला हवे तेवढे पैसे घे, पण कुठे जायचा आग्रह मला करू नकोस." राकेश अवनीपासून लांब जात बोलला.


" पैसे घेऊन काय करू? पैसे काही कंपनी देत नाही फिरायला." अवनी चिडली होती.


" कंपनी कशाला पाहिजे? आणि कंटाळा आला असेल तर जा माहेरी.. तिथे जायला तर कंपनीची गरज नाही ना?" माहेरचे नाव ऐकताच अवनीच्या डोळ्यात पाणी आले.

" तू मुद्दाम माझ्या जखमेवर मीठ चोळतो आहेस का? आईबाबा गेल्यापासून मी एकदा तरी तिथे राहिली आहे का?"

" मग रहा ना.. तुला कोणी अडवले आहे?" राकेश अवनीचे डोळे पुसत म्हणाला.

" मला नाही रहावेसे वाटत तिथे.. पण एवढे नक्कीच वाटते की चार दिवस का होईना कुठेतरी बाहेर जावं, जिथे कोणी आपली प्रेमाने विचारपूस करेल. जिथे आपली सुखदुःख वाटता येतील.."

" बाई, घाईच्या वेळेस मला हे बोलायलाही वेळ नाही. तुला जिथे हवे तिथे मैत्रिणींना घेऊन जा.. हवे तेवढे पैसे देतो. पण मला सांगू नकोस.." राकेश ऑफिसला जायला निघाला सुद्धा. अवनी स्तब्ध बसून राहिली आपल्या आईवडिलांच्या आठवणीत..


या कथेच्या अजून दोन नायिका बाकी आहेत.. त्यांना भेटू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all