Login

चर्चा तर होणारच भाग 3

“चर्चा तर होणारच... पण मी चालत राहणारच!”
भाग तीन:3 चर्चा तर होणारच :

एके दिवशी वाड्यातील महिला मंडळातर्फे “स्त्रीचा आवाज” या विषयावर चर्चासत्र कार्यक्रम ठरला.आणि तारीख ही ठरली.

गल्लीतल्या बायका आपापल्या साड्यांची तयारी करू लागल्या. सगळ्याच्या एकच रंगाच्या साड्या घालायचंय.

शांता मावशींनी लगेच टोमणा मारला, “साक्षीला बोलवणार का?का? ती तर परंपरेला सगळं ‘मोडून’ वागते!”

कार्यक्रमाच्या दिवशी, काहीशा कुजबुजीतच साक्षी मंचावर उभी राहिली. पण बोलायला लागल्यावर ती शांत, स्पष्ट आणि ठाम वाटू लागली.

“मित्रमैत्रिणींनो,
आपण बोलतो… समजतो… गृहीत धरतो. पण कधी समजून घेतो का?

"घरात रोज पूजा होते… पण मनात श्रद्धा नसेल, तर ती पूजा केवळ एक क्रिया उरते.
स्वयंपाकात मी मसाले थोडे वेगळे घालते म्हणून मी 'चुकीची' ठरत नाही…
आणि माझ्या सासूबाईंनी दुसऱ्या पद्धतीने स्वयंपाक केला म्हणून त्या 'मागास' ठरत नाहीत.
पद्धती वेगळ्या असल्या, तरी अंत:करण स्वच्छ असेल, तर प्रेम कधीच वेगळं वाटत नाही."


तिचा आवाज आता थोडा अधिक आत्मविश्वासानं भरलेला होता. डोळे सभागृहावर फिरवत ती म्हणाली—

आपण बदलांपासून घाबरून का बघतो?बदल गरजेचं असतो काळानुसार.

बदल म्हणजे चुकीचं नाही, तो एक नवा दृष्टीकोन असतो.

होय, मी काम करते, घरही सांभाळते. योगा करते, पण आईसारखं ‘मन:शांती’ घेऊन.
चर्चा तर होणारच… पण त्या चर्चांना आपण दिशा दिली, तर समाजही बदलतो.”

"काळानुसार सगळं बदलतं – फोन बदलतो, कपडे बदलतात…
मग नाती का बदलू नयेत? पद्धती का न बदलू नयेत?
बदल म्हणजे परंपरेवर घाला नव्हे, तर परंपरेला पुढे नेण्याचा प्रयत्न असतो."

"आता मीही बदललीय.
आधी मी लोक काय म्हणतील, याचा विचार करायचे…
आता मी विचार करते – मी काय म्हणते आणि का म्हणते."


क्षणभर शांतता पसरली.

आणि मग टाळ्यांचा आवाज झाला… गोंधळट, पण सकारात्मक.



घरी परतल्यावर सासूबाई म्हणाल्या, “साक्षी, मी सुरुवातीला खूप शंका घेतल्या तुझ्यावर… पण आज समजलं, तू आमचं घर खूप छान सांभाळणार नाहीस, उलट योग्य वळणावर नेत आहेस.”


साक्षी डोळ्यांत पाणी होत तरी पण ती हसली.

कारण आता ती फक्त चर्चेची विषय नव्हती, ती चर्चेची साक्ष बनली होती.बदल घडवून आणारी होती.

साक्षीचं लग्न झालं.एक वर्षाचा
वाढदिवस साजररा झालं , वाड्यात पुन्हा कुजबुज सुरु झाली –
“सासरी जमेल ना तीला?”
“पाहुण्यांशी नीट बोलत नाही… थोडी हट्टी वाटते…”
“तिला झेपेल का एवढं मोठं कुटुंब?”

साक्षी काहीच बोलली नाही.
ती आता समजून गेली होती –
चर्चा कुठे थांबतात का?

ती हसली… आणि स्वतःचं लक्ष आपल्या संसारात, नवऱ्याच्या स्वभावात, आणि रोजच्या चहात साखर किती हवी यामध्ये घालायला लागली.



काही महिन्यांनी ती आई झाली.
हातात छोटं बाळ, डोळ्यांत थकलं हास्य, आणि मनात – “आपण जे पेरू त्याचं प्रतिबिंबच बाळ होईल…” हाच विचार.

चर्चा आता वेगळ्या प्रकारच्या होत होत्या –
“आई झाल्यावर मुलगी अजून गंभीर झाली आहे…”
“मुलीचा आवाज आईवर गेला वाटतं…”
“हिचं बाळ हुशार आहे, पण खूप खेळतं… घरातली संस्कृती हवी हवीशी वाटते का कुठे?”

साक्षी पुन्हा काहीच बोलली नाही.
ती बाळासोबत बालगीत म्हणत राहिली, पुस्तकं वाचत राहिली, आणि सगळ्या चर्चांवर फक्त मनातल्या मनात एकच वाक्य बोलत राहिली –

“चर्चा होणारच… पण मी चालत राहणारच.”




मुलगी सिया थोडी मोठी झाली.
पहिलं पाऊल चालली, तेव्हा साक्षीला वाटलं – जणू आपलं स्वतःचं पाऊल नव्याने चालायला लागलं!
पहिलं शब्द बोलली – “आई…”
तेव्हा ती शब्द ऐकून फक्त आई नाही राहिली, ती एक आदर्श झाली.

साक्षीने सियाला केवळ वाढवलं नाही,
तर स्वतंत्र विचार, अभिमान, आत्मभान, आणि 'नकारात्मक चर्चांकडे दुर्लक्ष करण्याची ताकद' दिली.

सिया विचारायची,
“आई, लोक असं का बोलतात?”


तेव्हा साक्षी म्हणायची,

“लोक बोलत राहतात…
पण तू स्वतःला विचार – तू का चालतेयस? कुठे चालतेयस? आणि का चालू नये असं कोणी म्हणावं असं वागतेयस का?
जर उत्तर 'नाही' असेल… तर बाकी काही महत्त्वाचं नाही!”


---“आई… मला हे कपडे घालून जायचंय, पण मावशी म्हणत होती की आज न उद्या तुझं लग्न ठरेल थोडं सोज्वळ वागावं लागतं…”

१४ वर्षांची सिया आईपाशी खट्टू चेहरा करून बसली होती. पायात पांढऱ्या स्नीकर, हातात रंगीत बांगड्या, आणि कानात निळे हेडफोन. पण मनात मात्र गोंधळ होता.

साक्षीने तिच्याकडे पाहिलं. थोड्या वेळासाठी साक्षीला आपलं तरुणपण आठवलं – कपड्यांवर, बोलण्यावर, चालण्यावर लोकांच्या टीका ऐकत मोठी झालेली ती.

“सीया… एक गोष्ट सांगू?”
“काय?”
“मी लहान होते तेव्हा एकदा मी जीन्स घालून मिरवणुकीत गेले होते. गावात बरीच कुजबुज झाली होती. 'ही मुलगी वेडावून गेली का?' माझी जीन्स चर्चेचा विषय बनला होता.

घरी आल्यावर मी आईला विचारलं, मीं जीन्स घातली म्हणून मला वेडावून गेली असं म्हटलं. तेव्हा आईने

एक वाक्य सांगितलं – ‘ज्यांना चर्चा करायची असते, त्यांना कारणं लागतातच. तू कारण होऊ नको, उत्तर हो.’”

सिया चुप झाली.

साक्षी पुढे म्हणाली, “मुलीच्या कपड्यांपेक्षा तिच्या विचारांची लांबी, आणि तिच्या स्वभावाचा आकार महत्त्वाचा असतो. तू जे घालतेस, जे ऐकतेस, जे स्वप्नं बघतेस – त्यात जर तुझं स्वतःपण आहे ना, तर बाकी काहीही गैर नाही.”

सिया हसली. तिच्या डोळ्यांत गोंधळ कमी झाला, आत्मविश्वास वाढला.



दुसऱ्या दिवशी सिया शाळेत ‘स्वतंत्र विचार आणि समाज’ या विषयावर भाषण देणार होती.

ती म्हणाली,
“आपण लहानपणापासून समाज काय म्हणेल हे ऐकत मोठे होतो. पण समाज म्हणजे नक्की कोण? आणि का त्याला सतत आपलं वागणं बदलून द्यायचं?

माझ्या आईने मला शिकवलं – ‘लोक बोलतात, कारण त्यांना आपलं लक्ष हवं असतं. पण आपलं लक्ष स्वतःवर असेल, तर चर्चांना आपण घाबरत नाही.’

म्हणून मी आज इथे आहे – माझ्या मर्जीने, माझ्या आवडीनं आणि अभिमानाने.”

संपूर्ण वर्ग स्तब्ध झाला… टाळ्या वाजल्या.


त्या दिवशी संध्याकाळी, साक्षीने सियाला मिठीत घेतलं.

“मुली… तुझ्या या एका भाषणाने कितीतरी मुलींना आवाज मिळेल.”

सिया म्हणाली, “आई… चर्चा तर होणार, पण आता मी त्याला घाबरणार नाही!”


कारण समाजाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसायचं असतं.
पण लक्षात ठेवा – जी माणसं ध्येयावर चालतात, त्यांच्या मागे कुजबुजणारे आवाज नेहमीच राहतात!
म्हणूनच मुलींना केवळ लाजवाब सणांची संस्कृती नको – त्यांना ठाम विचारांची आणि 'तू आहेस तशीही पुरेशी आहेस' अशी शिकवण द्या.
कारण आरशातली प्रतिमा सुंदर असेल की नाही, हे कपड्यांवर नव्हे, तर 'घरून दिलेल्या आत्मविश्वासावर' ठरतं!”


“चर्चा होतात… ते समाजाचं आरसा असतो. पण त्या आरशात स्वतःचं खरे प्रतिबिंब टिकवायचं असेल, तर मुलींना घरातूनच बळ द्यावं लागतं.”