Login

बदल

Story of अ girl named poonam...

#बदल 
सिद्धी भुरके ©®

     पूनमची सकाळपासून गडबड चालू होती. तिने छान घर आवरलं होतं.. सजवलं होतं.. दारात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.. औक्षणाचे ताट तयार केले होते. घरी काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी बोलावली होती. तिची नजर दारावरून हलत नव्हती. सतत येरझाऱ्या घालत होती. घड्याळाकडे बघत होती... तेवढ्यात तिला अमितच्या गाडीचा आवाज आला.. घरी जमलेल्या सगळ्या मंडळींना तिने सूचना दिल्या.. दार उघडताच क्षणी सगळ्यांनी 'सरप्राईज' म्हणून जोरात ओरडायचे... आणि अखेर दारावरची बेल वाजली.. पूनमने लगबगीने दार उघडले.. तोच सगळे जण 'सरप्राईज' म्हणून ओरडले... पूनमने दारात उभ्या असणाऱ्या तिच्या सासूबाईंना मिठी मारली.. त्यांचे औक्षण केले.. फुलांच्या पायघड्यावरून त्यांना आत यायला सांगितले... सासूबाई हे सगळं बघून भारावून गेल्या..

"पूनम अगं.. इतकं सगळं कशासाठी??"सासूबाई पूनमला म्हणाल्या.

"आई अहो.. कुठे काय, फार नाही केलय.. तुमच्या लढ्यापुढे हे काहीच नाहीये.. आज तुमची जिद्द, सकारात्मकता जिंकली आहे.. तुम्ही कॅन्सरला हरवून आला आहात.. तुमच्या जिद्दीला सलाम आई.. म्हणून तुमचं स्वागत तसं झालंच  पाहिजे... वेलकम बॅक आई.. खूप आनंद झाला आम्हाला पुन्हा तुम्हाला घरात पाहून..."पूनम म्हणाली.

      घरी जमलेल्या सगळ्या पाहुणे  मंडळींना  सासूबाई भेटतच होत्या तोच पूनमची तीन वर्षाची लेक 'आजी आजी' करत बाहेर आली. बरेच दिवसांनी आजीला बघून काव्याला आनंद झाला. तिने जाऊन आजीला मिठी मारली. सासूबाईंना सुद्धा बरेच दिवसांनी नात भेटल्याने खूप बरं वाटलं.तितक्यात काव्या म्हणाली,

"आजी अगं तू घरात स्कार्फ  बांधून का बसली आहेस?? इथे तर ऊन नाहीये..."
काव्याच्या प्रश्नाने सासूबाई पण गोंधळून गेल्या.. तितक्यात पूनम म्हणाली,
"बाळा अगं आजीला बरं नाहीये ना.. म्हणून कानात वारा जाऊ नये यासाठी आजीने स्कार्फ बांधला आहे.."आता चार  वर्षांच्या काव्याला काय सांगणार? तिच्या आजीचे केस पूर्ण नाहीसे झाले आहेत ते... थोड्या वेळाने पाहुणे मंडळी गेली. सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या. पूनमला आज कित्येक दिवसांनी सासूबाईंना घरात बघून बरं वाटत होतं.

       असेच बरेच दिवस निघून गेले. सासूबाई त्यांच्या खोलीत आवराआवर करत होत्या.. त्यांनी डोक्यावर स्कार्फ बांधला नव्हता आणि तितक्यात काव्या  त्यांच्या खोलीत गेली. आजीला असं बघून तर ती किंचाळली...

"आजी... आजी काय झालं तुला?? तू अशी का दिसतं आहेस??"

सासूबाई कावऱ्याबावऱ्या झाल्या... त्यांनी पटकन स्कार्फ डोक्यावर घेतला.काव्याला रडूच कोसळलं..

"आजी.. काय झालं सांग ना.. तुझे केस कुठे गेले??"काव्या म्हणाली.

"अगं.. बाळा मी दवाखान्यात राक्षसासोबत लढत होते ना तेव्हा तो पळून गेला.. पण जाता जाता माझे केस घेऊन गेला..."सासूबाई काव्याला जवळ घेत म्हणाल्या.

"आजी.. आता तुझे केस तो राक्षस देणार नाही का??" काव्याने पुन्हा विचारलं.

"माहित नाही गं बाळा... तो राक्षस दूर पळून गेलाय..."सासूबाई डोळे पुसत म्हणाल्या.

"आजी रडू नको.. तू ना माझे केस घे.. असं पण मम्मा सारखे माझे केस कापत असते.. आणि मग परत वाढतात माझे केस... तू घे माझे केस.. आणि मग थोड्या दिवसांनी परत केस वाढतील माझे.."निरागस काव्या म्हणाली. नातीचं प्रेम पाहून सासूबाईंनी तिला उराशी कवटाळलं. खोलीबाहेरून पूनम सगळं ऐकत होती.. तिला काव्याचा अभिमान वाटत होता.
   
     सगळी कामं आटोपून पूनम तिच्या खोलीत गेली.पण तिच्या मनात काव्याचे शब्द घुमत होते.
"एवढाशा काव्याला आजीच्या दुःखाची जाणीव आहे.. ती स्वतःचे केस द्यायला तयार झाली.. खरचं किती निरागस असतात लहान मुलं... आज आम्हाला सासूबाईंना असं पाहून वाईट वाटतंय.. तर मग त्यांना स्वतःला काय वाटत असेल?? त्यांचे पण किती लांबसडक केस होते.."पूनम मनोमन विचार करत होती. ती आरशासमोर जाऊन उभी राहिली.. तिने स्वतःच्या लांबसडक वेणीकडे एकदा पाहिले..

"मी  किती जपते माझ्या केसांना.. हे लांबसडक केस माझे जीव कि प्राण आहेत.. पार्लर मध्ये गेल्यावर दहा दहा वेळा पार्लर वालीला मी फक्त एक इंच केस काप सांगते.. माझे केस माझ्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग आहेत.. लांबसडक केस आणि पूनम हे जणू एक समीकरणच बनले आहे.. मला जर माझ्या केसांची इतकी काळजी आहे तर सासूबाईंना काय वाटत असेल?? आज त्यांच्या डोक्यावर एकही केस नाहीये..कसं सहन केलं असेल त्यांनी.. शरीरातील एखादा अवयव गायब झाल्यासारखं वाटत असेल.."पूनम मनोमन विचार करत होती आणि तिचे मन सुन्न झाले होते.

       दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पूनम घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी पूनमचा पत्ता नाही म्हणून सासूबाई चिंतेत होत्या. तिने फोन सुद्धा उचलला नव्हता. थोड्या वेळाने अमितसुद्धा घरी आला.. त्याने सुद्धा पूनमला फोन लावले.. पण काही उपयोग नाही.. तिने फोन उचलला नाही आणि तितक्यात दारावरची बेल वाजली...सासूबाईंनी दार उघडले, दारात पूनमला पाहून त्या थक्क झाल्या..

"काय गं पूनम?? काय केलंस हे??? अमित.. अरे बघ हिने काय केलाय.."असं म्हणत सासूबाईंनी अमितला सुद्धा बोलवलं.. तो सुद्धा पूनमला असं पाहून आश्चर्यचकित झाला..

"पूनम अगं... तू केस कापले??? लांबसडक वेणी कापून खांद्यापर्यंत केस केले?? काय झालं?? का केलंस असं?? आणि कुठे होतीस दिवसभर तू??"अमितने चिडून विचारले.

"अरे काल काव्याच्या बोलण्याने माझे डोळे उघडले.. माझी चिमुकली परी तिचे केस आईंना द्यायला तयार झाली होती.. तिला समजलं हे.. पण माझ्या लक्षात आलं नव्हतं.. मी माझे केस आईंसारख्या कितीतरी कॅन्सर पेशंटला दान करू शकते.. मला अजूनही आठवतं मी आईंसोबत त्यांच्या कीमो थेरपीला जायचे.. तेव्हा तिथे विविध वयोगटातील पेशंटला मी पाहिले.. एका पाच वर्षांच्या कॅन्सरशी लढा देणाऱ्या मुलाला केस नव्हते.. भुवया सुद्धा नव्हत्या.. काही तरुण मुलं सुद्धा होती ज्यांचे केस कॅन्सर मुळे गेले होते.. फार वाईट वाटायचं मला त्यांच्याकडे बघुन.. आणि काल काव्या बोलली तेव्हा लक्षात आले माझ्या आम्ही केस कापले तर काही महिन्यात आमचे केस वाढतात सुद्धा.. आणि ते आमचे कापलेले केस शेवटी कचऱ्यातच जातात ना.. पण तेच केस कॅन्सर पेशंटला जीवदान बनू शकतात... म्हणून काल मी आईंच्या डॉक्टरांना फोन केला होता.. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.. त्यांनी मला सांगितले कि केस दान करता येऊ शकतात.. हे केस चेन्नईला कॅन्सर सेंटरला पाठवतात आणि त्यांच्यापासून विग बनवला जातो खास कॅन्सर पेशंट साठी...मग मी मनाशी ठरवलं.. आज जाऊन केस कापले.. आणि ते कॅन्सर सेंटरला पाठवले सुद्धा..."पूनमने सांगितले.

"अगं.. पण तुला स्वतःमध्ये हा बदल करायची काय गरज होती?? एवढे लांबसडक केस कापताना तुला वाईट नाही वाटलं?? मला विचार या केसांचं महत्व.."सासूबाई म्हणाल्या.

"आई... स्वतःमध्ये हा बदल  करून मला खूप छान वाटतंय... मला जाणीव आहे तुमच्या दुःखाची म्हणून तर जीवापाड जपणारे केस मी कापून आले.. काही इंच केस कापून माझं काही नुकसान झालं नाहीये.. पण कॅन्सर पेशंटला नक्कीच त्याचा फायदा होईल.. हा स्वतःमध्ये केलेला छोटासा बदल कोणाच्यातरी चेहऱ्यावर हास्याची कळी उमलावणार असेल तर मला हा बदल करायला नक्कीच आवडेल...आणि उद्या जाऊन आपण तुमच्यासाठी पण विग बनवायला सांगू "पूनम म्हणाली.

पूनमने स्वतःमध्ये केस कापून केलेला हा अनपेक्षित बदल सुखावणारा होता. सासूबाईंना कोणीतरी आपल्याला समजून घेतलं आहे हे पाहून खूप बरं वाटलं.

"खरंच.. तुझं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं..माझं दुःख जाणून तू स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल केलास.. कारण लांब केस ही तुझी ओळख होती... खरंच खूप मोठ्या मनाची आहेस तू.."सासूबाई डोळे पुसत म्हणाल्या... पूनमला सुद्धा गहिवरून आले. तिने जाऊन सासूबाईंना मिठी मारली.

    अमितही त्याच्या बायकोने तिच्यात केलेला अनपेक्षित  बदल पाहून भारावला  होता.. खरंतर त्याला सुद्धा पूनमचे लांबसडक केस आवडायचे पण आज ती केस कापून आल्यावर त्याला अजून सुंदर वाटत होती.. त्याला पूनमचा अभिमान वाटत होता.

वाचकहो तुम्हाला वरील कथा कशी वाटली ते नक्की सांगा. या अनपेक्षित बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®