ईरा राज्यस्तरीय करंडक लघुकथा
शीर्षक -चने है तो दात नही..
विषय - आणि ती हसली!
टीम ईरा संभाजीनगर
लेखिका ©स्वप्ना मुळे
ती घर झाडत होती,..तोंडाने बडबड सुरूच होती,मी दोन दिवस आजारी पडले की घराची रया बिघडून जाते,..पाहा किती पसारा करून ठेवला दोन दिवसात,..तिची ही वटवट सुरूच होती आणि तेवढ्यात बाथरूममध्ये शिरलेल्या जिजाबाईने विचारलं,.."बाई कपड्याची पावडर आणली का,..?दोन दिवस झाले कपडे फक्त साबणाने धुतले पावडरीत न भिजवता,.."
दालफ्रायला तडका बसावा असंच झालं आणि ती त्याच्या अगदी जवळ जाऊन कानातच ओरडली,"मावशी अहो कोण आणणार सामान, त्यासाठी दुकानात जावं लागतं,..साहेबाला कुठे वेळ मिळतो का वाण्याकडे जायला,..?"
तिच्या तोंडून वाणी हा टिपिकल शब्द ऐकून बाबांच्या बाजूलाच बसलेली चिमणी बाबांच्या कानात कुजबुजली,"बाबा वाणी कोण असतो?"बाबाने हातानेच खुणावले गप्प बैस,..सध्या तिच्या बडबडीसमोर तो काहीच बोलत नव्हता कारण त्याला माहित होतं आजारपणामुळे जास्तच चिडचिड सुरू आहे हिची,..
तिचा आवेग पाहून जिजाबाईच पटकन बाथरूमच्या बाहेर आली आणि म्हणाली,"ताई राहुद्या, चिडू नका साहेबावर, कारण माणसाला कुठे बाईसारख पटपट जमतं,.. तरी केलंच ना त्यांनी.
तुम्हाला गरम वरणभात तरी खाऊ घातला ना,..उग नका तब्येतीला त्रास करून घेऊ,..पावडर काय आज नाही उद्या येईल पण तब्येत ती अशी चिडचिड करून बिघडली तर पुन्हा सगळ्यांना त्रास,.." एवढ बोलत जिजाबाई परत बाथरूममध्ये शिरली.
त्याने तिचा मूड ओळखून लवकरच चहाच आधण टाकलं,..चहा घेताना ती बऱ्यापैकी शांत होती,..हल्ली दगदग,धावपळ आणि त्यात मध्येच असे डोके काढलेल्या दुखण्याने तिची चिडचिड होत होती,..त्याच तिच्यावर मनापासून प्रेम होतं,..त्याने चहा घेताना अलगद तिच्या हातावर हात ठेवला,..
डोळ्यानेच तिला खुणावले आणि म्हणाला,"आज वाण्याकडे मी आणि चिमणीच जाऊ ठीक आहे ना?"त्याने चिऊला हाक मारली आणि म्हणाला,"चिऊ संध्याकाळी तयार राहा मी ऑफिसमधुन आलो की आपण वाण्याकडे जाऊ,...जिजाबाई तुम्हाला उद्या कपडे धुण्याची पावडर नक्की मिळेल बरं का,..?"जिजाबाई हसत म्हणाल्या,"बरं बरं साहेब,.. चहा छान झाला होता बरं का?"
तो हसला, चहाचे कप ओट्यावर ठेवत तो चिऊला घेऊन निघाला.
गॅसवर कुकर तयार होता, तो ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच जेवणार होता, चिऊला शाळेतच जेवण होतं.
जिजाबाई निघताना तिच्या जवळ रेंगाळली,तिला लक्षात आलं,
ती म्हणाली,"काय म्हणता जिजाबाई,..?"
जिजाबाई म्हणाल्या,"ताई लै चिडचिड नका करू साहेबावर, माझ्या लेकासारखेच वाटतात मला ते आणि जीव पण लावतात,..गेल्या दहा वर्षांपासून कामाला आहे मी तुमच्याकडे, बघते म्हणून सांगते...आयुष्याचा काही भरवसा नाही,सकाळी गेलेलं माणूस संध्याकाळी डोळ्यासमोर दिसत नाही! मी असं भोगलेलं आहे ताई,..माणूस असेपर्यंत त्याची किंमत कळत न्हाई आणि गेलं की उणीव भरून येत नाही,..तश्या तुम्ही चांगल्याच आहात हो पण उगं मोठ्या अधिकारान सांगावं वाटलं मला, राग आला तर माफ करा."
जिजाबाई निघून गेली,.. तिला जिजाबाईचा राग आला नाही,तिला वाटलं आपली आजी आईला असं सांगायची,कधी ती बाबाला सांगायची.
तिचं ठरलेलं वाक्य असायचं,"दात है तो चने नही आणि चने है तो दात नही,.."आपण म्हणायचो हसून आजी हे पैसे आणि मजा ह्याच्यासाठी वापरतात,तर ती म्हणायची," मी ते माणसासाठी वापरते गं. ..माणसं आहेत जगण्यात तर जीव लावा नाहीतर नंतर उपरती होईल तुम्हाला जीव लावावा वाटेल पण माणसं नसतील कुठेतरी दूर निघून गेलेली असतील तर ?"
तिला आताही आजीचं सगळं बोलणं आठवलं आणि तिने पटकन मोबाईल हातात घेतला,.. नवऱ्याला फोन लावला,..तिचा पहिला शब्द होता,..सॉरी,..तो म्हणाला,"हम्म आता भांडण वाण्याकडे जाऊनच मिटेल" दोघे खळखळून हसले.
संध्याकाळी त्याने आल्या- आल्या सामानाची यादी करायला घेतली,..कितीतरी दिवसांनी कदाचित वर्षांनी तो आज यादी करायला बसला होता,..त्याने आधी श्री लिहिलं आणि म्हणाला चला पहिली वस्तू चिऊ तू सांग,..चिऊ म्हणाली,"बस दो मिनीटवाली मॅगी,.."तो म्हणाला,"ए चिऊ यादीत पहिले गोड नाव पाहिजे किराण्यातलं गोड नाव सांग,.."
चिऊ ओरडली,"साखर.."
तो हसून म्हणाला,"एकदम बरोबर साखर,..तुझ्या आईसारखी गोड,.. किती किलो लिहू,..?"
त्याच्या बदमाश विनोदावर डोळ्यांच्या कडामधून खुणावत ती म्हणाली,"तीन किलो लिही,.."त्याने लिहिलं,..आणि त्याला एकदम आठवलं,..आपले बाबा अशीच यादी बनवायचे,..आई एकेक डबा बघायची किंवा बरचसं तर अगदी तोंडपाठ असायचं तिच्या,..हल्ली आपण तर मॉलमधून बऱ्याच वस्तू आणतो,..काही अर्जंट असलं तर फोनवरून मागवून घेतो,..अशी यादी करायला बसण्याची मजा आपणच हाताने घालवली आहे,..त्याचा विचार तिच्या आवाजाने मोडला,.."चिऊ बाबाला म्हणा,..तांदूळ तीन किलो,गुळ दोन किलो,शेंगदाणे दोन किलो,.. ती भराभर सुरू झाली...
एका वस्तूवर तो थबकला,..काजू,बदाम?
चक्क अर्धकिलो सांगितले तिने.
त्याला आठवलं आपण आपल्या वडिलांच्याजवळ यादी करताना घुटमळायचो, काजू शब्द आला की बघायचो किती लिहिले बाबाने, आई तिकडून म्हणायची,"छटाकच आणा हो,..खरंतर काही गरजच नाही आणण्याची,..पण तुमचा नसता हट्ट,..लेकरांना काहीतरी पौष्टिक,..आणि मला मेलीला पाळी झाली की दोनचार बदाम,काजू तोंडात टाकले तरच शक्ती येईल ही तुमची चुकीची समजूत,.."
आईच्या या वाक्यावर बाबा हसून म्हणायचे,"चुकीची तर चुकीची समजूत असू दे पण काहीतरी फरक पडेल तुझ्या तब्येतीत,..उद्या मला असं वाटायला नको,..दात थे पर चने नही थे,.. जेवढं आहे त्यात थोडक्यात तर थोडक्यात करू दे की हौस,.."
आपण वडिलांसोबत वाण्याकडे जायचो,..त्याच्या समोर लावलेल्या त्या काजू,बदामाच्या गच्च् भरलेल्या काचेच्या बरण्या,..आपल्या घरासाठी त्यातले छटाकच तो बांधायचा,..घरी आलं की बाबा त्यातला एक एक तुकडा हातावर ठेवत म्हणायचे,"आता हे तुमच्या आईसाठी बरं, तिला बरं वाटलं पाहिजे ना,..ती सगळ्यात जास्त काम करते घरात,..ए हे घे गं, तुझा खाऊ,.."
आई खरंतर एकटी ते कधी खायची नाही त्यातलं तुकडे कोणालातरी मिळतच होतं,.. आणि आज आपल्या यादीत एवढे काजू,बदाम आपण आणू शकतो पण आई,बाबा कोणीच राहिलं नाही,..खरंच ह्यालाच म्हणत असतील का??
दात है तो चने नही और चने है तो दात नही.
" बाबा चला ना वाण्याकडे,.."चिऊच्या हाकेने त्याची तंद्री मोडली,..डोळ्यात आलेलं पाणी त्याने पुसलं,..ती दुरून बघतच होती त्याच्या कृतीकडे आणि ओळखूनही होती त्याला,..चटकन त्याचा हात धरत म्हणाली,"आई बाबांची आठवण आली का,..?"तो भरल्या गळ्याने म्हणाला,"दात है तो चने नही आणि चने है तो दात नही.."त्याच्या वाक्यावर तिला मनातलं सकाळचं सगळं आठवलं.
मनात वाटलं , प्रत्येकवेळी सगळंच बोलून दाखवायची गरज नसते म्हणून ती फक्त हसली...!
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
विषय - . . . आणि ती हसली.
जिल्हा- संभाजीनगर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा