Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

चंद्रिका

Read Later
चंद्रिका


 कथेचे नाव :- चंद्रिका
विषय :- काळ होता पण 

फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


(कथेचा काळ १९९० च्या आसपासचा आहे.)

" आगं ये वंदे लवकर ये. नवरा नवरी आलं हाईत दारावर. दार धराया लागल ननंदबाईस्नी." गंगुबाई आपली पुतणी वंदनाच्या नावाने ओरडल्या.

"आले आले काके. जरा दम धर की." वंदना घरात येत म्हणाली. घरात आल्यावर तिने चादरीने दरवाजा झाकुन घेतला. तोपर्यंत नवरा नवरी दरवाजात येऊन उभे राहीले होते.

" वहिनीबाई म्या  तुम्हास्नी  काय तशी घरामंदी येऊ द्याची न्हाई. " वंदना दाराला लावलेल्या चादरीआडून  म्हणाली. .

"काय पायजेल मग तुला?" नवरदेवासोबत असलेल्या एका करवलीने विचारले.

"मी मागन ते देशील का रं दादा?" वंदनाने  विचारले.

"व्हय देईन की!" नवरा मुलगा राजेश म्हणाला.

"माझ्या लेकाला तुझी पोर पायजे बायकू म्हणून. देशील का वैनीबाय!." वंदना म्हणाली.

सोबत असलेल्या करवलीने नवऱ्या मुलीच्या सरीताच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून सरीता म्हणाली." व्हईल लेक आम्हास्नी , देईन सुन तुम्हास्नी!"

" मागं सर गं वंदे . दार सोड आता. " गंगुबाई म्हणाल्या.

वंदनाने दरवाजाला लावलेली चादर काढली. तशी सरीता दरवाजात ठेवलेलं माप ओलांडून आत आली. मग नवरा नवरी आणि  बाकी लोक उखाणा व काही विधी मध्ये व्यस्त झाले. गंगूबाईंनी मात्र वंदनाचा हात धरून तिला एका बाजूला खेचत आणले आणि म्हणाल्या ." काय गं वंदे ! तुला दुसरं काय बी मागता न्हाई आलं व्हय गं ? आली मोठी पोरावाली. सुन पायजेल म्हणं."

"काके , मग काय तुझा लेक काय मला पैशे काढून देणार व्हता काय. येक नंबरचा कंजूस हाय त्यो. येळेला म्या हजर व्हते त्ये आभार मान माझे.  " वंदना फणकाऱ्याने निघून गेली.

सरीताचे नव्याचे नऊ दिवस संपून संसाराला सुरुवात झाली. एक दिवस सरीता कुंकवाच्या करंड्यातून कपाळावर कुंकू लावत होती. तोच खुप जोराचा वारा आला आणि कुंकवाचा करंडा खाली फरशीवर सांडला. फरशीवर सर्वीकडे कुंकूच कुंकू पसरले होते. तो आवाज ऐकून गंगूबाई तिथे आल्या आणि  म्हणाल्या ." काय गं सरे! कसला  येवढा आवाज . काय पाडलंस तू!"

" आवो आत्याबाई म्या काय बी न्हाई पाडलं. लई जोराचा वारा आला आन्  या फळीवर ठिवलेला ह्यो कु्काचा करंडा सांडला फरशीवर." सरीता घाबरून म्हणाली.

"इथं गर्मीनी घामाच्या धारा लागल्यात आंगाला आणि तुझ्याकडं वारा माजला म्हणती व्हय. सोताची चूक लपवायला खोटं बोलती व्हय. तुला फुकटात करुन आणलीये. तुझ्या आई-बानं येक पैशाचा हुंडा दिला न्हाई. जरा नीट वाग नाहीतर अशीच्या अशी घराबाह्येर काढीन ही गंगुबाई तुला. एक लक्षात ठिव मला अशी नुकसान केलेली खपायची न्हाई. सांगून ठेवते. आवर ते कुकू भरून टाक ." गंगुबाई दरवाजात उभ्या राहुनच सरीतावर डाफरल्या.

बिचारी सरीता विचारात पडली. \"अचानक कसा काय वारा आला.\" खाली फरशीवर सांडलेलं कुंकू भरायला ती खाली वाकली तोच तिला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. खाली सांडलेल्या कुंकात कुणाची तरी पावले उमटली होती. ते कुंकवाच्या पावलांचे ठसे खिडकीपर्यंत उमटली होती. . \"आत्याबाई पण आत आल्या नाही . मी पण एकाच जागेवर उभी हाय तरी ही पावलं कोणाची? भूत बित तर न्हाई ना.\" नुसत्या विचारानेच  सरीताच्या अंगावर काटा आला. नंतर कामाच्या व्यापात ती ही गोष्ट विसरून गेली.

काही दिवसांनी एके रात्री झोपण्यापूर्वी सरीता आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. तिला आरशात नकळत एक आकृती दिसली. तिने लगेच मागै वळून बघितले तर मागे काहीच नव्हतं. आपल्याला भास झाला असे समजून ती परत केस विंचरु लागली. पुन्हा तशीच एक आकृती तिला दिसली. आता मात्र सरीता खुप घाबरली. तिची मागे वळून बघायची हिंमतच होत नव्हती. घाबरून तिने डोळे गच्च मिटून घेतले. थोड्या वेळाने हिंमत एकवटून तिने हळूच आरशात बघितले तर तिथे काहीच नव्हतं. ती तशीच घाबरून पलंगावर झोपलेल्या राजेशकडे गेली आणि त्याला उठवू लागली. आवं ! उठा ना! आपल्या खोलीत कुणीतरी हाय. मला लई भीती वाटतीया.  ."

गाढ झोपलेल्या राजेशने सरीताला आपल्या मिठीत ओढत म्हणाला  " व्हय . आपल्या खोलीत आपण दोघं हावोत की. ये इकडं  जवळ. तुझी भीती घालवतो बघ कशी."

त्या रात्रीनंतर मात्र सरीता प्रत्येक रात्र जीव मुठीत धरून झोपू लागली. कधीकधी  कामात असताना सरीताला कुणीतरी सर्रकन बाजूने गेल्याचा भास होई. तर कधी रात्री अपरात्री झोपेत असताना कुणी कानात कुजबुजल्याचा भास होई. पण घरात तिच्या या सांगण्यावर कुणीच विश्वास ठेवत नव्हते. उलट तिलाच वेड्यात काढले जाई. एक दिवस सरीताच्या या वागण्याला वैतागून गंगूबाईंनी सरीता आणि राजेशला बोलावले आणि रागात म्हणाल्या. "सरे तुझी सारी नाटकं मला समजत्यात बरं. तुला या घरात र्हायचं न्हाई म्हणून तु काय पण नाटकं लावलीत. तुला सवता संसार थाटायचाय. पण एक लक्षात ठेव ही गंगुबाई जीत्ती हार तवर म्या हे घर मोडू द्यायची न्हाय. राजा आवर आपल्या बायकूला. परत म्या सांगितलं न्हाई म्हणशील. "

आईचं बोलणं ऐकून संतापलेल्या राजेशने पहिल्यांदा सरीतावर हात उचलला. बिचारी सरीता हे आरोप नाकारत होती पण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. ती पूर्ण रात्र सरीताने रडण्यात घालवली. तेव्हा पण तिला कुणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असं वाटत होतं. परंतु तिच्यावर झालेल्या आरोपांमुळे तिची मनस्थिती काहीच समजण्या पलिकडे होती.

लग्नाला दोन महिने झाले असतील . सरीताला नव्या जीवाची चाहूल लागली. घरात सर्वच खुप खुश झाले. राजेश देखील खुप प्रेमाने वागू लागला. आता मात्र सरीताने देखील या होणाऱ्या  भासांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. सरीताचे तीन महिने पूर्ण झाले होते. तीन महिने कुणाला सांगायचं नसतं है कारण देऊन गंगूबाईंनी सरीताला ही गोड बातमी तिच्या माहेरी देखील सांगू दिली नव्हती. तीन महिने पूर्ण झाल्यावर ही बातमी माहेरी कळवण्याबद्दल सरीताने राजेशला विचारले . आईला विचार असं सांगून राजेशने हात झटकले.

"आत्याबाई , आता तीन महिनं झालीत तर म्या माझ्या माह्येरी पत्र पाठवूनशानी  सांगावा धाडू काय?" सरीताने गंगूबाईंना विचारले. 

"थांब जरा. अजून एखादा महिना न्हाई कळलं तर काय बी  बिघडत न्हाई . वाईच थांब आपण उद्या तालुक्यातील डाग्टरकडं जाऊन येऊ. " गंगुबाई म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी गंगुबाई आणि राजेश सरीताला घेऊन तालुक्यातील डॉक्टरकडे जाऊन आले. घरी आल्यावर मात्र  सरीताला  दोघेही कमालीचे शांत वाटले. तिने विचारले असता तिला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. रात्री देखील सरीताला पुढे झोपायला पाठवून राजेश आणि गंगुबाई काहीतरी महत्त्वाचे बोलत बसले होते. चार पाच दिवसांनी राजेश सरीताला म्हणाला ." सरीता आवर पटकन. आपल्याला डाक्टरकडं जायचंय."

"आवं पण आता चार दिसापूर्वीच आपण जाऊन आलो की डाक्टरकडं." सरीता म्हणाली.

"ते येगळ्या डाक्टरकडं . आज येगळ्या डाक्टरकडं जायचंय." राजेश म्हणाला. तशी सरीता काळजीत पडली.

" असं काही हाय का जे तुमी मला सांगत न्हाई. बाळ बरंय ना आपलं." सरीताने विचारले.

" बाळाची तब्येत नाजूक हाय. म्हणूनच चांगल्या डाक्टरकडं जायचंय. तु आवर जा पटकन." राजेशने मोजकंच बोलून सरीताला आवरायला पाठवलं.

"मी सांगितलं तसंच कर राजा." गंगुबाई म्हणाल्या तशी राजेशने होकारार्थी मान हलवली. सरीता आवरुन आली. राजेश तिला घेऊन जायला निघाला. बंद असलेला दरवाजा उघडू लागला पण दरवाजा मात्र घट्ट बसला होता. राजेश जोर लावू लागला. तोच झटका लागल्यासारखा राजेश चार फुटावर जाऊन पडला. आता वातावरणातही बदल होऊ लागला. काळे ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुरू झाला. खिडक्यांचे दरवाजे एकमेकांवर आपटू लागले. गंगुबाई , राजेश , सरीता सर्वच घाबरले. नक्की काय होतंय कुणाला काहीच कळेनासं झालं. मध्येच जोरात वीजेचा कडाकडाट होऊ लागला.

म्या सांगत व्हते ना. नक्की कायतरी आहे आपल्या घरात. आता बघा तुमच्याच डोळ्यांनी. " सरीता थरथरत म्हणाली.

तोच एक छोटी वावटळ घरात निर्माण झाली आणि सर्वांभोवती फिरु लागली. तिघेही घाबरून थरथरू लागले.

"पुन्ह्यांदा तेच करु नगा तुमी लोक. नाहीतर माझ्या पेक्षा कुणी वाईट नसल. " एक घोगरा आवाज आला.

"कोण...कोण  हाय? " गंगुबाईने घाबरतच विचारले.

"मला ईसरलीस का गं थेरडे! " तोच आवाज आला.

" क..क...कोण .. ?" राजेशने थरथरत विचारले.

" ए भा******ऊ!  मी हाय चंद्रिका! " तोच आवाज आला आणि त्यांच्या समोर एक केस पिंजारलेली , कपाळावरचं कुंकू विस्कटलेली , डोळ्यांखाली काळी वर्तुळं आलेली , भीतीदायक दिसणारी चंद्रिका अवतरली.

"चंद्रे ... म्हणजे चंद्रिका तु..! " गंगुबाई म्हणाल्या.

"व्हय मीच. मी तुम्हाला परत दोन जीव घेऊन देणार न्हाई." चंद्रिका कडाडली.

" दोन जीव.. म्हंजी!" सरीताने विचारले.

" व्हय दोन जीव घेतले या नालायक लोकांनी. माणसं न्हाईत ही. जनावरं हायेत .. जनावरं. माझा आणि माझ्या पोटातल्या माझ्या लेकीचा जीव घेतला या भा*** लोकांनी. आधीपासनंच ह्ये लोक माझ्याशी धड वागत नव्हते. जनावरापायी राबवून घ्यायचे हे दोघं मायलेक . का तर माझ्या बापानं ठरवलेला हुंडा समदा दिला न्हाई म्हणून. माझ्या पोटात बाळ हाय हे समजल्यापासून मी या जनावरांच्या त्रासाकडं दुर्लक्ष करायचे. पण या गंगीनी आणि या तिच्या नालायक लेकानी तालुक्यातील डाक्टरकडं नेऊन  माझी तपासणी करून घेतली. माझ्या पोटात पोरीचा गर्भ हाय ते समजल्यापासून ही थेरडी पिसाळली. तिनी पोराला जन्म दिला , पोरीला नाही याचा या गंगीला लय माज व्हता. सारखी मला ऐकवायची. हिच्या आईबापानं हा ईचार केला असता तर ही गंगी असती का! माझ्या पोटातल्या माझ्या लेकीला मारायचं व्हतं या रानटी जनावरांना. आधीच यांनी दिलेल्या त्रासामुळं माझी तब्येत खराब झाली व्हती. अशा अवस्थेत गर्भ पाडायचा म्हंजी माझा जीव धोक्यात घालण्यासारखं हाय असं डाक्टरनी यांना सांगून पण या जनावरांना दया न्हाई आली. शेवटी माझा आन् माझ्या लेकीचा जीव घेतलाच यांनी. आन् आता तुझ्यासोबत पण ह्येच करायचंय यांना. म्या तुला सांगायचा लई प्रयत्न केला. पण तुला न्हाई वळखता आलं." चंद्रिका म्हणाली.

"म्हंजी मला व्हणारे ते भास नव्हते तर. ती खरंच तु व्हतीस." सरीता म्हणाली.

" व्हय ती म्याच व्हते. पण आता मी तुझा आन् तुझ्या लेकीचा जीव या जनावरांना घेऊन देणार न्हाई. ए गंगे आणि तु रे बांडगुळा .. एक लक्षात ठेवा , जर या सरीताला आणि तिच्या पोटातल्या बाळाला तुम्ही काही केलं तर समजायचं की तो तुमचा शेवटचा दिस हाय." चंद्रिका कडाडली.

"चंद्रिका ताई .. तुमचे लई उपकार झाले बगा माझ्यावर. आज माझा काळ आला होता पण तुमी देवासारख्या धावून आलात मला आन् माझ्या लेकीचा जीव वाचवायला. " सरिता हात जोडून म्हणाली.

गंगुबाई आणि राजेश दोघे पण हात जोडून चंद्रिकेच्या पाया पडत म्हणाले." न्हाई ..न्हाई.. आम्ही काय बी न्हाई करणार सरीतासंगं. आम्हाला एकवार माफी दे."

"आता म्या जाते पण जर परत तुम्ही काही केलं तर म्या परत येईन लक्षात ठिवा. " चंद्रिका म्हणाली आणि अदृश्य झाली. तिच्या जाण्यानंतर लगेच वातावरण पूर्ववत झाले.

घाबरलेल्या गंगूबाईने आणि राजेशने मात्र या घटनेनंतर स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली. आज बरोबर सात महिन्यांनी सरीताच्या सव्वा महिन्याच्या परीचं बारसं होतं . बाळाला पाळण्यात टाकून तिच्या वंदना आत्याने बाळाच्या कानात तिचं नाव सांगितलं .." चंद्रिका !!!!!!"

समाप्त .

©® माधवी पंकज हांडे

जिल्हा :- ठाणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

माधवी

House Wife

I Am Special

//