कथेचे नाव:- चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद
विषय :- प्रेमकथा
फेरी:- राज्यस्तरीय कथामालिका लेखन
"पुनमऽ ब्रेकफास्ट डायनिंग टेबलवर तयार करून ठेवला आहे, लवकर बाहेर ये. कॅब बुक केली आहे. सोसायटी खाली वीस मिनिटात येईल." रोहिणी बेडरूमच्या दरवाज्यावर टकटक करत बोलली.
पुनम बेडरूमचा दरवाजा उघडून बाहेर आली. "हे रोहिणी! हाऊ आय एम लुकिंग?"
तिने डार्क ब्लू कलरचा गुडघ्यापर्यंत टाईट वन पिस घातला होता. चेहऱ्यावर चमकदार हलकासा मेकअप व ओठावर फिकट गुलाबी लिपस्टिक, कानात स्टोनचे ब्लू इअर रींग घातले होते आणि स्टेप कट असणाऱ्या केसांना व्यवस्थित सेट केले होते. एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात छोटी पर्स घेतली होती. झीरो फिगर नाही अन् जाडही नाही; मात्र देखणी अशी फिगर मेन्टेन होती. गव्हाळ रंगाची अशी ती मादक दिसत होती.
रोहिणी एकटक पुनमकडे बघतच राहिली. ती आ वासून तिचे रुप न्याहाळत होती. पुनम हळूच हाताने तिचे ओठ बंद करत म्हणाली,"मॅडम! तू अशीच माझ्याकडे बघणार आहेस? की, काही बोलणार आहेस?"
रोहिणी हसतच तिला मिठी देत म्हणाली,"सोऽ प्रीटी. ऑल द बेस्ट स्वीटहार्ट."
तेवढीच घट्ट मिठी पुनमने रोहिणीला दिली, "थँक्स डियर फॉर एवरीथिंग. माझे स्वप्न केवळ तुझ्यामुळे...."
पुनमचे वाक्य तोडत रोहिणी प्रशंसा करण्याच्या सुरात बोलू लागली. "सुधांशुचे मार्गदर्शन लाखमोलाचे होते, कारण श्रावण क्वीन काँटेस्टसाठी त्याने दिलेल्या सूचना खूप महत्वाच्या ठरल्या आणि फायनली आज विजेती म्हणून तू महाराष्ट्रभर झळकली आहेस नाहीतर मला देखील याबद्दल काही आयडिया नाही. अँड यू नो ना? आय डोन्ट लाईक मीडिया अँड ऑल. ह्या सगळ्यापासून मी नेहमी लांबच असते." डोळे मिचकवत रोहिणी बोलून गेली.
"आणि सुधांशु? तो तर फिल्म डायरेक्टर आहे. मग तो कसा आवडला?" पुनमने हसतच तिची चेष्टा केली.
"जेव्हा सुधांशु जिममध्ये ट्रेनिंगसाठी जॉईन होणार होता तेव्हा त्याने विनंती अर्ज केला. मला ट्रेनरकडून ट्रेनिंग नको. जिम हेडकडून प्रॉपर फिटनेस ट्रेनिंग पाहिजे. कस्टमर म्हटलं तर त्यांची पाहिजे तशी व्यवस्था करणे भाग आहे. शिवाय एक प्रख्यात सेलिब्रिटी! प्रेम नावाचा शब्द माझ्या आयुष्याला कधीच जोडून नव्हता. कॉलेज नंतर माझे उद्दिष्ट जिम क्षेत्रात करियर घडवायचं हे एकच होतं. सुधांशुला ट्रेनिंग देत असताना हळू हळू त्याचा सहवास मला आवडायला लागला. मीटिंग, डिनर आणि मग होते होते प्यार हो गया. कधी एकमेकांचे झालो कळलेच नाही. असं पण सुधांशुचे काम पडद्याच्या मागे असते. त्यांच काम भलं आणि तो. असा एकंदर त्याचा स्वभाव आहे. जवळजवळ माझ्या सारखाच." बोलताना रोहिणीच्या गालावरची खळीदेखील लाजत होती.
डायनिंग टेबलवरील ऑरेंज ज्युसचा ग्लास उचलत पुनम म्हणाली ,"अच्छा! चार वर्षांपर्यंत रोहिणी नक्षत्र पुनवेच्या रातीस गडप होऊन बसलं; ते प्रेम जाळ्यात अडकून बसलं होतं." पुनम पुर्णपणे मस्ती करण्याच्या मुडमध्ये होती.
"तू तर माझी पुनवेची रात्र. माझ्या आयुष्यातील लखलखीत चंदेरी दुनियेच्या जगातली सखी." रोहिणी व्यक्त झाली.
"आणि सुधांशु तो कोण?" पुनम भुवया उंचावत बोलली.
"हम्म्म.. सुधांशु म्हणजे संस्कृत भाषेतला चंद्र. रोहिणी शिवाय चंद्र कुणालाच जवळ येऊ देत नाही. म्हणजे चंद्राच्या पत्नीस रोहिणी म्हटले जाते आणि ती रोहिणी म्हणजे मीच. कदाचित आम्हा दोघांच्या नावाला अनुसरून प्रेमाच्या तारा जुळल्या गेल्या असाव्यात?" स्वप्नाच्या जगात हरवून जावे असे उत्तर रोहिणीने दिले.
हसतच सोफ्यावर बसून पुनमने ड्रेसला मॅचींग आणलेले ब्लू रंगाचे हील सॅंडल्स घातले. "ऑडिशनसाठी किती वेळ लागेल काय माहिती? शिवाय स्टुडिओमधील क्राउड." असं म्हणत ती थोडी उदास झाली.
"क्राउड आणि स्वतःचा परफॉर्मन्स ह्यांचा एकमेकांशी काही एक संबंध नाही. आपला परॉर्मन्स नेहमी कमाल झाला पाहिजे. आज कुठल्याही परिस्थितीत तुझे सिलेक्शन झालेच पाहिजे. तिथे सुधांशुसोबत अजून चार डायरेक्टर असतील. बी कॉन्फिडंट यार." असं म्हणत रोहिणीने ड्रॉवरमधील किल्ल्याचा सेट पुनमच्या हातात सोपवला.
पुनमने किल्ल्या पर्समध्ये ठेवल्या. रोहिणी पुढे बोलू लागली."आपल्या जिममध्ये सुधांशुचे ॲक्टर मित्र जॉईन होणार आहेत. त्यांच्या सोबत मीटिंग आहे. सेलिब्रिटी म्हटलं तर ते त्यांच्या सवडीनुसार कधी येऊन टपकतील माहिती नाही गं. बहुतेक मला घरी यायला उशीर होईल. किल्ल्यांचा एक्स्ट्रा सेट तुझ्याकडे ठेव आणि घराबाहेर एकदाचे पाऊल टाक. नाहीतर आपण बोलतच बसू." पुनमच्या हातात हात घालून रोहिणी तिला लिफ्टपर्यंत सोडण्यासाठी गेली.
पुनम लिफ्टचा दरवाजा बंद करत असताना रोहिणी तिला म्हणाली,"सॉरी यार! आज तुला एकटीला जावे लागत आहे. नव्या अवकाशाच्या शोधात नव्या दिशेचा शोध घेताना तू डगमगू नये म्हणून यशाच्या पहिल्या पायरीवर तुला अढळ पद मिळवुन देण्यासाठी एकटीला सोडते आहे. गुड लक डियर."
"थँक्स माय डियर." म्हणत पुनमने तळमजल्यावर जाण्यासाठी बटन दाबले. लिफ्ट खाली गेल्यावर रोहिणी रुमकडे परतली.
कॅब खाली उभीच होती. पुनम कॅबमध्ये जाऊन बसली. ड्राइव्हरला ओटीपी दिल्यानंतर कॅब अरिहंत स्टुडिओच्या दिशेने निघाली. इतक्यात मेघराज दाटुन आले अन् अलवार सरी क्षणात कोसळू लागल्या. पुनमच्या मनातील ढगही काळेभोर झाले. काचेवर पडणाऱ्या थेंबाना पाहून तिच्या डोळ्याच्या कडा देखील ओल्या झाल्या. विचारांचा काहीसा गुंता होऊ लागला. तिच्या मनात भूतकाळ फ्लॅश बॅक सुरू झाला.
पुनमला लहानपणापासून सिनेमाची आवड होती. माधुरी दीक्षित तिची आवडती अभिनेत्री! ती टिव्हीवरचा डान्स बघून अगदी कृतीत उतरवायची, हुबेहूब नक्कल आणि सोबत डायलॉग तोंडपाठ असायचे. टिव्हीवर माधुरीचा सिनेमा लागला की, तिच्या डोळ्याची पापणी लवायचे नाव घ्यायची नाही. आपण देखील कधीतरी फिल्म स्टार होऊ हे स्वप्न ती उघड्या डोळ्यांनी पहायची. मुलीचा विरंगुळा म्हणून तिचे आबा सगळं हसण्यावर घालवायचे.
पुनमने कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये तीन वर्ष सलग कॉलेज क्वीनचा किताब पटकावला होता. तिला कॉलेजच्या करियर गाईडकडून मॉडेलिंग, ॲक्टिंगसारख्या क्षेत्रात करियर करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले.
रोहिणीने तिला पुरेपूर प्रोत्साहन दिले. मुंबईमधील चांगल्या क्लासेसमध्ये जाऊन चौकशी केली, फॉर्मसुद्धा आणला. मिळेल आणि आवडेल असं काम करायचं, सुरुवातीला छोट्या कामापासून सुरुवात करायची जेणेकरून ओळखी वाढतील, पुनमच्या राहण्याची व्यवस्था स्वतःच्या घरी करायची असं अगदी हक्काने रोहिणीने सगळं ठरवलं.
जेव्हा पदवी परीक्षा पास झाल्यानंतर तिने आबांना याबद्दल माहिती दिली. तेव्हा आबांनी घरात खूपच भयावह वातावरण निर्माण केलं.
"माझी इच्छा नसताना देखील तुला शहरात शिक्षणासाठी दाखल केले आणि आता नको त्या गोष्टी करायला पुन्हा शहरी मार्गावर चालायचे आहे होय? पोरी! ती चकाकणारी दुनिया, चकाकणारं सोनं असेलच असं नाही. आता ह्या क्षणापासून तुझा शहराचा मार्ग कायमचा बंद." आबांच्या लाल झालेल्या डोळ्यांतून मनातील ज्वालामुखीचा उद्रेक बाहेर पडला होता.
"माझी इच्छा नसताना देखील तुला शहरात शिक्षणासाठी दाखल केले आणि आता नको त्या गोष्टी करायला पुन्हा शहरी मार्गावर चालायचे आहे होय? पोरी! ती चकाकणारी दुनिया, चकाकणारं सोनं असेलच असं नाही. आता ह्या क्षणापासून तुझा शहराचा मार्ग कायमचा बंद." आबांच्या लाल झालेल्या डोळ्यांतून मनातील ज्वालामुखीचा उद्रेक बाहेर पडला होता.
आणि आजही तिच्या मनात आबांच्या बोलण्यातील अक्षर अन् अक्षर तसंच कोरलं गेलं होतं.
क्रमशः
©®नमिता धिरज तांडेल
जिल्हा पालघर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा