चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद (भाग ६)

रोहिणी जगाचा निरोप आठवणींचा सुगंध कायम दरवळत ठेऊन गेली


कथेचे नाव:- चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद
विषय:- प्रेमकथा
फेरी:-  राज्यस्तरीय कथामालिका लेखन

रोहिणी आणि पुनम दोघींच्या कारमध्ये मनमोकळेपणाने गप्पा सुरू होत्या. एकमेकांशी संवाद साधत असताना कार बंगल्याखाली येऊन पोहचली. रोहिणी गाणं गुणगुणू लागली,
\"आओ तुम्हे चांद पे ले जाये. प्यार भरे सपने सजाये.\"

हसतच दोघींनी बंगल्याच्या आत प्रवेश केला. पुनम बंगल्याच्या आत येऊन संबंध स्वप्नाचा महल न्याहाळत होती. मनोमन संवाद करू लागली,\"रोहिणी किती लकी आहे यार. सगळी सुखं तिच्या पायाशी लोळण घालतात असे वाटते. एके काळी एकटेपणा तिच्या आयुष्याचा साथीदार होता. मात्र आजवर तिला कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही. रोहिणीला नेहमी आबांचे कौतुक वाटे आणि मला तिच्या डॅडींचे. तिकडे मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मला आबांशी केवढे वाद घालून हा टप्पा पार पाडावा लागला. इकडे रोहिणीच्या डॅडीनी तिची आवड लक्षात घेऊन तिला पाठबळ दिले.\"

"आपण सबंध घर नंतर पाहूया. मी सुधांशु सोबत टेरेसवर येते. ह्या पायऱ्या तुला थेट टेरेसवर घेऊन जातील. तु पुढे हो आम्ही आलोच." रोहिणीने पुनमला टेरेसवर जाण्यास सांगितले.

सबंध टेरेसला गार्डन बनवले होते. हिरवीगार झाडे मनाला सुखावून जात होती. रातराणीच्या फुलांचा गंध मनाला घायाळ करू लागला होता. चंद्र सुद्धा त्या झाडांच्या आड डोकावून तिला पाहत होता. पाळण्यावर बसुन ती खुल्या आसमंताकडे पाहत असताना उल्कापात झाला. नेहमी प्रमाणे निखळत्या ताऱ्याला पाहून ती खुश झाली. पण आज तिला त्याच्याकडे पाहून काहीच मागण्याची इच्छा झाली नाही. कारण गावी ती एकटी टेरेसवर जाऊन बसायची. तेव्हा अधुऱ्या इच्छांची मागणी करण्यात तीची वर्ष उलटून गेली होती. आता तर सत्यातले स्वप्न आणि हरवलेली मैत्रीण नव्याने गवसली होती.

\" काँग्रेज्युलेशन अँड सेलिब्रेशन\" गाणं गात सुधांशु आणि रोहिणी दोघं केक घेऊन तिच्या पुढे हजर झाले. रोहिणीने तिच्या डोक्यावर क्राऊन लावला. केकवर कँडल लाऊन त्यांनी तिच्या हातात चाकू दिला. केक कापून झाल्यावर तीघं पार्टी करण्यासाठी बसले. पुनमची पहिलीच वेळ असल्यामुळे ती थोडी लाजत होती. हे सुधांशुच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिला मोकळीक वाटावी म्हणुन त्याने तिच्याशी गप्पा करण्यास सुरुवात केली. त्यांचे फॅशन शोचे विषय रंगले आणि काही वेळातच पुनम कंफर्टेबल झाली.

रोहिणीची तब्येत पुन्हा बिघडली. तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. म्हणुन ती फ्रेश होण्यासाठी गेली. बाथरूममध्ये गेल्यावर तिला रक्ताची उलटी झाली. रोहिणी पहिल्यांदाच घडलेला प्रकार बघुन गांगरली. चेहरा धुवून बाहेर आली.

तिचा घाबरलेला चेहरा पाहून सुधांशु धावतच तिच्या जवळ गेला,"काय झालं? काय होतंय तुला?" रोहिणी सुधांशुच्या गळ्यांत पडून रडू लागली आणि ग्लानी येऊन पडली. सुधांशुने रोहिणीला उचलून घेतले. पुनम सुद्धा पाठोपाठ आली. कार मध्ये बसुन हॉस्पिटल मध्ये पोहचले. ताबडतोब सगळ्या प्रोसिजर सुरू करण्यात आल्या. रिपोर्ट यायला अवधी होता. सुधांशु तिच्या जवळच बसून होता. रोहिणी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. तो अगदी लहान बाळासारखी तिची काळजी घेत बोलत होता. किती प्रेम ओतून टाकत होता. डोळ्यांतले पाणी जणू त्याने अडवून धरले असावे. पुनम दरवाज्यावरील काचेतून हे सगळं आत पाहत होती. मनातच बोलली,\"असा लाईफ पार्टनर मिळायला देखील किती भाग्य लागतं. हा चंद्र फक्त रोहिणीचाच राहो. देव दोघांचे भलं करो. रोहिणी ह्या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडू देत.\"

काही वेळानंतर रोहिणी शुद्धीवर आली. तिला शुद्धीवर आलेले पाहून पुनमला हायसे वाटले. सुधांशु रूम बाहेर आला आणि तो म्हणाला,"रोहिणी तुझ्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे."

पुनम रूममध्ये गेली. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रोहिणी दम घेतच बोलू लागली."तुझे स्वप्न लवकरच पुर्ण होणार आहे. ते पाहण्यासाठी मी ह्या जगात नसेन. पण सुधांशु तुझ्या सोबतीस असेल आणि असं समज मीच तुझ्या सोबत आहे. सुधांशुला सावर. ह्या जन्मात तो रोहिणीचा होणे शक्य नाही.ह्या क्षणी माझी इच्छा आहे त्याला पुनवेचा चांद करून घे."

"अगं तु हे काय बोलते आहेस. होप का सोडते आहेस. तुला काही होणार नाही. तु एवढ्यात कशी काय हरू शकतेस ?" असं म्हणत रोहिणी सुधांशुला बोलवण्यासाठी बाहेर गेली.

परंतु डॉक्टर व नर्सनी त्यांना आत जाऊ दिले नाही. रोहिणी पूर्णपणे कोमात गेली. थोड्या थोड्या वेळाने डॉक्टर येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. धावपळ सुरूच होती. बघता बघता सकाळ झाली आणि काही क्षणात डॉक्टरांनी व्हेंटिलेटर बाजूला केला. सगळं काही संपलं हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार रोहिणी ब्लड कॅन्सरच्या पहिल्याच पायरीवर होती. पण तिचा प्राण हृदय विकाराच्या झटक्यामुळे गेला. तिचे जे क्षेत्र आहे त्यामध्ये थोडी रिस्क असतेच.

रोहिणीचे मम्मा डॅडी मुंबईच्या बाहेर गेले होते. ते हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर कागदपत्र तपासणी करून बॉडी एम्बुलन्समध्ये ठेवण्यात आली. सुधांशुने रोहिणीची बॉडी त्याच्या घरी नेण्याचा आग्रह धरला. कोणीही त्याच्या मतावर आक्षेप घेतला नाही.

मेकअप आर्टिस्ट बोलावून रोहिणीची तयारी करण्यात आली. अगदी नवरीसारखी तिची तयारी करण्यात आली. नवरी नटून झोपली असावी असे दृश्य भासत होते. लाल जोड्यात किती देखणी दिसत होती. सुधांशुने तिच्यासाठी मंगळसूत्र बनवले होते. थरथरत्या हाताने तिच्या गळ्यांत घातले. कपाळी कुंकू भरले. तिला शेवटचे मिठीत घेतले.

सुधांशु अगदी वेडापिसा झाला. पुनमला काही सुचतच नव्हते.
डोळ्यादेखत रोहिणी आणि तिच्या सोबतचे अखेरचे क्षण ह्या खेरीज काहीच दिसत नव्हते. डोळ्या देखत असणारी हसती खेळती व्यक्ती पटकन जग सोडून गेली होती. अखेरचे क्षण कायम आठवणींच्या कुपीत ठेऊन ती सुगंध दरवळायला आली होती.

क्रमश:

जिल्हा पालघर
©®नमिता धिरज तांडेल

🎭 Series Post

View all