चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद ( भाग ३)

कॉलेजच्या आठवणींचा न संपणारा फेरा पुनमच्या डोळ्यादेखत लहरत चालला होता
कथेचे नाव:- चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद
विषय:- प्रेमकथा
फेरी:- राज्यस्तरीय कथामालिका लेखन

"दोनशे सहासष्ट.."टॅक्सी ड्रायव्हरचे शब्द कानी पडताच तिने पर्समधून पैसे काढून दिले आणि टॅक्सी बाहेर आली. लिफ्टमध्ये वर जातातच तिने किल्ल्या देखील काढून ठेवल्या. आजचा सगळा दिवस तिच्या मनःपटलावर उमटत असतानाच ती तिच्या फ्लोअरवर पोहोचली आणि लिफ्ट थांबल्यावर अगदी यंत्रवत ती बाहेर पडली. हातात असलेल्या किल्ल्यांनी तश्याच तंद्रीत तिने दार उघडलं आणि ती आत गेली. ऊन पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे खूपच गरम होत होतं. ग्लासभर पाणी पिऊन तिने चेहऱ्यावरचा मेकअप उतरवला आणि थंड पाण्याचा शॉवर घेऊन ती बाहेर आली अन् ओले केस सुकविण्यासाठी ड्रायर शोधू लागली. 

ड्रायर शोधता शोधता एका ड्रॉवरमध्ये तिला फोटो अल्बम हाती लागले. फोटो अल्बम म्हटलं तर कोण उघडून पाहणार नाही? फोटो म्हणजे गतकाळाची आठवण! पुन्हा एकदा अविस्मणीय क्षणाचे स्मरण करून देत असते. तिने फोटो अल्बम पाहण्यास सुरुवात केली. रोहिणी तिच्या मम्मा व डॅडी सोबत मोजक्याच फोटो मध्ये दिसली. मात्र बरेचसे तिचे फोटो आया सोबत होते.

पुनमला हॉस्टेल मधील त्या रात्रीची आठवण झाली. सकाळ पासून रोहिणीचा चेहरा उतरलेला होता. संध्याकाळी अचानक ताप भरला आणि रात्री थंडीने कुडकुडत असताना आयाच्या नावाचा जप सुरू केला. डॉक्टर येऊन तपासून गेले होते. इंजेक्शन देऊनसुद्धा तिचा ताप उतरत नव्हता म्हणून पुनम मिठाच्या पाण्याचा पट्ट्या रात्रभर तिच्याजवळ बसून बदलत होती. हॉस्टेलमधून तिच्या पालकांना फोन करून कळवले होते. दुसऱ्या दिवशी तिची मम्मा येऊन तिला घेऊन गेली.

कॉलेज सुरू झाल्यापासून पुनमला मनमिळाऊ रोहिणीची सवय झाली होती त्यामुळे इतक्या दिवसांनी तिला तिच्या शिवाय खूप सुनं सुनं वाटत होतं. दहा दिवसानंतर रोहिणी हॉस्टेलवर परतली. अगदी नेहमी सारखी हसत खेळत! तेव्हा पुनमच्या मनात एक प्रश्न सतत चिंतन करत होता; \"रोहिणीचे उच्च वर्गीय घराणे शिवाय आई वडिलांची एकुलती एक राजकुमारी मग हॉस्टेलवर येऊन राहण्याचा संबंध काय?\"

जेव्हा रात्रीचे टिपूर चांदणे खिडकीतून आत डोकवायचे तेव्हा रोहिणी त्या चंद्राला डोळ्यात साठवून घ्यायची. जणू काही तिच्या जन्मो जन्मीचा साथीदारच. कुणाच्या तरी आठवणीत ती पार डुबून जायची. किती तो अस्वस्थपणा तिच्या चेहऱ्यावर जाणवायचा?

"एक विचारू?" एक दिवस पुनमने न राहवता विचारलेच.

"खरंतर पर्सनल गोष्टी मी कुणालाच शेअर करत नाही पण आज तुझ्या एवढ्या दिवसांच्या शंकाचे निरसन करणार आहे." रोहिणीने पुनमच्या मनातील प्रश्न वेधले होते.

रोहिणीने बोलायला सुरुवात केली आणि पुनम शांतपणे तिची बालपणीची कहाणी ऐकण्यात गुंग झाली. "डॅडी बिझनेस टूरवर असल्यामुळे त्यांची पंधरा दिवसांतून दोन ते तीन वेळा भेट घडायची. त्यांचे जास्त लक्ष कामावर केंद्रित असल्यामुळे त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. शक्यतो सगळं बोलणं फोनवरच असायचं. फक्त वर्षातून एकदा काही दिवसांची सुट्टी काढून बाहेरगावी फिरायला घेऊन जायचे. ते दिवस फक्त आम्ही एकत्र एन्जॉय करायचो. मम्मालासुद्धा किटी पार्टीज आणि मैत्रिणींची सवय लागली. जास्त वेळ ती मैत्रिणी समवेत घालवायला लागली. \"बडे लोगो की बडी बाते\" म्हणतात अगदी तसंच. त्यामुळे मला लहानपणापासून सांभाळण्यासाठी आयाबाई ठेवली. आयाचे लहान वयात लग्न झाले होते. नवरा वयाने मोठा असल्यामुळे खूप छळ करायचा म्हणून ती गावाहून पळून मुंबईला आली होती. कामाच्या शोधात असताना कुणीतरी आमचे घर दाखवले. माझी शाळा त्यांनतर ट्युशन आणि संध्याकाळी जिमनॅस्टिक माझा दिवस ह्यामध्ये निघून जायचा. मला सोडायला व आणायला आया सोबत असायची. त्यामुळे येता जाता आम्हाला एकमेकांची साथ लाभली होती. माझ्यामुळे आयाला जगण्याचा नवा मार्ग मिळाला होता तर आया माझ्यासाठी सर्व काही झाली होती. आया मला झोपवल्याशिवाय कधीच झोपली नाही. मध्यरात्री तिला उठवले तरीही उठायची. बरं नसताना माझ्या जवळ बसून राहायची. किती प्रेम करायची म्हणून सांगू? नातं रक्ताचे नव्हते. पण ऋणानुबंध जिवाभावाचे होते. रात्री झोपवताना ती मला आचार विचार सांगायची. काल्पनिक परी कथेत मला दंग करून सोडायची. रात्रीचे निरभ्र आकाश, तो चंद्र आणि खास करून ती पौर्णिमेची शुभ्र प्रकाशी रात्र ह्यांच्या प्रेमात पाडण्याचे कारण आया होती. पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात चंद्राला न्याहाळताना कधी झोप लागायची कळायचंसुद्धा नाही. म्हणूनच की काय पुनम नावाची मैत्रीण माझ्या आयुष्यात आली?" त्याक्षणी विषयांतर करून तिने हसण्यावर घालवलं होतं.

एक आठवण सरत नाही इतक्यात पुनम समोर आबांच्या आठवणीतील पान डोळ्या देखत उभं राहिलं.

आबा दर पंधरा दिवसांनी पुनमला भेटण्यासाठी हॉस्टेलवर यायचे. आईच्या हाताने बनवलेले पौष्टिक, स्वादिष्ट पदार्थांचे डब्बे भरून आणायचे. मैत्रिणीची तर चंगळच असायची. कुणाला कधीही भूक लागली की, पुनम जिंदाबाद म्हणत तिच्या रूमकडे मोर्चा वळायचा.

पुनम पहिल्यांदा आणि शेवटचं मे महिन्याच्या सुट्टीत रोहिणीला गावी घेऊन गेली होती. रोहिणीचे फॅशनेबल कपडे पाहून आबांनी डोक्याला हात मारला. रोहिणीच्या राहणीमानावरून पुनमला खूप काही ऐकवले.

"अश्या मैत्रिणींची साथ पकडून ठेवशील तर तुझे भविष्य कधीच उज्ज्वल होणार नाही." असं म्हणत आबांनी हॉस्टेलमध्ये विनवणी करून पुनमची रूम बदली करायला लावली. दोघी एकमेकींच्या इतक्या हृदयाजवळ होत्या की, त्यांना रूम बदली झाल्यामुळे काहीच फरक पडला नव्हता.

असा अपमान कोणीच सहन करू शकत नाही. मात्र रोहिणीला आबांचा खूप हेवा वाटायचा. ती म्हणायची,"तुम्हाला धाकात ठेवण्यामागे त्यांच्या डोळ्यात झळकणारे प्रेम पाहिले आहे मी. त्यामुळे मला आबांविषयी जरा देखील तक्रार नाही. असे वडील मिळायला देखील भाग्य लागतं. पैसा म्हणजे सर्व काही नसतोच. आपल्या मुलांना त्याच्या गरजेनुसार दिलेला वेळ महत्वाचा असतो. कुटुंब प्रेम काय असतं? हे आईच्या मायाळू स्वभावात दोन दिवसांत अनुभवलं."

पुनमच्या डोळ्यांत पाणी तरळले. आठवणींचा न थांबणारा फेरा सतत गिरक्या घेत चाललेला होता.

उच्च वर्गीय सोसायटीमध्ये वाढलेल्या मुलीकडे एवढा समंजसपणा कसा काय असू शकतो? पुनमला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रोहिणीला कुटुंब प्रेम कधी प्राप्त झालं नव्हतं. एकुलती एक असल्यामुळे कोणी सोबत मोठं किंवा लहान भावंड देखील नव्हतं. तिच्या आयुष्याच्या डायरीत प्रेम, आपुलकी, विश्वास ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. मम्माने जन्म दिला होता. मात्र आईचे प्रेम तिला आयाकडून मिळत गेले. आयाच्या शुद्ध विचारांची तिला निर्मळ बनवले होते. रोहिणी आठवीत असताना अचानक आया आजारपणात गेली. रोहिणीच्या मनावर आयाच्या जाण्याचा खूप मोठा आघात झाला. तेव्हा डॅडी व मम्मा तिच्या जवळ आले. बऱ्याच कालावधीनंतर आयाच्या जाण्याने त्रिकुट कुटुंब एक झालं होतं. रोहिणी शरीराने त्यांच्या जवळ होती परंतु मनाने संपुर्णपणे आया जवळ होती. आया शिवाय तिला घरात करमत नव्हते म्हणून दहावी पास झाल्यावर तिने हॉस्टेलमध्ये राहण्याची इच्छा दर्शवली.

क्रमशः....

©®नमिता धिरज तांडेल.
जिल्हा पालघर

🎭 Series Post

View all