चंद्र

Importance Of Moon In Life
चंद्र...
एक पिढी होती कि ज्यांचे सकाळचे जेवण चिऊ काऊ सोबत व्हायचे आणि रात्रीचे चांदामामासोबत.. मामाच्या वाड्यात येऊन जा, तूपरोटी खाऊन जा. तूपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी. त्याला उपाशी ठेवल्याशिवाय मुलांचे पोट भरायचे नाही आणि निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे ऐकल्याशिवाय झोप यायची नाही...
तीच मुले जेव्हा वयात येत असतात तेव्हा हाच मामा त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होतो.चंद्र आहे साक्षीला हे म्हणत प्रेमाच्या आणाभाका होतात, तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी हे गात प्रेयसीसोबत वेळ घालवला जातो..ये चांदसा रोशन चेहरा , चौदहवी का चांद हो या आफताब हो अशी तिची खुशामत केली जाते. ती सुद्धा प्रियकर घरी आल्यावर तुम आये तो आया मुझे याद गली में आज चांद निकला अशा भावना व्यक्त करते.
आपल्या संस्कृतीत पण चंद्राला किती महत्व आहे नाही.. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेस काही ना काही महत्व..
चैत्र पौर्णिमेस हनुमान जन्म. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला जय हनुमान असे गर्जत हनुमानाची पूजा करायची. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेस बुद्धं शरणं गच्छामि अशी बुद्धांची पूजा करायची. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे स्त्रियांचे मोठे व्रत. सत्यवानसावित्रीला आठवण म्हणून वडाची पूजा करायची..नंतर येणारी आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणजे गुरूशिष्यांचा मोठाच उत्सव. गुरूंबद्दल असलेला आदर त्यांची पूजा करून प्रकट करण्याचा दिवस. श्रावण पौर्णिमा म्हणजे सर्व बहिणभावांचा आवडता दिवस.. बहेनाने भाईकि कलाईपे बांधा हुआ प्यार भाई सगळीकडे मिरवत असतो.आणि ज्यांना भाऊ नसतो त्या परत चंद्रालाच राखी बांधतात..आदल्या दिवशी झालेल्या गणपतीविसर्जनाचे दुःख असते म्हणून कि काय फक्त भाद्रपद पौर्णिमेसच काही विशेष नसते.बहुतेक हेच कोजागिरी पौर्णिमला दुप्पट महत्व देते. ज्येष्ठ अपत्य औक्षण काय, आटीव दुधाचा, पांढऱ्याशुभ्र पदार्थांचा चंद्राला नैवेद्य काय.. या नंतर येणारी चतुर्थी म्हणजे उत्तर भारतीयांची करवाचौथ. चांद को देखू हाथ में जोडू करवाचौथ का व्रत में तोडू..पाणी सुद्धा न पिता केलेला उपवास आणि नवर्‍या आधी असलेले चंद्राचे महत्व.
कार्तिक पौर्णिमा म्हणजे तुलसी विवाहाचा शेवटचा दिवस त्यामुळे बर्‍याच ठिकाणी धूमधडाक्यात साजरी होणारी लग्ने तसेच गुरू नानक जयंती याने हा हि दिवस दणक्यात साजरा होतो. तसेच फक्त याच दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायची असलेली परवानगी त्यामुळे याला असलेले विशेष महत्त्व. मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती... दत्तभक्तीने भरलेला , भारलेला दिवस. दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो..माघी पौर्णिमेला अनेक ठिकाणी भरलेल्या जत्रा आणि शेवटची फाल्गुन पौर्णिमा सगळ्यांची आवडती होळी .जसे रोजचे चंद्राचे रूप वेगळेच असते तसेच प्रत्येक पौर्णिमेसही तो वेगळा दिसतो.. संकष्टीचा उपवास तर त्याला न बघता सोडूच शकत नाही.. शंकर आणि गणपती सुद्धा याच्या मोहातून सुटू शकले नाहीत म्हणूनच कदाचित त्यांनीही त्याला मस्तकी धारण केले असावे.. असो हे चंद्रपुराण इथेच थांबवते कारण आता माझा चंदा रे चंदा कभी तो जमींपर आ, बैठेंगे बाते करेंगे असे म्हणत त्याच्यासोबत गप्पा मारण्याचा विचार आहे..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई