चंद्रा. भाग -११

वाचा इतिहासातील एक न उलगडलेले पान
चंद्रा.
भाग -११

या लुटीत बऱ्यापैकी माल हाती लागला होता. पण सरकार त्यांना सहज सोडणार नव्हती आणि म्हणूनच सयाजीने सर्वांसह आपला ठिकाणा बदलवला होता.

वारणेच्या दुसऱ्या खोऱ्यात त्यांनी आपला मुक्काम हलवला. तिकडच्या भागात देखील बरीच लूटमार केली. त्यांच्या मागावर असलेल्या सरकारच्या हाती मात्र काहीच लागत नव्हते. लूटमार करणारी ही टोळी कोणाची, तिचे नेतृत्व कोण करतोय? कसलाच थांगपत्ता लागत नव्हता.


लष्कर चिडले होते आणि त्यामुळे आता या भागात जास्त दिवस लपून राहणे शक्य नव्हते. परिस्थिती लक्षात घेत सयाजीने पुढचे लक्ष्य म्हणून पुण्याकडे कूच करायचे ठरवले.


तेच पुणे, ज्याच्या भांबूर्डीच्या घाटात उमाजी नाईकांनी लढा दिला होता. तेच पुणे, जिथल्या वासुदेव बळवंत फडक्यांनी रामोशी, मांगासारख्या लढाऊ आणि काटक साथीदारांना हाताशी घेऊन आणि प्रसंगी पुढे एकट्यानेच गोऱ्यांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली होती.


त्यांच्या मृत्यूने ती मशाल एकाकी पडली होती परंतु अजून पूर्णपणे विझली नव्हती. तिच्यातील धग अजूनही तेवत होती आणि सयाजीसारख्या क्रांतिकारकाला प्रोत्साहित करायला तेवढे पुरेसे होते.


पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी साथीदारांसह तो वारणेच्या पात्रात उतरला. हीच वारणा जिच्या खोऱ्यात कैक वर्षापासून त्याच्या पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. मात्र लष्कराचे राज्य आले आणि त्यांच्या सुखाला जणू नजर लागली. आज पोटासाठी होणारी वणवण त्यांच्यामुळेच यांच्या वाट्याला आली होती. तो राग, तो द्वेष कित्येकदा मनात अंगार फुलवत होता.


आतासुद्धा त्याच्याच मुलुखातील लोकांनी त्याला चोराची जमात संबोधले होते. त्यावेळी क्षणभर रागाने त्याचा जीव घ्यायचा विचार डोक्यात चमकून गेला पण तेवढ्यापुरताच. तो राग त्याला आतल्या आता तसाच धूमसत ठेवायचा होता. त्या रागाच्या आगीत त्याला केवळ गोऱ्यांना जाळायचे होते. आपल्याच मातीतल्या माणसांशी तो असा कसा वागू शकला असता?


"सया, कसला विचारात गढला हाईस?" विचाराच्या नादात पाण्यात पुढे पुढे चालत जाणाऱ्या त्याचा हात पकडत चंद्राने विचारले.

तिच्या स्पर्शाने आणि अलवारपणे घातलेल्या सादेने तो भानावर आला. तो स्पर्श जणू त्याच्या जळत्या जखमेवर चंदनाचा लेप लावल्यासारखा थंडगार भासत होता. भानावर येत त्याने तिचा हात झटक्याने बाजूला केला. कारण ती आग त्याला कुठे विझू द्यायची होती?


"या वारणेने आपली लई साथ दिली. दुसरी मायच जणू. पर आता तिचा निरोप घ्यायची वेळ आली हाय." तो चंद्राकडे पाहून म्हणाला.


"हे वारणामाय, आजवर जी माया आमच्यावर केलीस तीच माया या मुलखातल्या समद्या लेकराईवर राहू दे. तुज्या ऋणातून मुक्ती व्हता येणार नाही पर आमच्यापरीने आम्हाला प्रयत्न करू दे. त्या प्रयत्नात यश लाभू दे."
त्याने ओल्या डोळ्याने वारणेचे पाणी ओंजळीत घेतले.


हे बघून चंद्रासह त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याचे अनुकरण केले. सर्वांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. आपले घर, मायेची माणसं सोडून जाताना जेवढे दुःख झाले नव्हते तेवढे दुःख या खोऱ्यातून बाहेर पडताना होत होते.


तिथून निघताना बराच माल त्यांनी गोरगरिबांना मदतीखातर वाटून टाकला. मंग्याच्या मदतीने गावातील प्रत्येक रामोश्याच्या घरी अन्नधान्य पुरवले. लुटीत मिळालेल्या बंदूकी आणि काडतूसे आपापसात वाटून घेतली. आता ते खऱ्या अर्थाने गोऱ्यांवर धावा बोलायला सज्ज होते.

रानावनातून मजल दरमजल करत सयाजी आणि त्याच्या साथीदारांचा प्रवास सुरु झाला होता. इकडे वारणेच्या खोऱ्यात मात्र काहीतरी वेगळेच घडत होते.

लुटारू ठरवलेल्या रामोशी, मांग जातीच्या पुरुष मंडळींनी गावातील रावसाहेबांकडे रोज तीन वेळा हजेरी लावण्याचा नियम सुरु झाला होता आणि त्यामुळे मंग्या, खंड्या यांच्याबरोबरच सयादेखील लूटमारीत सहभागी असण्यावर सरकारने शिक्कामोर्तब केला.

एव्हाना सातारा सांगली परिसरात त्याच्या नावाचे पोस्टर लागले होते. सया आणि त्याच्या साथीदारांना जो पकडून देईल त्याला बक्षीस जाहीर करण्यात आले.


"सया, आता रं काय करायचं? सगळीकडून आपली कोंडी झाली हाय. पुण्यात गेल्यावर बी ते लस्कर आपल्याला जीता सोडणार न्हाय." मंग्याच्या डोळ्यात पाणी होते.

"आरं मर्दा, असा बायकांवानी का म्हून रडतोयास? मरन कधी कुणाला चुकलं आहे होय? पर असं मरन नगं गड्या. एका तरी गोऱ्याच्या छातीत ही बंदुकीतील गोळी घुसायला हवी. तेव्हाच कुठं या मनाला शांती लाभल."

"सया, तू असा सडफटिंग हाईस म्हून असा बोलतुस रं. तुला ना माय ना बाप. ना बायका ना पोरं. पर आमचं तसं न्हाई. घरी म्हातारी आई रोज आसवं गाळत असल. बायकू आपलं कुंकू जगावं म्हून देवाजवळ हात जोडत असल. आपण समदे संशयित आहोत. सरकारनं आमच्या घरच्यांना ओलीस ठेवले तर त्येंच्या जीवाचं काय हाल हुईल?" मंग्याच्या बोलण्याला दुजोरा देत खंडू म्हणाला.


"असं एक ना एक दिवस घडणारच होतं. मंग्या, खंडू तुमाला तुमचा मार्ग मोकळा हाय. तुमास्नी माघार पत्कारायची असेल तर म्या न्हाय म्हणणार नाही. तुमचा निर्णय तुमालाच घ्यायचा हाय. इतर कोणाला जायचं असेल तर त्येनीबी जावं. मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहनार."सयाजी शांतपणे म्हणाला.


"सया, म्या हाय रं तुझ्यासंग. मंग्या, तुला एक सांगू? जेव्हा मायला मी मोहिमेवर जाणार म्हून सांगितलं ना तवाचं ती म्हणाली, की चंद्रे आता दिवसातले सगळे प्रहर तुला डोक्यावर मरणाचं कफन बांधून फिरावं लागलं. आरं आपण इथं हाय काय अन वापस गेला काय, मरन सुटणार न्हाय.

तुमी सरकारला समर्पण केल्यावर बी फाशीचा फंदा गळ्यात अडकणारच हाय की. तेव्हा तसं मरण्यापेक्षा सयाला साथ देऊन मरू की रं." चंद्रा आपल्या सवंगड्याना समजावत म्हणाली.

हे सगळे तिचे ऐकतील का? की त्यांची साथ सोडून निघून जातील? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all