Feb 24, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

चंद्रा. भाग -९

Read Later
चंद्रा. भाग -९
चंद्रा.
भाग -९

मागील भागात:-
सयाजी चंद्राला घोडा चालवायचे प्रशिक्षण देतो. सोबतच तिला अक्षरज्ञान शिकवायचे ठरवतो.
आता पुढे.


"तिकडं पुण्यात फुलेबाबानं बायकांसाठी शाळा काढलीय अन आपण बायकांनी शिकू नये यातच अडून बसलोय. चंद्रे, शिक्षण समद्यासाठी असतं. तुला लिहाय वाचाय यायला पायजे."

त्याच्या बोलण्यावर तिने नुसती मान हलवली.

चंद्रे, तू वाघीण हाईस. त्यावानी तुला लढायचं हाय हे नेहमी ध्यानात ठीव.

आता घरला चल. उद्यापासून आपली शाळा पुन्हा सुरु करूया." त्याच्या विश्वासपूर्ण नजरेत तिचीही धारदार नजर मिसळली. चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पसरले होते.

*******

"हे अक्षर गिरवणं, घोड्यावर हिंडनं.. चंद्रे तुज्या मनात हाये तरी काय गं?" गोदाक्का चंद्राला विचारत होती.

आठ दिवसापासून चंद्राने चंदर आणि पुस्तकं दोघांनाही वेगळे केले नव्हते आणि म्हणून गोदाक्का काळजीत पडली होती.


"आई, याला प्रेम म्हणत्यात. हे पुस्तक फकस्त पुस्तक नव्हं, तर ज्ञानाचं भंडार हाय आन ह्यो घोडा घोडा न्हाय, हा चंदर हाय. माझा सखा." चंदरवरून प्रेमाने हात फिरवत ती म्हणाली.


"कसलं प्रेम नं कसली माया? चंद्रे, तू काय चुकीचं तर न्हाय ना गं करत हाईस?"


"न्हाय गं आई. तुझी चंद्री का म्हून चुकीची वागल? आन तुझ्यावर जी माया केलीय, जो लोभ करतेय, त्येच लोभ तेंच्यावर बी करतेय. मंग ते चुकीचं कसं हुनार?" चंद्रा तिला कोड्यात टाकत म्हणाली.


"माझ्यावानी माया तू आणखी कुणावर करती?" आत येत गोदाक्काने आश्चर्याने विचारले.


"आई, लई दिवस झालेत म्या तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपले न्हाय. आज मला असं डोकं ठिवून झोपू देती?"


"आदी माज्या प्रश्नाचे उत्तर दे." गोदाक्काच्या आवाजात जरब होती.


"म्या काय इचारतेय आन तुज काय चाललंय?" तिच्या प्रश्नाला उत्तर न देता चंद्रा मांडीवर विसावली होती आणि त्यामुळे गोदाक्का पुन्हा चिडली.


"आई, चिडू नगंस की. केसातून हात फिरव ना." तिचा हात डोक्यावर ठेवत चंद्रा.


"आता? हाय का? नेहमी आपल्याच मनाचं करत्येस होय?" लटक्या रागाने गोदाक्का तिच्या केसातून अलवार बोटे फिरवत होती. कितीतरी दिवसांनी आपल्या लेकीला असे मांडीवर बघून तिचा राग ममतेत बदलला होता.


"आई तुला माजा राग येतो, तरी माज्यावर किती माया करतीस गं? ही माया, हा लोभ एक आईच आपल्या लेकरासाठी करू शकते." मांडीवरून गोदाक्काकडे बघत ती म्हणाली.


"आज माजं लै गोडवं गात हाईस गं. डोस्कं जागेवर हाय ना?"


"गोडवं नव्हं, खरंच हाय. आईची माया आईचं लावू शकती. तू जशी माजी माय, तशी इतली माती बी मायचं. तुज्यावर माजा लै लोभ हाय, त्योच लोभ या मुलखावर, या भारत देशावर बी हाय.

लेकरानं कितीबी केलं तरी त्यो मायचं ऋण फेडू शकत न्हाय तसंच आपल्या जल्मभूमीचे बी फेडू शकत न्हाय."


"चंद्रे, मोठया मोठया गोष्टी करू लागलीस की गं." तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत गोदाक्का म्हणाली.


"तुजी चंद्री मोठीच झालीय. आता तिला कायतरी करू वाटतंय. तुज्यासाठी, आपल्या मुलखासाठी, आपल्या देशासाठी."


"चंद्रे?"


"आई, मी सयासंग त्याच्या टोळीत सामिल होणार हाय. त्या गोऱ्यांसंग लढणार हाये."


"चंद्रे, म्या तुला कुठं बी जाऊ द्यायची न्हाय. तो सया कायबी डोक्यात भरवतो आन तू त्येच्या मागं जातीस." केसातून फिरणारी गोदाक्काची बोटे गचकन थांबली.


"आई, मला तुजी परवानगी नगं. फकस्त आशीर्वाद हवाय."

"चंद्रे, हे सोपं नसतंय. दिवसाचे आठही प्रहर डोक्यावर मरनाचं कफन बांधून ऱ्हावं लागतंय. तुला काय झालं तर कोणाकडे बघून म्या जगावं?" गोदाक्काने डोळ्याला पदर लावला.

"आई, असं कुत्र्या मांजरावानी जगण्यापरीस आपल्या देशासाठी मरन येतं असन तर ते कैक पटीनं बेहत्तर हाय गं. वारणेच्या खोऱ्यातल्या गोदाक्काच्या चंद्रीनं आपल्या मुलखासाठी देहाचं सोनं केलं असं लोक म्हणतील. तेव्हा तुला माजा अभिमान वाटल बग." गोदाक्काचे अश्रू पुसत ती म्हणाली.


नतंर कितीतरी वेळ दोघी तशाच होत्या. भिंतीला टेकून बसलेली गोदाक्का आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेली चंद्रा. आकाशात पौर्णिमेचा चंद्र उजाडला होता आणि त्याचा शीतल प्रकाश त्या छोट्याश्या झोपडीत पसरला होता. चंद्राची किरणं चंद्रीच्या चेहऱ्यावर विसावली होती. त्या प्रकाशात तिचे तेज उजळून निघत होते.

त्याच किरणांचा मंद प्रकाश गोदाक्काच्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित होत होता. तो कष्टी आणि सुरकुतलेला चेहरा चंद्रा तिच्या डोळ्यात सामावून घेत होती. कदाचित यापुढे ही माय पुन्हा भेटेल की नाही याची तिला काहीच शाश्वती नव्हती.


******

"चंद्रे, आडोशाला जाऊन कापडं बदल. ह्यो सदरा, धोतर, पागोटे असा पुरुषी वेष धारण करून घोड्याला टाप मार."


"आरं पण का? इतके दिस लुगडं नेसूनच तर म्या घोडा दौडत होते की."


"हो, पर तेव्हा तू मोहिमेवर निघाली नव्हतीस. तू सुंदर हाईस त्यात तरुण बी. तुझं ह्ये खरं रूप बघून कोणाचा तुज्यावर जीव बिव जडायचा म्हून सांगतुया. आपल्या जीवाची आपण काळजी घ्यायला नगं व्हय?"


"सया, मला एखाद्यानं हात तरी लावून दाखवावा म्या त्याचं हात तिथंच मोडून ठिवीन."


"चंद्रे, तसं नव्हं गं. टोळीत बाईमाणूस हाय हे फिरंग्याच्या कानावर गेलं तर आपण पकडले जाऊ म्हून म्हणतुया." तो तिला समजावत म्हणाला.


सयाचे म्हणणे तिला फारसे पटले नव्हते. पण तो सांगतोय तेव्हा ऐकायला पाहिजे म्हणून तिने बाजूला जाऊन कपडे बदलली.

काळ्या रंगाचा सदरा, त्यावरचं धोतर, डोक्याला पागोटे आणि चेहरा शेल्याने झाकून घेतलेला. ती समोर आली तेव्हा टोळीतील सर्व मंडळी तिच्याकडे बघतच राहिली. ती एखादी स्त्री असेल असा कणभर देखील संशय कोणाला येणार नाही अशी रुबाबात तिच्या चंदरवर आरुढ होऊन ती सर्वांसमोर उपस्थित झाली.


"ए, कोण रं तू?" सयाजीने दरडावून विचारले.


"सया, आरं म्याच हाय. चंद्री." ती उत्तरली.


"कोण चंद्री? तू चंद्री न्हाईस, तर चंदर हाईस. माझा सखा. कळलं?" तो कठोर आवाजात म्हणाला.


"व्हय सरदार. म्या चंदर हाय आन ज्यावर बसलोय तो बी चंदरच. आता सांगा की पुढं काय करायचं हाय?"

चंद्रातील चंदर पुढच्या सूचनेचे पालन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//