चंद्रा. भाग -८

वाचा इतिहासाचे एक न उलगडलेले पान
चंद्रा.
भाग -८

मागील भागात :-

घोडा पळवायला शिकायला गेलेली चंद्रा सयाजीला त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली देते.
आता पुढे.


येवढा तरणाबंड मर्द माज्या अगदी जवळ यिऊन बोलतो हातावर हात ठिवतो, मंग थोडी बहकनारच ना मी?" ती नाक फुगवून म्हणाली.

"चंद्रे?"

"सया एवढं दिस म्या काय न्हाय बोलले पर आज सांगतीय, तू इथून गेल्यापासून तुझी आठवण आली नसन असा एक बी दिस गेला न्हाय. तुलाच मनात ठिवून म्या रोज सराव करीत हुते. इतक्या वर्साने तू आज परतलास. मंग अचानक तुला भेटून मनात कायतरी झालं असल तर त्यात माझा काय रं दोष?" त्याच्या नजरेत नजर मिळवून ती विचारत होती.


तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. ती असे काही बोलेल, त्याला तरी कुठे ठाऊक होते?

जांभळ्या इरकली लुगड्यात उठून दिसणारे तिचे सौंदर्य, दिवसागणिक तेजस्वी दिसणारा चेहरा, काळेभोर पाणीदार डोळे, जुडा घातलेल्या केसातून वाऱ्यामुळे विस्कटलेल्या एकदोन बटा.. क्षणभर त्या रूपवंत सौंदर्यामध्ये तो अडकला, पण क्षणभरच.


"चंद्रे, हे चुकीचं हाय." तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवत तो म्हणाला.


"काय चुकीचं हाय सया? तुला मी आवडते हे दिसतंय की मला. तू माज्यासाठी परत आलास. चंदरला बी आणलंस. हे समदं माझ्यावरच्या लोभापोटीच ना रं?"


"चंद्रे, लहान हाईस तू. तुला न्हाय कळायचं." तो गूढ हसून म्हणाला.


"मंग मला कळल असं नीट विस्कटून सांग की."


"इतकी वर्ष म्या कुठं हुतो, तुला ठाव हाय?" त्याच्या प्रश्नावर तिने नकारार्थी मान हलवली. 


"वासुदेव फडक्याचं नाव ऐकलंस व्हय?"

त्याच्या प्रश्नावर तिने पुन्हा नकारात्मक मान हलवली.


"पुण्यातले थोर क्रांतिकारी व्हते ते."


"आपल्यावानी रामोशी व्हते?" तिने भोळा प्रश्न केला.


"देशभक्त व्हते. तीच त्येंची जात अन त्योच त्येंचा धर्म. क्रांतिकारकांची दुसरी वेगळी जात नसती. धर्म बी नसतो. आपल्या मुलखाला गोऱ्या लोकांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्येनी सशस्त्र हल्ला केला. आपल्यासारख्या गोरगरिबांची टोळी तयार केली. लूटमार केली, दरोडं घातलं."


"आपल्यावानी त्ये बी गरीब व्हते?"

"न्हाय गं. त्ये तर पैसेवाले हुते. वीस रुपये महिना पगाराची नोकरी व्हती. पर आजारपनात त्येंची आई गेली अन त्येंना रजा बी नाय मिळाली म्हूनशान त्येनी त्या नोकरीला लाथ मारली आन फिरंग्याविरोधी बंडखोरी सुरु केली.

नंतर पडलेल्या दुष्काळामधी हजारो लोकं मेली आन त्येंचा राग अधिकच वाढला. गोऱ्याचं राज्य घालवायला त्येंनी आपल्या लोकांना गोळा केलं आन लढायला सुरुवात केली. त्येंना लोकांची साथ तर लाभली पर मंग हळूहळू लोकं कमी होऊ लागली.

तीन वर्षांपूर्वी मी बी त्येंच्या मोहिमेत सहभागी व्हायला गेलो हुतो. पर त्ये पकडल्या गेले होते आन त्यामुळं माज सपान सपानच राहीलं.

मागच्या सालात त्येंचा मृत्यू झाल्याची बातमी आली तवापासून माजं काळीज थाऱ्यावर न्हाई बग. मलाबी वाटतंय आपुन आपल्या मातीसाठी लढावं. त्यासाठी म्या लोकं जमवत फिरत हाय आन त्यापायी म्या तूज्याकडं आलोया." तो तिच्याकडे बघून सांगत होता.


"सया, मला माफ कर. मघाशी म्या लय चुकीचं बोलले." चंद्रा खाली मान घालून म्हणाली.

"चंद्रे, उलट बोललीस ते बरंच झालं की. तुजा हा स्वभाव आवडतो बग मला. ओटात एक नं पोटात दुसरं असं काय बी नसतं. जे मनात येतं त्ये बोलून मोकळी होतीस.

आपलं तरुण मन. या भावना मनात येतीलच की. पर त्यापरीस काय जास्ती महत्त्वाचं हाय तिकडे लक्ष द्यायचं.

प्रेम ही लय निर्मळ अन पवित्र भावना हाय. ती मनात राहिलीच पायजे. मला सांग, सगळ्यात पवित्र प्रेम कोणतं असतंया?"

"कोणतं?"


"आईचं प्रेम. ती आपल्याला जल्म देती आपल्या दुधावार जगवती. ती आई किती महान असल?"


"व्हय रं. माज्या ध्यानातच आलं न्हाई."


"तुज्या आईला कोणी वंगाळ बोललं तर काय करशील?"


"म्या तर त्याचं मुडदं पाडन." ती त्वेषाने म्हणाली.


"आन मला कोणी काय बोललं तर?"

"तर त्येची बी जीभ उपडून त्येच्या हातात ठिवीन."

"आन नानाबाबाला कोणी काय बोललं तर?"

"तर त्येला बी जीता सोडणार न्हाई." ती.

आपली माती, आपला मुलुख, आपला देश ही बी आपली मायच तिथली समदी माणसं आपली माणसं. त्येंच्यावर त्ये फिरंगी राज करीत हाईत. आपल्या आयाबाया, आपल्या माणसांना छळत हाईत. त्येंचा आपल्याला मुकाबला करायचा हाय.

कधी या मातीला आईवरच्या लोभानं बग, कधी नानाबाबाच्या लोभानं बग तर कधी माज्यावरच्या लोभानं बग. तवाच तुला लढायला आणखी बळ मिळल." सयाजीच्या बोलण्याने चंद्रा पुरती भारावून गेली.

"सया, तुज्या नुसत्या बोलण्यानं माज्या काळजात आग पेटायला लागलीय.म्या तुज्यासंग यायला तयार हाय. चल, आपन आत्ताच लढायला जावू."


" खुळीच हाईस बग. असं कसं आत्ताच तुला घिवून जावू? पर चंद्रे, ही आग अशीच धूमसत राहू दे. तुझं प्रशिक्षण पुरं झालं की मंग मी तुला आपल्या टोळीला अन घिवून जाईन."

"पर नंतर आई मला न्हाय जावू द्यायची." ती रडवेला चेहरा करून म्हणाली.

"क्रांतिकारी बनणं सोप्पं नसतं गं. मनावर दगूड ठिवून निर्णय घ्यावी लागत्याती. त्याची तू तयारी करून ठीव. उद्यापासून चंदरच्या रपेटी बरूबरंच तुला अक्षरज्ञान बी द्यायचं हाय."

"तू मला लिहाय वाचाय शिकिवणार?"


"व्हय तर. ते समद्यास्नी यायला हवं."


"पर बाईमाणसानं शिकायचं नसतं."


"तिकडं पुण्यात फुलेबाबानं बायकांसाठी शाळा काढलीय अन आपण बायकांनी शिकू नये यातच अडून बसलोय. चंद्रे, शिक्षण समद्यासाठी असतं. तुला लिहाय वाचाय यायला पायजे."

त्याच्या बोलण्यावर तिने नुसती मान हलवली.

चंद्रे, तू वाघीण हाईस. त्यावानी तुला लढायचं हाय हे नेहमी ध्यानात ठीव.

आता घरला चल. उद्यापासून आपली शाळा पुन्हा सुरु करूया." त्याच्या विश्वासपूर्ण नजरेत तिचीही धारदार नजर मिसळली. चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पसरले होते.

उद्याची सकाळ चंद्राच्या आयुष्यात नवीन पान घेऊन उगवेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all