चंद्रा. भाग -७

वाचा इतिहासाचे एक न उलगडलेले पान
चंद्रा.
भाग -७

मागील भागात :-
गोदाक्काला चंद्राच्या लग्नाचे वेध लागले असतात पण चंद्रा तिला नकार देते. त्याच वेळी सयाजी तिला भेटायला येतो.
आता पुढे.

मधला सहा वर्षांचा काळ पुढे गेला होता. याआधी भेटलेला पोरसवदा सयाजी आता मिसरूड फुटलेला एक परिपक्व तरुण झाला होता तर पैरण घालणारी चंद्रा आता नऊवारीत मुसमुसलेली सुंदर यौवना भासत होती.

दोघे एकमेकांकडे भारावल्यासारखे बघत होते आणि त्याचबरोबर एक नजर त्या दोघांना निरखत होती. ती नजर लहुजीची होती. दोघांना एकत्र बघून त्याच्या डोक्यात वेगळाच विचार डोकावत होता


"काय रं लेका, यवढा वाढलाईस. लगीन बिगीन करायचा काय विचार हाय का न्हाय?" गप्पांच्या ओघात कानोसा घेत लहुजीने विचारले.

"न्हाय ब्वा! म्याच सोता विचवावानी आपलं एकल्याचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन हिंडत असतो. बायकूला कुठं कुठं घिवून जाणार? आपल्यामुळं दुसऱ्याच्या पोरीला उगी तरास नगं. आन दुसरं लगीनं बी नगं." त्याने स्पष्टपणे सांगितले.


"दुसरं लगीन? आरं बेट्या, तू पहिलं लगीन केलंस तरी कवा?" शिरप्याने आत येत विचारले.

"आरं मामा, कवाचंच. समज आली तवापासूनच म्या लगन केलंय. माज्या मुलखाशी. आता त्येच्या बिगर काही सुचत न्हाई बग. आपल्या लोकांसाठी लढायचं. त्या फिरग्यांना येथून बाहेर काढायचं. प्रसंगी त्येंचे मुडदे पाडायचे आन वेळ आलीच तर आपलं बी मुडदं पडू द्यायचं यापरीस आता या जीवनात दुसरं काय बी न्हाय."
ऐन पंचवीशीतील उमद्या तरुणाच्या मुखातील बोल ऐकून लहुजी त्याच्याकडे एकटक पाहत राहिला.


"चंद्रे, चल की गं भाईर. तुझ्यासाठी म्या काहीतरी घेऊन आलोय." चंद्राला घेऊन तो बाहेर गेला तेव्हाही लहुजी त्याच्याकडेच बघत होता.


"नाना, असा काय बघतुस रं?" शिरप्याने विचारले.


"शिरप्या लेका, ही नजर लई अनुभवी हाय. तुझा सया गुणांचा हाय रं. असा एक जरी मर्द देशातील परत्येक घरी जल्माला आला ना, तरी ही फिरंग्याची सत्ता नष्ट व्हायला वेळ लागणार न्हाई." 
बोलताना लहुजीचा ऊर भरून आला होता.


"नाना, माझ्या टकूऱ्यात एक आलंय बग. तुला आवडलं तर ठीक हाय नायतर जाऊ दे."


"पहिलं सांग की रं. मंग ठरवू."


"नाना, वैनी मला काय वाटतुया की सया आन चंद्री दोघं बी एकमेकांना अनुरूप हाईत. तवा आपण त्येंचा विचार करावा." शिरप्या बोलून गेला.


"माझ्या मनात असा विचार शिवला नसलं म्हणतोस व्हय रं? पर हे न्हाय जमायचं रं. त्या दोघांच्याही डोसक्यात तलवारी अन फिरंगी घुमत असत्यात. ते कवा संसार करायचे?" लहुजी हसून म्हणाला.


"मामाजी, तुमी तर काय बी मनावर घेत न्हाय. अशी तरणी पोर घरात बसवून ठेवणं शक्य तरी हाय का?"


"ती कुठं घरात असती? ती तर दिवसभर आपल्या टोळीसंग असती."

"त्येच म्हणतेय मी. ह्ये असं बरं न्हाय दिसत."


"पोरी तुझी काळजी मला बी कळत्येय. पर आपली चंद्री शूर हाय. कोणी तिच्याकडं एक डोळा वाकडा करून पहिला तरी त्याचे दोन्ही डोळे भाईर काढायला ती मांगपुढं बघणार न्हाई.

सूनबाई, लगीन, संसार सगळीच करत्यात. पर या पोरांची वाट वेगळी हाय. चालू दे की त्येना त्या वाटेवर. आपल्या मुलखासाठी काई करू वाटतंय तर करू दे." लहुजीच्या समजावाण्यावर गोदाक्का नेहमीप्रमाणे पुन्हा गप्प झाली.

*****

"काय रं सया? काय आणलंस माज्यासाठी?" बाहेर आलेली चंद्रा सयाला विचारत होती.

"चंद्रे, तूच बग की गं." एका दिशेला बोट दाखवत तो म्हणाला.


"घोडा? सया, तू माज्यासाठी घोडा घिवून आलाईस?" ती बांधून ठेवलेल्या सफेद घोड्याकडे धाव घेत म्हणाली.


"आता? तुलाच घोडा चालवाया शिकायचं हुतं. मंग त्यासाठी त्यो लागनच ना?" सया हसला.


चंद्रा त्या घोड्यला कुतूहलाने न्याहाळत होती. त्याच्या गोल गोल फिरून तिने आनंदाने टाळी वाजवली.

"सया, ह्यो घोडा बगुन म्या लई खुश हाय. मला लवकर रपेटीवर घेऊन चल की."

"चंद्रे, हा फकस्त घोडा नाय, तर आपला दोस्त हाय. याचं नाव चंदर हाय."

"चंदर?"

"तर? चंद्रावानी कसा पांढराशुभ्र दिसतंय, म्हून चंदर."

"व्हय रं. आन हा बघ माथ्यावर काळा डाग बी तसाच हाय." चंदरच्या मस्तकावर हात फेरीत ती म्हणाली.
चंदरला तिचा स्पर्श आवडला असावा. त्याच्या डोळ्यात आपलेपणाची भावना दिसत होती.


"चंद्रे, घोडा पळवायला शिकायचंय नव्हं? चल मंग, आजपासूनच साळा सुरु करू."


"आरं पर मला कुठं घोड्यावर बसता येतं?"

"म्या हाय की." तिला हात देत सयाजी म्हणाला.

त्याच्या मदतीने ती घोड्यावर बसली. मागे तो होताच. त्याच्यासोबत तिच्या या शाळेच्या श्रीगणेशा झाला.
तिने लगाम हातात पकडली आणि सायच्या सूचनेचे पालन करत चंदरला पळवण्याचा प्रयत्न करू लागली. दोनेक तासात तिची बऱ्यापैकी प्रगती झाली होती.

"शाबास चंद्रे. पहिल्या दिवशीच तू लय झ्याक काम केलंस." रानात रपेट सुरु असताना सयाजी तिच्यावर खुश होऊन म्हणाला.


त्याचे असे अगदी जवळून बोलणे ऐकून तिला आज वेगळेच वाटले आणि त्या भरात हातातील लगाम सैल झाली.

"चंद्रे, काय करतीस?" तिच्या हातावर हात ठेवून लगाम खेचत सयाजी ओरडला.


"जराशी तारीफ केल्याबरूबर लगेच हुरळून बी गेलीस? ह्यापुढं ह्ये चलणार न्हाय."

घोड्याला उभे करत त्याने खाली उडी घेतली. त्याच्या पाठोपाठ तीही खाली आली.
त्याच्या ओरडण्याने तिच्या डोळ्यात पाणी आले होते.


"आता रडतीस कशापायी? मी तुझ्यावर वरडू बी शकत न्हाई व्हय? आस असल तर म्या शिकवणारच न्हाय बघ."


"सया तू मला शबुद दिला व्हतास."\"ती स्फुन्दत म्हणाली.


"तेच पाळाया आलो हुतो. चांगलं घोडं पळवता पळवता अचानक माती का खाल्लीस तू?"


"ते तुझ्यामुळंच झालं." तो पुन्हा ओरडतोय हे बघून ती म्हणाली.

येवढा तरणाबंड मर्द माज्या अगदी जवळ यिऊन बोलतो हातावर हात ठिवतो, मंग थोडी बहकनारच ना मी?" ती नाक फुगवून म्हणाली.

"चंद्रे?"

"सया एवढं दिस म्या काय न्हाय बोलले पर आज सांगतीय, तू इथून गेल्यापासून तुझी आठवण आली नसन असा एक बी दिस गेला न्हाय. तुलाच मनात ठिवून म्या रोज सराव करीत हुते. इतक्या वर्साने तू आज परतलास. मंग अचानक तुला भेटून मनात कायतरी झालं असल तर त्यात माझा काय रं दोष?" त्याच्या नजरेत नजर मिळवून ती विचारत होती.


काय उत्तर देईल सयाजी? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all