चंद्रा. भाग -६

वाचा इतिहासाचे एक न उलगडलेले पान.
चंद्रा.
भाग -६

मागील भागात :-
शत्रूवर वार करायचा असेल तर आतातायीपणा न करता विचारपूर्वक करायचा असतो असे सयाजी तिला समजावतो.

आता पुढे.


"आन मंग क्रांतिकारी बनून हल्लाबोल करायचा."


"क्रांतिकारी म्हंजी?"


"म्हंजी?" त्याने दोन सेकंद आपले डोके खाजवले.


"हं, क्रांतिकारी म्हंजी क्रांती करणारी लोकं. अन्याय सहन करायचा न्हाय. आपल्या लोकांसाठी लढायचं. फिरंगी पुढं दिसलं की त्येला मारायचं. पार एक घाव दोन तुकडं करायचं." तो जमेल तसा तिला समजावत होता.


"सया, किती भारी बोलत हाईस रं तू?" आत्तापर्यंत फुगलेला तिचा चेहरा आता फुलला होता. तो काय सांगतोय हे काही फारसे कळले नव्हते, पण 'एक घाव दोन तुकडे' हे ऐकून ती भारावून गेली होती.


"मला तुज्या टोळीमधी घेशील काय?"


"व्हय तर. तू तर आपल्या टोळीची सरदारीन व्हशील." तो हसून म्हणाला. तिच्या चालीने चालताना दोघे सर्वांपासून बरेच मागे पडले होते.


"चंद्रे, आता बिगीबिगी चाल. घरी पोचायला उशीर व्हायला नगं." तो.


"सया, मला उचलून घे की रं. उन्हापायी पायाला लई तरास होतोय."

त्याने बघितले, तिच्या नाजूक अनवाणी तळपायांना फोड आले होते. चालणे तसे अशक्यच होते.
खाली वाकून सयाने तिला आपल्या खांद्यावर उचलून धरले आणि घराच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

******

"मंग्या, पिऱ्या, खंड्या अन चंद्रे, आजच्या रातीची ही भेट म्हंजी माजी तुमच्यासंग शेवटाची भेट. उद्या पायटेलाच म्या जाणार हाय." वर्षभराचा काळ सरला होता. चंद्रा आणि तिच्या टोळीला सयाची सवय लागून गेली होती आणि आज अचानक तो जायचा म्हणत होता.


"तू खरंच जानार हाईस?" तिने डोळ्यात पाणी आणून विचारले.


"व्हय तर."


"सया, तू मला घोडा पळवायला न्हाय शिकिवलं." ती खट्टू होत म्हणाली.


"पुढल्या खेपेला आल्यावर शिकवील की गं."


"अन न्हाय आला तर?"

"चंद्रे, रामोशी दिलेला शबुद मोडत नसतो. म्या लवकरच हिथं हाजर असल. तुमी समद्यांनी मातुर रोजचा सराव सोडायचा न्हाय. आजपावतर जे काई शिकलावं त्ये इसरायचं न्हाई." तिच्यासोबतच सर्वांकडे बघत तो म्हणाला.


सया गेल्यावर दोनचार दिवस त्याच्या आठवणीत गेले. पण सर्वांनी आपल्या मित्राला शब्द दिला होता आणि त्यानुसार ते रोज एकत्र येऊन सराव करत होते.

******

असेच दिवस जात होते. दिवसभराचा शीण आणि थकवा आपल्या अंधारात गुडूप करत रोज नव्या आशेची प्रभा घेऊन नवा दिवस उगवत होता.


दिसामाजी कलेकलेने वाढणारी चंद्रा चेहऱ्यावर नवे तेज लेवून मोठी होत होती. आपल्या सरावाबरोबरच ती आता आईला घरकामात मदत करू लागली होती. अंगावरची पैरण आणि धोतर जाऊन चोळी आणि इरकली लुगडे अंगावर मिरवत होती.

आधीच सौंदर्याचे तेज ल्यालेली ती तारुण्याच्या पदार्पणात आणखीनच खुलून दिसू लागली होती.


"मामाजी, आपली चंद्री मोठी झालीय, न्हातीधुती झालीय. आता तिचं लगीन कराय पायजे." एक दिवस गोदाक्काने लहुजीजवळ विषय काढला.


"आई, आज काढला त्यो काढला, यापुढं ह्यो इषय न्हाय काढायचा." लहुजी काही बोलण्यापूर्वी चुलीतील लाकूड नीट करत चंद्रा म्हणाली.


"आता? लगीन त करावंच लागन ना? समद्यास्नी करावं लागतं." गोदाक्का.


"समदी म्हंजी चंद्री नव्हं. मला लगीन न्हाय करायचं."


"चंद्रे, हे कोणतं खुळ डोक्यात घातलंस गं? मामाजी आता तुमीच समजावा." गोदाक्का जरा रागातच म्हणाली.

"चंद्रे.."

"बाबा, तूच माजं ऐकून घे. आई म्हनली, 'चंद्रे तू मोठी झालीस, ह्ये पैरण, धोतर नेसणं बंद कर' म्या आयकलं. लुगडं नेसाया लागली. ती मनली सैपाक शिक, म्या रोज त्ये करते. तिचं म्या समदं ऐकत आल्ये. पर हे लगीन नगं मला. ह्ये मातुर न्हाई ऐकायची." लहुजीला थांबवत तिने आपली बाजू स्पष्ट केली.


"आगं, पर तुझं म्हणणं तरी काय? ते आमाला बी कळू दे की." लहुजी.


"बाबा, लगीन करून नवऱ्याला भाकरी बनवून द्यायला ही चंद्री न्हाय जल्मली. ते माज्यानं न्हाई हुनार. मला फिरंग्यासंग लढायचं हाय. बाबाला ज्येनी मारलंय त्येंचा बदला घ्यायचा हाय." ती ठामपणे म्हणाली.


"चंद्रे, आजवर लई ऐकलं. आता म्या तुज काय बी ऐकणार न्हाई."


"म्या बी न्हाई." चंद्राने तिला ठसनीत उत्तर दिलं.


"म्या काय म्हणतो, तुमी दोगीबी माझं ऐका. सुनबाई तुला चंद्रीच लगीन करून द्यायचं हाये नं? करील तो लगीन."

"आरं पर बाबा.."

"चंद्रे, तू मला बोलू दे. तुला नवऱ्याला भाकरी थापून न्हाई ना द्यायची? तर आपुन तसा नवरदेव शोधूया. म्हंजी तुला बी तरास नगं." तो म्हणाला.

"बाबा, काय बोलतुस तू,? मला लगीन न्हाई म्हंजी न्हाई करायचं." ती घुश्यात उठून बाहेर जायला निघाली.

"चंद्रेऽऽ " गोदाक्का मागून आवाज देत होती पण त्या हाकेला थांबेल ती चंद्रा कुठली? 


"ओ बाई, जरा जपून चाला की ओ. न्हायतर तुमच्या नाजूक हाताला जोराचा हिसका बसल."


"नाजूक आसन तुजी भन. माझे हात नाजूक न्हाईत तर तलवार चालवून राकट झाले हाईत. दाखवू का तुला माझा इंगा?"

रागात बाहेर येत असलेल्या तिला दारात कोणीतरी धडकणार तेवढ्यात त्या व्यक्तीने तिचा हात पकडला आणि तेवढ्याच त्वेषाने हात सोडवत ती त्याला म्हणाली.

हातातून हात सोडवताना त्याच्याशी तिची नजरानजर झाली मात्र आणि ती आश्चर्याने पाहतच राहिली.


"सया तू? केवढा बदललास रं? म्या तर वळखलंच न्हाई."

"चंद्रा? आगं, म्या तरी तुला कुठं वळखलं हुतं? नववारीत केवढी मोठी बाई दिसत्येस?"


मधला सहा वर्षांचा काळ पुढे गेला होता. याआधी भेटलेला पोरसवदा सयाजी आता मिसरूड फुटलेला एक परिपक्व तरुण झाला होता तर पैरण घालणारी चंद्रा आता नऊवारीत मुसमुसलेली सुंदर यौवना भासत होती.

दोघे एकमेकांकडे भारावल्यासारखे बघत होते आणि त्याचबरोबर एक नजर त्या दोघांना निरखत होती. ती नजर लहुजीची होती. दोघांना एकत्र बघून त्याच्या डोक्यात वेगळाच विचार डोकावत होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all