चंद्रा. भाग -५

वाचा इतिहासाचे एक न उलगडलेले पान.
चंद्रा.
भाग -५

मागील भागात :-

गावात नव्याने आलेला सयाजी चंद्राला काही डावपेच शिकवतो. ते सर्व मिळून गोऱ्या लोकांना बघायला जायचा प्लॅन बनवतात.

आता पुढे.


"न्हाय बा. पर आई म्हणते त्येंची जात लई वंगाळ असत्ये. माझ्या बाला त्येनीच मारलंय आन त्ये उमाजी राजे? त्येंना बी मारलंय." ती म्हणाली.

"तुला बघायचं हाय?" त्याने परत प्रश्न केला.

"तू बघितलंस?" तिचा प्रतिप्रश्न.

"हो."

"कशी दिसतात रं?" कुतूहलाने चंद्रा.


"माकडावानी. पर कापडं घातलेली माकडं." तो हसला.

त्याच्यासोबत तीही खळखळून हसायला लागली. कपडे घातल्यावर माकडं कशी दिसत असतील हा विचार तिला पुन्हा पुन्हा हसवत होता.


"माकडांस्नी काय बघायचं रं? त्ये तर रानात बी दिसत्यात." ती हसत म्हणाली.


"व्हय. पर रानातली माकडं आपल्याला तरास तर नाही ना देत? आन ही गोरी माकडं? यांनी तर नुसता उच्छाद मांडलाय. आपले वैरी हाईत त्ये."


"म्या माझी कट्यार घेऊन यिऊ काय? एकेका वैऱ्याचं मुंडकंच छाटून काढत्ये बघ." तिच्या अंगात अचानक स्फूरण चढले.


"चंद्रे, येडीच हाईस तू. आगं, तू अजून लई लहान हाईस. मोठी झालीस ना की मंग आपण त्येंची मुंडकी फोडाया जाऊया." तो तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला.


"तू कधी गेलाईस का अशा मोहिमेवर?" तिने पुन्हा प्रश्न केला.


"न्हाई. पर या वेळी मामासोबत भाईर जाणार हाय."


"तुला घोडा पळवता येतो?"


"व्हय तर."


"मला शिकीव की रं."


"शिकवील की. त्यात काय? बरं, लष्कर बघायला जायचं उद्याचं पक्कं हाय बरं. आपली पूरी टोळीच जाऊया. तू तुझ्या म्हाताऱ्याला तसं सांगून ठीव. नायतर उगाच गावभर धुंडाळत बसंन.

आन आपल्याला जायचंच हाय हे लक्ष्यात घे. आपला वैरी कसा दिसतो हे आपल्याला ठाव असलं पायजे." तिला घराकडे सोडत तो म्हणाला. 


"चंद्रे, पोरांची कापडं घालतेस म्हून सोताला पोरगं समजायला लागलीस व्हय गं? पोरीबारींनी घरी यायची ही येळ हाय होय?" घरात पाय ठेवताक्षणी गोदाक्का तिच्यावर कडाडली.


"आई, अगं सयासंगच तर हुती आन त्येनच मला घरला सोडून बी देलं."


"सया काय म्हणतेस गं? तुझ्याहून मोठा हाय त्यो. त्येला दादा बोलत जा."

"म्या नाय बोलायची दादा."

"का गं?"


"त्येनी तुझ्या पोटातून थोडीच जलम घेतलाय?" तिच्या उत्तरावर गोदाक्काने डोक्यावर हात मारून घेतला.


"सूनबाई, लहान हाय गं ती. मोठी झाली की तिलाच कळल." लहुजी हसत म्हणाला.


"मामाजी, तुमी तिला सारखी पाठीमागं घालता म्हूनशान ती जास्तच लाडावली हाय." बडबडत गोदाक्का चूल पेटवायला लागली.


"बाबा, तुला एक सांगायचं हुतं." रात्री जेवण आटोपल्यावर अंगणात चांदण्याच्या साक्षीने हळुवारपणे चंद्रा बोलत होती.


"सांग की गं."


"आमी समदी पोरं उद्याला लस्कर बघाया जानार हाय. तू आईला यातलं काय बी सांगू नगंस."



"चंद्रे, लय दूर हाये त्ये. कशी जानार?" त्याने काळजी व्यक्त केली.


"तू काळजी करू नगंस. तुझी चंद्री वाघीन हाय." तिच्या उत्तराने लहुजीच्या ओठावर हास्य पसरले.


"ए वाघीन, आता निजाया ये बघू." आईचा आवाज ऐकताच ती आत गेली. तिने जमिनीवर अंग टाकले खरे पण मन मात्र कापडं घातलेल्या त्या गोऱ्या माकडापाशी रेंगाळत होते.



दुसऱ्या दिवशी सगळी पोरं सयाजी सोबत गेली. ठिकाण जवळ नव्हते. चांगले सात आठ किलोमीटर लांब होते. भर उन्हात त्यांची वानरसेना निघाली होती. अंगातून घाम निथळत होता.


एकदाची इंग्रजांची छावणी दुरूनच त्यांच्या दृष्टिक्षेपात आली. एका झाडाच्या आडोशाला पोरं थांबली. तिथून लपूनच ती इंग्रजाचे निरीक्षण करत होती. आजवर कधीच न पाहिलेला गोरा गोरा रंग, माकडासारखे बसलेली नाकं, फुगलेले गाल.. सगळी मुलं डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होती.


त्या गोऱ्यांचा पोशाख देखील किती विचित्र? गुडघ्याच्याही खाली असलेले त्यांचे घागरे आणि अंगावर लाल रंगाचे डगले. त्या डगल्यांचे हात सुद्धा लांबच लांब. डोक्यावरचे पिंगट केस. हातात मोठ्याला बंदूका आणि त्यांची भाषा? भाषा अशी गिचमीड की ते काय बोलत आहेत यांचा पोरांना काही अंदाजही येईना.


"सया, ही खरोखरीचीच माणसं हाईत ना रं?" मंग्याने विचारले.


"न्हाई." सया गंभीरपणे म्हणाला. "ही माणसं न्हाईत तर विषारी जनावर हायती. वैरी हाईत आपली. त्येंना ठेचून काढाया हवं." त्याच्या डोळ्यात अंगार होता.


"सया, म्या सोबतीला गोफण आणली हाय. फेकायचीत का दगूडं?" चंद्रा त्याच्या कानात कुजबुजली.


"खुळी हाईस तू. असा हल्ला नसतो करायचा. चला, आता घरला परत जाऊ. न्हायतर तिकडं हंगामा हुईल."


तो तिथून परतीच्या वाटेकडे वळला. त्याच्याबरोबर इतर मुले देखील निघाली. चंद्रा काही न बोलता निघाली. तिचे गाल रुसल्यामुळे टम्म फुगले होते आणि डोळ्यातून पाणी वाहत होते.


"ए चंद्रे, कशापायी रडतीस? काय झालं?" तिच्याकडे लक्ष जाताच सयाने विचारले.


 "तुझ्यासंग म्या कट्टी हाय. यापुढं कधीच बोलायची न्हाय." ती स्फुंदत म्हणाली.


"आता? म्या काय केलं?" त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिले.


"तू मला दगूड का न्हाई मारू दिलंस? या फिरंग्यानीच बाबाला मारलं आन उमाजीला बी मारलं. तरी आपण गुमान रहायचं?" ती डोळे पुसत म्हणाली. रडल्याने तिच्या गव्हाळ नाकाचा शेंडा लाल झाला होता. 


"चंद्रे, आपल्या वैऱ्यावर असा वार करायचा नसतू. तू बघितलं हुतंस ना? त्येंच्याकडे किती बंदूका व्हत्या? त्या बंदुकीनं आपण पार ढेर होऊन गेलो असतो की गं."


"आरं पर मंग आपण काहीच करायचं न्हाई का?" ती.


"करायचं की. पर समदा विचार करून करायचं. आपण आपली एक फौज तयार करायची."


"फौज म्हंजी?"


"म्हंजी आपली टोळी तयार करायची. मोठी टोळी. जादाची माणसं जोडायची."


"आन मंग?" तिच्यातील कुतूहल जागे झाले होते.


"आन मंग क्रांतिकारी बनून हल्लाबोल करायचा."


"क्रांतिकारी म्हंजी?"


"म्हंजी?" त्याने दोन सेकंद आपले डोके खाजवले.


"हं, क्रांतिकारी म्हंजी क्रांती करणारी लोकं. अन्याय सहन करायचा न्हाय. आपल्या लोकांसाठी लढायचं. फिरंगी पुढं दिसलं की त्येला मारायचं. पार एक घाव दोन तुकडं करायचं." तो जमेल तसा तिला समजावत होता.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all