चंद्रा. भाग -४

वाचा इतिहासाचे एक न उलगडलेले पान.
चंद्रा.
भाग -४

मागील भागात :-
लखोजीच्या मृत्युंनंतर लहुजी चंद्राला तलवार शिकवायचा विचार करतो.सुरुवातीला गोदाक्का नकार देते. पण नंतर काही न बोलत संमती देते.

आता पुढे.

"त्या सगळ्या राजघराण्यातील बायका. आपण साधी माणसं." खालच्या स्वरात गोदाक्का म्हणाली.


"आपण साधी माणसं न्हाय. रामोशी आहोत. उमाजी नाईक तूच हिला सांगत हुतीस ना? त्यांचंच रगुत आपल्या शरीरात वाहतंय." लहुजी.


"जे करायचं ते करा. फकस्त चंद्रीला काय व्हायला नगं." गोदाक्काने डोळ्याला पदर लावला.


"सूनबाई, तुझी सल दिसत्येत गं मला. अचानक नवऱ्यानं साथ सोडली. पोटची दोन पोरं खंडोबानं केव्हाच आपल्यापाशी बोलावून घेतली. घरात उरलेली आजारी सासू आन हात मोडलेला सासरा. तवा तुझी सारी भिडस्त लेकीवरच हाय.

पर माझ्यावर विश्वास ठेव. आपल्या चंद्रीला हिऱ्यावानी चमकवील मी. लखुला म्याच शिकवलं हुतं. आन बघितलंस ना? त्येनं कशी फिरंग्याची डोस्की फोडली?" बोलता बोलता तो थांबला. कारण त्यांच्याशी लढतानाच त्याला प्राण गमवावे लागले होते.

"हरवेळी आपला दुष्मनाचीच जीत होईल असं नसतं ना गं? कधीतरी आपण बी जीतू." ओल्या शब्दात तो पुढे बोलला.


लहुजीच्या बोलण्यावर गोदाक्काने केवळ मान हलवली. सगळ्यांच्या ताटात भाकरी वाढताना नवऱ्याच्या आठवणीने तिचा जीव व्याकुळ होत होता. कसेबसे दोन घास पोटात ढकलून तिने ग्लासभर पाणी घशात ओतले.

******

दुसऱ्या दिवसापासून गोदाक्का आपले पांढरे कपाळ घेऊन कामाच्या शोधात निघाली. कोणाच्या शेतात, कोणाच्या मळ्यात ती कामाला जात होती. 

इकडे ती कामाला गेली की लहुजी आणि चंद्राच्या तालीमी सुरु होत होत्या.

तलवार हातात घेऊन वार करणे सोपे काम नव्हते. सुरुवातीला तर तिच्या कोवळ्या हातात तलवारीचा भार सोसवेना. पण लहुजीही पक्का चिकाटीचा होता. तो तिला बरोबर तयार करत होता.

डावपेच खेळताना मात्र परकर असल्यामुळे तिला अडचण येत होती लहुजीच्या हे लक्षात आले त्याने तिला परकरचा कास घालायला शिकवले.


"बाबा, मला नाय जमायचं. आनं परकरचा कास बी झटकन निघून जातोय." ती वैतागून गेली.

"वाईच थांब जरा." काहीतरी सुचून तो म्हणाला.

जनाबाईच्या खाटेखाली असलेली एक ट्रंक ओढून आणत त्याने तिच्यासमोर ठेवली.

"बाबा, यात काय हाय रं?" चंद्राने आश्चर्याने विचारले.

"तूच उघडून बघ की." लहुजी हसला.

तिने ट्रॅंक उघडली तर त्यात दोन गोल पैरण होते.

"बाबा ही तर पोराची कापडं हायेत." चंद्राच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

दुसऱ्या ट्रॅंकेत लखोजीचे एक धोतर होते. लहुजीने त्याचे दोन भाग केले आणि तो तिच्याकडे आला.

"चंद्रे ह्यो पैरण घाल आणि माझ्यासारखे धोतर नेसून बाहेर ये." तिच्या हातात कापडं कोंबून तो अंगणात गेला.

तिला पैरण तर घालता आली पण धोतर कसे नेसायचं ते काही जमेना. कमरेभोवती कसेबसे गुंडाळून ती धावत जनाबाई कडे गेली.

"मोठीआई, जरा मदत कर की गं."तिच्यासमोर उभे राहून चंद्राने गळ घातली.

तिच्या अंगावरची कापडं बघून जनाबाईला नातवांची आठवण झाली. त्यांच्याच तर दोन पैरणी गोदाक्काने आजवर जपून ठेवली होती.


जनाबाईने धोतर नेसायला मदत केली. सोबतच तिचे विस्कटलेले केस व्यवस्थित बांधून त्याचा जुडा घालून त्याच्यावरून पागोटे बांधून दिले. आता ती हुबेहूब मुलासारखी दिसत होती.


"बाबा.." दारात येऊन तिने लहुजीला हाक दिली.

तिच्या आवाजाने त्याने वळून पाहिले. अंगात पैरण, कमरेला धोतर, डोक्याला पागोटे बघून त्याला भरून आले.

"चंद्रे, ही पैरण तुझ्या भावाची, हे धोतर तुझ्या बापाचे हाय. बापावानीच लय गुणी हो. प्रसंग आला तर त्या गोऱ्या लस्कराशी दोन हात कराया कधी मागं सरु नगंस." तिच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला.

******

हळूहळू वर्ष सरत होते. चंद्रा आता तरबेज होत होती. नुसती कट्यारच नाही, तर कुऱ्हाडी आणि भाला चालवण्यात सुद्धा तरबेज होऊ लागली होती.


"चंद्रे, तिरकमठा शिकाया येती का?" एक दिवस शिरप्याने तिला विचारले.

लहुजीची परवानगी घेऊन ती त्याच्यासोबात गेली. रानातल्या मोकळ्या जागेत चार पाच पोरांना गोळा करून तो त्यांना तयार करून घेत होता.


"काका, ह्यो नवा गडी कोण रं?" तेरा -चौदा वर्षांच्या एका अनोळखी मुलाला बघून तिने विचारले.


ह्यो? ह्यो सया. माझा भाचा हाय. आता इथंच आपल्या गावी राहणार हाय." शिरप्याने तिला जादाची माहिती दिली.


"ए, आन तू कोण रे? एवढासाच तर हाईस अन तीरकमठा शिकणार हाईस होय?" सयाने थोडाशा गुर्मीत विचारले.

"म्या चंद्रा हाय." ती म्हणाली.

"कापडं तर पोरांची घातलीस? पोरीचं नाव का लावतोस रे? पोरगी बिरगी न्हाईस न्हवं?" तो हसून म्हणाला.

"म्या पोरगीच हाय आन मलाबी हे शिकायचं हाय."

उत्तरासोबतच तिने त्याला तलवारीचे दोन हात करून दाखवले. ते बघून सयाजी वरमला. एवढीशी चुरूचुरू बोलणारी आणि हत्यार चालवणारी पोरं तो पहिल्यांदाच बघत होता.

आठच दिवसात चंद्रा तीरकमठा चालवण्यात निपुण झाली. पोरगी खरंच तल्लख होती. तिच्यावर खूश होऊन सयाजी तिला स्वतःकडच्या नव्या नव्या क्लूप्त्या शिकवत होता. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती.

*******

"चंद्रे, तू कधी लष्कर बघितलं हाईस?" एक दिवस त्याने विचारले.

"म्हंजी गोरं लोक?"

"हम्म."

"न्हाय बा. पर आई म्हणते त्येंची जात लई वंगाळ असत्ये. माझ्या बाला त्येनीच मारलंय आन त्ये उमाजी राजे? त्येंना बी मारलंय." ती म्हणाली.

"तुला बघायचं हाय?" त्याने परत प्रश्न केला.

"तू बघितलंस?" तिचा प्रतिप्रश्न.

"हो."

"कशी दिसतात रं?" कुतूहलाने चंद्रा.

"माकडावानी. पर कापडं घातलेली माकडं." तो हसला.

त्याच्यासोबत तीही खळखळून हसायला लागली. कपडे घातल्यावर माकडं कशी दिसत असतील हा विचार तिला पुन्हा पुन्हा हसवत होता.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all