चंद्रा. भाग -३

वाचा इतिहासाचे एक न उलगडलेले पान.
चंद्रा.
भाग -३

अचानक जाग आली तसे गोदाक्काने बाहेर पाहिले. अजून तांबडं फुटायचे होते. पण अंगणातील काळोख कमी झाला होता. पक्ष्यांचे लयबद्ध सूर कानावर पडत होते. रात्रभर बसून राहिल्याने तिचे अंग अकडले होते. तिने हलक्या हाताने चंद्राचे मांडीवरचे डोके खाली ठेवले आणि आपली कामं आटोपायला लागली.

"लखू आलाच नाही नव्हं?" जनाबाईच्या प्रश्नावर तिने नकारार्थी मान डोलावली.

"लहुजी नानाऽऽ"

तेवढ्यात बाहेर जोराने आलेल्या आवाजाने ती लगबगीने बाहेर आली. त्या आवाजाने लहुजी उठून बसला.

"शिरप्या? काय रं लेका? काय झालं? कशापायी कोकलतोस?" लहुजी ने त्याला विचारले.

"नाना, घात झाला." तो दम टाकत म्हणाला.

"घात?" गोदाक्काने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिले.

"व्हय वैनी. आमी लुटीचा माल घेऊन येत हुतो पर लस्कराला कसं काय खबर लागली कुणास ठाऊक? वारणेच्या खोऱ्यात त्येनी आमाला घेरलं. गनिम जवळ येत आहे हे कळताच लखोबाने सगळ्यांना वाट फुटल तिकडं पळायला लावलं अन त्यो एकटा त्या फिरंग्याची डोस्की फोडू लागल . पर शेवटी त्यो त्यांच्या हाती लागला आन त्येनी त्याची राखरांगोळी केली." डोळे पुसत शिरप्या सांगत होता.

हे ऐकून तर गोदाक्काने हंबरडा फोडला. लहुजीच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली. आत असलेलली जनाबाई आपला उर बडवू लागली. या सगळ्या कोलाहलाने चंद्रा जागी झाली. सर्वांना रडताना बघून तीही रडायला लागली.

जेव्हा तिला कळले की दोन दिवसापासून ज्याची आतुरताने वाट बघत आहे तो बाबा आता कधीच येणार नाही हे ऐकून तिच्या डोळ्यात प्रचंड संताप दाटून आला.


"आई, तू काळजी करू नगं. बाबाला मारणाऱ्या फिरंग्याला म्या सोडणार नाई, म्याच त्याला मारून टाकील." ती चिमूरडी बोलत होती आणि ते ऐकून गोदाक्का पुन्हा मोठ्याने रडत होती.

*******
लखोजी गेला आणि गोदाक्का पार कोलमडून म्हणून पडली. तिचा कुंकवाचा धनी तिला कायमचा सोडून गेला होता. घरात म्हातारी सासू, अशाच एका दरोड्यात उजवा हात गमावलेला सासरा आणि तिच्या पदरात टाकून गेलेली सहा सात वर्षाची चिमुरडी. या सगळ्यांना आता कसे जगवायचे हा प्रश्न गोदाक्काला भेडसावत होता.


"वैनी, ह्यो लखोबाचा हिस्सा. तिच्या हाती एक पुरचुंडी देत शिरपा म्हणाला.

"आव पर.."
 ती पुढे काही बोलणार त्यावर शिरप्याने तिला थांबवले.

"वैनी, त्यो एकटा जीवानिशी गेला. त्याच्या सोबतीन कोण कोण होते याचा लस्काराला अंदाज नसला तरी आमी समदे काही दिवस परंगदा राहनार हाय.

आयुष्यभर तर मी काही तुमास्नी मदत करू शकणार नाय पर शब्द देतो जोवर जीवात जीव आहे तोवर जमल तसं मी मदत करल." डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू पुसत तो म्हणाला.

"चंद्रे, ही तुझ्या बा ची कट्यार. जपून ठिव " जाता जाता तिच्या हाती कट्यार देत शिरपा निघून गेला.


तो गेल्यावर हातातील पुरचुंडी कडे बघून गोदाक्का डोळे पुसत होती.

"सुनबाई तू काळजी करू नगंस. एक हात नसला तरी दुसरा हाय की. म्या काही काम शोधून घर चालवील." तिची तगमग उमजून लहुजी म्हणाला.

"मामाजी, असं काहून बोलता? तुमाला मी कोणापुढं हात नाही पसरू द्यायची. तुमी घरी राहून आत्याबाई अन चंद्रीची काळजी घ्या. म्या हाय ना? म्या बघन समदं."

"आई, मी बी तुझ्यासंग कामाला येतो."

"न्हाय. तू घरला राहायचं. मोठयाआई आन मोठया बाबाची काळजी घ्यायची." तिला नकार देत गोदाक्का चूल पेटवायला गेली. घरच्या मंडळींना ती आणखी किती दिवस उपाशी ठेवणार होती?

"चंद्रे, तुला तलवार शिकायची हुती नव्हं?" चंद्रीच्या हातची कट्यार बघून अचानक लहुजीचे डोळे लकाकले.

"व्हय. पर आता बाबा न्हाय तर कोण शिकवीन?" ती लहानसा चेहरा करून म्हणाली.

"म्या हाय की. म्या शिकवन."

"एका हातानं?" तिचा प्रश्न.

"तर? एक हात हाय म्हून काय झालं? तुझे दोन हात हाईत की. तुझी आई तर मला कुठं बाहेर जाऊ देयाची न्हाय. तर तेवढंच तुला शिकवत बसतो."

"हां. चालल मला." तिचा कोमेजलेला चेहरा लगेच फुलला. 

"पर मला न्हाय चालायचं. पोरीच्या हाती कशापायी कट्यार हवी?"

"ते त्या खंडोबालाच ठावं."

"मामाजी.."

"सूनबाई, आपली चंद्री म्हंजी डबक्यातलं तुंबलेलं पानी नव्हे. ती वारणेचं वाहतं पानी हाय.तिच्या मनापरीस वाहू दे की तिला. तू नको आडकाठी आणूस. आनं तुला ठाव न्हाय का? झाशीला लढणारी लक्षुमीबाई एक बाईच होती की. तितक्या दूर कशाला जा? इथं कोल्हापुरात राज्य स्थापन करणारी राणी ताराबाई ही देखील एक स्त्रीच. त्येंच्या च्हातात कट्यार चालती मंग आपल्या चंद्रीच्या हाती का न्हाई?" लहुजीने तिला कोड्यात टाकले.

"त्या सगळ्या राजघराण्यातील बायका. आपण साधी माणसं." खालच्या स्वरात गोदाक्का म्हणाली.

"आपण साधी माणसं न्हाय. रामोशी आहोत. उमाजी नाईक तूच हिला सांगत हुतीस ना? त्यांचंच रगुत आपल्या शरीरात वाहतंय." लहुजी.

"जे करायचं ते करा. फकस्त चंद्रीला काय व्हायला नगं." गोदाक्काने डोळ्याला पदर लावला.


येईल का चंद्राच्या हाती तलवार? वाचा पुढील भागात.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all