चंद्रा. भाग -२

वाचा इतिहासाचे न उलगडलेले एक पान.
चंद्रा.
भाग - २

मागील भागात :-
दोन दिवसांपासून भुकेने व्याकुळलेली छोटी चंद्रा आपल्या वडिलांची वाट बघत असते पण तो येत नाही.
तिचे मन रिझवण्यासाठी गोदाक्का तिला शूरवीर उमाजी नाईकांची कथा सांगायला लागते.

आता पुढे.


"असं नगं. नीट उचकटून सांग ना. हे गोरे लोक लै वाईट असतात का गं?"


"वाईट? लईच वंगाळ जात हाय त्यांची. त्येनीच तर आपल्या समद्यांना असे लाचार बनवले." तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता.

"म्हणजे?"

"त्या तिकडं, पुण्याकडं आपला देवमाणूस होता उमाजी नाईक. शिवाजी महाराजांसारखाच. आपलं दुसरं दैवतच जणू. पण त्या गोऱ्यांनी त्याला यमसदनी धाडलं." ती सांगत होती.


"राजांसारखंच व्हतं?" चंद्राचे कान टवकारले.


"व्हय तर. काय त्ये रूप, काय तो रुबाब अन् काय तो दरारा! आपण रामाचे वंश म्हून रामोशी, त्या रामाचे तेज होते आपल्या उमाजींवर. त्येंनी कधी कोणावर अन्याय होऊ दिला नाही का स्वतःही केला नाही. आयाबाहिणीच्या रक्षणासाठी त्येंची कट्यार सदैव तयार असायची."


"एवढ्या भारी मानसास्नी त्या गोऱ्यांनी का तरास दिला?" चंद्रा निरागसपणे विचारले.


"त्यांच्या त्या पांढऱ्या कातडीमांग काळं काळीज हाय गं. चांगल्या माणसाला ते जगू देत्यात व्हय?" खिन्नपणे गोदाक्का म्हणाली.


"पेशवाई येईपातूर आपल्याकडं बी वतनं हुती. पर सत्ता लष्कराच्या हातात गेली आनं त्यांनी इनामे हडप केली. वतनं काढून टाकली आनिक कामावरून बी कमी केले.


रानावनात हिंडणारी जात आपली तर त्येंनी वनकायदा का काय त्यो आणला. आपल्या जमातीची चारी दिशांनी कोंडी करून टाकली. शेवटी आपण रामोशी, हातावर हात ठेवून कसं राहणार हुतो? पोटासाठी कुठे दरोडा टाकला तर त्या लोकांनी आपल्याला चोर बनवून टाकलं."

"मंग गं?"


"चंद्रे, आपले नाईक नाईक व्हते. गोरे लोकं त्यांच्यावर चाल करून आले तेव्हा त्यांनी पाच गोऱ्यांची मुंडकीच उडवून लावली. लष्कर तर त्यांच्या पाठीशी हात धुवून लागली होती पर ते कुठं कुणाच्या हाताला गावत्याल?


लष्कर मागावर असले तरी आपले नाईक मातुर शांत बसले नाही. संतुजी नाईकाच्या बरोबरीने त्यांनी दरोडे घातले आन आपल्या साथीदारांच्या घरची चूल पेटवली. गोरगरीबात दौलत वाटून दिली.

प्रभू श्रीरामानं चवदा वर्षाचा वनवास पत्कारला आणि आपल्या नरवीर नाईकांनी चवदा वरीस लष्कराशी लढा दिला. त्येंना पकडायला म्हणे इंग्रजानी भारी भरकम इनाम ठेवला व्हता. धा हजार रुप्ये आन दोनशे बिघा जमीन."


"म्हणजे गं किती?"


"काय माहित? पर लई मोठ्ठी. आपण मोजू शकणार न्हाई एवढी."


"बापरे! इतका पैका?" 


"पैशाचं आमिष लई वंगाळ बघ. आपलीच माणसं सरकारला फितूर झाली अन आपल्याच राजाला गोऱ्यांच्या ताब्यात दिलं. त्या लष्कराने त्यांना फासावर चढवलं आनं पुन्हा असा दुसरा उमाजी होऊ नये म्हूनशान पुरे तीन दिस त्येंचं प्रेत कचेरीसमोरच्या पिंपळावर लटकवून ठेवलं.

जितेपनी त्या फिरंग्यासमोर मान ताठ ठेवून राहिलेल्या राजाच्या गळ्यात फास अडकला आनं पहिल्यांदा त्येंची मान वाकली, तेही मरण आल्यावरच."


"आई, हे लष्कर एवढे क्रूर असत्यात?"


"असत्यात. पर त्येंना हे माहित नाही की ही भूमी शिवबाची हाय. त्याच्या पराक्रमाची गाथा अगाध आहे. इथल्या मातीतील रक्तात एक आग हाय, आन एक ना एक दिस ह्यो लष्कर बी त्या आगीत भरडणार हाय." तिच्या नजरेत अंगार दाटला होता आणि ते बोल ऐकून लहानग्या चंद्राला स्फूरण चढत होते.


"आई, मी बी उमाजी राजावानी शूरवीर बनणार आन त्या लष्कराशी लढणार." 


"आत्ता? पोरीच्या जातीनं लढायचं असतं व्हय?" तिच्याकडे हसून बघत गोदाक्का म्हणाली.


"त्ये न्हाय ठावं. पर म्या लढणार. उद्यापास्नंच बाबाकडून तलवार चालवायला शिकत्ये की नाई त्ये बघच तू." तिच्या जणू उत्साह संचारला होता.


"व्हय, व्हय शिक की गं. तू फकुस्त शब्द बाहीर फेक. तुझा बा तुला नक्की शिकवन." इतका वेळ मायलेकीचा संवाद गुमान ऐकत असलेला लहुजी तिच्याजवळ येत म्हणाला.


"मामाजी, पोरीच्या टकुऱ्यात तुमी भलतं खुळ कशापाई भरवताय?" डोकीचा पदर नीट सावरत गोदाक्का म्हणाली.

"सुनबाई, खुळ नाय गं. आपली चंद्री हुशार हाय. शिकू दे की तिला." लहुजीने आपले म्हणणे पुढे रेटले.


त्याच्या बोलण्यावर प्रत्युत्तर न देता ती केवळ चंद्राच्या केसातून हात फिरवत बसली. तिचा एक हात प्रेमाने पोरीच्या केसात फिरत होता आणि दुसऱ्या हात नवऱ्याच्या काळजीने गळ्यात घातलेल्या त्या काळ्या मण्याच्या पोतीला घट्ट आवळून धरला होता.


आणि चंद्रा? ती तर तहान भूक विसरून आईच्या मांडीवर झोपी गेली होती. स्वप्नात उमाजी नाईकांसारखी तलवार चालवत होती. स्वप्नातल्या पराक्रमाने तिच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू उमलत होते.


रात्र आणखी गडद होत होती. नभीचा चंद्र त्याच्या संथ चालीने वर येत होता. त्याचे शीतल चांदणे थेट गोदाक्काच्या मांडीवर निजलेल्या चंद्रीच्या मुखकमलावर पसरत होते आणि भुकेने कोमेजलेला तो मुखडा स्वप्नात सुरु असलेल्या तलवारबाजीने उजळून निघत होता.


लखोजी परत येण्याची अजूनतरी काहीच खबरबात लागत नव्हती. आत खोलीत एकुलत्या एक खाटेवर तळमळणारी जनाबाई आताशा घोरायला लागली होती.


इकडे लेकीची झोपमोड होऊ नये म्हणून तिचे डोके
मांडीवरच ठेवून कुळाच्या भिंतीला गोदाक्काने शीर टेकवले. तर थकलेल्या लहुजीने ओसरीमध्ये जमिनीवर अंग टाकले.


हळूहळू सारीजण निद्रेच्या आधीन गेली होती. तिकडे वारणेच्या दुसऱ्या खोऱ्यात लखोजी प्राण हातात घेऊन गनिमाशी दोन हात करत होता. घरात मात्र कोणालाच त्याची गंधवार्ताही नव्हती.


लखोजी सुखरूप घरी परत येईल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********


🎭 Series Post

View all