चंद्रा भाग -१

वाचा इतिहासाचे न उलगडलेले एक पान
चंद्रा.
भाग -१

( सदर कथा ही पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही.
कथेतील घटना आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. इतिहासातील कोणत्याही घटनेशी त्याचा संबंध नाही. यात काही साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

सूर्य पश्चिमेला कलू लागला होता. वारणेच्या पात्रात दिसणारे त्याचे लाल रुपडे हळूहळू गुडूप व्हायला लागले होते आणि अंधाराचे सावट आता त्या खोऱ्यातील खेडोपाडी पसरत होते.


त्या खेड्यांच्या रांगेतच घनदाट वनराजी आणि सोबतीला कडेकपारीने वेढलेले आणखी एक गाव, शेजगाव. आता ते गावसुद्धा अंधाराच्या सम्राज्यात लोप पावत होते.


गावात पाटील, कुलकर्ण्यांच्या टोलेजंग वाड्यानंतर इतर लोकांची वस्ती. गावात राहणारे बारा बलुतेदार. कुंभार, लोहार, महार आणि मांगाची घरे सरल्यावर दाट झाडीपलीकडे रामोश्यांच्या पाच पन्नास घरांची वस्ती.


आज वस्तीवर एकाही घरातील चूल पेटली नव्हती. दोन दिवस मुसळधार बरसलेल्या पावसाने उभ्या पिकांची नासाडी झाली होती. घरात पसाभर दाणे आणण्यासाठी घरातील कर्ते पुरुष दोन दिवसाआधीच बाहेर पडले होते ते अजून घरी परतले नव्हते.


"आई, पोटात भुकेचा डोंब उसळलाय. खायला भाकरी दे की." परकर पोलके नेसलेली लहानगी चंद्रा पोटाशी पाय दुमडून बसली होती. आजचा दुसरा दिवस आणि त्यांच्या घरची चूल अजून पेटली नव्हती.


"चंद्रे, वाईच थांब की गं. तुझा बा येतंच असलं. आजतरी थोडंफार धान्य घेऊन येईल. मग देतेच की खायला. तोवर हे पाणी पी." पाण्याने भरलेले वाडगे तिच्यासमोर धरत गोदाक्का म्हणाली.


"नगं. पाणी पिऊन पिऊन पोट फुगतंय अन मंग सारखं मुतारीला जावं लागतं. त्या परिस मी बाची वाट बघत्ये." ती दारात येत म्हणाली.


चंद्रा म्हणजे लखोजी रामोशी आणि गोदाक्काचे एकुलती एक औलाद. तिच्या आधी झालेली दोन भावंडे पटकीच्या आजारात बळी पडली होती. त्यानंतर झालेली लखोबाची जास्तच लाडाची होती. ती जन्मली तेव्हा तिचा नाजूक आणि गोरापान मुखडा बघून लखोजीनेच तिथल्या तिथे तिचे नामकरण करून टाकले, 'चंद्रा.'


तिच्या रूपाचे त्याला कोण कौतुक होते. आमच्या सात पिढ्यामध्ये एवढी सुंदर पोरगी जन्माला आली नसेल असे तो गर्वाने म्हणत असे.

आणि अशा सुंदर, नाजूक पोरीचा भुकेने उतरलेला चेहरा बघून गोदाक्काच्या डोळ्यात पाणी तराळले. भूक तर तिलाही लागली होती पण या जिण्याची तिला सवय होत आली होती. वर्षा दोन वर्षातून असे दिवस वाट्याला यायचेच.

या वर्षी मात्र कहर झाला होता. अवकाळी आलेल्या पावसाने उभे पीक वाहून गेले होते. सहा वर्षांची चंद्री पहिल्यांदाच या दुष्काळाला सामोरी जात होती.


आतून जनाबाईच्या खोकल्याची उबळ कानावर पडली आणि डोळ्यातील अश्रू पुसत हातातील पाण्याचे वाडगे घेऊन गोदाक्का तिच्याजवळ गेली.

"आत्याबाई, थोडं पाणी प्या बघू. तोवर मी अंगणातल्या तुळशीचा रस करून देते." तिला उठवून बसत गोदाक्का.


"गोदा, सांच्याला तुळसेला हात नको गं लावू." तिला अडवत जनाबाई म्हणाली. "लखू अजून आला नाय नव्हं?" तिच्या डोळ्यात प्रश्न होता.


"नाय, पर येतील. ते आले की चूल पेटल्यावर तुमास्नी उठवीन मी. तोवर तुमी वाईच आराम करा." जनाबाईला उसने अवसान देत गोदा बाहेर आली.

दारात लहानगी चंद्रा बाबाच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती.

"चंद्रे, ये की बाय इकडे. चारी ठाव असे सांजेला दारात बसू नये." तिने चंद्राला प्रेमळ स्वरात हाक दिली.


"आई, एक इचारू?" निरागस चंद्रा तिच्याजवळ येऊन बसत म्हणाली.


"आता? मला काही विचारायला तुला परवानगी लागते व्हय? विचार की." अंमळ हसून गोदाक्काने होकार भरला.

"आई, आपणच एवढे गरीब का गं? म्हंजी ते पाटील, कुळकर्णी त्येंचा कसला भारी वाडा आहे आन जवळ रग्गड पैका बी. आपल्याकडं असं काहीच का म्हून नाही गं?" तिच्या टपोऱ्या डोळ्यात तेवढेच टपोरे प्रश्न होते.


"कारण पाटील गावाचे पाटील हाईत आन कुळकर्णी गावचे पंत. गावची मोठी माणसं हायती त्ये. मग त्यांची घरं बी मोठीच राहणार ना?" तिला जवळ घेत गोदा.


"मोठी माणसं म्हंजी? त्ये पाटील तर माझ्या बाबाहून ठेंगणे हायती तरी मंग मोठे कसे?" चेहऱ्यावर गोंधळ घेऊन तिने विचारले.

"तू अजून लहान हाईस बघ. माझी इवलीशी चंद्रकोर हाईस तू. मोठी होशील तवा तुला समदं कळेल." तिचा मुका घेत गोदाक्काने उत्तर दिले. या उत्तराने मात्र चंद्राचे समाधान काही होत नव्हते.

"आई, पाटील अन कुळकर्णी गावची मोठी माणसं. मग आपण कुणीच नाही का गं?" तिचा पुढचा प्रश्न तयार होता.

"आहोत की. आपण तर गावचे राखणदार आहोत." गोदा तिच्या शंकेचे निरसण करण्याचा प्रयत्न करत होती.

"मग गावचा राखणदार उपाशी का झोपतो?" या प्रश्नाने मात्र गोदाच्या काळजात एकदम चर्रर्र झाले.


"नाही गो बाय, आधी आपणही पोटभर खाऊनच झोपत होतो की.पण त्या गोऱ्या साहेबाचं शासन आलं नि सगळा घात झाला."


"म्हंजी?" तिने पुन्हा आपले टपोरे डोळे मोठे केले.

"म्हंजी गावात आपलं बी एक स्थान हुतं. महाराजाच्या काळात आपल्या लोकांनी लई साथ दिली. तुझ्या बाची तलवार बघितली नव्हं? ती महाराजांनीच कामगिरीवर खूश होऊन भेट म्हणून दिली."

"बाबाला?"

"नाय गं खुळाबाई. त्येंच्या आजोबाला."

"खुद्द महाराजांनी?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

"व्हय तर! खुद्द शिवाजी महाराजांनी." ती अभिमानाने म्हणाली.

"मग?"

"मग काही नाही. राजे गेले. त्यांचा छावा बी गेला. पुढे पेशवाई आली आन मंग आता गोऱ्याचं राज्य आलं अन त्यांच्यासंगट आपली वतनं बी गेली." ती लांब सुस्कारा टाकत उत्तरली.

ऐकता ऐकता चंद्रीने आईच्या मांडीवर डोके ठेवून आपले नीट बस्तान बसवले होते.

"असं नगं. नीट उचकटून सांग ना. हे गोरे लोक लै वाईट असतात का गं?"


"वाईट? लईच वंगाळ जात हाय त्यांची. त्येनीच तर आपल्या समद्यांना असे लाचार बनवले." तिच्या डोळ्यात अंगार फुलला होता.

"म्हणजे?"

त्या तिकडं, पुण्याकडं आपला देवमाणूस होता उमाजी नाईक. शिवाजी महाराजांसारखाच. आपलं दुसरं दैवतच जणू. पण त्या गोऱ्यांनी त्याला यमसदनी धाडलं." ती सांगत होती.

कोण होते हे उमाजी नाईक? त्यांच्याबद्दल ऐकून आपली छोटी चंद्रा प्रभावीत होईल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********


🎭 Series Post

View all