चंद्रा. भाग -१४(अंतिम भाग.)

वाचा इतिहासातील एक न उलघडलेले पान.
चंद्रा.
भाग -१४. (अंतिम भाग.)

मागील भागात :-
लष्कराच्या हल्ल्यात ठार झालेल्या सयाचे दुःख बाजूला सारून चंद्रा तिच्या सहकाऱ्यांबरोबर लढा द्यायला सज्ज होते.
आता पुढे.


"आता रं आणखी कुठवर सोताला दडवायचं? आखरीच्या वक्ताला तरी चंद्रीला चंद्री म्हूनच लढू द्या की रं. माझ्या बाची चंद्री. बाबाची चंद्री. आजी अन आईची चंद्री. सयाची आन तुमची बी चंद्रीच." दाटलेल्या स्वराने ती म्हणाली.


"चंद्रे, आता या क्षणापासून तूच आमची सरदार. तुजा शबुद आम्ही खाली पडू देनार न्हाई. खंड्या म्हणाला.


"चला तर मग. तुमची ही सरदारीन तुमाला लढायचा आदेश देतीय." त्वेषाने चंदरवर आरुढ होत चंद्रा पुन्हा लढायला सिद्ध झाली.


तिच्या गोफणीतील दगड समोरून येणाऱ्या शिपायांच्या दिशेने भिरभिरत होते. तिच्या दोन्ही बाजूला असलेल्या मंग्या आणि खंड्यानेही त्यांच्या हातात गोफणी घेतल्या. समोर साक्षात मृत्यू होता पण आता त्याचे त्या तिघांनाही काही पडले नव्हते. आपले अश्व दौडत ते आवेगाने समोर चाल करत होते.

गोफणीतून भिरभिरणारे दगड थेट समोरून येणाऱ्या शिपायांच्या काळजात, कोणाच्या डोक्यावर तर कोणाच्या हातातील बंदुकीवर येऊन धडकत होते आणि त्यामुळे बावरून शिपाई मागे सरत होते.


"..आपली माती, आपला मुलुख, आपला देश ही बी आपली मायच. तिथली समदी माणसं ही आपली माणसं. त्येंच्यावर त्ये फिरंगी राज करीत हाईत. आपल्या आयाबाया, आपल्या माणसांना छळत हाईत. त्येंचा आपल्याला मुकाबला करायचा हाय.

कधी या मातीला आईवरच्या लोभानं बग, कधी नानाबाबाच्या लोभानं बग, तर कधी माज्यावरच्या लोभानं बग. तवाच तुला लढायला आणखी बळ मिळल."
सयाजीचे एकेक शब्द आठवून चंद्राला आणखी स्फूरण चढत होते.


लहानपणी पाय भाजले म्हणून तिला खांद्यावरून घेऊन येणारा सया, तिला घोडा पळवायला शिकवणारा सया, या मातीवरचं प्रेम हेच खरं प्रेम अशी प्रेमाची नवी परिभाषा सांगणारा सया, आणि आता आपल्या बांधवासाठी धारातीर्थी पडलेला सया.. त्याचे प्रत्येक रूप तिच्या नजरेसमोर यायला लागली आणि आपसूकच डोळ्यात अश्रुंची गर्दी होऊ लागली.


डोळ्यात दाटलेल्या अश्रुंच्या पडद्यामुळे तिला समोरचे चित्र धूसर होऊ लागले होते. तर रात्र सरत येऊन आगमन होत असलेल्या पहाटेच्या संधीप्रकाशात एका शिपायाचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.


"आरं, तिकडं बघितलंस काय? ती तर बाई हाय." बंदुकीच्या चापेवरचा हात मागे ओढत तो आपल्या सहकाऱ्याला म्हणाला.


"म्हंजी? आपण एवढा वेळ एका बाईसंग लढत हुतो?" दुसरा डोळे चोळत म्हणाला.


"अरेस्ट द्याट गर्ल. आय वॉन्ट हर."

इंग्रज अधिकाऱ्याच्या कानावर ही बाब जाताच तो चवताळून उठला.


एव्हाना डोळ्यातून बरसू पाहणाऱ्या आसवांना आतल्या आत गिळून आपली तलवार हातात घेत चंद्रा अगदी त्यांच्या पुढ्यात येऊन ठेपली.


"तू या दरोडेखोरांची प्रमुख आहेस का?" दुभाषाने त्या अधिकाऱ्याच्या प्रश्नाचे भाषांतर करत तिला विचारले.


"न्हाई.आमच्या म्होरक्याला तर तुमी मारून टाकलं. पर आता मातर जे घडल त्ये माज्या मर्जीनुसारच घडल." ती तोऱ्यात उत्तरली.

"आर यू क्वीन? स्वतःला काय राणी समजतेस काय?" दुभाषाने पुन्हा विचारले. अधिकाऱ्याचा चेहरा रागाने लाल झाला होता.


"व्हय. हायेच की मी रानी. तुमाला तिकडं तुमच्या रानीचं राज चालतं तसं हिकडं माजं राज हाय. म्या माज्या मुलखाची रानी हाय." ती चवताळून म्हणाली.


"आय एम इम्प्रेस्ड! मी प्रभावीत झालोय. पण त्याचा काही उपयोग नाहीय. तुझ्या दोन्ही साथीदारांना फासावर लटकवण्यात येईल आणि त्यानंतर तुझाच नंबर असेल." अधिकाऱ्याच्या ओठावर छद्मी हसू होते तर चंद्राच्या डोळ्यात अंगार.


"मला एकदा शिवून तर दावा. मंग मी तुमाला माजा इंगा दावते."


यू बिच, जरा जास्तच वटवट लावली आहेस. शिपायांनो हिला अटक करून तुरुंगात डांबा." इंग्रज अधिकारी चेकाळून उठला.

शिपाई तिच्याजवळ येताच तिने हातातील तलवारीने त्यांचे हात छाटून काढले. तिचे ते चवताळलेले रूप आणि निर्भीड वागणे बघून जवळचे इतर सैन्य बाजूला सरले.


इंग्रज अधिकारी मात्र इरेला पेटला होता. आज एका स्त्रीने त्याला ललकारले होते. काही कळायच्या आत त्याने हातातील बंदूकीने नेम धरला आणि गोळी चालवली. परंतू सावध असलेल्या चंद्राने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पाठीवरची कुऱ्हाड काढून त्याच्या दिशेने भिरकावली. कुऱ्हाडीचा निशाणा पोटावर अचूक लागला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला.


तो कोसळताच चारही बाजूने तिच्यावर गोळीबार सुरु झाला. तिला हे अपेक्षित होतेच. बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या तिच्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच तिने हातातील कट्यार स्वतःच्या पोटात खुपसली आणि खाली कोसळली. त्या गोळ्यांनी तर तिला साधे स्पर्शले देखील नव्हते.

चंद्रा खाली कोसळली होती, ती कायमचीच. लहानपणापासूनचे पाहिलेले स्वप्न ती आज प्रत्यक्षात जगली होती. उमाजी नाईकांसारखे तिला लढायचे होते. त्यांना फासावर लटकवणाऱ्या गोऱ्या माकडांना ठेचून काढायचे होते. आज खऱ्या अर्थाने वारणेच्या खोऱ्यातील गोदाक्काच्या चंद्री देशाच्या कामी आली होती.


नभाआडून तांबडा सूर्य हळूच वर येत होता. आजवर रात्रीच्या चांदण्यात लढणाऱ्या चंद्राच्या मुखावार आज सूर्याची सोनेरी किरणे पसरली होती. त्या सोनेरी आभेने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी झळकत होती.

कदाचित तिच्या स्वप्नपूर्तीच्या तेजाची ही झळाळी होती. आजपासून आशेच्या एका नव्या प्रभेची सुरुवात होत होती.

*समाप्त*
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
********

'चंद्रा' कथेच्या निमित्ताने.

स्पर्धेच्या निमित्ताने का होईना ऐतिहासिक कथा लिहिण्याचा मी प्रयत्न केला.भारतीय इतिहासाला अनेक सोनेरी पाने लाभली. काही अजरामर झाली तर काहींची दखल तेवढ्यापुरतीच घेतली गेली.. त्यातील एक नाव म्हणजे नरवीर उमाजी नाईक यांचे.

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारी म्हणून आपण वासुदेव बळवंत फडके यांना ओळखतो पण त्यांच्यापूर्वीच साठ वर्षे आधी उमाजी नाईक यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतीचे हत्यार उपसले. त्यामुळे तेही आद्य क्रांतिकारकच.

इंग्रजाविरुद्ध महाराष्ट्रातून झालेल्या पहिल्या उठावात आद्यक्रांतिकारी रामोशी उमाजी नाईक यांची क्रांतिकारी भूमिका होती. त्यांनी चौदा वर्षे इंग्रजाशी लढा देत त्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी प्रेरित होऊन कथा लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न.

मराठ्यांचे राज्य असताना गावाचे रखवालदार म्हणून
काम करणाऱ्या या समाजाला ब्रिटिशांनी त्यांची वतने काढून घेत त्यांच्यावर चोर, लुटारू, दरोडेखोर हा ठपका लावला.

अशाच एका कुटुंबातील ही चंद्रा, जीला उमाजी नाईकांसारखे इंग्रजाविरुद्ध लढायचे होते. तिच्या स्वप्नाचा प्रवास दाखवणारी ही कथा.

अर्थातच ही चंद्रा काल्पनिक आहे, तिच्यासोबत कथेत आलेली इतर पात्रे देखील काल्पनिक आहेत, परंतु रामोश्यांचा इतिहास आणि त्यांची लढाऊ वृत्ती मात्र तेवढीच खरी.

या कथेद्वारे महाराष्ट्राच्या इतिहासात क्रांतीची पहिली ठिणगी पेटवणाऱ्या उमाजी नाईक यांना शतशः नमन!

-Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*********


🎭 Series Post

View all