चंद्रा. भाग -१३

वाचा इतिहासातील एक न उलगडलेले पान.
चंद्रा.
भाग -१३

मागील भागात :-
सयाजी लष्कराची कचेरी पेठवण्याची योजना आखतो. त्यात त्याला गोळी लागते.

आता पुढे.

गोळ्या झाडत सगळे रामोशी रानात पळत होते. पण त्यांच्याजवळची काडतूसे संपत आली होती. चारही दिशांनी वाऱ्याच्या वेगाने ते घनदाट जंगलात गुडूप झाले होते. इतकी मोठी कामगिरी फत्ते करूनही पळत असलेल्या एकाही रामोश्याची ओळख पटली नव्हती म्हणून ते खूश होते. परंतु दैवाला मात्र काहीतरी वेगळेच मंजूर होते.

तेवढ्यात सूं सूं करत एक गोळी सयाजीच्या पाठीतून आरपार बाहेर निघाली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला.

"सयाऽऽ"

चंद्राची किंकाळी रानभर गुंजत होती.


"सया, तू ठीक हाईस ना रं? चंदरवरून खाली उडी मारत ती त्याच्याजवळ आली.

सयाजीची छाती रक्ताने माखली होती. तिने आपल्या चेहऱ्यावरचा शेला बाजूला केला आणि छातीवर बांधला. डोक्याला गुंडाळलेले पागोटे काढून रक्त पुसू लागली.


"सया, काहीतरी बोल ना रं." तो ग्लानीत आहे असे वाटून ती सारखी त्याला हाका देत होती.


"चंदर, सया ठीक आहे ना? तू वरडली हुतीस काय?" तेवढ्यात दोन दिशेने मंग्या आणि खंड्या तिच्याजवळ येऊन उभे राहिले.


"चंद्रे, तुझं पागोटं अन शेला कुठं हाय?" खंड्या तिच्या पागोटे नसलेल्या डोक्याकडे बघून विचारले.


"त्ये समदं सोडा. फिरंग्यांच्या बंदुकीतील गोळी सयाला लागलीय. आदी त्ये बगा." चंद्रा उत्तरली.


"याला इथून घिऊन जायला पायजे. रगुत किती गेलं हाय बग की." मंग्या.


"चंद्रे तू रानात पळ. आमी दोघं याला घिवून येतो. शिपाई आपल्या मागावर असतील."खंड्या घोड्यावरून खाली उडी मारत म्हणाला.


"न्हाय. म्या अशी भित्री भागुबाई वानी पळणार न्हाय. सयाला ज्यानं गोळी घातली त्येचा मुडदा पाडल्याशिवाय मी ऱ्हाणार न्हाय."


"आगं, आपल्यासाठी या वक्ताला सया जादा महत्त्वाचा हाय. तुला कळत कसं न्हाई?"


तिला दमटावत मंग्या सयाला उचलण्यासाठी खाली वाकला. सयाच्या चेहऱ्यावर चंद्राची किरणं पसरली होती. तो चेहरा बघून त्याला काय वाटलं कुणास ठाऊक? छातीच्या वाढलेल्या ठोक्याबरोबर त्याने आपली दोन बोटे सयाच्या नाकाजवळ नेली आणि तितक्याच झटक्याने मागे आणली.

"खंड्या, आरं आपला सया.." त्याला पुढचं बोलवेना.
खंड्याने चमकून त्याच्याकडे पाहिले.


"आरं, तो बेसुध झालाय म्हून नाकातून वारा भाईर पडत नसन." मंग्याला काय बोलायचे आहे हे उमगून खंड्या म्हणाला.


"न्हाय रं. बेसुध असलं तरी बी शुवास घेता येतो की रं. याची त कुठलीच हालचाल सुरु न्हाय."


"मंग्या काही काय बोलतोस रं? थांबा म्या बघते." चंद्रा सयाच्या हाताला हात लावत म्हणाली.


"..चंद्रे, मानसाला एखाद्यावेळी आपला शुवास रोखता यील पर आपल्या शरीरात वाहणारे रगुत नाही थांबवता यायचे. आपण थकलो तरी आपलं काळीज अन मेंदू कधीच थकत न्हाई. त्येचं काम अविरत सुरूच रायत्ये.
ते तवाच थांबते, जवा आपण आखरीचा शुवास घेतो. एकदम आपण ढगात जातो तवाच." केव्हातरी बोलता बोलता सयाने चंद्राला सांगितले होते.


"सया, तुला तर लय ज्ञान हाय रं."

ती म्हणाली त्यावर तो मंद हसला.


"ह्ये बघ, ह्यो आपला अंगठा. याच्या खाली इथं हातावर तीन बोटं घट्ट रोवायची. आपल्या हाताला नाडीचे ठोके जाणवत्यात. त्यावरून त्यो माणूस जीता हाय हे समजत्ये."

तिचे हात आपल्या नाडीवर ठेवून त्याने तिला प्रात्यक्षिक करून दाखवले होते आणि आज तेच प्रात्यक्षिक तो जिवंत आहे की मृत हे सिद्ध करणार होते.


आपला श्वास रोखून ती सयाची नाडी चाचपायला लागली. तीन तीनदा नाडी बघूनही तिला काहीच ठोके जाणवत नव्हते. आता तिच्या डोळ्यातून धारा बरसायला लागल्या.


"चंद्रे?" मंग्याने तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिले.


"मंग्या, खंड्या, आपला सया आपल्याला सोडून गेला रं." ती तोंडावर हात ठेवून हुंदका दाबत म्हणाली.


"त्ये बघा, ते दरोडेखोर तिथंच हाईत. सगळ्यांना पकडा अन सरकारपुढं हजर करा." हातातील मशालीच्या प्रकाशात लष्करातील शिपायांना दुरवर हालचाल जाणवत होती.


"चंद्रे, आपण रानात पळूया. न्हायतर ह्ये लस्कर आपल्याला जीता न्हाय सोडायचे." दुरून दिसणाऱ्या मशालीच्या उजेडाची चाहूल लागताच मंग्या म्हणाला.


"आता जीतं राहायचंय तरी कोणाला? आपल्या साथीदारांना यांनी मारलंया. आपली बी तकदीर तीच हाय. पर पळून मरण्यापरीस लढून मरूया की रं." हातातील गोफण सांभाळत ती उठली.


अंगावरचा सदरा आणि धोतर काढून टाकत ती तिच्या मूळ रूपात आली. आजवर तिने घातलेली चोळी आणि इरकली नऊवारी तिच्या पुरुषी वेषाआड दडलेली असायची. आज मात्र डोक्याचे पागोटे सयाजीच्या कामात आल्यामुळे तिने तो वेषच काढून टाकला.


"आगं, ह्ये काय करतीस? हा चंदरचा वेष का काढलाईस?"


"आता रं कुठवर सोताला दडवायचं? आखरीच्या वक्ताला तरी चंद्रीला चंद्री म्हूनच लढू द्या की रं. माझ्या बा ची चंद्री. बाबाची चंद्री. आजी अन आईची चंद्री. सयाची आन तुमची बी चंद्रीच." दाटलेल्या स्वराने ती म्हणाली.


"चंद्रे, आता या क्षणापासून तूच आमची सरदार. तुजा शबुद आम्ही खाली पडू देनार न्हाई. खंड्या म्हणाला.


"चला तर मग. तुमची ही सरदारीन तुमाला लढायचा आदेश देतीय." त्वेषाने चंदरवर आरुढ होत चंद्रा पुन्हा लढायला सिद्ध झाली.

चंद्राची ही लढाई यशस्वी होईल का? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all