चंद्रा. भाग -१२.

वाचा इतिहासातील एक न उलगडलेले पान.
चंद्रा.
भाग -१२.

मागील भागात :-
सयाजी आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सरकारने पोस्टर जारी केले होते. त्यामुळे घाबरून मंग्या आणि खंड्या लष्करापुढे हजर व्हायला तयार होतात.

आता पुढे.


"सया, म्या हाय रं तुझ्यासंग. मंग्या, तुला एक सांगू? जेव्हा मायला मी मोहिमेवर जाणार म्हून सांगितलं ना तवाचं ती म्हणाली, की चंद्रे आता दिवसातले सगळे पहर तुला डोक्यावर मरणाचं कफन बांधून फिरावं लागलं. खरंच बोलली होती ती. आरं, आपण इथं हाय काय अन वापस गेलो काय, मरन सुटणार न्हाय.

तुमी सरकारला समर्पण केल्यावर बी फाशीचा फंदा गळ्यात अडकणारच हाय की. तेव्हा तसं मरण्यापेक्षा सयाला साथ देऊन मरू की रं." चंद्रा आपल्या सवंगड्याना समजावत म्हणाली.


"चंद्रे, तुजं म्हणणं बरोबर हाय. घरच्यांच्या लोभापायी म्या भरकटलो होतो. सया मला माफ कर. म्या तुला सोडून न्हाय जाणार." मंग्या डोळे पुसत म्हणाला.


"व्हय चंद्रे, तू आमचे डोळे उघडलेस. म्या बी कुठंच जाणार न्हाय. सया तू म्हणशील तेच हुईल." खंड्या म्हणाला.


"बगा बरं. न्हायतर पुन्हा म्हणाल, का हा सया सडफटिंग हाय म्हून हे करतोय."


"न्हाय रं. वारणेची शपथ. चूक झाली माझी. तू रं कसला सडफटिंग? तू तर समद्यांच्या सुखासाठी लढायला निघाला हाईस. तू समद्यांचा हाईस."

बोलता बोलता खंड्याने त्याला मिठी मारली. मंग्याही त्यात सामिल झाला आणि त्यांच्याबरोबर इतरही द्विधा मनस्थिती झालेल्या इतरांनी देखील सयाला माफी मागत आलिंगन दिले.

हे सारे बघत असणाऱ्या चंद्राचे डोळे उगाचच भरून आले.

"सया, आता पुढं काय करायचं हाय रं?" मंग्या विचारत होता.


"आता पुढचा दरोडा सासवडला." सयाजी मिशीला पीळ देत म्हणाला.


सयाजीच्या बोलण्यात सगळ्यांनी होकार भरला. महिन्याभरात सासवड, भिवरी इथे डाका टाकून त्यांनी मोठी लूट केली.


शेवटची लूट करून पंधरा दिवस लोटले होते. चंद्रा सगळ्यांसाठी भाकरी थापत होती. इतर सगळी गप्पात रंगली होती.कुणाच्या नकळत सया तिथून हळूच निसटला.


"सया, असा एकलाच इकडं काय करतो रं?" सर्वांपासून दूर एका मोठया वृक्षाला टेकून आकाशातील चांदण्यात टक लावून पाहत असलेल्या त्याला चंद्राने विचारले. तो दिसत नव्हता म्हणून त्याला शोधत तिथे आली होती.


"चंद्रे, ही लूटमार लई झाली. आता काहीतरी वेगळं करायचं हाय." तो आकाशातील नजर तिथेच स्थिर होती.


"आरं, पर काय?"


"सासवडची कचेरी जाळून टाकायची म्हणतुया." त्याने आपल्या मनातील मनसूबा तिच्यासमोर मांडला.


"सया, ही लई कठीण कामगिरी हाये. त्यात आपण पकडलं बी जाऊ शकतो." ती.


"चंद्रे, हुशार झालीस बगं. आधी कशी काय बी करायचं म्हणलं तर कोणताच विचार न करता पटदिशी तयार होऊन जायचीस, अन आता विचार करून निर्णय घेतीस. आवडलं मला." तो हसून म्हणाला.


"सया, तुझ्या संगतीनं राहून विचार करायला मी शिकल्ये. पर तू सांग, तू का ही योजना बनवली? अजून दोनचार लुटी करू की. त्येनं बी सरकार जेरीला येत हाईतच की."


"गावाकडची खबर आलीय." तो दूर बघत म्हणाला.


"कसली?" काळजीने तिचा हात आपोआप छातीवर हात गेला.


"सरकारने दीडशे दोनशे लोकांना ओलीस ठेवलंय. परत्येक घरातील समद्यांना. लहान लेकरं, म्हतारी कोतारी, गर्भार बायका.. कोणालाच सोडलं न्हाय.
परश्या मामा, तुझा म्हातारा बाबा, गोदाक्का काकी.. समद्येच." त्याच्या डोळ्यात पाणी होते.


"सया.." तिचा स्वर भिजला होता.


"चंद्रे, माझं काळीज दगडाचं न्हाय गं. मला बी वेदना होतात. रक्ताचे नसले तरी समदी माझीच माणसं हायेत की. आपल्यापायी शे दोनशे लोकांचा जीव धोक्यात गेलाय, या विचारानंच मन झुरनीला लागलंय. आसं वाटतंय मंग्या मनला होता तसं समर्पण करावं. सरकारपुढं जाऊन हजर व्हावं."


"व्वा! सरदार. लई झ्याक बोलताय बघा." मागे टाळ्या वाजवत मंग्या आणि खंड्या उभे होते.


"मांगच्या टायमाला मी असा बोललो तवा चंद्रे तू लईमोठ्ठ भाषण दिलं व्हतंस. आताही तसंच एखादं दे की." मंग्या पुढे बोलला.


तेवढ्यात खंड्याने हातातील सुरीने बोटावर हलका घाव
केला. त्यासरशी एक रक्ताची चिरकांडी बाहेर पडली.


"आरं खंड्या, काय करतोस? येडा हाईस का?" त्याच्या बोटाला दाबून धरत सया म्हणाला.

"सया, तू आत्ताच बोललास ना रं, की गावातली माणसं तुझ्या रक्ताची न्हाईत म्हून? आमच्या रक्ताची माणसं हाईत ती. पर माझं रगुत बघून तुला तरास झाला नव्हं? तसाच तरास तुज्या चेहऱ्यावरच्या वेदना बघून आम्हाला बी व्हतो. आरं, रगुत एक नसलं तरी आपली काळीज एक हाईत की रं."


"तुमाला कळत कसं न्हाय? आपण गेलो नाय तर त्ये एकेकाला कापून काढतील." सयाजी हळवा झाला होता.


"त्या आधी आपण त्येंना कापून काढू. सया, गावातल्या दोनशे लोकांसाठी आता मांग हटायचं न्हाय रं. शे-दोनशे लोकांपायी हजारो लोकांसाठी लढनं थांबवायचं न्हाई. ती कचेरी पेटवायची हाय ना? मंग आजच रातीला पेटवू या. आमच्या सरदाराला असं आमी खचू देणार न्हाय."


"शाब्बास रं माज्या पट्ठ्यांनो. तुमच्यामुळं लय बळ आलं बघा." त्यांना मिठी मारत सया गहिवरून म्हणाला.


त्यांनी योजनेप्रमाणे काळ्याकुट्ट रात्री त्यांनी आपले घोडे बाहेर काढले. हातात शस्त्र होतीच. सोबत मशालीदेखील होत्या. रात्री जेव्हा तिथले रखवालदार साखर झोपेत असतील तेव्हा डाव टाकायचा असे ठरले.

त्याप्रमाणे रात्री एक -दोनच्या दरम्यान गस्तीवर असलेल्या शिपायांना धारदार तलवारीने कापून काढत त्यांनी कचेरीला वेढा घातला.


"खंडोबाच्या नावानं चांग भलं!" अशा घोषणा देत हातातील जळत्या मशाली त्यांनी कचेरीवर फेकल्या.


सगळीकडे आगीचे लोळ उठत होते. आत असलेले अधिकारी धावत बाहेर आले. अचानक लागलेल्या आगीमुळे चेहऱ्यावर भीती होती. ती भीती लगेच रागात बदलली. चेहऱ्यावरचा लाल रंग रागाने आणखी गडद झाला.

"यू बास्टर्ड, जस्ट फायरऽऽ" त्यांच्यातील एका इंग्रज अधिकाऱ्याने शिपायांना ओरडून गोळ्या झाडण्याचा आदेश दिला

त्याच्या आदेशासरशी बंदुकीच्या फैऱ्या झडायला लागल्या. प्रत्युत्तर म्हणून सयाजी आणि त्याच्या साथीदारांनीही गोळीबार सुरु केला.


अचानक सयाजीच्या बंदूकीतील सुटलेली एक गोळी त्या अधिकाऱ्याच्या छातीत घुसली आणि तो जागीच कोसळला.

"कॅच देम. डोन्ट लेट देम टू गो." (त्यांना पकडा. जावू देऊ नका.) दुसरा अधिकारी ओरडला. तोपर्यंत त्यांचे घोडे जंगलाच्या दिशेने वळले होते.


इंग्रज अधिकारी कोसळल्यामुळे लष्करांचा राग सातव्या आसमानाला भिडला होता. तिथे कामावर असलेल्या भारतीय शिपायाचे साहाय्याने त्याने अंधाधुंद गोळीबार सुरु केला. त्यात सयाजीचे मागे राहिलेले तीन साथीदार बळी पडले.


"नो वन शुड स्पेअर." (त्यांच्यातील एकही वाचायला नको.) तो अधिकारी सारखा ओरडत होता.


गोळ्या झाडत सगळे रामोशी रानात पळत होते. पण त्यांच्याजवळची काडतूसे संपत आली होती. चारही दिशांनी वाऱ्याच्या वेगाने ते घनदाट जंगलात गुडूप झाले होते. इतकी मोठी कामगिरी फत्ते करूनही पळत असलेल्या एकाही रामोश्याची ओळख पटली नव्हती म्हणून ते खूश होते. परंतु दैवाला मात्र काहीतरी वेगळेच मंजूर होते.

तेवढ्यात सूं सूं करत एक गोळी सयाजीच्या पाठीतून आरपार बाहेर निघाली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला.

"सयाऽऽ"

चंद्राची किंकाळी रानभर गुंजत होती.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********

🎭 Series Post

View all