चंद्रा.
भाग -१०
मागील भागात :-
भाग -१०
मागील भागात :-
अखेर चंद्रा सयाजीसोबत मोहिमेवर जाण्यासाठी निघते. सयाजी तिला पुरुषी वेष धारण करायला लावतो. त्याचे ऐकून चंद्राचा चंदर होतो.
आता पुढे.
"ए, कोण रं तू?" सयाजीने दरडावून विचारले.
"सया, आरं म्याच हाय. चंद्री." ती उत्तरली.
"कोण चंद्री? तू चंद्री न्हाईस, तर चंदर हाईस. माझा सखा. कळलं?" तो कठोर आवाजात म्हणाला.
"व्हय सरदार. म्या चंदर हाय आन ज्यावर बसलोय तो बी चंदरच. आता सांगा की पुढं काय करायचं हाय?"
चंद्रातील चंदर पुढच्या सूचनेचे पालन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता.
"दरोडा टाकायला निघायचंय. दोस्तांनो एक पक्की खबर हाय, आज रातीला साताऱ्याकडे खजिना रवाना होतोय. त्यो लुटायचा हाय. चंदर, तू तयार हाईस ना रं?" सयाजीने चंद्राकडे एक कटाक्ष टाकून विचारले.
"व्हय तर. तुजा परत्येक शबुद परमान हाय."
"चला तर मंग. आपल्या घोडयाला टाप द्या आन निगा. दोन तासात आपल्याला त्या खजिन्यापर्यंत पोहचायचं हाय."
सयाजीच्या शब्दावर सर्वांनी आपली घोडी उधळली. काळ्या रात्रीत काळी कापडं घालून घोड्यावर स्वार असलेले ते दहा ते बारा जण. कमरेला तलवार, हातात कुऱ्हाडी अन कोयते. सोबतीला गोफण आणि दगडंदेखील होती.
घोड्यांच्या टापांचा होणारा एक लयबद्ध नाद. टिपूर चांदण्यात त्यांच्या मागे उडत असणारा धुराळा आणि अंगाला झोंबणारा गार वारा. चंदरच्या वेषात असलेली चंद्रा हे सगळं गाठीशी बांधून सयाजीच्या पाठीमागे निघाली होती.
"मंग्या, खंडू, चंदर तयारीत रहा. थोड्याच वेळात खजिना इथून रवाना होणार. तेव्हा समद्यांनी मिळून वेढा घालूया." सयाजी भेदक नजरेने कानोसा घेत म्हणाला.
तो बोलला तसे सर्वजण झाडामागे आसरा घेऊन सावजाची वाट बघू लागले.
जवळपास पंधरा मिनिटांचा कालावधी लोटला असेल, तेवढ्यात पाच सहा घोडेस्वार त्या मार्गाने मार्गस्थ होताना दिसले. मधल्या घोडेस्वाराकडे खजिन्याची तिजोरी होती आणि त्यांच्या सोबतीला समोर मागे संरक्षणासाठी दोन -दोन घोडेस्वार पळत होते.
ते दृष्टिक्षेपात येताच सयाजीने तोंडातून एक वेगळा आवाज काढला. शत्रूवर धावा बोलायची ती सांकेतिक खूण होती. त्या इशाऱ्यासरशी झाडामागे दडलेल्या सर्वांनी घोडेस्वारांना चहोबाजूने घेरले.
"शस्त्र हाती घ्या. घात झालाय. दरोडा पाडलाय."
एका घोडेस्वाराच्या तोंडून बाहेर पडले. त्याचे ऐकून सोबत्यांनी आपापल्या तलवारी बाहेर काढल्या.
"एकेकाचे मुडदे पाडा पर खजिना इथून हलता कामा नये." सयाजीने रणशिंग फुंकले.
वारणेचा तो परिसर सपासप चालणाऱ्या तलवारी आणि कुऱ्हाडीच्या आवाजाने गजबजून गेला होता.
सयाजीच्या विरांपुढे समोरच्यांचा वार ढिला पडला होता. काही वेळातच ते सहाजण नि:शस्त्र झाले.
"ह्यो सरकारी खजिना हाय. याला लुटलं तर सरकार तुमाला माफ करणार नाय." एकजण म्हणाला. कदाचित तो त्यांचा प्रमुख असावा.
"सरकारी खजिना आहे म्हून शानच तर लुटतोय आन हिथं माफी कुणाला हवीय?" सयाजी बेफिकीरीने उद्गारला.
"याला हात लावाल तर त्ये लई महागात पडन." खजिन्याची तिजोरी उचलत असताना त्यांचा प्रमुख करारी आवाजात म्हणाला.
"सरदार, ह्यो बरोबर बोलतंय. तिजोरीला हात लावाया नगं. त्यात हाय तो माल काढून घिवून जावूया." पुरुषी आवाजात चंद्रा म्हणाली तसा सयाजी खूश झाला.
"शाबास रं पठ्ठ्या. लै झ्याक सांगितलंस. गडयांनो तिजोरी रिकामी करा रं." तलवारीचे पाते प्रमुखाच्या मानेवर ठेवून सयाजी कडाडला.
आधीच शस्त्रहीन झालेले ते तिजोरी रिकामी होताना हताशपणे बघत राहिले. त्यांनाही त्यांच्या जीवाची पर्वा होती. त्यात सयाजी आणि चंद्राने प्रमुखालाच घेरल्यावर इतरांची जीभ उचलायची काय बिशाद होती.
"चला, निघा आता." सर्व खजिना आपल्या ताब्यात घेतल्यावर सयाजीने त्या प्रमुखाला सोडून दिले.
"लै चुकीचं केलंत तुमी. पर सरकार तुम्हाला सोडणार नाय. आरं तुमची जातच चोराची. दडून दडून कुठं दडणार? लस्कर तुमाला बरोबर हुडकून काढल."
प्रमुख असे बोलताच सयाजीने त्याच्या श्रीमुखात एक भडकावली.
"चोराची जात असली तरी ती तुज्या सरकारपायीच झाली हाय. ज्या सरकारचे गोडवे गात हाईस ना त्येनी पुरा देश कंगाल करून सोडल्याय.
आरं, त्या पांढऱ्या माकडांची साथ देण्यापरिस आपल्या लोकांची दे की रं. पर तुमच्यासारख्या मिंद्या कुत्र्यांकडून कोणी अपेक्षा करायची? चला निघा हितून. अजून जास्त बोलाल तर प्राणास मुकाल." वाघासारखा गुरगरत सया म्हणाला.
त्याचे गुरकावणे ऐकून त्यांनी त्यांची वाट धरली. इतक्या साऱ्या दरोडेखोरांपासून त्यांचे प्राण वाचले होते आणि यावेळी तेही त्यांच्यासाठी पुरेसे होते.
******
"समद्यांनी इथून चला रं. आपला मुक्काम रातीतून दुसरीकडे हलवायचा हाय."
आपला घोडा दुसऱ्या दिशेने उधळत सयाजीने पुढे कूच केली.
आपला घोडा दुसऱ्या दिशेने उधळत सयाजीने पुढे कूच केली.
"सरदार, तुमी त्याला असंच सोडायला नको व्हतं. म्हणलं असतं तर म्याच त्याचं डोकं फोडलं असतं.“ जाता जाता चंद्रा रागाने म्हणाली.
"प्रत्येकवेळी अशी टाकुऱ्यात राख घालून घ्यायची नसते. त्येंचं हे काम बी पोटासाठीच. एवढ्या रातच्याला जीवावर उदार होऊन ते सरकारची काम करत्यात. त्यांच्या घरी त्येंची बायका पोरं वाट डोळ्यात प्राण आणून त्यांच्या वाटेकडं डोळं लावून बसली असतील हे विसरून कसंbचालल?" सयाजीचा स्वर कमालीचा हळवा झाला होता.
ते ऐकून चंद्राच्या हृदयात कालवाकालव झाली. अशाच एका रात्री लखोजी गोऱ्यासोबत लढला असेल आणि मारला गेला असेल. तेव्हा त्याच्या काळजात आमच्या समद्यांचा विचार घोळत असेल. हा विचार तिच्या मनात डोकावून गेला.
आत्तापर्यंत मुडदे पाडण्याची भाषा बोलणाऱ्या सयाजीचे हे रूप चंद्रा प्रथमच बघत होती. वरून काटेरी फणसासारखा असला तरी मनातून तो इतका हळवा असेल हे माहित नव्हते.
शत्रू असले तरी आपल्या देशबांधवांबद्दल त्याच्या मनात मायेचा धागा होता. खरे तर ते वैरी नव्हतेच. वैर तर एकाशीच होते ते म्हणजे फिरग्यांशी. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचायला एक ठोस कारण हवे होते आणि हवी होती त्यांच्यासारखी आधुनिक शस्त्रास्त्रे. त्यासाठी मोठी किंमत लागणार होती. म्हणून त्याने पाहिले लूटमारीची योजना आखली होती.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
फोटो गुगल साभार.
********
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा