चंद्र आहे साक्षीला - भाग ८

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

सानिकाला कणवलीला येऊन दोन-तीन दिवस झाले होते. ह्या दोन-तीन दिवसात काही शेजारी पाजारी येऊन तिला भेटून गेले. आशाताईंच्या भजनी मंडळातल्या बायकाही घरी आल्या होत्या. आडून आडून त्यांनी सानिकाच्या लग्नाबद्दल विचारलं, आशाताईंनी तेव्हा त्यांचं बोलणं हसण्यावारी नेलं असलं तरी आतून मात्र त्यांना सानिकाने आता लग्नाचा विचार करावा असं वाटत होतंच. आज तिच्या ऑफिसमध्ये काहीतरी घडलं म्हणून ती निराश होऊन इकडे आली, उद्या आशाताई नसताना असं काही झालं तर तिची काळजी कोण घेणार, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. एक दिवस दुपारचं जेवण बनवताना त्यांनी सानिकापाशी पुन्हा तो विषय काढला. 

"सानू, तुला आता अनायसे सुट्टी मिळालीच आहे तर जरा लग्नाचं बघ की. ती कसली ऍप्स आली आहेत फोनवर, त्यावरून मुलं मुली लग्न जुळवतात म्हणे आजकाल. तू पण आहेस का गं त्यावर? जोश्यांची मुलगी असते ना बँगलोरला तिने पण तसंच जुळवलं आहे लग्न. नाहीतरी आजकाल आई-वडिलांनी बघितलेली पोरं कुठे पसंत पडतात मुलींना." आमटीला फोडणी घालत त्या म्हणाल्या. 

"त्या ऍप्स वर लग्न सोडून बाकी सगळं जुळतं आई." सानिका कच्चे शेंगदाणे तोंडात टाकत म्हणाली. 

"म्हणजे?" आशाताईंनी न कळून विचारलं. 

"अगं म्हणजे त्याच्यावर बहुतांश मुलं मुली टाईमपास करायला येतात. गप्पा मारायच्या, भेटायचं बाहेर किंवा घरी आणि 'मज्जा' करायची" सानिका आशाताईंना डोळा मारत म्हणाली. 

"ईश्श, काय सांगतेस? खरंच? मग जोश्यांच्या मुलीने पण तसंच केलंय की काय? थांब मी आत्ता जाऊन त्यांना सांगून येते, म्हणजे त्या बोलतील तिच्याशी." म्हणून आशाताई हातातलं काम सोडून निघाल्या तसं सानिकाने त्यांना अडवलं. 

"ए आई, काहीही काय. तुला काय करायचंय. त्यांचं ते बघून घेतील ना. मी तुला आपलं असंच सांगितलं, तुला माहिती असावं म्हणून. कदाचित तिचं तसं नसेलही. तिला भेटला असेल तिच्या स्वप्नांचा राजकुमार त्या ऍप्स वर. किंवा करत असेल ती पण 'मज्जा'." सानिका आशाताईंना चिडवत म्हणाली. तेवढ्यात कोणीतरी बंगल्याच्या फाटकातून आत आल्याचा आवाज आला आणि सानिका बघायला बाहेर गेली. आशाताई अजूनही कणकेचा गोळा हातात धरून जोश्यांना सांगायचं की नाही याचाच विचार करत होत्या. 

 सानिका बाहेर आली तेव्हा तिला दोन-तीन दिवसांपूर्वी भेटलेला बाईकवाला  दारातून आत येताना दिसला. तशी ती लगबगीने बंगल्याच्या पायऱ्या उतरून त्याच्यापाशी आली. 

"आता मात्र हद्द झाली हां. तुम्ही इकडे पण पोहोचलात का माझा पाठलाग करत?" तो बाईकवरून उतरत असतानाच ती म्हणाली. त्याच्या खांद्यावरचा लाल पंचा खाली पडला. तो उचलायला तो वाकला तशी सानिका पटकन मागे झाली. 

"हो, अनायसे काही काम नव्हतंच मला, म्हंटलं तुम्हाला पत्ता नीट सापडला आहे का बघावं. म्हणून आलो." तो मिश्कीलपणे म्हणाला. त्याच्या  ट्रिम केलेल्या दाढीमध्ये थोडी माती अडकली होती. त्याचा ढगळ झब्बा लेंगा पण जरा मळलेलाच होता. 'त्या दिवशी जीन्स टीशर्ट घालून फिरत होता हा आणि आज हे काय घातलंय? त्याच कपड्यात चांगला दिसत होता. हा आहे कोण नक्की?' सानिका संशयाने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत बघत होती. 

"परत हरवलात की काय माझ्या हँडसम चेहऱ्यात. " तिला चिडवत तो म्हणाला. सानिका तोंड वासून पहातच राहिली.

"ओ मिस्टर.." ती चिडून काही बोलणार त्याआधीच तो बोलला.

"काय मॅडम तुम्ही पण. मज्जा केली मी. हि फळं द्यायची होती." हातातल्या दोन जड पिशव्या पुढे करत तो म्हणाला. 

"अच्छा, तुम्ही फळवाले आहात का. पण हे काय बाकीची फळं कुठेत? पिशवीतून फळं विकता तुम्ही?" तिने विचारलं. 

"नाही फळांची गाडी बाहेर ठेऊन आलोय. तुमच्या आई कोणती फळं घेतात माहिती आहे ना मला." तो कपाळावरचा घाम पंचाने पुसत म्हणाला.  

"अच्छा, द्या ते इकडे. किती झाले?" पिशवीत डोकावून बघत सानिका म्हणाली. 

"तुम्हाला फ्री देतो चला मी. नवीन आहेत ना तुम्ही गावात." तो तिच्याकडे बघत म्हणाला. 

"नको. मला कोणाचा उधार ठेवायला आवडत नाही. आणि काय हो, ह्यावर तुमचं घर चालतं ना, मग फुकटात फळं काय वाटताय? तुम्ही थांबा इथे मी पैसे घेऊन आले." तो आपल्याशी फ्लर्ट करतोय असं वाटून सानिका वैतागून म्हणाली आणि आत पैसे आणायला गेली. ती बाहेर आली तेव्हा आशाताई त्याच्याशी बोलत उभ्या होत्या. सानिकाने बाहेर येऊन पाचशे रुपयांची नोट त्याच्यासमोर धरली.  

"काय गं? हे कसले पैसे?" आशाताईंनी विचारलं. 

"कसले म्हणजे? फळं घेतली ना आपण ह्यांच्याकडून." सानिका म्हणाली. दोन मिनिटं आशाताईंना काही कळलंच नाही आणि मग त्या खदखदून हसायला लागल्या. 

"अगं सानू, तू काय ह्याला फळवाला समजलास की काय?" त्यांनी सानिकाला विचारलं. 

"समजायचं काय त्यात, ते पण म्हणाले त्यांची फळांची गाडी बाहेर आहे. आणि फळवालेच वाटतायत की हे." सानिका पुन्हा त्याच्या अवताराकडे बघत म्हणाली. 

"अरे देवा. काय रे समीर तू पण. माझ्या लेकीची मस्करी करतोयस होय." त्याला खोटं खोटं रागवत त्या म्हणाल्या, "सानू तू ओळखलं नाहीस का ह्याला? हा वसंतकाकांचा समीर. तुम्ही एकाच शाळेत होतात. आपल्याकडे कितीवेळा येऊन गेला आहे की." आशाताई म्हणाल्या आणि सानिकाची ट्यूब पेटली. तिला थोडा ओळखीचा वाटलं खरं त्याचा चेहरा पण तिला शाळा सोडूनही बरीच वर्ष लोटून गेली होती. त्यामुळे समीरला तिने कित्येक वर्षात पाहिलंही नव्हतं किंवा त्याचा विषयही कधी निघाला नव्हता. समीर आणि आशाताई तिच्याकडे अपेक्षेने बघत होते. 

"जाऊ दे काकू, तिला कुठे आठवणार आहे. किती वर्ष झाली त्याला. मला जर रस्त्यात भेटली असती कुठे तर मी पण नसतं ओळखलं तिला." समीर म्हणाला.

"कठीण आहे हां सानू तुझं. अख्खी माणसं काय विसरतोस तू. आणि समीर ह्यात चूक फक्त तिची नाहीये. काय हा अवतार करून ठेवला आहेस, फळंवालाच वाटतो आहेस हां." आशाताई गालातल्या गालात हसत म्हणाल्या. 

"काय करणार काकू, मासाहेबांचा आदेश होता हे आंबे आजच झाडावरून काढायचे, कसला तरी मुहूर्त आहे म्हणे. आणि आमचे गजानन काका आज आहेत सुट्टीवर. म्हणून मलाच झाडावर चढवलं तिने आणि लगेच इकडे तुम्हाला आंबे द्यायला पाठवलं. त्यामुळे वेळच नाही मिळाला. खरंच काय अवतार केलाय मी. अच्छा म्हणून तू माझ्याकडे बघत होतीस का सानिका आणि मला आपलं उगाच वाटलं आपण फारच हँडसम दिसतोय की काय." समीर बाईकच्या आरशात बघून केस नीट करत हसत म्हणाला आणि सानिकाने डोळे फिरवले. पण तो हँडसम होता ह्यात मात्र तिला काही शंका नव्हती. हां ड्रेसिंग स्टाईल जरा सुधारली तर बरा दिसेल अजून. तिने स्वतःशीच विचार केला. 

"तू आत ये ना. मस्त गार कोकम सरबत केलं आहे ते पिऊन जा." आशाताई आग्रह करत म्हणाल्या. थोडे आढेवेढे घेऊन समीर तयार झाला. आत आल्यावर त्याने सगळ्यात पहिले स्वतःचा चेहरा धुतला आणि केस पाणी लावून नीट बसवले. खांद्यावरचा पंचा घडी घालून खिशात ठेवला आणि हॉलमध्ये आला. सानिका जवळच फोनवर ई-मेल्स बघत बसलेली. तो चेहरा धुवून बाहेर आल्यावर सानिकाने त्याच्याकडे बघितलं. 

"बरा आहेस की दिसायला. मग मगाशी असा अवतार कशाला केला होतास?" तिने विचारलं. 

"अरे वा, तू फ्लर्ट केलेलं चालतं का?" समीरने मस्करीने विचारलं. खरंतर कोणत्याही मुलीने वळून बघावं आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकावा इतका तो हँडसम नक्कीच होता. सहा फूट उंची, व्यायामाने कमावलेलं शरीर जे आत्ता त्याच्या ढगळ झब्ब्यामुळे दिसत नव्हतं, उजळ चेहरा, खट्याळ मिश्किल ब्राऊन डोळे,  दाट काळे केस.. त्यामुळे 'बरा दिसतोयस' हे ऐकायची त्याला सवय नव्हती. त्याला हे बोलणारी सानिका पहिलीच. 

"काय मग, ह्यावेळी अचानक कशी काय आलीस इकडे? आधी कधी बघितलं नाहीये तुला. बारावी मध्ये असताना मुंबई ला गेलीस ना तू?" त्याने काहीतरी संभाषण सुरु करायला विचारलं. 

"सहजच आले. आई आहे ना माझी इकडे. म्हंटलं तिला सरप्राईज द्यावं, बाकी काही नाही." सानिकाने काहीबाही कारण दिलं. परक्या माणसासमोर स्वतःच्या नोकरीचं गाऱ्हाणं सांगणं तिला पटत नव्हतं. तेवढ्यात आशाताई पण सरबत घेऊन आल्या. 

"आंब्यांचा वास छान येतोय रे समीर. या वेळेला मोहोर छान धरलेला दिसतोय. आईला थँक यु सांग!" त्या हसत म्हणाल्या. 

"काय काकू तुम्ही पण, थँक यु काय त्यात. नेहमीचं ठरलेलं आहे की आपलं. पुढच्या आठवड्यापासून बाहेर पाठवायला सुरवात करू म्हंटलं त्याआधी आपल्या गावातल्यांना मिळाले पाहिजेत. खाऊन सांगा कसे आहेत." समीर हसत म्हणाला.

"हो. खरंय. ह्यावेळी आमच्या सानुला पण मिळतील ताजे आंबे खायला. एरवी मुंबईमध्ये डाएटच्या नावाखाली काहीतरी बेचव पदार्थ खात बसते. लहान असताना केवढे आवडायचे आंबे तुला सानू, आठवतंय का? मी तर तुला पेटीकोटवरच बसवायचे, चांगल्या कपड्यांना डाग नको पडायला म्हणून. सगळं हात तोंड माखवून खायचीस आंबे." आशाताई कौतुकाने बोलत होत्या. पण सानिका अचानक अवघडली.

"आई पेटीकोट वगैरे काहीही काय बोलतेस तू कोणाही समोर." समीरकडे इशारा करत ती म्हणाली आणि आशाताई गप्प बसल्या. 

"मी काय म्हणतो काकू, तुम्ही कापा की एखादा आंबा आत्ता. आपण सगळेच खाऊ." समीर अवघडलेलं वातावरण निवळायला म्हणाला. तशा आशाताई उठून आत जाऊन दोन आंबे चिरून घेऊन आल्या. एक ताटली त्यांनी समीर समोर ठेवली आणि एक सानिकाच्या समोर. सानिकाने दोन मिनिटं समोरच्या आंब्यांकडे बघितलं आणि आत जाऊन चमचा घेऊन आली. 

"ओह माय गॉड, काय आंबा आहे. खरंय हां आई तुझं. असे आंबे मुंबईमध्ये मिळणं अशक्य आहे." चमच्याने समोरच्या आंब्याचे छोटे छोटे तुकडे खात सानिका म्हणाली. 

"आंब्यांची खरी चव तो हाताने खातानाच येते बरं का? त्याशिवाय समाधान मिळत नाही. आमच्या गावाचा नियम आहे हा. फळं हातानेच खायची." तिला चमच्याने आंबा खाताना पाहून चिडवत समीर म्हणाला आणि सानिकाने त्याच्याकडे बघून तोंड वाकडं केलं. 

"मी काय म्हणते समीर आता आलाच आहेस तर जेवूनच जा ना." आशाताई म्हणाल्या. 

"नको काकू, आई वाट बघत असेल घरी. एकदा तुम्हीच या ना त्यापेक्षा, सानिकाला पण घेऊन या. त्यानिमित्ताने तिची आणि आई-बाबांची पण भेट होईल." समीर आंब्याची कोय खात म्हणाला आणि आशाताईंनी मान डोलावली. पुढ्यातला आंबा संपवून तो निघाला तेव्हा आशाताई त्याला गेटपर्यंत सोडून आल्या. त्या परत आल्या तेव्हा सानिका ई-मेल्स वाचण्यात मग्न होती. तिच्या पुढ्यातल्या आंब्याची जेमतेम एक फोड तिने खाल्ली होती. आशाताई तिला काही बोलणार तेवढ्यात ती फोनवर बोलत बाहेर गेली. 

"कसं होणार या पोरीचं देव जाणे. इतकी बदलली आहे. लहान असताना आंब्याचं साल कसंबसं सोडवून घ्यावं लावायचं हिच्या हातातून आणि आता धड खाल्लं ही नाही. सुट्टी असून पण जीवाला शांतता नाही हिच्या." म्हणून त्या जेवणाची तयारी करायला आत गेल्या. 

---***---

"हॅलो, सर मी सानिका बोलतेय!" सानिका पडवीत फोनवर बोलत होती. 

"सानिका? हाय. कशी आहेस? आणि महत्वाचं म्हणजे सुट्टी कशी चालू आहे?" समोरून दीक्षित सरांनी विचारलं. 

"सुट्टी बरी चालू आहे. म्हंटलं एकदा फोन करून बघूया ऑफिसमध्ये सगळं कसं चाललंय बघायला." सानिका म्हणाली. 

"इकडे सगळं मस्त चालू आहे. तू काही काळजीच करू नकोस. तू गेल्यापासून सागरने एकदम जबाबदारीने सांभाळलं आहे सगळं. कोणाचीही काहीही तक्रार नाही." दीक्षित सर म्हणाले आणि सानिकाच्या छातीत चर्रर्र झालं. अच्छा, आता माझी पोस्ट सागरला द्यायचा प्लॅन आहे वाटतं. म्हणजे सगळं अजूनच सोप्पं झालं, बाहेरून कोणाला कंपनी मध्ये आणून शिकवत बसायला नको. माझे सगळे क्लायंट सागरला माहितीच आहेत. मी परत जाईपर्यंत बहुदा तोच माझ्या केबिनमध्ये बसला असेल. 

"सानिका? ऐकतेयस ना?" समोरून दीक्षित सरांच्या आवाजाने सानिका भानावर आली. 

"हो सर, मी खरंतर फोन ह्याच्यासाठी केला की वाळिंबेंचा ई-मेल बघितला मी मगाशी. त्यांनी मि. मेहेतांसाठी जो इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनवला आहे तो खूपच अग्रेसिव्ह आहे. आता त्यांचं डील आपल्याला मिळालं आहे तर उगाच एवढा जास्त प्रॉफिट कशाला दाखवायचा आपण. सध्या कोरोना व्हायरस नंतर मार्केट अजून हळू हळू वधारत आहे. आपण एवढी रिस्की इन्व्हटमेन्ट करणं मला चुकीचं वाटतंय." सानिका म्हणाली. 

"सानिका, तू त्या सगळ्याची चिंता कशाला करते आहेस? वाळिंबे समर्थ आहेत ते बघून घ्यायला. सुट्टीत ऑफिसला यायला नाही सांगितलं म्हणून आता घरी बसून काम करणार आहेस का तू? अशाने तुझा ई-मेल पण बंद करावा लागेल हां मला." दीक्षित सर म्हणाले आणि सानिका गप्पच बसली. ई-मेल पण बंद केला माझा तर संपलंच सगळं. दोन महिने ऑफिसमध्ये कोणाचं काय चाललंय तेही कळणार नाही मला. 

"नाही नको सर. त्याची काही गरज नाही. मी नाही करणार काम. पण मी काय म्हणते, मला ह्या तीन-चार दिवसांतच एवढं फ्रेश वाटतंय मग दोन महिने सुट्टी घेणं गरजेचं आहे का? अजून एखादा आठवडा घेते सुट्टी आणि येते कामावर." सानिका समजावणीच्या सुरात म्हणाली. पण त्याचा काहीही परिणाम दीक्षित सरांवर झाला नाही. त्यांनी तिची सुट्टी कमी केलीच नाही, वर परत तिने घरी बसून कामाकडे लक्ष दिलं तर ते तिची सुट्टी अजून वाढवतील अशी धमकीच दिली त्यांनी. नाईलाजाने सानिकाने फोन ठेवला. 

'मी उगाच एवढ्या लांब कोकणात आले का? मुंबईत थांबून दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करायला हवा होता का मी? म्हणजे माझ्याकडे दुसरा मार्ग तरी राहिला असता.' सानिका स्वतःशीच विचार करत असताना तिला आशाताईंनी जेवायला बोलावलं. मनात चालू असलेले सगळे विचार बाजूला सारायचा प्रयत्न करत ती आत जेवायला गेली..

🎭 Series Post

View all