चंद्र आहे साक्षीला - भाग ७

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

संध्याकाळी धुपाच्या वासाने आणि घंटानादाने सानिकाला जाग आली. ती डोळे चोळत खाली आली तेव्हा आशाताई देवघरात दिवा लावत होत्या. त्यांच्या मंजुळ आवाजातल्या स्तोत्रांनी घरात एकदम मंगलमय वाटत होतं. सानिकाने हातातल्या घड्याळाकडे बघितलं. सहा वाजून गेलेले. 'बापरे इतका वेळ झोपले होते मी?' ती स्वतःशीच विचार करत खाली आली. 

"झाली का झोप? मी येणारच होते तुला उठवायला. तिन्ही सांजेला झोपायचं नसतं. आणि इतका वेळ झोपलीस तर रात्री झोप नाही लागायची. ये देवाला नमस्कार कर." आशाताई म्हणाल्या तशी सानिका देवासमोर हात जोडून उभी राहिली. तिच्या मुंबईच्या घरात देवघर नव्हतंच. त्यामुळे आज कितीतरी दिवसांनी ती देवापुढे उभी होती. 

"देवा, माझ्या लेकीच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर कर रे बाबा!" तिच्या बाजूला उभ्या आशाताईंनीच तिच्या वाटेचं  मागणं मागितलं आणि सानिकाने त्यांच्याकडे बघून डोळे फिरवले. 

"कधी आलीस आई तू? आता संध्याकाळी काय करायचंय आपण? मला काही झोप लागेल परत असं वाटत नाही रात्री. इथे आसपास जॉगिंगला जागा आहे का? विचार करतेय जरा धावायला जाते. एवढं खाल्लंय दुपारी." सानिका आळस देत म्हणाली. 

"आता अंधार पडेल गं. तुला हे गाव पण नवीन आहे. त्यापेक्षा उद्या सकाळी जा ना धावायला. हवं तर मी पण येईन तुझ्याबरोबर. धावायला नाही जमणार मला पण चालत येईन." आशाताई म्हणाल्या. 

"हं, चालेल. उगाच रात्रीची कुठे धडपडले तर डोक्याला ताप होईल. आधीच कमी व्याप नाहीयेत माझ्या डोक्याला." सानिका म्हणाली आणि आशाताईंनी तिच्याकडे बघितलं. 

"अगं म्हणजे सुट्टीसाठी आलेय ना इकडे, मग पडले तर घरीच बसून रहावं लागेल म्हणून म्हंटलं. ए आई, मस्त कॉफी दे ना तुझ्या हातची गरमा गरम. जायफळ घालून." सानिकाने फर्माईश केली.

"अरे देवा, ह्या बायकांच्या गोंधळात दूध आणायला विसरले बघ मी. दुपारी खीर केली ना तेव्हा संपलं. थांब मी पटकन घेऊन येते आणि मग करते कॉफी तुझ्यासाठी." म्हणून आशाताई पर्स घेऊन निघाल्या. 

"थांब थांब. तू आत्ताच जाऊन आलीस ना बाहेर. मी आणते दूध. कुठून आणायचं सांग. मी गाडीने पटकन जाऊन येते." सानिका स्लीपर्स पायात अडकवत म्हणाली. 

"गाडीने? इथे वीस पावलांवर आहे त्या गोपाळचं दुकान. आणि अशी जाणार आहेस तू?" आशाताई तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघत म्हणाल्या. सानिकाने कुठल्यातरी कार्टूनचा टीशर्ट आणि खाली त्याला मॅचिंग शॉर्ट्स घातलेली. तिने आशाताईंकडे बघून खांदे उडवले. 

"बाळा, हे गाव आहे. इकडच्या लोकांना अशा कपड्यांची सवय नसते. साधी जिन्स घालून जा की किंवा एखादा सलवार कुर्ता घालतेस का? आणि हे पातेलं घेऊन जा, त्यातच देईल तो दूध." आशाताई म्हणाल्या आणि सानिका नाईलाजाने कपडे बदलायला गेली. 

गोपाळच्या दुकानाकडे जायचा रस्ता खरंच जेमतेम वीस पावलांचा होता. सानिका आजूबाजूला बघत हातातलं पातेलं हलवत चालली होती. लोकंही तिच्याकडे बघत होते. संध्याकाळ होऊन गेल्यामुळे रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होती. घराघरातल दिवे लागले होते. मोठी माणसं अंगणात बसून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष ठेऊन होती. तेव्हड्यात सानिकाला दुकान दिसलं. 

"हाय, मला अर्धा लिटर दूध देता का?" हातातलं पातेलं पुढे करून ती म्हणाली. तसं कॉउंटर वर बसलेल्या साधारण तिच्याच वयाच्या मुलाने चमकून तिच्याकडे बघितलं. 

"तुम्ही गावातल्या दिसत नाही. बाहेरून आलात का?" त्याने विचारलं. 

"हो. का? तुम्ही बाहेरच्या लोकांना दूध देत नाही का?" सानिकाने जरा वैतागून विचारलं. 

"मी कोणालाच दूध देत नाही, माझ्या म्हशी दूध देतात.” म्हणून गोपाळ स्वतःच्याच जोकवर मोठ्यांदा हसला आणि सानिकाने नाक मुरडलं.  

“गोठा मागे आहे, तिकडेच मिळेल दूध. इकडून आत जा." तो बाजूच्या गल्लीकडे हात दाखवून पुढे म्हणाला. 

काही पाऊलं चालून गेल्यावर सानिका एकदम थबकलीच. समोर दहा-बारा म्हशी आणि पाच-सहा गायी उभ्या होत्या. अचानक एवढे प्राणी समोर बघून सानिकाच्या हातातलं भांडं खाली पडलं आणि त्याचा आवाज झाला. समोर निवांत रवंथ करत बसलेल्या म्हशीने निर्विकारपणे तिच्याकडे बघितलं. सानिकाच्या तोंडून नकळत 'सॉरी' निघालं. तशी ती म्हैस पुन्हा शेपटीने अंगावर बसलेल्या माशा उडवत रवंथ करण्यात मग्न झाली. 

'त्याने मला गोठ्यात पाठवलं म्हणजे मी दूध काढून घ्यायचंय की काय? पण आई तर मला काही बोलली नाही.' सानिका गोंधळून समोरच्या म्हशीकडे आणि हातातल्या पातेल्याकडे बघत उभी राहिली. तिच्या मागोमाग आलेला गोपाळ तिची मजा बघत उभा होता. 

"ओ ताई, द्या ते पातेलं इकडे. आणि हिला सॉरी म्हणालात होय मगाशी. तिला काय तुमचं इंग्लिश कळत नाही." गालातल्या गालात हसत तो मागे ठेवलेल्या फ्रिजपाशी गेला. सानिकाला स्वतःची चूक समजली. 'म्हशीला काय सॉरी म्हंटलं मी', तिने स्वतःच्याच डोक्यावर हात मारला. 

"हे घ्या, म्हणूनच म्हंटलं मगाशी, गावातल्या वाटत नाही तुम्ही. पंचवीस रुपये झाले तुमचे." तो दुधाचं पातेलं सानिकाकडे देत म्हणाला. तेव्हा सानिकाला आठवलं ती गडबडीत पाकीट आणायला विसरली होती. पण तिचा फोन होता तिच्याकडे. 

"मी माझं पाकीट विसरले आहे. गुगल पे ने देऊ का तुम्हाला पैसे?" तिने फोन अनलॉक करत विचारलं. गोपाळने तिच्याकडे गोंधळून बघितलं. त्यावरून त्याला गुगल पे माहित नाहीये हे सानिकाला कळलं. 

"एक काम करा, हे पातेलं ठेवा इथे. मी पटकन घरी जाऊन माझं पाकीट घेऊन येते." म्हणून सानिका जायला निघाली. 

"ओ थांबा जरा. कोणाकडे आला आहात तुम्ही?" गोपाळने विचारलं. 

"आशा पाध्ये. इकडे जवळच राहतात त्या." सानिका घरच्या दिशेने हात दाखवत म्हणाली. 

"अच्छा आशाकाकूंची मुलगी का तुम्ही? मग आधी सांगायचं ना. आणि तुम्ही कशाला आलात, मी आलो असतो की फोन केला असता तर. ऑनलाईन ऑर्डर घेतो मी." गोपाळ एकदम खुश होत म्हणाला. 

"ऑनलाईन? म्हणजे तुमची वेबसाईट आहे?" सानिकाने आश्चर्याने विचारलं. मग ह्याला गुगल पे कसं माहित नाही?

"ऑनलाईन म्हणजे व्हाट्सऍप वर हो. नुकतंच चालू केलंय." तो हसत म्हणाला आणि सानिकाला पण हसायला आलं. 

"तुम्ही हे दूध घेऊन जा. मी महिन्याच्या हिशोबात लिहून ठेवतो. आशाकाकूंचं खातं आहे माझ्याकडे." तो म्हणाला तशी सानिका पातेलं घेऊन निघाली.

घरी येऊन कॉफी पिताना सानिकाने घडलेला किस्सा आशाताईंना सांगितला तशा त्या हसायलाच लागल्या, "हो गं बाई, ती सुंदरी जामच मजेशीर आहे. मी गेले होते मागे एकदा तेव्हा खाता खाता मलाच शेपटी मारली."

"कोण सुंदरी? आणि तिला शेपटी आहे?" सानिकाने गोंधळून विचारलं. 

"अगं तीच, गोपाळची म्हैस गं. त्याने तिला नाव ठेवलं आहे. सगळ्यात जुनी म्हैस आहे त्याची ती. आपल्याकडे तिचंच दूध येतं." आशाताई म्हणाल्या. 

"म्हैस आहे ती आई. त्यात मजेशीर काय? अंगावर बसलेल्या माशा उडवणं एवढंच तर काम असतं त्यांना." सानिका डोळे फिरवत म्हणाली. 

रात्री जेवण झाल्यावर दोघी मायलेकी अंगणात झोपाळ्यावर बसल्या होत्या. आशाताई आडून आडून सानिकाला प्रश्न विचारत होत्या. शेवटी एकदाचं तिने त्याना घडलेला प्रसंग सांगून टाकला. त्यावर त्या थोडावेळ गप्प बसल्या. 

"असं सगळं आहे आई. मला नाही माहिती इकडून परत गेल्यावर माझ्याकडे नोकरी असणार आहे का. म्हणजे दीक्षित सर मला पुन्हा पुन्हा हेच सांगत होते की त्यांनी मला आराम करण्यासाठी सुट्टी दिली आहे, पण तूच सांग कुठली कंपनी एवढ्या सिनिअर पदावरच्या माणसाला आराम करण्यासाठी पगारी सुट्टी देईल?" सानिका अंगणातल्या झाडांकडे बघत म्हणाली. त्यावरची फुलं ओलसर पानांच्या आडोशात विसावली होती.

"सानू मग तसंच असेल अगं. तू उगाच एवढा त्रास कशाला करून घेतेयस. इतके वर्षांनी सुट्टी मिळाली आहे तर जरा उपभोग ना ती. मला किती आनंद झालाय सांगू तू इकडे आलीयेस म्हणून. ह्या घराला तुझ्या येण्याने घरपण आलं बघ." आशाताईंचा जीव भांड्यात पडला. त्यांना वाटलं होतं तेवढं गंभीर काही झालं नव्हतं तर. 

दोघी अजून थोडावेळ गप्पा मारत बसल्या आणि मग आशाताई झोपायला आत आल्या.  सानिका थोडावेळ झोपाळ्यातच बसून फोनवर मेसेजेस, ई-मेल्स बघत होती. ऑफिसमध्ये साधारण काय चाललंय ह्याचा तिला त्या ई-मेल्स वरून अंदाज आला. वाळिंबेंच्या टीमला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे होती. पण दीक्षित सरांची सक्त ताकीद असल्यामुळे तिला त्या ई-मेल्सना उत्तर देता येत नव्हतं. नाईलाजाने तिने फोन बंद केला. 'ऑफिसमधल्यांना माझी उणीव भासत असेल का? का माझी कटकट नाही म्हणून ते खूषच असतील?' तिने स्वतःशीच विचार केला. दोन दिवसांपूर्वी तिला ते ईमेल्स बघून जितका त्रास झाला होता त्यापेक्षा आज कमी झाला. कसं असतं ना माणसाचं मन, तुम्ही त्याला द्याल त्या परिस्थितीशी आपोआप समरस होतं. वेळ सगळ्यावरचं उत्तम औषध आहे हेच खरं! फोन बंद करून सानिकाची नजर रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे गेली. दोन दिवसांपूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती, त्यामुळे आकाशातला तो तेजस्वी गोळा आकसत चालला होता. आसपासच्या चांदण्यांबरोबर त्याचा ढगांआड जाऊन लपंडाव चालू होता. त्या चंद्राकडे बघताना सानिकाला वाटत असलेलं एकटेपण आज काहीसं कमी झालं होतं. रात्रीच्या त्या चांदण्यात हरवली असतानाच अचानक रस्त्यावरून गेलेल्या बाईकच्या आवाजाने ती दचकून भानावर आली. कच्च्या रस्त्यावरून जाताना मागे लाल मातीचा धुरळा उडवत ती बाईक गेली. दिवसभर उन्हात तापलेल्या मातीचे कण सानिकाच्या नाकातोंडात गेले. खोकतच तिने गेलेल्या बाईकच्या दिशेने पाहिलं पण ती बाईक रात्रीच्या अंधारात केव्हाच नाहीशी झालेली..

🎭 Series Post

View all