चंद्र आहे साक्षीला - भाग ६

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

 कणवली म्हणजे कोकणातलं एक सुंदर टुमदार गाव. कोकणातल्या बाकीच्या भागात जरी इमारती उभ्या रहात असल्या तरी कणवलीच्या लोकांनी मात्र त्यांच्या बागा, कौलारू घरं जपली होती. गावातली बरीचशी तरुण पिढी नोकरी धंद्यानिमित्त बाहेर पडली होती तर उरलेले मागे राहून वडिलोपार्जित जमीन सांभाळत होते. खरंतर कणवलीमध्ये राहिल्यानंतर कुठल्या शहरात जाऊन रहाणं तसं कठीणच. आंजर्ल्याच्या किनाऱ्याला लागून पंधरा वीस किलोमीटर पुढे गेलं की हळुहळू डोंगरातून डोकावणारी गर्द वनराई दृष्टीक्षेपात यायची. पाहणाऱ्याला लांबून जरी तिकडे मनुष्यवस्ती असेल असं वाटत नसलं तरी त्या वनराईच्या आत एक अख्ख गाव वसलं होतं. तिथे राहणाऱ्यांची संख्या तशी फार नव्हती पण पूर्वापार तिथे राहात आलेल्या कुटुंबातील एक तरी पिढी मागे राहून त्यांचं घर, नारळ सुपारीची झाडं, आंबे-फणसाच्या बागा सांभाळत होती. कोकणासारख्या सुंदर ठिकाणी असून सुद्धा तिकडे व्यावसायिक हॉटेल्सचा सुळसुळाट नव्हता. त्याला कारण गावातली लोकं होती. कणवली सारख्या सुंदर गावाचं सौन्दर्य आणि वेगळेपण त्यांना जपायचं होतं. बाहेरून येऊन समुद्रावर धिंगाणा घालणारे कॉलेज तरुण-तरुणींचे घोळके, त्याने गावातल्या शांततेला आणि सुरक्षेला निर्माण होणारा धोका हे सगळं त्यांना टाळायचं होतं. त्यामुळे कोणताही रिसॉर्ट्सचा प्रस्ताव आला की पूर्ण गाव तो धुडकावून लावायच्या मागे लागायचं. संह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या गावात पोहोचणंही तसं कठीणच. मुर्डीचा मुख्य रस्ता सोडून डोंगरातला कच्चा रस्ता धरला की निमुळत्या होत चाललेल्या वाटेवरून २५-३० किलोमीटर गाडी चालवत नेण्यासाठी तुमच्याकडे संयम हवा. पण गावाच्या जवळपास पोहोचत आलं की एका बाजूच्या कड्यावरून दिसणारा सुंदर अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला असलेली गर्द वनराई पाहून कोणाच्याही डोळ्याचं पारणं फिटेल ह्यात दुमत नाही. 

त्याच कच्च्या रस्त्यावरून निळ्या रंगाची मर्सिडीज कासवाच्या गतीने चालत होती. दूरदूरपर्यंत एकही माणूस दिसत नव्हता. रस्त्यावर काही पाट्याही नव्हत्या. सानिकाने अस्वस्थ होऊन तिच्या फोनवर लावलेल्या मॅपवर बघितलं. रस्ता तर बरोबर होता, मग घरं, माणसं काहीच कसं दिसत नाहीये? तिच्या फोनला नेटवर्कही नव्हतं त्यामुळे कोणाला फोन करून विचारायची पण सोय नव्हती. काल रात्री अचानक ठरवून आशाताईंना सरप्राईज द्यायचं म्हणून सानिका भल्या सकाळी उठून तिच्या गावाच्या दिशेने निघाली. सुरवातीचा प्रवास चांगला झाला पण गेली ४० मिनिटं ती ह्या कच्च्या रस्त्यावरून गाडी चालवत होती तरी कणवलीचा काही पत्ता नव्हता. सानिका जवळपास पंधरा वर्षांनी आज तिकडे आली होती. काल उत्साहाच्या भरात तिने तिकडे जायचं ठरवलं खरं पण आज त्या रस्त्यावरून गाडी चालवताना बसणाऱ्या प्रत्येक धक्क्याने आणि खड्ड्याने ती तिचा निर्णय किती चुकीचा होता याची जाणीव होत होती. "शी .. काय रस्ते आहेत हे, आई इकडून कशी जाते येते आश्चर्यच आहे. आणि नेटवर्क काय नाहीये इकडे. मला आत्ताच वैताग आलाय, पुढे कसं होणार आहे काय माहीत. " सानिका स्वतःशीच चरफडत म्हणाली. तिच्या गाडीला परत एक हिसका बसला. तिच्या प्राणाहून प्रिय गाडीला होत असलेल्या त्रासाने सानिकाचा जीव तुटत होता.  तेवढ्यात तिला रस्त्याच्या कडेला दोन माणसं बोलत उभी असलेली दिसली. त्यातल्या एका बाईकवर बसलेल्या माणसाच्या बाजूला गाडी थांबवत तिने खिडकीतून डोकं बाहेर काढलं, "एक्सक्यूज मी, कणवलीला जायचा रस्ता हाच आहे का?"  

बाईकवर बसलेल्या मुलाने त्याच्या हेल्मेटची काच वर करून तिच्याकडे आणि तिच्या गाडीकडे बघितलं. त्याचे ब्राऊन डोळे सानिकाच्या वैतागलेल्या चेहऱ्यावर स्थिरावले. "हो हाच आहे, अजून १५-२० मिनिटं सरळ जा." तो तिला निरखत म्हणाला. त्याच्या डोळ्यांकडे पाहून सानिकाला उगाच असं वाटून गेलं, 'मी ह्याला ओळखते का?' पण आत्ता संवाद वाढवण्यात तिला काही रस नव्हता. 

"ओके, थँक यु!" म्हणून ती तिकडून निघाली. अजून पंधरा मिनिटं त्या रस्त्यावरून गाडी चालवायच्या कल्पनेने खरंतर तिच्या पोटात गोळा आला होता. तिची पाठ तर पार पिळवटून निघाली होती. पण सुदैवाने काही मिनिटांतच चांगला डांबरी रास्ता सुरु झाला. रस्त्याच्या बाजूला छोट्या चहाच्या टपऱ्या, किरकोळ दुकानं दिसायला लागली. तिकडे थांबून कॉफी प्यायची खरंतर तिला खूप तल्लफ आली होती पण त्याहीपेक्षा जास्त घाई तिला आशाताईंना भेटायची झालेली. म्हणून ती न थांबता गाडी चालवत राहिली. हळूहळू ती गावातल्या मुख्य रस्त्यावर आली. दोन्ही बाजूला दुमजली कौलारू घरं, प्रत्येक घरासमोर छोटं का होईना पण अंगण होतं, काही घरांसमोर झोपाळे होते, त्यावर मुलं खेलत होती. गावातली बरीचशी घरं दिसायला सारखीच होती. इतक्या वर्षांनी तिकडे आल्यामुळे तिचं घर शोधणं सानिकाला खूपच कठीण जात होतं. त्यातच गावातले रस्ते लहान, त्यामुळे गाडी घेऊन फिरत राहण्यापेक्षा कोणालातरी विचारावं असं ठरवून तिने गाडी थांबवली. आसपास लोकं बरीच होती, पण कोणाला विचारायचं तिला कळत नव्हतं. सगळे तिच्याकडे कुतूहलाने बघत होते. तेवढ्यात तिला मगाशी भेटलेला दुचाकीस्वार दिसला, तिने त्याच्यासमोर गाडी लावली, त्याने चमकून तिच्याकडे बघितलं, "तुम्ही काय मला फॉलो करताय की काय?" त्याने समोरच्या हेल्मेट वर हात ठेवत मिश्कीलपणे हसत विचारलं. सानिकाला पहिल्यांदाच त्याचा चेहरा दिसला. साधारण तिशीच्या आसपासचा होता तो. त्याने 'न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी' लिहिलेला टी-शर्ट घातला होता. 'हा इकडे न्यूयॉर्कचा टीशर्ट घालून का फिरतोय?' सानिकाला प्रश्न पडला. 

"तुमचं बघून झालं असेल माझ्याकडे तर एक विचारू का?" बाईकच्या आरशात हेल्मेटमुळे विस्कटलेले केस नीट करत तो म्हणाला. सानिकाने पटकन ओशाळून दुसरीकडे बघितलं. त्याला जज करायच्या नादात ती अख्खा एक मिनिट त्याच्याकडे बघत होती. एका अनोळखी माणसाच्या अशा बोलण्याने सानिकाला काय बोलावं कळलं नाही पण तिने पटकन स्वतःला सावरलं.

"इकडे यायचा पत्ता मी तुम्हाला विचारला होता, मग पाठलाग तर तुम्ही माझा करताय वाटतं." सानिकाचं बोलणं ऐकून तो हसला. 

"आशाकाकूंचं घर शोधताय ना तुम्ही? हा रस्ता संपतो तिकडे उजवीकडे वळा. 'पारिजात' बंगला दिसेल तुम्हाला." तो हेल्मेट डोक्यावर चढवत म्हणाला. त्याला कसं कळलं सानिका कोणता पत्ता शोधतेय ते? तिने संशयाने त्याच्याकडे बघितलं. 

"तुम्ही मुंबईला असता ना? आशाकाकूंची मुलगी सानिका ? हे गाव तसं छोटं आहे, सगळे सगळ्यांना ओळखतात म्हणून मला माहितीये." तिच्या मनातले विचार ओळखून तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य जराही कमी नव्हतं झालं. त्याला थँक यु म्हणून सानिका त्याने सांगितलेल्या वाटेवर निघाली आणि मोजून दहा मिनिटांनी ती पारिजात बंगल्याच्या समोर उभी होती.  रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून ती गेट उघडून आत गेली आणि थक्कंच झाली. किती सुंदर बाग लावली होती आशाताईंनी. निरनिराळ्या रंगाची फुलं फुलली होती. अंगणातल्या मांडवाच्या खांबांवर नाजूक वेली वर चढल्या होत्या, त्यावर कृष्णकमळाची निळी नाजूक फुलं बहरली होती. गुलाब, मोगरा, पारिजात, रातराणी, गोकर्ण अशा कितीतरी झाडं तिकडे दाटीवाटीने उभी होती. त्याच्या मधोमध उभा होता दुमजली 'पारिजात'. मांडवातून चालत सानिका बंगल्यापाशी आली. बाजूलाच वेताचे दोन झोपाळे बसवले होते. आशाताईंनी तिला पाठवलेल्या फोटोज मध्ये तिने हे बघितले असले तरी आज प्रत्यक्षात ते घर बघताना तिच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या. झोपाळ्याच्या बाजूला परातीत नुकत्याच झाडावरून उतरवलेल्या कैऱ्या ठेवल्या होत्या. त्यांचा चीकही अजून वाळला नव्हता. दोन जिने चढून ती दरवाजापाशी येऊन थांबली. रेडिओवर जुनी मराठी गाणी वाजत होती. आशाताईंच्या स्वयंपाकाचा घमघमाट घरात सुटला होता. त्याने सानिकाची भूक अजूनच चाळवली. अर्धवट लोटलेला दरवाजा सानिकाने हळूच ढकलला आणि आशाताईंना आवाज दिला,"आई!"

---***---

मगाशी आलेला गेटचा आवाज आशाताईंनी ऐकला होता पण त्यांना वाटलं रस्त्यावर खेळणारी मुलं बॉल घ्यायला वगैरे आली असतील, तेवढ्यात अचानक सानिकाचा आवाज त्यांच्या कानावर पडला तशा त्या पदराला हात पुसत बाहेर आल्या. समोर आपल्या एकुलत्या एका लेकीला बघून त्यांच्या आनंदाला काही सीमाच उरली नाही, "सानू?" त्या पुढे काही बोलायच्या आधीच सानिका धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली.  

"सानू , अगं तू अशी अचानक इकडे कशी काय? तब्येत बरी आहे ना बाळा तुझी? आणि मला काही बोलली नाहीस. सांगितलं असतंस तर मी कोणाला तरी घ्यायला पाठवलं असतं ना तुला. आलीस कशी तू इकडे? आणि ऑफिसला सुट्टी घेऊन आलीस?" आनंदाचा भर ओसरल्यावर आशाताईंना अचानक काळजीने घेरलं. इतके वर्षांत एकदाही गावाकडे न आलेली लेक आज आठवड्याच्या मध्ये ऑफिससोडून कशी काय आली तेच त्यांना समजत नव्हतं.  

"आई, सगळं सांगते मी. आधी मला जेवायला देतेस का? खूप भूक लागली आहे. तोपर्यंत मी हातपाय धुवून फ्रेश होऊन येते. प्रवासात इतकी लाल माती उडाली आहे माझ्या अंगावर की फक्त माझ्या तोंडावर जमलेल्या मातीतून तीन -चार वीटा बनतील." म्हणून सानिका कपडे झटकत फ्रेश व्हायला गेली. आशाताई त्यांच्या मुलीकडे बघतच राहिल्या. 

मोजून पंधरा मिनिटांनी सानिका जेवायला स्वयंपाकघरात आली तेव्हा आशाताई तिचं ताट वाढून बसल्या होत्या. त्यांच्या डोक्यात प्रश्नांची यादी तयार होतीच फक्त भुकेल्या सानिकाला पोटभर शांत जेवता यावं म्हणून त्या लगेच ते प्रश्न विचारायचे टाळत होत्या. लेक इतके वर्षांनी घरी आली म्हणून त्यांनी पटकन खीर बनवली होती. सानिका ताटावर बसली आणि क्षणाचाही विलंब न करता जेवायला लागली. सँडविच, पिझ्झा सगळं ठीक आहे पण त्याला आईने बनवलेल्या आमटी भाताची सर नाही हेच खरं, ती स्वतःशीच विचार करत होती. 

"सानू हळू खा गं जरा, कोणी ताट घेऊन चाललं आहे का तुझं? साधच जेवण बनवलं मी, आधी सांगितलं असतंस मला तर काहीतरी चांगलं बनवलं असतं ना." आशाताई लेकीला पोटभर जेवताना बघून खुश होत्या.  

"ठीक आहे गं आई, आता काय मी आहे इकडे बरेच दिवस. तेव्हा घाल करून खायला." सानिका म्हणाली आणि आशाताईंची काळजी अजूनच वाढली. लेक राहणार ह्याचा आनंद असला तरी तिला नक्की काय झालंय ती अशी अचानक इकडे का आलीये हे कळल्याशिवाय त्यांच्या जीवाला काही शांतता मिळणार नव्हती. 

"सानू, तू इथे आलीयेस ह्याचा आनंदच आहे मला. पण मला जरा काळजी पण वाटतेय गं. तू अचानक ऑफिसला सुट्टी घेऊन इकडे आलीस?" आशाताईंनी न राहवून विषयाला हात घातला. 

"आई तू पण ना, एवढी काय काळजी करतेस. तूच म्हणायचीस ना सुट्टी घे सुट्टी घे, आणि आता घेतली आहे तर तू कशाला टेन्शन घेतेयस?" सानिका म्हणाली. आशाताईंशी बोलताना खरतर तिला रडायला येत होतं. मुंबईत झालेलं सगळं पुन्हा पुन्हा आठवून आता पुढे काय होणार ह्याच्या काळजीने पोटात गोळा येत होता, पण तिला इतक्यात हे सगळं सांगून आशाताईंना टेन्शन द्यायचं नव्हतं. थोडे दिवस राहून ती स्वतः थोडी शांत झाली की मग त्यांना सांगावं असा विचार तिने केला. 

"आई, जेवण सगळं खूप छान झालं होतं. इतके दिवसांनी एवढं खाल्लंय. आता जरा पडते मी. तसही सकाळी लवकर निघाले त्यामुळे झोप अर्धवटच झालीये. तू काय करणार आहेस आता?" ती आशाताईंची नजर चुकवत म्हणाली. 

"मी काही नाही, शेजारी जोशी वहिनींकडे जाणार होते, त्यांनी आज पापडांचा घाट घातलाय. बाकीच्या बायका पण येणार आहेत. पण आता तू आलीयेस तर मी नाही जात." इतक्या वर्षांनी घरी आलेल्या लेकीला सोडून आशाताई जाणं शक्यंच नव्हतं. 

"नको नको, तू जा. मी तशीही झोपणारच आहे. मग तू घरी थांबून काय करणार. तू जाऊन ये मग आल्यावर आपण मारू की गप्पा." म्हणून सानिका ताटावरून उठली आणि हात धुवायला गेली. आशाताईपण उगाच विषय ना वाढवता उठल्या आणि वरच्या मजल्यावरची खोली सानिकासाठी तयार करायला गेल्या.

सानिका बाहेर जाऊन गाडीतून तिच्या बॅग्स घेऊन आली. बॅगा घेऊन ती तिच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत आली तेव्हा एका ओळखीच्या भावनेने तिचं मन व्यापून गेलं. वरच्या मजल्यावरच्या खोल्या नवीन असल्या तरी आशाताईंना सानिकाचं लहानपणीचं सगळं सामान त्या खोलीत मांडून ठेवलं होतं. तिचं शाळेत असतानाचं अभ्यासाचं टेबल खोलीत एका कोपऱ्यात ठेवलं होतं. त्यावरच्या भिंतीवर तिने काढलेली चित्र त्यांनी फ्रेमकरून लावलेली. नव्याने बनवलेल्या लाकडाच्या कपाटात एका बाजूला तिचे जुने कपडे, बाहुल्या, काही खेळणी ठेवली होती आणि एक बाजू रिकामी ठेवलेली. सानिकाने तिकडे तिचे कपडे ठेवले. बाजूच्या खिडकीवरचा पांढरा शुभ्र पडदा वाऱ्याच्या झुळकेने उडत होता. त्यातून दुपारच्या उन्हाची एक तिरीप आत आली होती. सानिकाने तो पडदा नीट बंद केला, झोपताना डोळ्यावर उजेड नको! त्या खोलीतलं तिचं बालपण मनात साठवून घेत ती तिच्या बेडवर येऊन बसली. एप्रिल सुरु होत असला तरी कौलांमुळे घर गार होतं. त्यात आशाताईंनी खिडक्यांना वाळाचे पडदे लावले होते. बेडवर ठेवलेली मऊ मऊ दुलई अंगावर घेत सानिका आडवी झाली. सकाळपासूनचा प्रवास, पोटभर जेवण आणि गेल्या काही दिवसांचा ताण या सगळ्यांमुळे काही क्षणातच ती गाढ झोपली..

🎭 Series Post

View all