चंद्र आहे साक्षीला - भाग ५

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

सकाळी सातचा गजर वाजला. पण त्याची काहीच गरज नव्हती. कारण कर्कश्य कोकलणाऱ्या त्या घड्याळाच्या बाजूला सानिका बसली होती, टक्क जागी. डोळे रडून लाल झालेले. आदल्या दिवशी तिने घरी येऊन प्यायलेल्या वाईनचाही त्यात हातभार होताच. विस्कटलेले केस आणि लाल नाक. गजर बंद करून ती बाथरूममध्ये आली तेव्हा तिचं प्रतिबिंब बघून तीच काही क्षण थबकली. 'एवढं काय मनाला लावून घेतलंय मी. सुट्टीच आहे ना. संपली की जाईन परत कामावर. लोकं आयुष्यभर अशा संधीची वाट बघतात आणि मी मिळालेली सुट्टी वाया कशाला घालवतेय. मी कायम आईकडे तक्रार करते मला माझ्या आवडीनिवडी जोपासायला वेळ मिळत नाही मग आता वेळ आहे तर रडण्यात कशाला वाया घालवतेय.' सानिकाने आरशात बघून स्वतःशीच विचार केला. मरगळ झटकून ती पटकन आवरून धावायला गेली. तासभर समुद्रकिनारी पळून तिने तिच्या नेहमीच्या कॅफेमधून कॉफी घेतली. घरी येईपर्यंत तिने कॉफी संपवली. आज वेळ होता म्हणून तिने पटकन तिच्या आवडीचं सँडविच बनवलं, घरात आवरा आवरा केली. हे सगळं करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. स्वयंपाकघर आवरून ती हात पुसत सोफ्यावर बसली. सवयीप्रमाणे तिने पटकन ऑफिसचे ईमेल्स चेक केले. केवढं काय काय घडत होतं ऑफिसमध्ये. मि. मेहेतांच्या प्रोजेक्टसचे लीगल पेपर्स फायनल झाले होते. तिच्या टीममधल्या दोन तीन जणांना तात्पुरतं वाळिंबेंच्या टीममध्ये पाठवलं होतं. तिच्या महत्वाच्या मिटींग्स सागरला दिल्या होत्या. तिचं केबिन? ते तरी तसंच होतं का ते पण कोणाला तरी दिलं होतं? तिच्या डोळ्यासमोर तिच्या गुबगुबीत खुर्चीवर विसावलेलं वाळिंबेंचं पोट आलं आणि तिच्या अंगावर काटाच आला. 'काय करतेय मी हे? माझ्या अनुपस्थितीत मी इतके वर्ष कमावलेलं सगळं माझ्या हातातून निसटून चाललं आहे आणि मी इकडे बसून स्वयंपाकघर काय साफ करतेय. ह्याच्यासाठी मी एवढं शिकलेय का. ते काही नाही, मी आत्ता जाऊन दीक्षित सरांशी बोलते आणि माझी सुट्टी पुढे ढकलते. सध्या मी ऑफिसमध्ये असणं जास्त महत्वाचं आहे.' सानिका निर्धाराने उठली आणि पटकन ऑफिसला जायला तयार झाली. नेहमी सारखीच टकाटक, सूट बूट, चेहऱ्यावरचा मेकअप.. नीट सेट केलेले केस. अर्ध्या तासात ती ऑफिसला पोहोचली. सगळे मीटिंग रूममध्ये होते. त्यांना बघून सानिकाही तिकडे जायला निघाली. तेवढ्यात दीक्षित सर तिच्या समोर आले. 

"सानिका? तू आज इकडे कशी? काही घ्यायला आली आहेस का ऑफिसमधून?" त्यांनी आश्चर्याने विचारलं. 

"हो सर. मी माझे क्लायंटस परत घ्यायला आले आहे. मला ही सुट्टी नकोय सर. मला खूप काम करायचंय, ह्या कंपनीमध्ये स्वतःचं स्थान बनवायचंय. आत्ता ह्या सुट्टीसाठी माझ्याकडे अजिबातच वेळ नाहीये." सानिका पोटतिडकीने बोलत होती. तिचं बोलणं ऐकून दीक्षित सरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. 

"सानिका मी तुला कालच सांगितलंय की हि सुट्टी तुला घ्यावीच लागेल. मी इतके दिवस ह्याकडे दुर्लक्ष करत राहिलो पण तुझ्यासारखी हुशार मुलगी अशी कामाच्या ओझ्याखाली बर्न आऊट झालेली मला नाही चालणार. मी आत्तापासून तुझं ऑफिसचं ऍक्सेस कार्ड ब्लॉक करतोय. तू तुझी सुट्टी संपल्याशिवाय आता परत ऑफिसमध्ये येऊ शकत नाहीस. ये मी तुला बाहेर सोडतो." म्हणून दीक्षित सरांनी दरवाजाच्या दिशेने हात केला. 

----**----

दरवाजावररची बेल वाजत होती. आत लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. जवळपास पाच मिनिटं होऊन गेल्यावर एका तिशीतल्या बाईने दार उघडलं. अस्ताव्यस्त केस, कपड्यांवर कसलेसे डाग पडले होते, डोळ्यांखाली डार्क सरकल्स.. तिने समोर बघितला, "सानू ? तू आत्ता इकडे?" तिने आश्चर्याने विचारलं. 

तशी समोर उभी असलेली सानिका तिच्या गळ्यात पडून रडायला लागली, "मिथू..!"

मिथिलाला काहीच कळेना. सानिका अशी बुधवारी दुपारी ऑफिसच्या कपड्यांमध्ये तिच्या घरी कशी काय आली? तेवढ्यात मिथिलाची २ वर्षांची मुलगी पण रडायला लागली. आधी कोणाला शांत करावं तेच मिथिलाला कळत नव्हतं. तिने सानिकाला आत आणून बसवलं आणि छोट्या वेदाच्या हातात फोनवर व्हिडीओ लावून दिला तशी ती लगेच गप्प बसली. 

"सानू, मला सांगशील का नक्की काय झालंय?" तिने काळजीने सानिकाला विचारलं. तिने आणलेली कॉफी पिऊन सानिकाला जरा तरतरी आलेली. 

"मिथू, माझ्या नोकरीचं काही खरं नाही गं. इतकी वर्ष मी जीव ओतून एवढं काम केलं आणि आता त्यांनी मला.. त्यांनी मला.." पुन्हा येत असलेल्या हुंदक्यानं सानिकाला तिचं वाक्यच पूर्ण करता आलं नाही. 

"काढून टाकलं तुला?" मिथिलाने आश्चर्याने विचारलं. 

"नाही, सुट्टी घ्यायला लावली." सानिका डोळे पुसत म्हणाली, "मिथू त्यांनी मला दोन महिने सुट्टी घ्यायला लावली आहे."

"म्हणजे? मग तू रडतेयस का? एक मिनिट, तू आनंदाने रडतेयस का? कसला भारी आहे तुझा बॉस. तुला दोन महिने सुट्टी दिलीये, न मागता?" मिथिलानं गोंधळून विचारलं. 

"हे सगळे बहाणे आहेत गं. त्यांना फक्त माझ्या जागी दुसऱ्या कोणालातरी नेमून मग मला काढायचं आहे म्हणून ते वेळ घालवायला मला सुट्टी वगैरे देतायत." सानिकाचं नाक रडून लाल झालं होतं. समोर बसलेली छोटी वेदा आलटून पालटून तिच्या समोरच्या कार्टून्सकडे आणि सानिकाकडे बघत होती. सानिकाने तिला जीभ बाहेर काढून दाखवली तशी ती खुद्कन हसली. 

"सानू तू नेहमीप्रमाणेच जरा जास्त विचार करतेयस असं नाही वाटत तुला? अगं तुझ्यासारख्या मुलीला कोणी का काढेल नोकरीवरून. आठ वर्षात तू तुझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने कितीतरी मोठ्या असलेल्या लोकांच्या बरोबरीनं काम करतेयस. तुझ्यापेक्षा चांगलं कोण मिळणार आहे त्यांना." मिथिला वडे तळताना सानिकाला म्हणाली. ती सानिकाला लहानपणापासून ओळखत होती. दोघी एकत्रच लहानाच्या मोठ्या झाल्या. सुदैवाने सानिका पाठोपाठ मिथीलाही मुंबईला शिफ्ट झाली पण लग्न करून. ती पण सानिका सारखीच हुशार होती पण आई वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं. त्यानंतर घराच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला नोकरी वगैरे करणं जमलं नाही. वेदाच्या जन्मानंतर तर तिचा सगळं वेळ तिच्यापाठीच जात होता. छोट्या गावातून मुंबई सारख्या शहरात राहायला आल्यावर तिला अनेक बदलांना सामोरं जावं लागलं होतं. पण या सगळ्यात तिच्या नवऱ्याबरोबर सानिकाही तिच्या बरोबर होती. जशी वर्ष गेली दोघींची मैत्री अजूनच घट्ट होत गेली. आजही कोणतीही आनंदाची गोष्ट असो वा दुःखाची सानिका सगळ्यात पहिले मिथिलाला सांगायची. म्हणूनच आजपण ती तिकडे आली होती. 

"तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आपल्यापेक्षा वयाने लहान मुलगी आपल्या बरोबरीने काम करते हेच त्यांच्या पोटात दुखायचं कारण आहे. ह्या सगळ्यामागे त्या वाळिंबेचा हात असणार सांगते मी तुला." पोटात गरम वडे गेल्यावर सानिकाला जरा बरं वाटत होतं. 

"काही का असेना. नंतरचं नंतर बघू. तुला काय सहज दुसरी नोकरी मिळेल. आत्ता तुला सुट्टी मिळाली आहे ना? मग जरा आराम कर. इतकी वर्ष नुसतं काम करतेयस. मस्त कुठेतरी फिरायला जा काकूंना घेऊन. मला तर कोणी या सगळ्यातून सुट्टी दिली ना तर मी पहिली ट्रेन पकडून कुठंतरी जाईन. पण सगळ्यांचं कुठे नशीब असतं तुझ्यासारखं." मिथिला तोंड वाकडं करत म्हणाली.

"हं.. बघू. आत्ता तरी मला काय करायचं सुचत नाहीये. इतकी वर्ष सुट्टीचा विचारच नाही केला कधी. आणि आता अचानक इतकी सुट्टी मिळाल्यावर काय करायचं, कुठे जायचं तेच सुचत नाहीये मला. अमेरिकेला जायचं म्हंटलं फिरायला तर तिकडे सगळ्या जुन्या आठवणी आहेत. युरोपला एकटं फिरायला जाण्याइतका काही उत्साह नाहीये मला. तू पण येतेस का माझ्याबरोबर?" सानिका विचार करत म्हणाली.  

"आणि हिचं काय करू? हिला हितेन बरोबर एकटं सोडून जायचं म्हणजे परत आल्यावर दोघंही वेडे झाले असतील. एवढा स्ट्रेस नको घेऊस गं. खूप वेळ आहे तुझ्याकडे. आरामात घरी जाऊन विचार कर कुठे जायचं त्याचा." मिथिला म्हणाली. तेवढ्यात वेदा झोपेतून उठली आणि मिथिला तिला बघायला बाहेर गेली. 

मिथिलाकडून घरी आल्यावर सानिका टी.व्ही. बघत बसली होती. पण तिचं लक्ष टी.व्ही. कडे नव्हतं. तिच्या डोक्यात विचारांची चक्रं फिरत होती. दोन महिन्याची सुट्टी इकडे मुंबईत बसून काढणं शक्यच नव्हतं तिला. आज एका दिवसातच तिने तिचं ऑफिसचं रुटीन इतकं मिस केलं होतं. त्यामुळं तिला इकडून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं होतं. पण कुठे जायचं हाही प्रश्न होताच. फॉरेनला जायचं म्हणजे व्हिजा वगैरे आलं. त्यातच २-३ आठवडे जाणार. मग भारतातच कुठेतरी जाऊ का? विचार करत असतानाच तिची नजर टी.व्ही. च्या बाजूला लावलेल्या फोटोफ्रेमवर गेली. तिचा आणि आशाताईंचा फोटो होता तो. कोकणातल्या आंजर्ल्याच्या समुद्रावर खेळतानाचा. सानिका त्यात ८-९ वर्षांची होती. त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सानिकाला तिचं बालपण आठवलं. सगळं किती सोप्पं होतं. मग हे सगळं एवढं कठीण कधी झालं? का मी ते कठीण केलं? त्या फोटोतला अफाट समुद्र, किनाऱ्याला लागून असलेली नारळाची ऊंच झाडं, किनाऱ्यावरची मऊ मऊ वाळू आणि त्यात पाय घट्ट रोवून उभी असलेली छोटी सानिका.. किती बिनधास्त आणि स्वछंदी होती ती. फोटोकडे बघत सानिका विचार करत होती. कुठे मिळेल मला ही सानिका पुन्हा? कोकणात?

🎭 Series Post

View all