चंद्र आहे साक्षीला! - भाग ५३ 

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave for few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories at her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks int

चंद्र आहे साक्षीला! - भाग ५३ 

मिथिला निघून गेल्यावर सानिका तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये आली. रात्रीच्या निरव शांततेत तिच्या मनातले विचार तिला खूपच स्पष्टपणे ऐकू येत होते. मगाशी मिथिलाशी झालेल्या बोलण्यानंतर ती तिच्या आणि समीरच्या भांडणाबद्दल विचार करत होती. खरंच त्यात पूर्ण चूक त्याची होती का? त्याने त्याचं प्रेम कबूल केल्यानंतर तिने तिच्या भावना त्याला कधी सांगितल्याचं नव्हत्या. मग काहीच नातं नसताना त्याच्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा करून त्याचं वागणं पूर्ण चुकीचं ठरवणं योग्य होतं का? मिथिला म्हणाली तसं एकमेकांच्या सहवासात इतकी वर्ष राहिल्यावरही लोकांमध्ये गैरसमज होतात, भांडणं होतात. मग समीर आणि तिच्यामध्ये काही नातं सुरु व्हायच्या आधीच त्याने तिच्या मनातलं ओळखून तिला समजून घ्यावं ही अपेक्षा करणं, ही तिचीच चूक होती ना? त्याची बाजू समजून न घेताच आपणही त्याला चुकीचं ठरवून मोकळे झालोच की. इतके दिवस तिथे असताना त्याने त्याच्या वागण्यातून दाखवून दिलेलं प्रेम, काळजी सगळं मी त्याच्या एका चुकीने नजरअंदाज कशी करू शकते? विचार करून तिचं डोकं भणभणलं होतं. मनातलं विचारांचं वादळ शांत करायला तिने हेडफोन्स घातले आणि ती सोफ्यावर येऊन बसली. चंद्राचा शीतल प्रकाश तिच्या घरात पसरला होता. बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळुकेने बाल्कनीचे पडदे अलगद उडत होते. कानांत सुरु असणाऱ्या गाण्यांच्या सुरात सानिका हरवली होती .. 'लग जा गले, के फिर ये, हसीन रात हो ना हो sss'

आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर 'ती' रात्र आली. सोफ्यावर बसलेली सानिका डोळे विस्फारून समोर बघत होती. त्याच तिच्या चंद्रप्रकाशात न्हायलेल्या हॉलच्या मध्यभागी समीर आणि सानिका उभे होते. एकेमकांच्या डोळ्यांत हरवलेले.. "आय लव्ह यु समीर" सानिकाचे शब्द त्या खोलीत गुंजले. तिने पुढे येऊन समीरच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याची लांबसडक बोटं तिच्या चेहऱ्यावर फिरत होती. "आय लव्ह यु टू सानू" तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला आणि पुढे येऊन त्याने तिला मिठीत घेतलं. सोफ्यावर बसलेली सानिका हळूच उठून पूढे आली. तिच्या पुढ्यात उभ्या असलेल्या सानिका आणि समीरला हात लावायला तिने हात पुढे केला पण ते दोघं हवेत विरून गेले. नकळत तोंडावर हात ठेवला तरी अस्फुट हुंदका बाहेर आलाच.

"ओह माय गॉड, म्हणजे त्यादिवशी मी समीर समोर माझ्या प्रेमाची कबुली दिली होती? तरीच त्याचं वागणं दुसऱ्या दिवशी वेगळं वाटत होतं. पण तो मला काही बोलला का नाही? आणि नंतर आमच्यात एवढं सगळं होऊनही त्याने एकदाही ह्या गोष्टीचा उल्लेख केला नाही? आणि मी मात्र स्वतःची काहीच चूक नसल्यासारखी वागत होते इतके दिवस. किती स्वप्न बघितली असतील त्याने त्या रात्रीनंतर. पण मी मात्र ती सगळी पायदळी तुडवून त्याला एवढं दुखावून तिकडून निघून आले. हे काय करून बसलेय मी." ती डोक्याला हात लावून सोफ्यावर बसली होती. इतके दिवसांपासून मनात दाबून ठेवलेलं त्याच्यासाठीचं प्रेम आता कसलीही बंधनं न झुगारता बाहेर येत होतं. आत्ताच्या आत्ता त्याच्या मिठीत शिरून त्याची माफी मागायची होती तिला पण खूप लांब होता तो तिच्यापासून. डोळ्यातलं पाणी पुसत तिने फोन उचलला त्याच्याशी बोलायला, पण रात्रीचे दोन वाजले होते. तिने खूप कष्टाने त्याला फोन करायची ईच्छा आवरली. तशीच पाय पोटाशी घेऊन ती सोफ्यावर पडून फोनवर त्याचे फोटोज बघत होती. त्याच्या आठवणीने व्याकुळ होत.

तेवढ्यात तिची नजर समीरने तिला गावातून निघताना दिलेल्या गिफ्टकडे गेली. आत्तापर्यंत ते उघडायची हिम्मतच नव्हती झाली तिची. पण आज तिने थरथरत्या हाताने ते उचललं, हळूच तो बॉक्स उघडला आणि तिचा श्वासच अडकला. भरलेल्या डोळ्यांनी ती तिच्या हातातल्या त्या फोटोफ्रेमकडे पाहात होती. त्यांच्या बीचवरच्या पिकनिकच्या दिवशी तिचा काढलेला फोटो होता तो. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ड्रेसमधली समुद्राचं पाणी हाताने उडवणारी, खळखळून हसणारी, सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांत न्हाऊन निघालेली सानिका त्या फोटोतून तिच्याकडे बघून हसत होती. जी स्वच्छंदी, अल्लड सानिका नव्याने शोधण्यासाठी ती कणवलीला गेली होती ती तिला मिळाली होती.. आणि त्याला मुख्यत्वे तोच जबाबदार होता.. तिचा समीर!

____****____

सकाळी कर्कश्य अलार्मच्या आवाजने सानिकाला जाग आली. रात्रभर सोफ्यावर झोपल्यामुळे तिचं अंग आखडलं होतं. रात्री झोपही पुरेशी झाली नव्हती. समीरने दिलेली फोटोफ्रेम अजूनही समोरच पडली होती. ती बघून त्याच्या आठवणी पुन्हा नव्याने डोकं वर काढत होत्या. डोळ्यांत आलेलं पाणी आत ढकलत तिने ती फ्रेम उचलून टी.व्ही. जवळच्या तिच्या जुन्या फोटोच्या बाजूला ठेवली आणि ती आवरायला निघून गेली.

सानिका ऑफिसमध्ये शिरली तेव्हा सगळ्यांची धावपळ चालू होती. समोरच्या मीटिंगरूमधून लोकं आत बाहेर करत होती. "आज तर सकाळी कोणती मिटिंग नव्हती मग हे सगळे एवढ्या लवकर येऊन काय करतायत." ती स्वतःशीच विचार करत होती. खरंतर काल रात्रीपासून झालेल्या प्रसंगांनंतर तिचा ऑफिसला यायचा मूडच नव्हता, मनात फक्त समीरचेच विचार चालू होते. त्याला तिने सकाळी एक दोनदा फोनही केला होता पण त्यांचं बोलणं झालं नव्हतं. तशीच मनावरची मरगळ घेऊन ती समोरच्या मीटिंगरूममध्ये शिरली.

"काँग्रॅच्युलेशन्स!" ती आत शिरताच समोर बसलेला पूर्ण ऑफिसचा स्टाफ एकसुरात ओरडला. तिच्याकडे बघून दीक्षित सर पुढे आले. 

"मिस. सानिका, मला तुम्हाला हे कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की आजपासून तुम्ही ह्या फर्ममध्ये सिनिअर पार्टनर आहात. गेले काही वर्ष तुम्ही केलेली अविरत मेहनत, ह्या कंपनीला तुम्ही मिळवून दिलेला प्रॉफिट, ह्या कंपनीच्या क्लाएंट्सना तुम्ही दिलेली सर्व्हिस हे सगळं बघता तुमच्यापेक्षा योग्य ह्या प्रमोशनसाठी कोणी असूच शकत नाही. सो प्लिज एक्सेप्ट माय बेस्ट विशेस" म्हणून दीक्षितसरांनी समोरची महागडी शॅम्पेनची बाटली सानिकासमोर धरली. तिने हसून ती उघडली. सगळा ऑफिसचा स्टाफ तिला येऊन काँग्रॅट्स करत होता. त्यात वाळिंबेही होते.

"मिस. सानिका, आय मस्ट से, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुमच्यासाठी. लोकांचं आयुष्य जातं हे मिळवण्यात पण तुम्ही एवढ्या लहान वयात हे मिळवलं आहे. खरंच कमाल आहे. आता आपली स्पर्धा अजून चुरशीची होणार नाही का?" ते हसत त्यांच्या पोटावर हात फिरवत म्हणाले.

"थँक यु फॉर युअर काईन्ड वर्ड्स. आणि एकाच ऑफिसमध्ये राहून स्पर्धा कशाला करायची. शेवटी आपल्या दोघांचा हेतू ह्या कंपनीचा फायदा करून देणं हा आहे. मग आपापसात स्पर्धा करून काय होणार आहे." सानिका म्हणाली. तिचा हा बदललेला सूर बघून वाळिंबेंना पण आश्चर्य वाटलं. एरवी तर कायम त्यांच्यात शीतयुध्ध चालू असायचं आणि आज ती अगदीच निर्वाणीची भाषा करत होती. सगळ्यांशी बोलून झाल्यावर सानिका जरा शांतता मिळावी म्हणून तिच्या केबिनमधल्या खिडकीजवळ जाऊन उभी होती. हातातल्या शॅम्पेनच्या ग्लासकडे बघत. सगळे किती खुश होते तिच्या प्रमोशनची बातमी ऐकून. सगळ्यांनी तिला अगदी भरभरून शुभेच्छा पण दिल्या होत्या. पण तरीही ते यश अपूर्ण वाटत होतं तिला. कुठेतरी काहीतरी कमी वाटत होतं पण काय ते तिलाही समजत नव्हतं. एवढं मोठं यश पदरात पडूनसुद्धा मन मात्र रिकामं होतं. तेव्हढ्यात ऑफिसच्या पिऊनने तिच्या टेबलवर एक मोठा फुलांचा बुके आणून ठेवला. तिने कुतूहलाने त्यावरची चिठ्ठी वाचली. "काँग्रॅच्युलेशन्स सानू. आय होप ऑल युअर ड्रीम्स कम ट्रु! - समीर" 

गौतमी.. तिनेच सांगितलं असणार त्याला. ती चिठ्ठी वाचून अचानक तिच्या मनावरची मरगळ दूर झाली. आता तोही होता तिच्याबरोबर तिच्या ह्या यशात. एवढं सगळं होऊनही माझा एवढा विचार करतोस? त्याच्या नावावरून तिने प्रेमाने हात फिरवला. जणू काही त्यात त्याचा स्पर्श शोधायचा प्रयत्न करत होती ती. तेवढ्यात केबिनच्या दारावर कोणीतरी नॉक केलं त्याने ती भानावर आली.

"सानिका अगं तिकडे सगळे तुझं प्रमोशन सेलिब्रेट करतायत आणि तू इकडे काय करतेयस? बरं मला सांग, कसं वाटतंय तुला? एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे तुझ्यावर. पण मला खात्री आहे तू ही नवीन जबादारी सुध्दा अगदी सहज पार पडशील. वाळिंबेना आता एकदम तोडीस तोड प्रतिस्पर्धी मिळणार आहे. आर यु हॅप्पी?" नुकतेच तिच्या केबिनमध्ये शिरलेले दीक्षित सर हसत म्हणाले. 

"येस सर. आय एम व्हेरी हॅप्पी.." ती हसून म्हणाली. "पण ह्या प्रमोशनमुळे नाही. त्याच्यामुळे... आज त्याचं प्रेम जिंकलं आणि तुमच्यामुळे मला त्याची जाणीव झाली. थँक यु सो मच सर. जर तुम्ही मला हे प्रमोशन दिलं नसतं तर मला कळलंच नसतं माझ्या आयुष्यात काय मिसिंग आहे. अख्ख आयुष्य ह्याच्या मागे धावल्यावर पण आज जेव्हा प्रत्यक्षात हे यश हातात आलंय, मी खुश नाहीये. कारण तो नाहीये माझ्याबरोबर. त्याच्याशिवाय कशाला काही अर्थच नाहीये. त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सुख आणि दुःख मला अपूर्णच वाटेल." सानिका भरल्या डोळ्यांनी तिच्या हातातल्या चिठ्ठीकडे बघत होती. म्हणायला काही शब्द होते ते, पण त्यातूनही त्याचं प्रेम, त्यांच्या नात्यातला ओलावा जाणवत होतं तिला.  

"सॉरी सर, पण मला मिटिंगरूममध्ये नाही येता येणार. मला खूप तातडीने निघावं लागेल. आधीच खूप उशीर केलाय मी. आणि हो.. तुम्ही वाळिंबेना सांगा ह्यापुढे त्यांना माझ्याशी स्पर्धा करायची काहीच गरज नाही. कारण मी फार दिवस ह्या कंपनीमध्ये नसेनच आता. आय रिझाईन टुडे." म्हणून सानिका धावतच तिची बॅग घेऊन केबिनमधून बाहेर पडली. दीक्षितसर पूर्णपणे गोंधळून त्यांच्यासमोर बंद होणाऱ्या केबिनच्या दाराकडे पाहात होते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून सानिकाचं बोलणं त्यांच्या पूर्णपणे डोक्यावरून गेलं होतं हे कोणीही सांगू शकलं असतं.

क्रमशः!

🎭 Series Post

View all