चंद्र आहे साक्षीला! - भाग ५२
दिवसभर कामाच्या व्यापात व्यस्त असलेल्या सानिकाला दुपारी थोडा वेळ मिळाला तेव्हा तिने घरी फोन करून मिथिलाची चौकशी केली. तिचं रडणं आता थांबलं असलं तरी राग अजून गेला नव्हता. एकदा मनात विचार आला हितेनला फोन करून काय झालंय विचारावं पण त्यांच्या वैयक्तिक गोष्टीत मध्ये पडणं तिला पटत नव्हतं. शेवटी मनातले विचार बाजूला सारत ती परत कामाला लागली. दुपारी बारा वाजता मेहता त्यांच्या बाकीच्या टीमबरोबर ऑफिसात आले. ऑफिसमधल्या मोठ्या मिटिंग रूममध्ये त्यांच्या प्रोजेक्टचं पेपरवर्क फायनल होत होतं. सानिका स्वतः ते डोळ्यांखालून घालत होती. तिच्या टिममधले सगळेच त्यांच्या ह्या सर्वात महत्वाच्या क्लाएन्टला लागेल ती मदत करत होते. दिवसाची रात्र होत आली होती. साधारण संध्याकाळी ७ च्या सुमारास मेहतांची टीम प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स फायनल करून ऑफिसमधून निघाली. सानिका त्यांना सोडायला बाहेर आली होती. अजूनही थोडं काम बाकी होतं. तिने एकदा त्या मिटिंगरुमध्ये बसून मन लावून काम करणाऱ्या तिच्या टीमकडे बघितलं. त्या सगळ्यांनीच आज दिवसभर किती कष्ट घेतले होते. अक्षरशः तहान भूक विसरून सगळे काम करत होते. मनाशी काहीतरी ठरवून तिने एक फोन लावला आणि ती परत मीटिंगरूम मध्ये गेली.
तासाभराने सगळं काम आटोक्यात आल्यावर सगळेच जरा रिलॅक्स झाले होते. तेवढ्यात मीटिंगरूमचा दरवाजा उघडून ऑफिसचा पिऊन मोठे मोठे पिझ्झा बॉक्सेस आत घेऊन आला आणि समोरच्या टेबलवर ठेवले. दिवसभराच्या थकव्यानंतर सगळ्यांच्याच पोटात भुकेने कावळे थैमान घालत होते. त्यात गरमा गरम पिझ्झ्याच्या वासाने त्या सगळ्यांचीच भूक चाळवली. पण हे सगळं मागवलं कोणी? ते सगळे एकमेकांकडे बघत होते.
"अरे वाह, आपलं जेवण आलं वाटतं." नुकतीच मीटिंरूममध्ये शिरलेली सानिका हसून म्हणाली. सगळ्यांनीच तिच्याकडे आश्चर्याने बघितलं. हिने सगळ्यांसाठी जेवण मागवलं आहे?
"अरे असे काय बघताय? तुम्ही कोणीच सकाळपासून काही नीट खाल्लं नाहीये. पूर्णवेळ इकडे कामं करताय आणि आता रात्रीच्या जेवणाची वेळ होत आलीये म्हणून मागवलं मी. आवडतो ना पिझ्झा?" तिने त्यांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल बघून विचारलं.
"हो पिझ्झा तर आवडतोच मॅम, पण तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात." सागर ओशाळून म्हणाला.
"त्रास काय त्यात. मी स्वतःसाठी तर मागवलंच असतं ना काहीतरी. खरंतर मला तुम्हाला आज तुम्ही केलेल्या कामाबद्दल थँक यु म्हणायचं होतं. तुमच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आपल्याला आज मेहेतांचा प्रोजेक्ट सुरु करणं शक्य झालंय. त्यांच्या मागण्या अवास्तव होत्याच पण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने त्या हॅन्डल केल्यात त्याबद्दल मला खरंच तुमचं कौतुक वाटतं. इन फॅक्ट, हाच काय, ह्या आधी आपण जे काही प्रोजेक्ट्स एकत्र केले आहेत त्यामध्येही तुम्ही कायम तुमच्या परीने बेस्ट काम करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या सगळ्या क्लाएंट्स ना बेस्ट सर्विस देणं शक्य झालं आहे. सो तुम्ही आजपर्यंत केलेल्या ह्या मेहनतीबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. ह्यापुढेही आपण असेच एकत्र काम करत राहिलो तर आपले आत्ताचे सगळे प्रोजेक्ट्स एकदम यशस्वी होतील ह्याबद्दल मला काहीच शंका नाहीये. काँग्रॅच्युलेशन्स टू यु ऑल!" ती समोरचा सॉफ्टड्रिंकचा कॅन समोर करत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून समोर बसलेल्या तिच्या टीमच्या चेहऱ्यावर एकदम आनंदाचे भाव आले. त्यांचा दिवसभराचा थकवा कुठल्याकुठे पळाला. सगळे नुकत्याच आलेल्या पिझ्झ्यावर तुटून पडले. सानिका पण त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याशी गप्पा मारत होती.
"सागर, आपल्या मॅडम सुट्टीवरून आल्यापासून जरा बदलल्या आहेत असं नाही वाटत तुला? काही प्रॉब्लेम नसेल ना?" रश्मी सागरच्या कानाजवळ कुजबुजली.
"प्रॉब्लेम काय असणार?" त्याने गोंधळून विचारलं.
"नाही ते पिक्चरमध्ये दाखवतात तसं, आपल्या मॅडमच्या जागी दुसरंच त्यांच्यासारखं दिसणारं कोणी आलंय का? त्या आधी अशा कधी वागल्या नाहीयेत." ती अजूनही कुजबुजत होती.
"तुला काय करायचंय गं. पदरात पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं ना. चांगल्याच तर वागतायत आता. माझ्या बायकोने बोललेला नवस पूर्ण झाला वाटतं." सागर पिझ्झ्याचा मोठ्ठा तुकडा तोंडात कोंबत म्हणाला. त्यांचं जेवण चालू असतानाच दीक्षित सरांनी सानिकाला केबिनमध्ये बोलावून घेतलं.
"मे आय कम इन सर?" सानिकाने दरवाजा ठोठावत विचारलं. तिला बघून दीक्षित सरांच्या चेहऱ्यावर मोठ्ठ स्माईल आलं.
"सानिका, ये ये. बस. आय मस्ट से आज तुझ्या टीमने जे काम केलंय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. नाहीतर काही दिवसांपूर्वी हा प्रोजेक्ट आपल्या हातातून गेल्यातच जमा होता." ते म्हणाले.
"थँक यु सर." सानिका हसून म्हणाली.
"नो नो, थँक यु तर मी तुला म्हंटलं पाहिजे. तू तुझी सुट्टी कॅन्सल करून तातडीने इकडे आल्याबद्दल. पण बरं झालं तू सुट्टी घेतलीस ते. अगं केवढी बदलली आहेस तू. आधीपेक्षा किती फ्रेश वाटतेयस, कामाचा काही ताण नाही, चिडचिड नाही. आल्यापासून सगळ्यांशी हसत खेळत वागतेयस आणि तुझी टीमसुध्दा किती खुश आहे. आधी तुला बघून भीतीने कापायचे ते." दीक्षित सर हसत म्हणाले.
"हो सर. नक्कीच त्या सुट्टीची गरज होती मला. थँक्यू मला सुट्टी घ्यायला फोर्स केल्याबद्दल." सानिका म्हणाली. पण खरंच तिच्यामध्ये आलेला हा बदल फक्त त्या सुट्टीमुळे होता? की अजून कोणामुळे?
"बरं मी तुला फोनवर म्हणालो तसं तुला ह्या फर्ममध्ये प्रमोशन देणार आहे मी. इन फॅक्ट आपण आत्ताच मिटींगरूममध्ये जाऊन सगळ्यांसमोर ही अनाउन्समेंट करूया. त्यांना पण खूप आनंद होईल. मस्त काहीतरी सेलिब्रेशन पण करू मग ऑफिसमध्येच." दीक्षित सर म्हणाले. तेवढ्यात सानिकाच्या डोक्यात मिथिलाचा विचार आला. कामामुळे तिला लवकर निघणं जमलं नव्हतं पण मिथिला अशी घरी रडत बसली असताना इथे स्वतःचा आनंद साजरा करणं शक्य नव्हतं तिला.
"तुमची हरकत नसेल तर उद्या करूया का आपण सर? सॉरी म्हणजे मला जरा तातडीने घरी जावं लागेल एका पर्सनल कामासाठी आत्ता. प्रमोशन काय आज नाही तर उद्या मिळेलच की." ती म्हणाली. दीक्षितसर तिच्याकडे आश्चर्याने पाहात होते. त्यांच्यासमोर बसलेली सानिका आज त्यांना वेगळीच वाटत होती. पण फार आढेवेढे न घेता त्यांनी तिच्या निर्णयाला दुजोरा दिला आणि त्यांचा निरोप घेऊन सानिका ऑफिसमधून निघाली.
____****____
सानिका घरी पोहोचली तेव्हा हितेन आणि मिथिलाच्या आवाजाने तिची पाऊलं दारातच थबकली. त्यांचं बोलणं चालू असताना त्यांना आत जाऊन डिस्टर्ब करणं तिच्या जीवावर आलं होतं खरं पण तिचा नाईलाज होता. हळूच दरवाजा उघडून ती आत गेली तर सुदैवाने ते दोघं आतल्या खोलीत बोलत होते. ती तशीच जाऊन समोरच्या सोफ्यावर बसली.
"मिथू, सॉरी ना गं. मी खूप चुकीचं वागलो सकाळी मला मान्य आहे. आणि त्यासाठी मी तुला हवे तितके वेळा सॉरी म्हणायला तयार आहे. पण तू सुद्धा थोडं जास्तच बोललीस ना मला? एरवी सगळ्या गोष्टी तू शांतपणे ऐकून घेतेस आणि तुझ्या मनात काय चालू आहे ते मला कळूच देत नाहीस. जर तू मला आधीच सांगितलं असतंस की तुलाही घराबाहेर पडून स्वतःचं करिअर करायचं आहे तर मी तुला थांबवलं नसतं. पण आज तुझा अचानक असा उद्रेक झाला आणि मला कळलंच नाही मी काय केलं पाहिजे. शब्दाने शब्द वाढत गेला मग." हितेन मिथिलाची समजूत घालत होता.
"सगळं सांगावं का लागतं तुला हितेन? चोवीस तास माझ्याबरोबर राहून, माझ्या वागण्यातून कळत नाही का तुला माझ्या मनात काय चाललंय ते?" मिथिला अजूनही रुसून बसली होती.
"मान्य आहे मला नाही कळलं तुझ्या मनातलं. पण जगातल्या कुठल्याच पुरुषाला नाही कळत ना बायकोच्या मनातलं. हा तर जगतमान्य प्रॉब्लेम आहे की नाही? मग काय हरकत आहे तू मला तुझ्या तोंडाने सांगितलंस तुला काय हवंय ते? आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे ना. मग ते बोलून असो किंवा मनातलं ओळखून असो. आपल्या नात्यामध्ये इतका मोकळेपणा तर आहेच ना की तू तुझ्या मनातलं मला बिनधास्त सांगू शकतेस." हितेनचं तिला मनवणं चालूच होतं अजून.
"ते काही नाही हितेन. तुला माझी काही किंमतच नाहीये. मी एवढं सगळं करते तुझ्यासाठी, वेदासाठी, आपल्या घरासाठी.. तरी तू मात्र मी एखादी गोष्ट केली नाही तर त्यावरूनच बोलतोस मला. आज सकाळीपण तेच केलंस. केवढं बोललास तू मला माझं काही ऐकून न घेता. मी का सगळं विसरून तुझ्याबरोबर परत यायचं मग? फक्त तुझ्याबरोबर थोडासा एकांत मागितला होता ना मी. मग एवढं चिडायला काय झालं तुला? " मिथिला म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आता सानिकाला हितेनसाठी वाईट वाटत होतं. 'अशी काय ही, तो एवढा सॉरी म्हणतोय तर सोडून द्यायचं ना. कशाला उगाच एवढं ताणतेय.' तिने मनातच विचार केला.
"अगं पण त्याआधी तू जे काही बोललीस त्याने माझं पण डोकं सटकलं होतं ना. तू आपल्या संसारात इतकी नाखूष आहेस हे बघून मला वाईट वाटत होतं म्हणून माझी चिडचिड झाली. तुझ्या काळजीपोटीच होती ना ती? तूच माझी हक्काची आहेस ना मग अजून कोणावर चिडणार मी?" तिला मस्का मारत हितेन बोलला. त्यांच्या भांडणाचा आवाज आता कमी झाला होता. मध्येच वेदाचा हसण्याचा आवाजही येत होता. सानिका एक सुस्कारा सोडून किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी घेऊन आली. डोक्यात नुकत्याच ऐकलेलं मिथिला आणि हितेनच बोलणं घोळत होतं. तेवढ्यात मिथिला बाहेर आली, तिला सोफ्यावर बसलेलं बघून तिने विचारलं, "सानू, तू कधी आलीस?"
"ही काय आत्ताच आले. तुम्ही बोलत होतात म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला. काय गं भांडण मिटलं का?" तिने विचारलं . पण मिथिलाच्या हसऱ्या चेहऱ्यावरून तिचं उत्तर तिला आधीच मिळालं होतं.
"हो मिटलं. माझं जरा चुकलंच. गोष्टी वेळच्या वेळी सांगितल्या की गैरसमज कमी होतात. नाहीतर सगळं मनात साचून राहून त्याचा चुकीच्या पद्धतीने उद्रेक होतो. पण आता सगळं नीट आहे. बोलले मी हितेनशी. कम्युनिकेशन गॅपचा प्रॉब्लेम आहे गं. आपण सिनेमे वगैरे बघून काहीतरी खूळ डोक्यात भरवून घेतो. माझ्या मनातलं सगळं न बोलता कळलं पाहिजे, त्यानेच मला समजून घेतलं पाहिजे, त्यानेच भांडण सोडवायला पुढाकार घेतला पाहिजे..हे सगळे मनसुबे पिक्चरमध्ये ठीक वाटतात. पण प्रत्यक्षात तोंड उघडून घडाघडा बोललं की सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होतात. मग तुम्ही एकत्र रहा किंवा लांब रहा. दोघांमधला संवाद हीच कोणत्याही नात्याची गुरुकिल्ली आहे हेच खरं. शेवटी कोणतंही नातं टिकवणं ही दोघांची जबाबदारी असते ना. मग एकाकडूनच समजूतदारपणाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि खरं सांगू का, ह्या भांडणांमुळेच जवळ येतात नवरा बायको. नाहीतर नुसतं मिळमिळीत वाटतं सगळं." मिथिला हसून म्हणाली. "चल मी वेदाचं दूध गरम करायला जाते नाहीतर ती रडून घर डोक्यावर घेईल." म्हणून ती किचनमध्ये गेली पण सानिकाचं आता तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती स्वतःच्याच विचारात हरवली होती.
मिथिला आत जाऊन स्वयंपाकघरातून डोकावून सानिकाकडे बघत होती. सानिकाच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या हावभावांवरून तिच्या मनात चालू असलेल्या विचारांची मिथिलाला कल्पना आली होती. तिने तिच्या फोनवर नंबर फिरवला, "हॅलो, मला वाटतंय तीर सही निशाने पे लगा है. बघू आता काय होतंय." एवढंच बोलून तिने फोन ठेऊन दिला. तिच्यामागे नुकताच येऊन उभा राहिलेला हितेन तिच्याकडे गूढ नजरेने पाहात होता.
"काय कशी वाटली माझी ऍक्टिंग? बोललो होतो ना मी तुला, तुझ्यापेक्षा भारी नाटक मी करू शकतो. तुझाच विश्वास नव्हता माझ्यावर. आता सानिकाला काय ते लवकर समजू दे बाई नाहीतर ह्यांच्या लव्हस्टोरीच्या नादात माझा संसार मोडायचा." तो तिच्या कानापाशी कुजबुजला. तेवढ्यात वेदाच्या रडण्याने दोघं भानावर आले.
"हं हे घ्या आणि द्या तुमच्या लेकीला." मिथिलाने त्याच्या हातात दुधाची बाटली टेकवली आणि त्याला आत पिटाळलं. पुन्हा एकदा तिची नजर बाहेर गोंधळून उभ्या असलेल्या सानिकाकडे गेली. "सानू, आम्हाला सगळ्यांना जे दिसतंय ते तुला का नाही दिसत आहे गं . प्लिज फार उशीर नको करुस."
क्रमशः!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा