चंद्र आहे साक्षीला - भाग ४

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

(मागच्या भागात ..

"मिस. सानिका.." इतकावेळ दारात शांतपणे उभे राहून सानिकाचा उद्वेग बघत असलेले दीक्षित सर कडाडले. सगळ्यांच्या नजर त्यांच्याकडे वळल्या. 

"आत्ताच्या आत्ता माझ्या केबिनमध्ये या." म्हणून दीक्षित सर तिकडून निघून गेले. सानिकाने तिच्या टीमकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती सरांच्या पाठोपाठ निघाली. )

"मे आय कम इन सर?" सानिकाने बिचकत विचारलं. 

"हो अर्थात, मीच बोलावलं आहे ना तुला? ये आत, बस!" दीक्षित सर त्यांच्या प्रशस्त केबिन मधल्या खुर्चीत बसून म्हणाले. सानिका आत येऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. त्यांनी फोनकरून रमेशला चहा पाठवायला सांगितला. मोजून पाच मिनिटांत तो चहा घेऊन आत आला. तोपर्यंत कोणीच काहीच बोललं नाही. सरांच्या टेबलवर फाईल्सचा खच पडला होता. तो बाजूला सारून त्यांनी चहा ठेवायला जागा केली. रमेश गेल्यावर सरांनी हातानेच सानिकाला चहा घ्यायची खूण केली. त्यांच्या काचेच्या पारदर्शक केबिन बाहेर बसलेली सानिकाची टीम अधूनमधून त्यांच्या दिशेने चोरटे कटाक्ष टाकत होती. सानिकाला त्यांच्या नजरा जाणवत होत्या. 'ह्यांना आनंदच होत असेल. आज मला शिव्या पडणार आहेत हे बघून.' सानिकाने स्वतःशीच विचार केला. 

"सानिका, आजच्या मीटिंगमध्ये काय झालं सांगशील का मला?" दीक्षित सरांनी चहाचा घोट घेत विचारलं. 

"सर, सॉरी. मी खूप प्रयत्न केले. पण डील नाही मिळालं मला. ठीक आहे ना, वाळिंबेंच्या टीमला तर मिळालं. कंपनीचा फायदा होणं महत्वाचं. " सागरचं बोलणंच पुढे करत सानिका म्हणाली.

"मी त्याबद्दल बोलत नाहीये. तुझा जो उद्रेक झाला त्या मिटिंग नंतर त्याबद्दल विचारतोय मी. बाहेरच्या लोकांसमोर हे असलं वागणं बरं दिसतं का? त्याने आपल्या कंपनीची किती नाचक्की होईल माहितीये तुला? हे असं वातावरण असतं आपल्या कंपनीमध्ये असं दाखवायचंय का तुला बाहेरच्या लोकांना?" त्यांनी जरा कठोरपणे विचारलं. 

"पण सर मी त्यांच्यासमोर नाहीच बोलले. ते गेल्यावर बोलले. मला नाही वाटत त्यांनी काही बघितलं असेल." सानिका म्हणाली. 

"ओके. आणि आपल्या ऑफिसमधल्या लोकांचं काय? केवढं बोललीस तू तुझ्या टीमला. अगं एक डील मिळालं नाही म्हणून एवढा अपमान? इतके वर्ष तुझ्यासाठी त्यांनी इतक्या प्रोजेक्ट्स वर काम केलंय ते सगळं एका क्षणात विसरलीस तू?" दीक्षित सर म्हणाले. त्यांचा आवाज आता जरा नॉर्मल झाला होता.

"ह्यात पूर्ण चूक माझीच आहे का सर? त्यांना कोणालाच कशाची जाणीव नाहीये. एवढ्या महत्वाच्या मिटिंगसाठी धड तयारी केली नव्हती त्यांनी. काल रात्री मी स्वतः जागून रात्री बाराला काम पूर्ण करून त्यांनी ईमेल केला कि सकाळी आठला ऑफिसला या तर कोणीच आलं नव्हतं. प्रत्येक ठिकाणी त्यांना हाताला धरून सगळं शिकवायला मी त्यांची आई नाहीये, बॉस आहे." सानिकाने आपली बाजू मांडली. दीक्षित सर शांतपणे तिचा त्रागा ऐकत होते. 

"त्या सागरला मी एवढी महत्वाची जबाबदारी दिली आणि त्याने काल सुट्टी टाकली. आज सकाळी उशिरा आला. का तर म्हणे बायकोची काळजी घ्यायची होती. त्या सुप्रियाला मुलीला शाळेत सोडायचं होतं. एक दिवस नवऱ्याला पाठवायचं ना. कामाची काही जबाबदारी आहे की नाही?" सानिका पुढे म्हणाली.

"तुला असं म्हणायचंय का की त्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या लोकांकडे दुर्लक्ष करून तुझ्या प्रेझेन्टेशनला जास्त वेळ द्यायला हवा होता. असं का करतील ते? त्यांना जेवढा पगार मिळतो तेवढं किंबहुना त्यापेक्षा जास्तच काम करतात ते." सर त्यांचा चहाचा कप खाली ठेवत म्हणाले. 

"सर? हे तुम्ही म्हणताय? त्यांच्या अशा वागण्याने तुमच्याच कंपनीचं नुकसान होतंय ना?" सानिकाने आश्चर्याने विचारलं. 

"माझ्या कंपनीचं काय नुकसान झालं? डील मिळालं की आपल्याला." दीक्षित सर हसून म्हणाले. 

"पण माझं तर नुकसान झालं ना? माझं प्रमोशन गेलं." सानिका न राहवून म्हणाली. 

"अच्छा, म्हणजे तुझं प्रमोशन सागरसाठी इतकं महत्वाचं असलं पाहिजे की त्यासाठी त्याने त्याच्या प्रेग्नेंट आजारी बायकोला घरी एकटं सोडून ऑफिसमध्ये यायला हवं किंवा सुप्रियाने तिच्या मुलीची शाळा बुडवून लवकर मीटिंगला यायला हवं? " दीक्षित सर विचार करत म्हणाले.

"सानिका, आज मी तुला तुझा सर म्हणून नाही तर तुझा मित्र म्हणून काहीतरी सांगणार आहे. तुझ्यापेक्षा वीस वर्ष जास्त काम करण्याचा अनुभव आहे ह्या हक्काने तुला काही सल्ला देणार आहे. तो कितीही कटू असला तरी सत्य आहे हे लक्षात ठेऊन समजून घ्यायचा प्रयत्न कर. हे जे तू म्हणत्येस ना, की बाकीच्यांना काही महत्वाकांक्षा नाहीत, त्याला त्यांचा आळशीपणा किंवा नाकर्तेपणा नाही म्हणत. त्याला वर्क लाईफ बॅलन्स म्हणतात. बाहेर बसलेल्या प्रत्येकाचं ह्या ऑफिसच्या बाहेर एक आयुष्य आहे. वैयक्तिक आयुष्य. माणूस पैसे कमावण्यासाठी जी नोकरी करतो ना ते त्याचं वैयक्तिक आयुष्य सुखावह व्हावं म्हणूनच करतो. आपल्या जवळच्या माणसांशिवाय हे यश, पैसे सगळं व्यर्थ आहे अगं. पण म्हणून महत्वाकांक्षा असणं वाईट आहे का? अजिबात नाही. फक्त प्रत्येक माणसाच्या  गरजा, प्रायॉरिटीज वेगळ्या असतात. आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. तू रात्री बारा पर्यंत जागून काम केलंस आणि ईमेल केलास म्हणून बाकी सगळ्यांनी तो वाचून सकाळी लवकर आलं पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे." दीक्षित सर बोलत होते. सानिकाला काय बोलावं कळत नव्हतं. 

"आणि वैयक्तिक आयुष्य त्यांनाच नाही, तुला पण आहेच की. तू शेवटची सुट्टी कधी घेतली आहेस सांग?" सरांनी विचारलं. 

"मी सुट्टी घेतच नाही सर. मला माझं वैयक्तिक आयुष्य त्याशिवायच मॅनेज करता येतं." सानिका अभिमानाने म्हणाली. 

"तेच मी म्हणतोय. तू शेवटची सुट्टी ३ वर्षांपूर्वी घेतली आहेस. आपली कंपनी सगळ्या कर्मचाऱ्यांना वर्षाला वीस सुट्ट्या देते. तू त्यातली एकही घेतली नाहीयेस तीन वर्षात. असं का?" दीक्षित सरांनी विचारलं. 

"मला काही गरजच नव्हती सुट्टीची म्हणून नाही घेतली." सानिकाला कळत नव्हतं हे सगळं संभाषण अचानक तिच्या सुट्यांवर का घसरलं होतं. 

"कंपनी ह्या ज्या सुट्ट्या देते त्याच्या मागे काही कारणं आहेत. लोकं सतत काम करून बर्न आऊट होऊ नयेत हे त्यातलं एक महत्वाचं कारण. तुझी सध्या जी चिडचिड चालू आहे, त्या मागचं कारण हेच आहे की तु कामातून गेली कित्येक वर्ष ब्रेकचं घेतला नाहीयेस. तुझं दुपारचं जेवण तू तुझ्या केबिनमध्येच बसून करतेस, काम करत. मी तुला कधी कोणाबरोबर कॉफी पिताना बघितलं नाहीये का कोणत्या पार्टीमध्ये बघितलं नाहीये. ह्या सगळ्यामुळे तुझं मन आणि डोकं दोन्ही थकत चाललंय असं नाही वाटत तुला?" दीक्षित सरांनी सानिकाला विचारलं. 

"पण मला माझं काम म्हणजे ओझं वाटतंच नाही. त्यामुळे त्यातून बदल म्हणून सुट्टी घ्यावी असं मला कधी वाटलंच नाहीये. आणि मी सुट्टी घेत नाही ही कंपनीसाठी आनंदाची गोष्ट आहे ना? मग तुम्ही त्यासाठी मला का दोष देताय?" सानिका तक्रारीच्या सुरात म्हणाली.

"अगं तुला दोष कोण देतंय? तुला असं वाटत असेल कि तू काम एन्जॉय करतेयस आणि ते खरंही असेल. मी तुला तुझ्या ह्या कंपनी मधल्या पहिल्या दिवसापासून बघतोय की. तुझी हुशारी, कष्ट मी नाकारत नाहीच आहे. पण तुझ्या प्रगती बरोबर तुझ्यात झालेले बाकीचे बदलही बघतोय ना मी. आधी तू अशी माणूसघाणी, अलिप्त नव्हतीस. सुट्ट्या घेऊन फिरायला जायचीस, ऑफिसमधल्यांशी बोलायचीस. पण काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन आल्यापासून तू बदलली आहेस. तेव्हापासून तू कामात स्वतःला एवढं झोकून दिलं आहेस की बाकी कोणत्या गोष्टींचं तुला महत्वच राहिलं नाहीये. मला असं वाटतं तू थोडे दिवस सुट्टी घ्यावीस आणि काहीतरी वेगळं करावंस." दीक्षित सर समजावणीच्या सुरात म्हणाले.  त्यांचं बोलणं ऐकून सानिका दचकलीच. 

"सुट्टी घ्यायची म्हणजे? तुम्ही मला कामावरून काढून टाकायचा विचार करताय का?" तिचा सूर आता रडवेला झाला होता. त्यावर दीक्षित सर खळखळून हसले. 

"तू पण ना सानिका. अगं मी तुला सुट्टी घ्यायला सांगतोय. लोकांचं स्वप्न असतं की त्यांच्या बॉसनी त्यांना सुट्टी द्यावी. आणि मी ते करतोय तर तुझा चेहरा असा का झालाय?" दीक्षित सर म्हणाले आणि सानिकाचा जीव भांड्यात पडला. 

"असं होय. नको सर, मी ओके आहे, मला सुट्टी नकोय. माझं खूप काम राहिलंय अजून. नंतर कधीतरी घेईन मी सुट्टी." सानिका आवंढा गिळत म्हणाली. 

"सानिका, तू ह्या माझ्या टेबलवर पडलेल्या फाईल्स बघतेयस? तुला असं वाटत असेल की सर काही काम करत नाहीत. मला विचारणारं कोण आहे. काम केलं काय किंवा नाही केलं काय. पण तसं नाहीये. मी दिवसातून दोन फाईल्स संपवल्या तर अजून तीन फाईल्स माझ्या टेबलवर हजर होतात. त्यामुळे काम कधी संपत नाहीच. सुट्टी घेण्यासाठी तू त्याची वाटत बघत असशील तर तुला रिटायर होईपर्यंत थांबावं लागेल." दीक्षित सर समोरच्या फाइल्सवरून डोळे फिरवत म्हणाले. 

"नको सर. पण आत्ता सुट्टी खरंच नको." सानिका विनवणीच्या सुरात म्हणाली. 

"ठीक आहे, तू प्रेमाने सांगून ऐकणार नसशील तर मला थोडी बॉसगिरी करावीच लागेल. मिस. सानिका पाध्ये तुम्ही उद्यापासून दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाताय. अँड इट्स ऐन ऑर्डर!" सर म्हणाले आणि सानिका तोंड उघडं ठेऊन त्यांच्याकडे बघतच बसली. 

दीक्षित सरांशी बोलून सानिका बाहेर आली तेव्हा तिचं मन सुन्न झालं होतं. आज सकाळी ती ऑफिसमध्ये आली तेव्हा मि. मेहेतांच्या कंपनी बरोबर डील फायनल करून एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करायला ती उत्सुक होती. आणि आता दिवस मावळताना तो प्रोजेक्ट तर तिच्या हातातून गेलेलाच वर तिच्या नोकरीचीही शाश्वती नव्हती. दीक्षित सरांनी तिला दोन महिने सुट्टी घ्यायला सांगितली होती? दोन महिने? ऑफिसमध्ये एवढं काम असताना तिच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला असं जबरदस्ती सुट्टीवर पाठ्वण्यामागे त्यांचा काय हेतू असेल? तिच्याजागी दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक करून ती सुट्टीवरून परत आल्यावर तिला काढून टाकायचं अशी योजना असेल का सरांची? सानिका स्वतःच्याच विचारांत हरवली होती. काळजीने आणि पुढे काय होईल या अनिश्चिततेने तिच्या पोटात खड्डा पडला होता, त्यात तिने सकाळपासून काही खाल्लंही नव्हतं. ती केबिनमधून बाहेर पडल्या पासून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. समोरून येणाऱ्या वाळिंबेंनीही तिच्याकडे एक करुण कटाक्ष टाकला. त्याने सानिका च्या अंगावर शहारा आला. ती ह्या सगळ्यांच्या नजर चुकवण्यासाठी ऑफिसच्या गच्चीवर गेली. समोर मरीन ड्राईव्हचा अफाट समुद्र पसरला होता. वरवर शांत दिसत असला तरी आतून त्यातही लाटांचा कल्लोळ उठला असणार.. सानिकाच्या मनासारखाच. दूर क्षितिजावर सूर्य मावळत होता, सगळ्यांचा निरोप घेत. पण त्यालाही माहिती होतं की उद्या पुन्हा त्याला त्याच्या नेहमीच्या ठिकाणी उगवायचं आहे. पण सानिका? तिची उद्याची आणि त्यानंतरची येणारी प्रत्येक सकाळ कशी असणार होती? गेली कित्येक वर्ष नियमित न चुकता रोज सकाळी आठ ला घर सोडून, तिच्या नेहमीच्या 'गपशप' कॅफेमधून कॉफी घेऊन नऊला ती तिच्या केबिनमध्ये तिच्या कामाच्या पसाऱ्यात हरवलेली असायची. गेली आठ वर्ष तिने न चुकता हेच रुटीन जगलं होतं. आणि आज अचानक तिला उद्या काय करायचा ह्याचा प्रश्न पडला होता. समुद्राच्या आर्द्र हवेने तिचा चेहरा ओलसर झाला, त्याने की तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून ओघळलेल्या अश्रूंनी? स्वतःला सावरून ती पुन्हा खाली आली तेव्हा सागर आणि रश्मी दीक्षित सरांच्या केबिन मधून बाहेर पडत होते. 'ह्यांनाही कळलं असेल?' सानिकाचे गाल शरमेनं लाल झाले. 

"मॅडम, सर म्हणाले तुम्ही काही दिवस सुट्टीवर चालला आहेत. इकडची काहीच काळजी करू नका. आम्ही सगळं सांभाळून घेऊ." सागर म्हणाला. त्यावर सानिका नुसतीच हसून तिच्या केबिनमध्ये आली. खरंतर पुढच्या महिनाभराच्या कामांची यादी तिच्या टेबलावर पडली होती. पण आज झालेल्या घटनांनंतर तिला कोणालाच काही कामं सांगायची किंवा कोणाशी काही बोलायचीही ईच्छा उरली नव्हती. तिला बाय म्हणण्यासाठी  सगळी टीम निघताना तिच्या केबिनमध्ये येणार आहे असं बाहेर सागर म्हणाला होता, पण त्यांच्या डोळ्यांत तिच्यासाठी असलेली कीव बघण्यात सानिकाला काहीच रस उरला नव्हता. ती थकली होती, ऑफिसमधल्या कामांचं ओझं वाहून, जी कामं तिनेच स्वतःवर ओढवून घेतली होती. ती थकली होती, तिच्या एकटेपणाला, पण त्यासाठीही तीच जबाबदार होती. ती थकली होती, तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या ह्या बदलला सामोरं जाताना पण त्यात तिची साथ द्यायलाही कोणी नव्हतं. सानिकाने एकवार बाहेर बसलेल्या, गप्पा गोष्टी करत काम करणाऱ्या तिच्या टीमकडे बघितलं. त्यांना ती गेल्याची पोकळी कदाचित जाणवणारही नव्हती. तिने तिच्या टेबलवरची कामाची यादी फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली. 

निघताना ठरल्याप्रमाणे सागर आणि रश्मी बाकीच्या टीमला घेऊन सानिकाला भेटायला आले. पण त्यांना उशीर झाला होता. सानिका कधीच ऑफिसमधून निघून गेली होती.

🎭 Series Post

View all