चंद्र आहे साक्षीला! - भाग ४७ 

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ४७ 

सकाळी आशाताईंच्या आवाजाने सानिका जागी झाली. "सकाळी सकाळी कोणाशी बोलतेय ही एवढ्या मोठ्याने." ती डोळे चोळत खाली आली. तिने समोर बघितलं आणि ती गप्पच बसली.  आशाताई आणि समीर दोघं एकदम तयार होऊन गप्पा मारत बसले होते. सानिकाने स्वतःकडे बघितलं. 'कायम असं का होतं माझ्याबाबतीत. सगळे छान कपडे घालून तयार असतात आणि मी नाईट ड्रेसमध्ये.' तेवढ्यात तिची नजर समीरकडे गेली. तिला बघून तो पटकन पुढे आला.

"सानू, एकटी कशाला आलीस खाली. आवाज द्यायचास ना. उगाच पायावर फार वजन नको पडायला." त्याने तिचा हात धरत विचारलं. आशाताई कौतुकाने त्याच्याकडे बघत होत्या. आपल्या लेकीची आपल्याइतकी काळजी घेणारं कोणीतरी आहे हे बघून त्या खुश झाल्या. सानिका तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होती.

"तू कितीही प्रयत्न कर, मी काही तुझा हात सोडणार नाहीये आता कधीच." तो तिच्या कानाजवळ कुजबुजला. ती मनातून सुखावली पण दुसऱ्याच क्षणी तिला तिचा आदल्या दिवशीचा निर्णय आठवला. 'फोकस सानिका, गोष्टी अजून कठीण करून ठेऊ नकोस.'

"तुम्ही दोघं एवढे तयार होऊन कुठे निघालात?" तिने समोरच्या खुर्चीवर बसत विचारलं.

"अगं आज गावात ईमरजेन्सी सभा आहे. गेल्या दोन दिवसात जे काही झालं त्याबद्दल जाणून घ्यायला सगळेच उत्सुक आहेत. मग सगळ्यांना वेगवेगळं सांगत बसण्यापेक्षा एकत्र बोलावून सांगणार आहेत पोलीस आणि बाकीची काही लोकं." आशाताई म्हणाल्या "तू पण पटकन तयार होऊन ये बरं सानू." त्या म्हणाल्या तशी सानिका आवरायला उठली. 

"आई गं.." पटकन उठायच्या नादात ती तिच्या पायावर जोर देऊन उभी राहिली आणि तिचा बॅलन्स गेला. समीरने पटकन पुढे येऊन तिला पकडलं. तिनेही आधारासाठी त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हात गुंफले.

"मिठीच मारायची होती तर सांगायचं ना मला. मी मारली असती. त्यासाठी पडायचं कशाला!" समीर फक्त तिलाच ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला. तिचे गाल लाल झाले. दोघं एकमेकांकडे बघत होते आणि आशाताई त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होत्या. 

थोड्यावेळाने सानिका आवरून खाली आली आणि तिघं गावच्या शाळेकडे जायला निघाले. त्यांच्या बंगल्यांच्या दारातच समीरची गाडी उभी होती. तिच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर जेमतेम दहा मिनिटांचं होतं, पण त्यातही तिला त्रास होऊ नये म्हणून तो गाडी घेऊन आला होता. तो सानिकाला हाताला धरून गाडीपाशी घेऊन गेला. गाडीचा दरवाजा उघडून त्याने अलगद तिला आत बसवलं आणि मागचा दरवाजा आशाताईंसाठी उघडला. पण आशाताई मात्र तशाच दारात घुटमळत होत्या. त्या दोघांना थोडा एकांत मिळावा असं त्यांना मनापासून वाटत होतं म्हणून त्या जोश्यांना बोलवायच्या कारणाने तिकडून सटकल्या आणि समीर ड्रायविंग सीटवर येऊन बसला. सानिकाला आता अचानक तो एकांत खायला उठत होता. त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होती ती पण बाकी सगळे त्यांना जवळ आणण्याची एक संधी सोडत नव्हते. ती स्वतःच्याच विचारात हरवली असताना समीर पटकन तिच्या जवळ आला. तिने दचकून त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यांत बघत त्याने साईडचा सीटबेल्ट तिला लावला. मागच्या सीटवरून एक उशी घेऊन ती तिच्या दुखावलेल्या पायाखाली ठेवली आणि तो मागे झाला. सानिका त्याच्या काळजीने हेलावून गेली. तिने तिच्या डोळ्यातलं पाणी लपवायला पटकन खिडकीबाहेर बघितलं.

____****____

दोघं शाळेच्या आवारात पोहचले तेव्हा बाकी सगळे तिकडे आधीच पोहोचले होते. सानिकाला बघून चंदूने धावत जाऊन खुर्ची आणली. "थँक यु चंद्या. पण एवढी काळजी नका करू माझी. मी ठीक आहे. थोडावेळ उभी राहिले असते की." ती म्हणाली. 

"असं कसं, तू आजची उत्सवमूर्ती आहेस. म्हणून तुला स्पेशल सीट. आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? पाय पटकन बरा व्हायला हवा असेल तर त्याला आराम द्यायचा. मग?" चंद्या म्हणला. सानिका नाईलाजाने खुर्चीत बसली. बाकी सगळेही बसले आणि सभेला सुरवात झाली. 

"तर आपल्या गावामध्ये गेल्या एक दोन दिवसात झालेल्या घडामोडींबद्दल जाणून घ्यायची ईच्छा तुम्हाला सगळ्यांनाच असेल. म्हणूनच आज तातडीने ही सभा आपण बोलावली आहे. आपल्याबरोबर आज इकडे आपल्या पंचक्रोशीतले इन्स्पेक्टर पवार उपस्थित आहेत. ते गेले काही दिवस ह्या केसचा तपास करत होते. ते आपल्याला घडलेल्या घडामोडींबद्दल सविस्तर माहिती देतील."  म्हणून जाधवांनी सभेची सूत्र इन्स्पेकटर पवारांच्या हातात दिली.

"नमस्कार!" इन्स्पेक्टर पवार गावासमोर उभे राहून बोलत होते. "गावाबाहेरच्या जंगलातून पकडलेले चार गुंड हे एका ह्यूमन ट्रॅफिकिंग करणाऱ्या टोळीचे मेम्बर्स आहेत. गेले काही महिने ही टोळी कोकणातल्या आणि आसपासच्या गावांमध्ये सक्रिय होती. गावांमधली पोलीस व्यवस्था मोठ्या शहरांइतकी तत्पर आणि पुढारलेली नसते ह्याचा फायदा घेऊन ते छोट्या छोट्या गावांमधून मुलींना फसवून मुंबई मधल्या मोठ्या गँग्सच्या हवाली करत होते. ह्या बदल्यात त्यांना चांगला मोबदलाही मिळत होता. काही मुलींना मुंबईसारख्या शहरातल्या आलिशान आयुष्याची स्वप्न दाखवून फसवून नेलं जात होतं तर काहींना बळजबरीने त्यांच्या मनाविरुद्ध. कुठल्याही गावाच्या आसपास डेरा टाकून मुलगी हेरायची आणि पुढचा प्लॅन अमलात आणायचा हे त्यांनी गेल्या सहा महिन्यात जवळपास दहा गावांच्या बाबतीत केलं आहे. हे अर्थातच गावातल्या कोणाच्या मदतीशिवाय शक्य नाहीये. कणवलीमध्ये उघडलेल्या दारूच्या दुकानाचा मालक ह्या लोकांना मिळाला होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेऊन होता आणि त्यांची माहिती तो ह्या लोकांना देत होता." पवार पाणी पिण्यासाठी बोलायचे थांबले. गावातले सगळे आपापसात कुजबुजत होते.

"अशातच त्या दारूच्या दुकानाच्या मालकाने निमकरांना हेरलं आणि त्याची नजर पिहूवर पडली.  अठरा-एकोणीस वर्षांचा एक मुलगाही ह्या गँगमध्ये सहभागी होती. हा तोच मुलगा ज्याला तुम्ही डोक्यात रॉड मारून बेशुद्ध केलं होतंत." ते सानिकाकडे बघून म्हणाले. 

"त्या मुलाने आधी निमकरांच्या माध्यमातून पिहूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचाही प्रयत्न केला. पण पिहू त्याला बळी पडली नाही. प्रेमाने ऐकत नाही हे बघितल्यावर त्यांनी जबरदस्तीने तिला घेऊन जायचा प्लॅन बनवला. हे करताना आधी त्यांनी तिच्या घरच्यांच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण केला. जेणेकरून उद्या पिहू गायब झाली असती तरी त्यांना वाटलं असतं ती स्वतःच्या मर्जीने कोणा मुलाबरोबर पळून गेली आहे. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला नसता. पण झालं उलटंच. मिस. सानिका ह्यांनी त्यांचा पूर्ण प्लॅनच उधळून लावला. ह्या सगळ्यांत वेळ खूप महत्वाची होती. कोणत्याही मुलीला गायब केल्यावर ही गॅंग एका दिवसापेक्षा जास्त त्या गावात थांबत नाही. ते पिहूला घेऊन त्यादिवशी रात्रीच इकडून निघणार होते. जर त्यांनी हे गाव सोडलं असतं तर तिला शोधणं खूपच कठीण झालं असतं. मिस. सानिका वेळेत तिकडे पोहोचल्यामुळेच पिहू आपल्याला सापडू शकली आणि ते गुंडही. आम्ही ह्या सगळ्या प्रकारची सविस्तर माहिती आमच्या वरिष्ठांना पाठवली आहे. ह्यापुढे कणवली सारख्या गावांमधली कायदा आणि सुव्यवस्था वाढवण्यासाठी ते स्वतः लक्ष घालणार आहेत. पण मला ह्या गावातल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. तुमच्या एकीमुळे आणि धाडसामुळे तुम्ही ह्या अवैध टोळीला आळा घालण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे. खासकरून मिस. सानिका तुम्ही.. एक मुलगी असून एवढी मोठी जोखीम उचलणं, एवढी मोठी रिस्क घेणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे." पवार पुढे म्हणाले. "तुमच्या ह्या कामगिरीसाठी आम्ही आज पंचक्रोशीतल्या गावांतर्फे तुमचा इथे सत्कार करणार आहोत." 

संपूर्ण गावाच्या नजरा सानिकाकडे वळल्या. तिने अवघडून आजूबाजूला बघितलं आणि ती खुर्चीवरून उठून उभी राहिली. पवारांनी पुढे येऊन तिला पुष्पगुच्छ आणि एक छोटं मेडल दिलं. संपूर्ण गावाने उभं राहून तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. सानिकाचं मन भरून आलं. समीरही अभिमानाने तिच्याकडे पाहात होता.  

"मिस. सानिका, तुम्ही दाखवलेल्या धाडसाबद्दल आणि समयसूचकतेसाठी हे गाव तुमचं ऋणी राहील. अ बिग थँक यु फ्रॉम ऑल ऑफ अस! ह्या प्रसंगी तुम्हाला काही बोलायला आवडेल का?" पवारांनी विचारलं. सानिकाने गळ्यात आलेला आवंढा गिळला आणि बोलायला सुरवात केली. 

"कुठून सुरवात करू कळत नाहीये. आज ह्या सत्काराची वगैरे अपेक्षाच केली नव्हती मी. खरंतर थँक यु मी तुम्हाला म्हंटलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी ह्या गावात आले तेव्हा वैयक्तिक आयुष्यात खूप उलथापालथ झाली होती माझ्या. त्यातून सुटका म्हणून बारा वर्षानंतर ह्या गावात पाऊल ठेवलं मी. पण आल्या दिवसापासून पुन्हा परत जायची ओढ लागली होती मला. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी इकडच्या छोट्या छोट्या उपक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. ते करत असताना कशी ह्या गावात आणि इथल्या लोकांमध्ये गुंतत गेले मलाही कळलं नाही. मुंबईच्या रुक्ष आयुष्यातून इथे आल्यावर इथल्या लोकांनी जो मायेचा ओलावा मला दिला त्यातून माझ्या कोमेजलेल्या मनाला पालवी फुटत होती. माझ्या आयुष्यातून ह्यापूर्वी हरवलेली नाती मला इकडे नव्याने मिळत होती. कणवली युथच्या सगळ्या मेम्बर्सच्या रूपात मला खूप मस्त फ्रेंड्स मिळाले. आपल्या पलीकडे एक जग असतं आणि त्याचं आपण काही देणं लागतो ही भावना त्यांच्यामुळे मनात रुजली. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला खूप मोठं मन लागतं आणि तुम्हा सगळ्यांकडे आहे .. समीर, गौतमी, लावण्या, चंदू आणि गोपाळ.. थँक यु माझी पुन्हा एकदा माणुसकीशी ओळख करून दिल्याबद्दल." तिने थांबून त्या सगळ्यांकडे बघितलं. त्या सगळ्यांनीही हसून तिला प्रतिसाद दिला.

"ह्यांच्याबरोबरच गावातल्या बाकीच्या लोकांनीही माझ्यावर खूप जीव लावला आणि त्यातली दोन सगळ्यात महत्वाची माणसं म्हणजे वैद्य काका काकू. ह्या गावात आल्यापासून तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम केलंय ते मी कधीच नाही विसरू शकत. आपल्या आईशिवाय इतर कोणासाठी आपण इतके स्पेशल असू शकतो हे आयुष्यात पहिल्यांदाच जाणवलं आणि ती भावना खूप सुखावह होती माझ्यासाठी. थँक यु मला एवढं निरपेक्ष प्रेम दिल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यातली वडील ह्या नात्याची पोकळी भरून काढल्याबद्दल." तिने भरल्या डोळ्यांनी वैद्यकाका आणि काकूंकडे बघितलं. त्यांनाही गहिवरून आलं.

"ह्या गावाच्या मासिक सभा, छोटे छोटे उपक्रम सगळं खूप एन्जॉय केलं मी.. इकडच्या वेगवगेळ्या उपक्रमात सहभागी होताना बाकीच्या लोकांशीही नकळत जोडले गेले मी. आपल्या गावच्या शाळेतल्या मुलांची सानिकाताई झाले मी. त्यांना शिकवताना, त्यांच्याबरोबर वेळ घालवताना माझ्या बालपणीच्या आठवणीही पुन्हा ताज्या होत होत्या. त्या वयात केलेली मस्ती, मज्जा, भरभरून एन्जॉय केलेली आयुष्यातली छोट्यातली छोटी गोष्ट सगळं पुन्हा एकदा जगले मी. नवीन जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या माझ्यातल्या निरागस, अल्लड सानिकाने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला. मला ही संधी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही एवढं काही भरभरून दिलं आहे मला की त्यासमोर मी केलेली ही छोटीशी गोष्ट काहीच नाही. आभार तुम्ही माझे नाही मी तुमचे मानले पाहिजेत." सानिका बोलताना थांबली. गावकरी सगळे मन लावून तिचं बोलणं ऐकत होते. 

"तुम्हाला प्रश्न पडला असेल मी आज अचानक हे आभार प्रदर्शन का करतेय, नाही का? कारण मला माहित नाही परत ही संधी मला कधी मिळेल. आज तुम्ही सगळेच इथे आहात म्हणून सांगते.. मी उद्याच मुंबईला जायला निघतेय." सानिका म्हणाली आणि समोर एकच गोंधळ उडाला. 

"काय? पण अशी अचानक का चाललीयेस तू मुंबईला? तू अजून राहणार होतीस ना?" पिहूने विचारलं.

"अगं पण तू अजून बरी कुठे झालीयेस?" जाधव काकूंनी विचारलं.

"सानू, तू तर पुढच्या आठवड्यात जाणार होतीस ना?" गौतमीने विचारलं.

सगळेच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते. पण तो एकटाच निःशब्द होऊन तिच्याकडे बघत होता. डोळ्यांत पाणी आणून. खूप शिताफीने ती त्याच्याकडे बघायचं टाळत होती पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिचं लक्ष त्याच्याकडे गेलंच. हृदयात कालवाकालव झाली तिच्या, त्याचे ते भरलेले डोळे बघून. न राहावून तिने त्या नजरेला नजर मिळवली. आसपासची लोकं हळूहळू धूसर झाली, त्यांचा आवाज हळूहळू विरत गेला.. आता तिच्यासमोर फक्त तोच होता.. तिचा समीर.. पण तिच्या भरलेल्या डोळ्यांसमोर आता त्याचा चेहराही धूसर होत होता!

क्रमशः!

🎭 Series Post

View all