चंद्र आहे साक्षीला! - भाग ४४ 

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ४४   

(मागच्या भागात : घशाला भीतीने कोरड पडली असताना तिने उरला सुरला सगळा जीव एकवटून त्याला हाक मारण्यासाठी तोंड उघडलं पण त्याच वेळी एका राकट हाताने तिचं तोंड आवळलं. खूप कष्टाने तिने ओठांपर्यंत आणलेला शब्द तिच्या तोंडातच विरला..  स..मी..र ! )

वर्तमान काळात ..

सानिकाने डोळे किलकिले करून बघितले तेव्हा ती पुन्हा त्याच खोलीत होती. मगाशी ज्या खुर्चीला पिहूला बांधलं होतं त्या खुर्चीवरच. तिने समोर एक नजर फिरवली आणि तिच्या समोर उभ्या असलेल्या माणसाकडे बघून तिच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. तो त्याचे तंबाखूने रंगलेले दात दाखवत तिच्याकडे बघून हसला, "काय मॅडम तुम्ही पण, एक मोबाईल ऍप शिकवायला इथपर्यंत आलात की काय." तो तिच्याजवळ जात म्हणाला. तिच्या अंगावर शिसारी आली. तिने बाजूला तोंड फिरवलं. त्याने त्याच्या हातांनी तिच्या गालाला पकडलं आणि तिचा चेहरा पुन्हा स्वतःकडे वळवला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू मग्रूर होत होते.

"प्रत्येक गोष्टीत टांग अडवायची सवय आहे वाटतं तुला. मूर्ख मुली तुझ्यामुळे आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. का मदत केलीस तू त्या मुलीला पळून जायला?" तिच्या चेहऱ्यावरची पकड मजबूत करत तो म्हणाला. सानिका वेदनेने कळवळत होती. तेवढ्यात त्याच्या क्रूर लाल डोळ्यांत चमक आली.

"मी काय म्हणतो, आपण त्या मुलीऐवजी हिला विकलं तर काय होईल? तिच्यापेक्षा जास्तच भाव मिळेल हिला नाही का." तिच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवत तो म्हणाला. भीतीने सानिकाच्या हातापायातलं त्राण गेलं होतं. त्याच्या घाणेरड्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा येत होता. उरला सुरला जीव एकवटून ती किंचाळली. तशी त्याच्या हाताची एक थप्पड तिच्या गालावर पडली. 

"ए, जास्त आवाज नाही करायचा हां. त्यादिवशी बोललो होतो ना तुला, महागात पडेल मला मारलेली थप्पड. अजून तर खूप काही होणार आहे पुढे. आत्तापासूनच का ओरडतेयस." तो बोलला आणि सानिकाची बोलतीच बंद झाली. तिने इतकावेळ आणलेलं अवसान गळून पडलं. वेदनेने आणि भीतीने डोळ्यांतून पाणी गळत होतं. 

"निघायची तयारी करा रे. ती मुलगी गावात जाऊन आरडाओरडा करायच्या आधी इकडून निघालं पाहिजे." त्याने बाकीच्यांकडे बघून ऑर्डर सोडली. बाकीची माणसं तिच्या आजूबाजूचे बॉक्स घेऊन निघाले आणि हा त्यांचा मोहोरक्या सानिकाचे हात पाय सोडत होता. 

"तुझे हात पाय सोडल्यावर जर तू जराही पळायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. जिवंत राहायचं असेल ना तर गपचूप चालायचं माझ्या पुढे. कळलं?" त्याने तिला दम भरला. तिने भेदरलेल्या नजरेनंच होकार दिला. कुठे घेऊन जाणार आहेत हे मला? आणि मगाशी हा काय म्हणाला? मला विकणार आहेत? कोण आहेत ही माणसं? सानिका तिच्या आजूबाजूला सुटकेचा शेवटचा मार्ग शोधत होती. पण तिच्या शरीराने एव्हाना तिची साथ सोडली होती. खुर्चीतून उठून उभी राहिल्यावर तिच्या दुखावलेल्या पायातून जोरात कळ गेली. पण तेवढ्यात त्या माणसाने तिला पुढे ढकललं, "ए चल गं. जास्त टाईमपास करू नको. स्वतः चालणार आहेस की उचलून नेऊ आता?"

त्याच्या धक्क्याने ती अडखळून समोरच्या भिंतीवर आपटली. कसेबसे हात झटकत ती पुन्हा उभी राहिली आणि त्याने सांगितलेल्या दिशेने चालायला लागली. त्या घराच्या आसपास गाडी आणणं तर शक्य नव्हतं हे तिलाही माहिती होतं. म्हणजे तो पूर्ण उतार चालून त्यांना खालच्या कच्च्या रस्त्यापर्यंत तरी चालावं लागणार होतं. त्यातच तिला एखादी संधी मिळेल का पळायची? आपल्या आसपासचा परिसर नजरेखालून घालत पुढे जात होती ती. त्या माणसाने एक छोटा चाकू तिच्या पाठीशी धरला होता. त्यामुळे तिच्याकडून चुकीला फार वाव नव्हता. अडखळत, अंधारात त्या वाटेवरून ती चालत होती. तिकडून चालत असतानाच तिला तिची आणि समीरची भेट आठवली. इकडेच पळायला आली होती ती पहिल्यांदा कणवलीला आल्यावर. इथल्याच कुठल्यातरी दगडावरून पाय घसरून पडली होती ती आणि घसरत समीरच्या गाडीसमोर जाऊन पोहोचली होती. तेव्हाचा त्याच्या स्पर्श आठवून तिला ह्या परिस्थितीतही हसायला आलं. तेव्हाच मी त्याला ह्या घराबद्दल सांगितलं असतं तर? कदाचित आज ही वेळ आलीच नसती. पण इकडे ह्या आड जंगलात इतकं भयानक काहीतरी घडत असेल ह्याची तेव्हा तिला कल्पनाही नव्हती. आता पश्चात्ताप करून काही फायदा नव्हता. तेवढ्यात तिला समोरच्या झाडाची एक फांदी तुटलेली दिसली. तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. शेवटचा सुटकेचा मार्ग! ती आधारासाठी त्या फांदीला टेकून उभी राहिली आणि त्या माणसाचं लक्ष नसताना तिने हळूच ती फांदी तिच्या पुढे बांधलेल्या हातांच्या मध्ये पकडली. काही पावलं पुढे चालल्यावर दोन्ही हातांनी तिने त्या फांदीवरची पकड घट्ट केली. मागचा माणूस बेसावध असतानाच ती  जोरात मागे वळली. काय होतंय हे कळायच्या आधीच ती फांदी जोरात त्या माणसाच्या हातावर बसली आणि त्याच्या हातातला चाकू अंधारात कुठेतरी उडून पडला. चरफडत त्याने सानिकाला एक शिवी हासडली आणि समोर बघितलं.. पण सानिका? एवढ्या जोरात ती जड फांदी घेऊन गोल फिरताना तिचा तोल गेला आणि ती तिकडच्या उतारावरून घसरत खाली आली. बांधलेल्या हातांमुळे तिला आजूबाजूला पकडताही येत नव्हतं. तशीच घसरत ती खाली येऊन त्या कच्च्या रस्त्यावरच्या एका दगडावर आपटली. 

"आई गं.." तिच्या दुखऱ्या पायावर पुन्हा एकदा तिच्या शरीराचं पूर्ण वजन पडलं होतं. वेदनेने कळवळली ती. उठायचा असफल प्रयत्न करत ती वरून येणाऱ्या त्या माणसाच्या दिशेने बघत होती. डोळ्यांत मूर्तिमंत भीती होती तिच्या. आता पुन्हा नाही सापडू शकत मी ह्याच्या तावडीत. आणि तेवढ्यात तिच्यासमोर कोणीतरी हात पुढे केला. भीतीने थरथरत तिने त्याच्याकडे बघितलं आणि तिचे डोळे भरून आले.. समीर! 

"सानू.." त्याने पटकन पुढे येऊन तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकवले त्याने. इतका वेळ अडवलेले अश्रू आता अनावर झाले होते त्याला. वेड्यासारखा तो तिच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि डोक्यावर ओठ टेकवत होता. 

"सानू.. तू ठीक.." त्याने काही क्षणांसाठीच तिला लांब केलं.. तिच्याकडे बघण्यासाठी.. आणि त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं. तिचा तो लाल झालेला चेहरा, त्यावरचे हातांचे वळ, फाटलेला ओठ, त्यातून येणारं रक्त बघून तो अक्षरशः कासावीस होत होता. जणूकाही त्या जखमा त्याच्याच अंगावर झाल्या होत्या. सानिका अजूनही भीतीने थरथरत होती. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या मागे येऊन उभ्या राहिलेल्या त्या माणसाकडे गेलं. समीर तिला तसंच जमिनीवर बसवून तिच्यासमोर उभा राहिला. त्या माणसाकडे बघत. त्याच्या हाताच्या मुठी रागाने वळल्या होत्या. कपाळावरची शीर फुगली होती. 

"ए हिरो.. चुपचाप निघायचं इकडनं काय? त्या पोरीला मी घेऊन जाणार आहे. आत्ता इथे राडा करायला वेळ नाहीये माझ्याकडे." समीरकडे दुर्लक्ष करत त्याने पुढे जाऊन सानिकाचा हात पकडला. सुटायची व्यर्थ धडपड करत होती ती. तिचा विरोध बघून त्याचं डोकं फिरलं आणि त्याने तिला मारायला हात वर उचलला. पण त्याचा हात तसाच हवेत उलटा फिरला. गुरासारखा ओरडला तो. समीर त्याचा खांद्यापासून निखळलेला हात मागे धरून उभा होता. रागाने थरथरत होता तो. पुढची काही मिनिटं त्याने त्या माणसाला एवढा तुडवला की सानिकाला तो मरेल अशी भीती वाटायला लागली.

"समीर, सोड त्याला. मरेल तो." ती ओरडली. पण तिचे शब्द त्याच्या कानावरच पडत नव्हते. तिला झालेल्या प्रत्येक त्रासाचा बदला घेतल्याशिवाय तो शांत होणार नव्हता. रागाने आंधळा झाला होता तो. फक्त आजचा नाही, कालपासून त्याच्या आतमध्ये धुमसत असलेला राग त्या माणसावर बाहेर निघत होता. शेवटी सानिका जवळच पडलेल्या एका काठीच्या मदतीने उभी राहून त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात पकडला. "समीर..!"

तिच्या स्पर्शाने त्याच्या मनात लागलेली आग अचानक शांत झाली. कुठल्यातरी ट्रान्समधून तो बाहेर आला. त्याच्या समोर तो माणूस कळवळत पडला होता. त्याने त्याची नजर सानिकाकडे वळवली. तिला बघून त्याचा सगळा आवेश एका क्षणात उतरला. गेल्या काही तासांमध्ये त्याच्या मनाची झालेली घालमेल तिला बघून थांबली होती. तिला कायमचं गमवायची भीती आता त्याच्या डोळ्यांतून हळूहळू जात होती. जवळपास गमावलंच होतं त्याने तिला आज. कोणाच्या चुकीमुळे? तिच्याकडे बघत तो पुढे आला. तिला मिठीत घेऊन तो म्हणाला "आय एम सो सो सॉरी सानू. तू.. तू ठीक आहेस ना? तुला काही झालं असतं तर आयुष्यात स्वतःला माफ नसतो करू शकलो  मी. नाही राहू शकत गं मी तुझ्याशिवाय. प्लिज मला माफ कर. प्लिज.." पण त्याचे ते शब्द ऐकायला ती शुद्धिवरच नव्हती. दिवसभराच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाने त्याच्या मिठीतच तिची शुद्ध हरपली होती.   

"सानू.. सानू...! प्लिज डोळे उघड ना. प्लिज. इट्स ऑल ओव्हर नाऊ. माझ्याकडे बघ ना. मी आलोय ना आता. तुला काहीच होऊ नाही देणार मी. प्लिज डोळे उघड..." तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो तिला विनवण्याच करत होता. मागून चंदू आणि बाकीचे गाडीवरून येत होते. गावात जाऊन पाहू सगळ्यांना घेऊन आली होती. रस्त्याच्या मध्यभागी सानिकाला घेऊन बसलेल्या समीरला बघून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. नक्की काय झालंय?

"समीर? तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलं पाहिजे. मी गाडी घेऊन आलोय." चंदूने समीरच्या खांद्यावर हात ठेवला. तसा समीर घाई घाईने उठला. त्याने तिला उचलून गाडीमध्ये ठेवलं आणि तो तिकडून निघाला.

गावकऱ्यांनी समोर पडलेल्या त्या गुंडांच्या म्होरक्याला तर ताब्यात घेतलंच होतं पण पिहूच्या सांगण्याप्रमाणे बाकी दोन गुंडांचा शोध घ्यायला पण त्यांनी माणसं आजूबाजूच्या परिसरात पाठवली होती. वसंतरावांनी फोन करून बोलावलेले पोलिसही एव्हाना घटनास्थळी पोहोचले होते. गावावर, पिहूवर आलेलं संकट आता टळलं होतं. पण सानिका?

क्रमशः!

🎭 Series Post

View all