चंद्र आहे साक्षीला! - भाग ४३  

Mumbai girl Sanika faces unexpected hurdle in her career and is forced to go on a leave few months! She takes this opportunity to rekindle her childhood memories in her birth place.. a small town in Konkan! There an unexpected stranger knocks into he

चंद्र आहे साक्षीला! - भाग ४३  

मागच्या भागात :

मनाशी काहीतरी विचार करून सानिका तिच्या जॉगिंगच्या रस्त्याला लागली. जवळजवळ धावतच होती ती आता. "पिहू! मी येतेय बाळा, फक्त तोपर्यंत स्वतःची काळजी घे." )

सानिका त्या घरापाशी पोहोचली तेव्हा तिथे आधीच दोन माणसं बाहेर उभी होती. घरामध्ये एक झिरोचा पिवळा बल्ब जळत होता. सानिका झाडांच्या आडून परिस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होती. हे सगळे इकडे आहेत म्हणजे पिहू सुद्धा इकडेच असली पाहिजे. ती हळूच झाडांतून वाट काढत त्या घराच्या मागच्या बाजूला पोहोचली. सुदैवाने तिकडच्या दाट झाडीमुळे तिला अजूनतरी कोणी बघितलं नव्हतं. कशीबशी ती मागच्या खिडकीपाशी आली. त्यातून आत डोकावून पाहताना तिला एका खुर्चीला बांधलेली पिहू दिसली. तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. बिचारी भेदरलेल्या नजरेने आजूबाजूला बघत होती. चेहरा एकदम मलूल झाला होता तिचा. तिच्या आसपास कोणी दिसत नव्हतं. तिला ठेवलेल्या खोलीचा दरवाजा बंद केला होता. सानिका खिडकीच्या थोडी पुढे जाऊन त्या दरवाजापाशी गेली. हा त्या घराचा मुख्य दरवाजा नव्हता. पण तिकडून तिला समोरच्या बाजूला उभी असलेली ती माणसं दिसत होती. तिने दरवाजा चेक केला त्याला नुसतीच कडी घातली होती बाहेरून. तिने ती हळूच उघडली. पण तरीही दरवाजा जरा जुना असल्यामुळे त्याचा आवाज झालाच. सानिका श्वास   रोखून उभी होती. दोन मिनिटं वाट बघून ती आत शिरली आणि दरवाजा पुन्हा लोटून घेतला. तिला समोर बघून पिहूच्या विझलेल्या डोळ्यांमध्ये चमक आली. सानिकाने खुणेनेच तिला गप्प राहायला सांगितलं. तिने पटकन पुढे जाऊन तिचे हात पाय सोडले आणि तोंडातला बोळा काढला.

"सानिकाताई, तू इकडे कशी आलीस? तुला कसं कळलं मी इकडे आहे? हे लोकं खूप भयानक आहेत. मला खूप भीती वाटतेय." ती रडतच सानिकाच्या गळ्यात पडली.

"शूsssss, पिहू मी आलेय ना आता इकडे, आपण सगळं नीट करू हां आता. मला सांग त्यांनी तुला काही केलं नाही ना." सानिकाला वेगळीच चिंता होती. पिहूने नकारार्थी मान हलवली तसा सानिकाने निःश्वास सोडला. त्या तिकडे बोलत असतानाच सानिकाला कोणाचीतरी चाहूल लागली. दोघींना घाबरून घाम फुटला होता. कोणीतरी कुठल्याही क्षणी त्या खोलीचं दार उघडून आत येणार होतं. तेवढ्यात सानिकाला कल्पना सुचली. जवळच पडलेला एक लोखंडी खांब हातात घेऊन ती पिहूला तिकडेच सोडून दरवाज्यामागे जाऊन उभी राहिली. वेळ खूप महत्वाचा होता. बाहेरच्या बाकीच्या माणसांना काही संशय यायच्या आधीच ह्या आत येणाऱ्या माणसाचा बंदोबस्त करायचा होता. सानिका श्वास रोखून उभी राहिली होती. पिहू भयभीत नजरेने दाराकडे बघत होती. हळूहळू तो दरवाजा उघडला आणि एक पोरगेलासा मुलगा आत आला. पिहूला खुर्चीवरून सुटलेला बघून त्याने बाकीच्यांना आवाज द्यायला तोंड उघडलं पण त्याआधीच सानिकाने तिच्या हातातला रॉड त्याच्या डोक्यात मारला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला. पिहू डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. सानिकाचेही हात थरथरत होते. तिने पटकन पुढे जाऊन त्याच्या नाकाला हात लावला. जिवंत होता तो. फक्त बेशुद्ध झालेला. सानिका पटकन धावत पिहूकडे आली. दोघी एकमेकींचा हात धरून बाहेर पडत असतानाच त्यांच्या दुर्दैवाने मगाशी बाहेर उभे असलेले दोघं तिकडे आले आणि त्यांनी हा दरवाजा उघडलेला बघितला. त्या दोघींना तिकडून पळताना बघून तू धावतच त्यांना पकडायला आले. सानिकाने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला. दुसरा पर्याय नव्हता आता तिच्याकडे. पटकन वळून तिने पिहूकडे बघितलं.

"पिहू मी पळ म्हंटलं कि पळायचं ओके? वेळ कमी आहे. मागे न बघता पळत सूट आणि आपल्या गावातल्या लोकांना घेऊन ये ओके?" ती पटकन तिला म्हणाली. एव्हाना ती माणसं खोलीच्या दारातून आत शिरली होती. सानिकाकडे बघून दोन मिनिटं ते दोघंही गोंधळले. त्यांच्या बॉसला तिनेच सणसणीत लगावली होती. नकळत त्यांचा हात गालाकडे गेला. तेवढा एक क्षण सानिकासाठी पुरेसा होता. तिने पूर्ण ताकद लावून दोघांच्याही पोटात दणकून लाथ घातली. दोघं पार कळवळले. त्यांची ती अवस्था बघून सानिका स्वतःवरच खुश झाली, "नॉट बॅड सानू. अजून चांगलं जमतंय की." येस! कराटे ब्लॅकबेल्ट होती ती! अर्थात अलीकडे ह्याचा फार वापर करावा लागला नसल्यामुळे तिला खात्री नव्हती तिला जमेल की नाही पण 'ऑन पॉईंट' बसली होती तिची लाथ. 

"पिहू पळ." ते दोघं उठायच्या आधीच तिने पिहूला बाहेर पाठवलं. सानिकाला तिकडे सोडून पिहूचा पाय निघत नव्हता पण तिला सानिकाच्या सूचना टाळायच्या नव्हत्या. नाहीतर त्या दोघींच्या जीवाला धोका होता. जिवाच्या आकांताने पिहू तिकडून पळत सुटली. डोक्यात एकच नाव होतं तिच्या, समीरदादा! लवकरात लवकर तिला त्याच्या पर्यंत पोहोचायचं होतं.

इकडे ते दोन गुंड दात ओठ खात कळवळत उभे राहिले. समोरच्या मुलीला कमी लेखायची चूक त्यांनी केली होती ते ती परत करणार नव्हते. सानिकाचा पुढचा वार खूप कठीण असणार होता. त्यातल्या एकाने पुढे येऊन तिचे मोकळे केस हातात धरून खेचले आणि तिच्या कानाखाली मारली. सानिका कळवळली. त्याचा इम्पॅक्ट एवढा जबरदस्त होता की तिच्या ओठातून रक्त येत होतं. तिच्या नितळ चेहऱ्यावर त्याच्या हाताचे वळ उठले होते. क्षणभर डोळ्यांसमोर काजवे चमकले तिच्या. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. कसंबसं स्वतःला त्याच्या दिशेने वळवत तिने पूर्ण ताकदीनिशी त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये आपला गुढघा मारला. आता काजवे बघायची वेळ त्याच्यावर आली होती. कशीबशी त्याच्या तावडीतून सुटत असतानाच समोरचा दुसरा माणूस तिच्यादिशेने धावत आला. ती पटकन खाली वाकली. तिच्या अचानक वाकण्यामुळे तिला पकडताना त्याचा बॅलन्स गेला आणि तो समोर भिंतीवर आपटला. ह्यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाहीये हे तिला एव्हाना कळलं होतं. तिला लवकरात लवकर तिकडून बाहेर पडणं गरजेचं होतं.

पिहूला पळत पुढे जायला थोडा वेळ मिळावा फक्त म्हणूनच ती त्यांना अडवून ठेवायचा प्रयत्न करत होती. पण आता तिला ते शक्य नव्हतं. त्यांना तिकडे पडलेलं बघून ती धावत खोलीच्या बाहेर आली. बास आता हा दरवाजा लावून त्याला बाहेरून काडी घातली कि काम फत्ते! तिने पूर्ण जोर लावून तो दरवाजा ओढला पण त्या गंजलेल्या जुन्या दरवाजाने तिला दगा दिला. काही केल्या तो दरवाजा पूर्ण बंद होत नव्हता. आत पडलेले दोघं एव्हाना उठून पुन्हा तिच्या दिशेने यायला सज्ज झाले होते. दरवाजा तसाच सोडून सानिका मागच्या जंगलात पळाली. अंधारात तिला समोरचं काहीच दिसत नव्हतं. हा काही तिच्या रोजच्या सवयीचा रस्ता नव्हता. त्यात वेड्या वाकड्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या तिच्या हातापायाला घासत होत्या. कशीबशी झाडांचा आधार घेत ती पुढे जात होती. मागून आलेले दोघे टॉर्चलाईट मध्ये तिला शोधत होते. चाचपडत पुढे जात असतानाच ती एका झाडाच्या मुळात पाय अडकून पडली आणि तिच्या डाव्या पायातून वेदनेची तीव्र सणक गेली. पुन्हा त्या पायावर वजन टाकून तिला उठता येत नव्हता. मागून येणाऱ्या गुंडांपासून लपण्यासाठी त्याच झाडाच्या जाड बुंध्यामागे बसली ती.

थरथरत्या हाताने तिने फोन बाहेर काढला आणि तिने समीरला फोन लावला. एकदा..दोनदा.. तीनदा.. पण त्याने उचललाच नाही. ती पॅनिक होऊन बाकीच्यांना फोन करत होती पण गावातल्या फार लोकांचे नंबर्स नव्हते तिच्याकडे. ती इकडे आल्यापासून तिच्या सगळ्या कठीण प्रसंगात एकाच व्यक्तीने तिला कायम मदत केली होती.. समीर! पण आज तोच तिच्याजवळ नव्हता. सतत फोन करत होती ती त्याला.. आणि तेवढ्यात तिच्या फोनच्या बॅटरीने असहकार पुकारला. मागून येणारी दोन लोकं तिच्या जवळ पोहोचत होती. तिच्या फोनचा लाईट बघून त्यांना ती सापडणार होती. तिने पटकन फोनवर मेसेज टाईप केला 'हेल्प.. पिहू.. गावाबाहेर.. जंगल' आणि तिच्या ओळखीच्या गावातल्या सगळ्यांना पाठवून दिला. शेवटचे काही क्षण होते तिच्याकडे आता. त्या माणसांमधलं आणि तिच्यामधलं अंतर झपाट्याने कमी होत होतं. तिने पुन्हा समीरला फोन लावला, "समीर प्लिज फोन उचल, आय नीड यु." पण तेवढ्यात तिच्या फोनची बॅटरी संपली आणि तिचा फोन बंद झाला. हतबलतेने तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते.

तेवढ्यात तिचं लक्ष समोर पसरलेल्या विस्तीर्ण जंगलातून पलीकडे दिसणाऱ्या तिच्या गावाच्या वाटेकडे गेलं. तिला बाईकचे दोन मिणमिणते दिवे दिसले त्या वाटेवर. तिच्याच दिशेने येत होते ते. अश्रूंनी भरलेल्या तिच्या डोळ्यांत एक शेवटची आशा तरळली, तिला वाचवायला आला होता का तो? तिच्या मनातलं त्याला सांगायच्या आधीच तिला काही झालं तर? नाही .. नाही.. मला त्याला सांगितलंच पाहिजे. आमची शेवटची आठवण एक गैरसमज नाही असू शकत. त्याला सत्य कळलंच पाहिजे. कशीतरी धडपडत ती उभी राहिली. घशाला भीतीने कोरड पडली असताना तिने उरला सुरला सगळा जीव एकवटून त्याला हाक मारण्यासाठी तोंड उघडलं पण त्याच वेळी एका राकट हाताने तिचं तोंड आवळलं. खूप कष्टाने तिने ओठांपर्यंत आणलेला शब्द तिच्या तोंडातच विरला..  स..मी..र !

क्रमशः!

🎭 Series Post

View all